आप्पांनी १९२६ साली ‘रत्नाकर’ मासिकातून भारतीय संगीतावर पहिला लेख लिहिला. त्यानंतर ‘प्रतिभा’, ‘यशवंत’ अशा मासिकांमधून त्यांनी त्या वेळच्या संगीत, नृत्य, चित्रकला आणि क्रीडाविश्वामधल्या नवनव्या प्रवाहांची नोंद करून ठेवली. ग्वाल्हेर घराण्याचा संपूर्ण इतिहासही त्यांनी लिहिला. तेव्हा ते कोल्हापूरला होते. त्यानंतर पुण्याला आल्यावरही पुण्याच्या सांस्कृतिक वर्तुळात एक जाणकार रसिक म्हणून सर्व कलाकार त्यांचा आदर करू लागले. फडक्यांनी आपला अविष्कार पहावा, त्यांनी आपल्याला शाबासकी द्यावी यासाठी कलाकार त्यांना भेटू लागले.
त्यामुळं ‘दौलत’मधला प्रत्येक दिवस कुणाची भेट घडवून आणेल, हे कुणालाच माहीत नसायचं. हिराबाई बडोदेकर, केशवराव भोळे, अरविंद मंगळुरकर ही तर स्नेही मंडळी. नेहमीच येणारी-जाणारी; पण काही अगदी आगळी मंडळी आली की, ‘दौलत’ झगमगून उठायची. त्यातले एक गायक, संगीतकार आणि नट म्हणजे मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर. गोरे गोमटे, बुटकेसे कृष्णराव स्वच्छ शुभ्र धोतर, रेशमी सदरा कोट अशा वेषात असायचे. भुवयांमधे गंधाचा टिळा आणि तोंडात पान. ते आले की आप्पा काम बंद करायचे. मग त्यांचं सांगितिक गप्पासत्र सुरू व्हायचं. मधून मधून कृष्णराव गाऊन दाखवायचे. जुन्या आठवणी जाग्या व्हायच्या. कृष्णरावांचा संगीत साधनेचा प्रवास डोळे दिपवणारा होता. सहा वर्षांच्या कृष्णानं ‘संत सखू’ नाटकात विठ्ठलाची भूमिका केली आणि लोकांची हृदयं जिंकून घेतली. त्यानंतर १४ वर्षांच्या कृष्णाची पहिली मैफल इतकी गाजली की, शंकराचार्यांनी त्याला ‘संगीत कलानिधी’ अशी पदवी दिली. त्यानंतर त्यांनी बालगंधर्वांच्या गंधर्व कंपनीसाठी ‘मेनका’, ‘कान्होपात्रा’ अशा नाटकांना संगीत दिलं. त्यांचं संगीत असलेल्या ‘कुलवधु’ नाटकातली जोत्स्ना भोळेंची गाणी तर अजरामर आहेत. प्रभात कंपनीच्या ‘धर्मात्मा’, ‘संत एकनाथ’, ‘पडोसी’, ‘अमरज्योती’ या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं होते. कृष्णराव आले की आप्पा पानदान काढायचे. मग तोंडात ठेवलेल्या विड्यांपेक्षा दोन मित्रांच्या गप्पा जास्त रंगायच्या.
असेच आप्पांचे आणखी एक लाडके मित्र होते, पंडित जगन्नाथबुवा पुरोहित. जगन्नाथबुवा मुंबईहून आप्पांना भेटायला यायचे. ते कोल्हापूरच्या जनार्दन पुरोहितांचे चिरंजीव होते. आग्रा घराण्याचे ख्यातनाम गायक होते. आणि विलायत हुसेन खान हे त्यांचे गुरू होते. त्यांची गुरूभक्ती इतकी पराकोटीची होती की, बुवांनी रचलेल्या बंदिशींच्या शब्दात ते खानसाहेबांचा उल्लेख ‘प्राणपिया’ आणि स्वतःचा उल्लेख ‘गुणीदास’ असा करत. ते आले की आप्पांचे ‘दुकान’ बंद होई. बुवा टेबलावर ताल धरत आप्पांना नवी बंदिश ऐकवत. अशा खाजगी मैफली पायाशी बसून ऐकण्याचा आनंद मी अगदी लहान वयात लुटला आहे. त्यांच्या आयुष्यातली एक अद्भुत घटना त्यांनी आप्पांना सांगितलेली आठवते. बुवा एकदा आगगाडीनं प्रवास करत होते. त्यांना झोप लागली. आणि त्यांनी स्वप्नात विलायत हुसेन साहेबांना गाताना ऐकलं. झोपेतून जागं झाल्यावरही त्यांना ते स्वर स्पष्ट आठवले. आणि त्या स्वररचनेतूनच त्यांनी जोगकंस रागाची निर्मिती केली.
