बाईच्या हातात स्वयंपाकघर का नको?

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-abhijit-sonawane-ajubaju-baichya-hatat-swayampakghar-ka-nako-sonja-punz-unsplash-1

।। १ ।।
घर आणि स्वयंपाकघर यांचा संबंध आहेही आणि नाहीही; पण स्वयंपाकघर नसेल तर घर पूर्णतः कोलमडेल असं मला अजिबात वाटत नाही. घर ही संकल्पनाच स्वयंपाकघर आहे म्हणून सुरू आहे, असंही माझं मत नाही. घराला असणारं ‘घरपण’ हे स्वयंपाकघर केंद्रित असावं, हे न पटणारं आहे. घर ही एकमेकांना आदर आणि आधार देण्याची गोष्ट व्हायला हवी, असं मला वाटतं. हा आदर आणि आधार स्वयंपाकघराच्या अनुपस्थितीतही देता येऊ शकतो.

।। २ ।।
घरात स्वयंपाक घर असण्याचा एक जबरदस्त तोटा म्हणजे बाईचं आयुष्य. बाईच्या हाती स्वयंपाकघर सोपवताना तिला एक प्रश्न विचारायला जायला हवा की, ‘तुला या स्वयंपाकघरात करिअर करायचं आहे काय?’ तिची त्याला पूर्ण आनंदानं संमती असेल, तर बिनदिक्कत तिच्या ताब्यात स्वयंपाकघर सोपवावं आणि मग अशा घरात स्वयंपाकघर टिकवून ठेवावं; पण जर तिला स्वतःच्या स्वयंपाकघरात ‘करिअर’ करायचं नसेल, तरीही ती स्वयंपाकघरात राबत असेल, तर यासारखी दुःखी, वेदना देणारी गोष्ट नाही. प्रत्येक माणसाला आयुष्य एकदाच मिळतं, बाईही त्यात आलीच. घरातला तथाकथित पतीदेव आणि मुलं यांचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारून, त्याग करून ती एकदाच मिळणारं आयुष्य स्वयंपाकघरासाठी खर्च करते. माझं असं निरीक्षण आहे, बाईच्या या आयुष्य खर्च करण्याला ती ज्यांच्यासाठी रोज जगण्याचे घास बनवते त्यांच्याकडून सलगपणे किंमत दिली जातेच असं नाही. बऱ्याचवेळा ती घरात कायम वावरणारी, राबणारी म्हणून तिला कायम गृहीतच धरण्यात येतं. हे गृहीत धरणं म्हणजे स्वयंपाकघराला आपलं पूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या बाईचा अपमान आहे, असं मला वाटतं. दुसरं असंही एक वाटतं, ते म्हणजे घरात स्वयंपाकघर आहे, तर मग घरातल्याच पुरुषांना बाहेर खाण्याच्या अमाप सवयी का? बाहेरचं खाणं घरातल्यापेक्षा आवडणं, हा देखील मला आपलं संपूर्ण आयुष्य फक्त स्वयंपाकघरासाठी खर्च करणाऱ्या बाईचा अपमानच वाटतो. तिला मनातून वाटत, जाणवत असणारंच की आपल्याला अमुक एक चांगलं करता येत नाही, म्हणून माझा नवऱ्याला बाहेरची चव आवडते. ही अव्यक्त खंत तिच्या मनात कधी ना कधी उगवत असणारंच. खायचंच असेल बाहेर, इतकीच आवडत असेल बाहेरची अमुक एक चव, तर त्या चवीत घरातल्या बाईलाही सहभागी करून घ्यावं; पण असंही कमी दिसतं. घरात राबणाऱ्या बाईपेक्षा पुरुषांनाच खाण्याचे अड्डे जास्त माहीत असतात. बाईच्या वाट्याला त्या बाहेरच्या पदार्थांची चव केवळ ऐकण्यातूनच घ्यावी लागते. मुद्दा फक्त एवढाच आहे, की बाई स्वयंपाकघरात देत असलेल्या वेळेचा आणि तिच्या स्वयंपाक कलेचा आदर राखला जायला हवा. त्यात चुकूनही अनादर नको.

यानिमित्तानं मला उगाचच वाटतं की साठी-सत्तरी ओलांडलेल्या आणि पूर्णवेळ स्वयंपाकघरात राबलेल्या बायकांकडून एक प्रश्नावली भरून घ्यावी. ‘स्वयंपाकघरात खरंच तू रमलीस का?’, ‘दुसरं काय करावं वाटत होतं आयुष्यात?’, ‘केलेला स्वयंपाक घरच्यांच्या विनातक्रार पोटात जात होता का?’, ‘तुझ्या स्वयंपाकाबद्दल घरच्यांची काय मतं आहेत, असं तुला वाटतं?’, ‘समजा तू स्वयंपाक केलाच नसता या घरात, तर इतकी वर्षं टिकली असतीस का?’, ‘स्वयंपाक येत होता म्हणून इथवर पोचलीस का या घरात?’
… स्वयंपाक-घर-कुटुंब यांच्या अवतीभोवती फिरणारे असे खूप प्रश्न या प्रश्नावलीत असावेत.

असे विविध प्रश्न विचारून स्वयंपाकघरासंबंधी साठी-सत्तरीच्या महिलांची नेमकी मतं काय आहेत, हे जाणून घेतल्यास बाईचं स्वयंपाकघरातच अडकलेलं नेमकं दुःख बाहेर येईल. वर्षानुवर्षं उंबऱ्याआड लपलेल्या वेदनेला वाचा फुटेल. ‘इतकं केलं यांच्यासाठी.. आणि हे असे निघाले..’ हे असं निराशेचं वाक्य तर हाती लागणार नाही ना, याची मात्र उगाचच भीतीही वाटते.

या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये थोडी जरी निराशा, नकारात्मकता आढळली, तर समजावं की त्या घरानं बाईला स्वतःसाठी वापरलं. तिनं समर्पित केलेल्या आयुष्याचा अनादर केला. तिला एकदाच मिळालेल्या आयुष्याचं मोल जाणलं नाही. तिच्या आयुष्यातल्या मौल्यवान वेळेचा चुथडा केला.

।। ३ ।।
घरात स्वयंपाक घर नसावं, या विषयाला माझं समर्थन असलं तरी एक गोष्ट मात्र मला आग्रहानं सांगाविशी वाटते, ती म्हणजे घरातल्या प्रत्येकाला स्वतःपुरता स्वयंपाक बनविता यायलाच हवा. ‘माझा नवऱ्याला ना फक्त चहा करता येतो’, ‘मला ना त्यांच्या चहाचं काहीच बघावं लागत नाही’ अशा आशयाची वाक्यं मोठ्या कौतुकानं ऐकवणाऱ्या अनेक बायका भेटतील. जगण्यासाठीचा श्वास आपण स्वतःचा स्वतः घेतो. मात्र हा श्वास घेण्यासाठी जी ऊर्जा अन्नातून मिळते, त्या अन्नाची निर्मिती स्वतःला करता येत नाही, हे मला कायम चुकीचं वाटतं. म्हणूनच स्वयंपाक शिकणं हा शालेय अभ्यासक्रमाचाच भाग व्हायला हवा, असं मला आग्रहानं वाटतं. भले नंतर गरज पडो तो करण्याची किंवा न पडो, स्वतःची भूक शमवण्याइतपत तरी रोजच्या खाण्यातले पदार्थ प्रत्येकाला यायलाच हवेत. कार्यानुभवाचा तास असायचा शाळेत. त्यात अनेक गोष्टी केल्या. अगदी कागदी होड्यांपासून ते दोरीनं हलणाऱ्या हसऱ्या माणसापर्यंत. त्याचा उपयोग सलगपणे झाला नाही नंतरच्या आयुष्यात. पण तरीही ते शिकणं वाया नाही गेलं. वेळ आली कागदी होडी बनविण्याची तर मनात त्याची कृती पक्की असतेच. घ्यायचा कागद की करायची होडी. इतकी पक्की. तसं या स्वयंपाकाचं हवं. स्वतःचं खाणं स्वतःला बनवायला येणं, तेही कुणाच्याही मदतीशिवाय, हे छोटुकलं शिक्षण प्रत्येकालाच हवं. खाणं बनवणं, ही गोष्ट केवळ स्त्री-केंद्रित असू नये.

स्वयंपाकात बायकोला पुरुषानं मदत करणं, यातला ‘मी तिला ‘मदत’ करतो’ हा भावही मला चुकीचा वाटतो. मी तिला मदत करतो याचा अर्थ मूळचं ते तिचंच काम आहे; पण मी ते माझ्या मदतीतून हलकं करतो. असा त्याचा अर्थ होतो. खाणं ही दोघांची गरज असेल, तर ते कुण्या एकाचंच काम कसं होऊ शकेल. ते निरोगी जगण्यासाठीचं कर्तव्य का नाही होत?