नुकताच चार ऑगस्टला आप्पांच्या जन्मतिथीच्या निमित्तानं पुणे आकाशवाणीनं त्यांची एक जुनी मुलाखत प्रसारित केली. त्यातलं एक वाक्य ऐकून आप्पांच्या संगीत प्रेमाचा एक नवाच पैलू मला समजला. आप्पा म्हणाले, ‘मी जे भरपूर संगीत ऐकलं त्यामुळं माझ्या भाषेला नादमाधुर्य मिळालं.’ संगीतानं मराठी भाषेला दिलेली ही केवढी मूल्यवान ‘दौलत’ म्हणायची.
या दोन्ही असामान्य कलाकारांवर आप्पांनी प्रदीर्घ लेख लिहिले आहेत. प्रभा अत्रे तेव्हा तडफदार तरूण गायिका होत्या. त्यांचे वडील आप्पांचे मित्र होते. त्या आपल्या आई-वडलांबरोबर आप्पांना भेटायला यायच्या. तेजस्वी सावळं सौंदर्य, टपोरे डोळे, लांबसडक केस. फार सुंदर दिसायच्या. (अजूनही दिसतात.) आप्पांना त्यांच्या गुणांचं फार कौतुक होतं.
थोडी नंतरची म्हणजे १९७३-७४ ची गोष्ट. मी तेव्हा माहेरी आले होते. कोकणातलं एक तरूण जोडपं आपल्या चार वर्षांच्या चिमुरड्या मुलीला घेऊन आप्पांना भेटायला आले. आप्पांनी तिचं गाणं ऐकावं अशी त्यांनी विनंती केली. आप्पा आनंदानं तिचं गाणं ऐकायला बसले. अतिशय गोड आवाज आणि गाण्याची समज तिच्या अंगी होती. धीटपणाही होता. आप्पांनी तिला शाबासकी दिली आणि आई-वडलांना प्रेमानं सल्ला दिला. या गुणी मुलीला स्टेजवर आणायची घाई करू नका. तिला योग्य गुरूची तालीम मिळू दे. ती नक्कीच नाव काढेल. आई-वडील सुज्ञ होते. त्या मुलीनं पंडित जसराजांकडून दहा वर्षं तालीम घेतली आणि ती प्रसिद्ध पार्श्वगायिका झाली. तिचं नाव साधना घाणेकर उर्फ साधना सरगम.
पद्माताईंच्या मैफलीनंतर अनेक मैफली झाल्या. अरविंद गजेंद्रगडकरांचं बासरी वादन, बापूरावांचं पखवाज वादन, सुशिलाराणी पटेल, जयमाला शिलेदार यांचं गायन, पद्माकर गोवईकरांचं गीत रामायण… ‘दौलत’ खऱ्या अर्थानं रसिकांना आनंद देणारी वास्तू ठरली.
गीतांजलि अविनाश जोशी या ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके यांच्या कनिष्ठ कन्या आहेत. त्या कवयित्री आहेत. ‘घुंगुरमाया’, ‘हळवे दहिवर’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ८०० वर्षांतील स्त्री काव्याचं संकलन त्यांनी ‘शततारका’ या पुस्तकात केलंय. ना. सी. फडके यांच्या साहित्याचा मागोवा घेणारं ‘केशराचा मळा’ या पुस्तकाचं संपादन आणि ‘शारदीय मोरपिसे’ यात दीपाली दातार यांच्यासह विविध कवींच्या कवितांच्या जन्मकथा त्यांनी उलगडून सांगितल्या आहेत. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर ‘जॉर्ज धुक्यात हरवण्याआधी’ ही एकांकिकाही त्यांनी लिहिली आहे.
अप्रतिम आणि समृद्ध आठवणी! 💐