।। ४ ।।
घरात स्वयंपाकघर नसावं, मग रोजच्या जेवणाचं कसं करायचं? सकस जेवण करणं ही माणसाची आवश्यक गरज आहे, ही गरज स्वयंपाकघरातूनच पूर्ण होऊ शकते. याला माझं पूर्ण समर्थन आहे. पण सकस जेवण मिळण्याची गरज केवळ स्वतःच्याच घरात असलेल्या एका स्वयंपाकघर नामक खोलीतूनच ती पूर्ण होऊ शकते. असं वातावरण किमान आज तरी शहरात नाही. पुण्यासारख्या शहरात स्वतःचं हक्काचं स्वयंपाकघर नसणारी, नोकरीनिमित्त शिक्षणानिमित्त दुसऱ्याच्या स्वयंपाकघरावर अवलंबून असणारे अनेकजण आहेत. अर्थात ते स्वतःच्या कुटुंबाबरोबर राहत नसले तरीही ते स्वयंपाकघर नसणाऱ्या आयुष्याचे एक भाग झाले आहेत. मला इथं एक वेगळी संकल्पना मांडावीशी वाटते. ती संकल्पना म्हणजे ‘सामूहिक स्वयंपाकघरा’ची. परदेशात काही ठिकाणी ही संकल्पना अस्तित्वात असेल, असं वाटतं. मला त्याबाबत फारशी माहिती नाही. स्वयंपाकघर नसलेलं घर, या माझ्या विधानाचं मूळ ‘सामूहिक स्वयंपाकघर’ हेच आहे. मी असं एक स्वप्नं पाहतो की एखाद्या बांधकाम व्यावसायिकानं, अशा पद्धतीनं एखादी गृहरचना करावी. या गृहरचनेत प्रत्येक मजल्यावर आठ-दहा घरं असतील. आणि या आठ-दहा घरांचं मिळून एक भलंमोठं स्वयंपाकघर असेल. त्या स्वयंपाकघरात एकाचवेळी एकत्र जेवायला बसण्याची सोय असेल. किंवा आपापल्या घरापुरतं एखाद्याला जेवायचं असेल, तर प्रत्येक घरानुसार एक स्वतंत्र जेवण खोली असेल. घरातून (फ्लॅटमधून) बाहेर पडायचं.. पंधरा-वीस पावलं चालायचं.. की आपण त्या खोलीत येऊ.. इतक्या कमी अंतरावर ही खोली असावी. नाहीतरी घरातल्या घरात आपण स्वयंपाकघरात जाण्यासाठी चार-पाच पावलं चालतोच की.. या जेवण खोलीची कुटुंबानुसार सजावट करण्याचीही मुभा असावी. म्हणजे सध्याच्या घरांची रचना १ बीएचके, २ बीएचके अशी असते. तर या प्रकारात ती फक्त १ बीएच+ १ जेवण खोली, २ बीएच+१ जेवण खोली अशी असेल. फक्त यातली जेवण खोली ही त्या त्या मजल्यावरच्या स्वयंपाकघराच्या जवळपास कुठंतरी असेल. इतकंच.

सामूहिक स्वयंपाकघर हे चोवीसतास तुमच्या सेवेत असेल. ज्या वेळी जे पदार्थ हवे आहेत, ते बनवून देण्याची तिथं सोय असेल. हे स्वयंपाकघर त्या मजल्यावरील फ्लॅटधारक एकत्रितपणे चालवतील. त्या आठ-दहा कुटुंबांसाठी जो काही किराणामाल खरेदी होईल, तो एकत्रितपणे खरेदी केला जाईल. त्यामुळं खर्चातही बचत होईल. फक्त स्वयंपाक बनवणारे हे मात्र तिथं कर्मचारी म्हणून काम करतील. समजा एखाद्याला वाटलंच की स्वतः काही बनवावं, तर तेही स्वातंत्र्य इथं असेल.

अशा प्रकारच्या संकल्पनेत मजल्यांवरील आठ-दहा घरांच्या सोबतीनं एकत्र जेवण घेता येईल. (समजा एखाद्याला नको वाटलं एकत्र जेवण, तर जेवण खोली आहेच.) आज फ्लॅट संस्कृतीत एकमेकांची तोंडंही पाहता येत नाहती. प्रत्येकजण कोंडला गेला आहे, तर हे कोंडलेपणही यामुळं निघून जाईल. मजल्यावरील आठ-दहा घरं एकमेकांशी एकोप्यानं जोडली जातील, हाही हेतू आपोआप साध्य होईल. यातून एक गोष्ट होईल, ती म्हणजे ज्याला स्वयंपाकघरापासून दूर राहायचंय त्याला ते राहता येईल. आणि ज्याला स्वयंपाकघराशी जोडून घ्यायचं असेल, तर तेही घेता येईल. सर्वांचं खाणं बनवण्यासाठी एका बाईच्या आयुष्याचा वेळ, इच्छा असो किंवा नसो जातोच. तो इथं जाणार नाही. तिलाही तिच्या सर्जनशीलतेप्रमाणं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य मिळेल, असं वाटतं. स्वयंपाकघराशी निगडित बाई या गोष्टीबरोबर अनेक वाद येतात, तेही मिटतील. उदाहरणार्थ, लग्न झाल्यानंतर सासू-सुनेतील जवळपास सगळे वाद हे या स्वयंपाकघराशीच निगडित असतात. ते पूर्ण संपुष्टात येतील.

।। ५ ।।
पुढं येणारा मुद्दा कदाचित या विषयाला सोडून असेल; पण तो मांडणं इथं आवश्यक वाटतं. स्वयंपाकघर असो किंवा नसो, एका गोष्टीकडे मात्र लक्ष द्यायला हवं. ती म्हणजे आहारातील शिस्त. घरात स्वयंपाकघर असेल, तरीही या गोष्टीकडे लक्ष दिलं जातंच असं नाही. किंबहुना दिलं जातच नाही. त्यामुळंच पूर्णपणे निरोगी घर ही गोष्ट दुर्मिळच झाली आहे. प्रत्येक घरात सरासरी एक जण तरी कोणत्या ना कोणत्या व्याधीनं ग्रस्त असतोच. किंवा होणार तरी असतो. (मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, सांधेदुखी, असे असंख्य..) घरात हवं तेव्हा हवं तितकं, आणि हवं ते खाण्याची मुभा या स्वयंपाकघरामुळं मिळते. शरीराला आवश्यक किंवा सकस आहे का, हे न पाहता प्रत्येक स्वयंपाकघरात हा पोटभरीचा उपक्रम सर्रास सुरू असतो. मला वाटतं, ही स्वयंपाकघराची हार आहे. घरात स्वयंपाक घर नको, असं म्हटल्यावर अनेकजण म्हणतील, की बाहेरच्या खाण्यामुळं मग रोग होतील.. खाण्याला शिस्त लागणार नाही.. अशी कारणांची रांगच्या रांग उभी करतील; पण मुद्दा हा आहे, की सध्याच्या स्वयंपाकघर व्यवस्थेत ही शिस्त पूर्णपणे बिघडलीच आहे, हे मान्य करूया आपण. त्यामुळं निरोगी आरोग्य हे पूर्णपणे आहारीय शिस्तीवर अवलंबून आहे, असं मला वाटतं. ही शिस्त एकदा लावली की आपण कुठं खातो, हा मुद्दा गौण ठरतो.

एकूणच आजच्या कुटुंबसंस्थेतील स्वयंपाकघर हे पूर्णतः स्त्री केंद्रित आहे. प्रत्येकालाच पोट असेल, तर प्रत्येकजणच त्याचा केंद्रबिंदू असायला हवा. वर मांडलेल्या सामूहिक स्वयंपाकघर या संकल्पनेपर्यंत पोचायला खूप अवकाश आहे. किंवा त्याची गरज ही व्यक्तिपरत्वे वेगळी असू शकते. मग ‘स्वयंपाकघर आणि बाई’ या विषयातला मध्यममार्ग काढायचा असेल तर घरातलं स्वयंपाकघर हे स्त्रीकेद्रिंत न ठेवता सर्वकेंद्रिंत ठेवण्याचा अट्टहास करू शकतो. स्वयंपाकज्ञान हे आजपर्यंत अनेक घरात केवळ स्त्रीकडून स्त्रीकडे हस्तांतरित होत आलं आहे, असा भेदभाव यापुढं टाळून त्याचं हस्तांतर स्त्रीकडून जन्माला येणाऱ्या प्रत्येकापर्यंत व्हायला हवं. असं झालं, तरच त्या घरात खऱ्या अर्थानं कुटुंबसमता नांदेल. या कुटुंब समतेतच घराचं घरपण अवलंबून आहे.


Website | + posts

अभिजित सोनावणे सारद मजकूरचे संचालक असून ते लेखक आणि पत्रकार आहेत.

7 Comments

  1. Avatar

    छान.. स्वयंपाकघर स्त्रीकेंद्रीत नसावं हे पटलं. ते इतरांप्रमाणे स्रीयांनीही स्वीकारावं लागेल. अर्थातच, पिढ्यान् पिढ्या चालत आलेली गोष्ट बदलायला वेळ लागेल, तो द्यायला हवा.
    .
    पण याच्यावरचा मार्ग म्हणून सामूहिक स्वयंराकघराची संकल्पना पटत नाही. आताचा आपल्या जीवनशैलीत हा पर्याय अव्यवहार्य ठरण्याची व अयशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. त्याचे पर्यवसन पुन्हा घरातील नेहमीप्रमाणे असलेल्या स्वयंपाकघरात होईल का?

  2. Avatar

    सामूहिक स्वयंपाक घर ही संकल्पना जगात कुठे आहे का?मुळात स्वयंपाक घराची मालकी हक्क सुद्धा स्त्री ने स्वतः च बनवलेल्या आहे, त्यात सुध्दा जेलसी असते घरा घरात पण अगदी आई मुली या नात्यात पण, जसं आई होणं पण निसर्गाने स्त्री कडे सोपवलं आहे, त्यामुळे कुटुंब खाऊ पिऊ घालून पालन पोषण करणे हा वारसा निसर्गतः स्त्री कडे गेला आहे, अर्थात प्रत्येक जणाने किमान स्वतः च स्वयंपाक बनवता येणे इतपत आत्मनिर्भर नक्कीच असावं, या लोकडाऊन च्या काळात हे प्रकर्षाने जाणवले, घरातल्या गृहिणी ला स्वयंपाक बनवण्यात मदत ही करायला हवीच, तिला तिच्या साठी वेळ हा मिळायला हवाच…. माझ्या आईने स्वयंपाक बनवला कुटुंब साठी हे मला लहानपणी पासून बघायला मिळते, माझी पत्नी ही सुगरण असावी ही माझी अपेक्षा असते, पण जेव्हा मी माझ्या मुली बद्द्ल विचार करतो त्या वेळी तिला मात्र स्वयंपाक बनवण्याची वेळ येऊ नये, तिने तिचे आयुष्य स्वयंपाक घरात घालवू नये असे नक्कीच वाटते……..

  3. Avatar

    लेख आवडला. स्वयंपाकघर हे स्त्रीकेंद्रित न होता सर्वकेंद्रित हवं या मताशी मी सहमत आहे. आणि हा बदल जेव्हा घरातल्या स्वयंपाकघरात आधी होईल, तेव्हाच तो सामूहिक स्वयंपाकघरात पण दिसेल. पुरुषांच्या स्वयंपाकाची कौतूकं जेव्हा बायका आणि पुरुष दोघेही करणं बंद करतील, तेव्हा स्वयंपाकघरात आणि पर्यायानी केलेल्या स्वयंपाकाला समान ‘किंमत’ येईल.

    कारण अजूनही जगभर पुरुष Chef च स्त्री Chef पेक्षा जास्त पैसे कमावतात आणि प्रसिद्धी मिळवतात, इतके cooking shows बायका चालवत असून / जिंकून सुद्धा!

  4. Avatar

    छान आहे

  5. गीतांजलि अविनाश जोशी

    काही मुद्दे पटले. काही नाही. स्वयंपाकघरात काम करायचं किंवा नाही हे ठरवण्याचा हक्क बाईला किंवा पुरुषालाही असला पाहिजे हे एकदम मान्य. स्वयंपाकघर म्हणजे बाईच्या आयुष्यातलं अंतिम कर्तव्य किंवा आनंद अजिबात असावा हे एकदम अमान्य.पण नाण्याची दुसरी बाजू आहे. अन्नग्रहण केवळ पोटाची खळगी भरणे नाही प्रेमाने खाणे आणि खायला घालणे ह्यामुळे रक्ताची नाती आणि मैत्रीचे बंध मजबूत होतात हे सत्य आहे. आम्ही व्हिएतनाम ला गेलो तेव्हा त्या कम्युनिस्ट समाजात आधुनिक फ्लॅटमधे स्वयपाकघर फक्त चहाकाॅफीपुरतेच. स्गळेजणरोज बाहेरच स्ट्रिट फूड खाताना दिसतात.

  6. Avatar

    लेख वाचला. काही मुद्दे पटले. काही नाहीच. सामूहिक स्वयंपाकघर ही कल्पना प्रत्यक्षात येणे व्यवहार्य वाटत नाही. त्यात खाण्यापिण्याच्या आवडी, पथ्य, वेळा आणि सवयी याचबरोबर त्यासाठी गुंतवावी लागणारी रक्कम यांचा मेळ राखावा लागेल, ते फारच अवघड आहे. त्यामुळे ही संकल्पना वरवरची वाटते.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :