मनाच्या एका कोपऱ्यात कायम जागी असणारी ‘ती’
स्त्रीत्वाबद्दल माझं एक निरीक्षण आहे. ते म्हणजे,
आजवरच्या माझ्या पुरुषपणाच्या प्रवासात एकदाही
‘पूर्ण समंजस’ अशा स्त्रीत्वाचं दर्शन मला झालेलं नाही.
ते होण्यासाठी मी खूप आतुर आहे…
– अभिजीत सोनावणे
आजूबाजू । चित्राक्षरे
www.chitrakshare.com
।। १ ।।
स्मरणांच्या छायेत तू..
हृदयाच्या गजरात तू..
श्वासांच्या वाटेत तू..
अदृश्यातील दृश्य तू…
कधी काळी मी लिहिलेल्या या ओळी.. या ओळी वरवर एका व्यक्तीशी संबंधित आहेत, असं वाटत असलं तरीही इथं या ओळींचा संदर्भ वेगळा आहे. तो असा: प्रत्येक पुरुषाच्या मनात ‘ती’ ही कायम रेंगाळत असतेच. (आणि प्रत्येक स्त्रीच्या मनात पुरुषही कायम रेंगाळत असतोच.) दरवेळी ‘ती’ विशिष्ट व्यक्ती स्वरूपात असेलच असं नाही; पण तिच्यातलं स्त्रीत्व हे पुरुषाच्या मनात कायम रेंगाळत असतं, असा पुरुष म्हणून माझा अनुभव आहे. हे मनात रेंगाळणारं स्त्रीत्व दरवेळी जाणवतं असंही नाही. पण ते मनाच्या एका कोपऱ्यात कायम ‘जागं’ असतं, हे मात्र नक्की!
तसं पाहायला गेलं तर प्रत्येक पुरुषाच्या मनात स्त्री ही दडलेली असतेच. ही दडलेली स्त्री आयुष्यभर वेगवेगळ्या रुपानं पुरुष व्यक्त करत असतो. अगदी लहानपणापासून ते आत्ताच्या वयापर्यंत. त्याच्या आजूबाजूला जी स्त्री दिसत असते, वावरत असते, त्यातून त्याच्या मनात स्त्रीत्वाचे कच्चे-पक्के धागे जुळत जातात. या मनाशी जमलेल्या, जुळवलेल्या स्त्रीत्वाच्या धाग्यांतूनच पुरुष व्यक्तिमत्त्वाचं स्त्री व्यक्तिमत्त्वाशी होणारं वागणं आकार घेतं. थोडक्यात पुरुषाचं स्त्रीशी असलेलं वागणं, त्याच्या मनात जमलेल्या किंवा त्यानं स्वतः जुळवलेल्या स्त्रीनुसार घडत किंवा बिघडत असतं, असंही म्हणता येईल. त्यामुळंच पुरुषाच्या मनात स्त्री व्यक्तिमत्त्वाची नेमकी काय प्रतिमा आहे, याचा शोध प्रत्येक पुरुषानं घ्यायला हवा. कारण त्यानुसार भवताली असलेल्या स्त्री व्यक्तिमत्त्वाशी असलेलं त्याचं बोलणं-वागणं अवलंबून असणार असतं. पुरुषाच्या मनातली स्त्री जर स्वच्छ, निर्मळ असेल तर त्याचा स्त्रीशी असलेला व्यवहारही साहजिकच त्याच पातळीवरचा असण्याची शक्यता वाढते.
प्रत्येक पुरुष त्याच्याही नकळत मनाशी एक स्त्री कायम ‘रंगवत’ असतो. या रंगवारंगवीत तो त्याच्याच मनातल्या स्त्री व्यक्तिमत्त्वालाही काही अंशी बिघडवतही असतो. पुरुष व्यक्तिमत्त्वाचं स्त्री व्यक्तिमत्त्वाशी असलेलं नातं अधिकाधिक बळकट व्हायचं असेल, तर ही मनातली अशा पद्धतीची रंगवारंगवी थांबवायला हवी, असं वाटत राहतं. याच प्रक्रियेचा भाग म्हणून प्रत्येक पुरुषानं स्त्री, ही मनात नांदवत ठेवावी. वावरत ठेवावी. प्रत्येक पुरुषानं त्याच्या भवताली दिसणारी, अनुभवाला येणारी स्त्री ही तटस्थपणे मनाशीच नोंदवत ठेवली तर त्याच्या मनातल्या स्त्री व्यक्तिमत्त्वाबद्दलचं आकलन अधिकाधिक दुरुस्त करता येऊ शकतं. हे आकलन जितकं दुरुस्त, तितकं त्याचं म्हणजेच त्याच्यातल्या पुरुष व्यक्तिमत्त्वाचं आणि आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, मुलगी, सहकारी, रस्त्यावर नजरेस पडणारी.. या विविध रुपातून जोडल्या गेलेल्या स्त्री व्यक्तिमत्त्वाशी असलेलं नातंही अधिकाधिक दुरुस्त होण्याची आशा निर्माण होते.
।। २ ।।
काही प्रसंग सांगतो. माझ्या आयुष्याच्या अलीकडे-पलीकडे घडलेले.
पहिला प्रसंग लहानपणीचा आहे. टीव्हीवर ‘शांती’ नावाची मालिका सुरू होती तेव्हाचा. ही मालिका तुफान लोकप्रिय असल्यानं आमच्याही घरी पाहिली जायची. मीही पाहायचो. त्यातल्या एका भागात ‘बलात्कार’ हा शब्द ऐकला. पुढचे काही दिवस हा शब्द पुन्हा पुन्हा मालिकेत येत राहिला. हा शब्द न समजल्यामुळं मालिकेतलं काहीच समजायचं नाही. एके दिवशी आईला या शब्दाचा अर्थ विचारला. तिनं बहिणीकडं पाहिलं. बहीण म्हणाली, ‘तुझं पोरगं काय विचारतंय बघ.. बलात्कार म्हणजे काय?’ पाठीवर धपाटा पडला आणि मी मालिकेतून उठून गेलो.
***
सहावीला होतो. वर्गात प्रश्नाचं उत्तर दिलं की एक मुलगी माझ्याकडे पाहायची. भारी वाटायचं. तिनं माझ्याकडे पाहावं म्हणून जोरदार अभ्यास केला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर मिळणारी शाबासकी आणि तिची नजर हे सोबतच घडायचं. वर्गात थेट तिसराच नंबर आला. तेव्हा आणि आजतागायत तिच्याशी एका शब्दाचंही बोलणं झालं नाही. अर्थात तशी गरज ना तेव्हा वाटली ना आज वाटते.
***
बी.ए.ला होतो. साधारण तिशी-पस्तिशीत असणाऱ्या एक शिक्षिका समाजशास्त्र शिकवत होत्या. वर्गात आम्ही मोजकेच मुलं-मुली. शिकवता शिकवता विषय भरकटला. संवादी चर्चा सुरू झाली. नव्यानंच कॉलेज सुरू झालेलं. त्यामुळं मुला-मुलींचे ग्रुपही नव्यानं तयार झाले होते. नव्या ग्रुपचं सोबतीनं ट्रिपला जायचं प्लॅनिंग सुरू होतं. ते एकीनं समाजशास्त्राच्या शिक्षिकेसोबत शेअर केलं. शिक्षिका म्हणाली, ‘मुलं-मुली एकत्र जाताय.. पण जरा सांभाळून जा.. सांभाळून मजा करा..’ असं सांगत असताना शिक्षिकेनं एकाकडे बोट दाखवलं आणि पुढं म्हटलं, ‘हा जर तुमच्यासोबत असेल तर बिनधास्त त्याच्यासोबत जा.. तुम्हाला त्याच्यापासून कसलाही धोका नाही.’
***
मी आणि अमृता. एकदा हॉटेलात बसलो होतो. पराठा खाल्ला. ‘एखाद्या वस्तूची किंमत जितकी जास्त तितकी आपण त्या वस्तूची काळजी जास्त घेतो.’ बोलता बोलता वाक्य मनात आलं. बोलून टाकलं. माझी किंमत किती असेल? सहजच प्रश्न पडला. ग्लासमधला पेपर नॅपकीन काढून अमृतानं त्यावर माझी भली मोठी किंमत लिहिली आणि मला ती दाखवून कागद पर्समध्ये टाकला. (कित्येक वर्षं उलटली तरी तो कागद आजही तिच्या पर्समध्ये आहे.)
***
माझ्या नजरेतून ‘ती’ म्हटल्यावर हे काही ठळक प्रसंग जे मनावर कोरले गेले आहेत, ते लगेचच मनासमोर आले. म्हणून लिहिले. या प्रसंगांचं रुप-स्वरूप प्रातिनिधिकच आहे. पण या आणि अन्य अनेक प्रसंगातून माझ्या नजरेतून ‘तिला’ शोधण्याचा, साकारण्याचा प्रयत्न झाला आहे. या सगळ्या प्रसंगातूनच माझ्या मनातलं ‘स्त्री’पात्र रेखाटलं गेलं आहे. ते कधी घडण्याच्या बाजूनं पुढं गेलं आहे तर ते कधी बिघडण्याच्या बाजूनं मागे आलं आहे. हा शोध आजही सुरू आहे. त्यामुळं ‘माझ्या नजरेतून ती’ हे मला नेमकं आणि पक्केपणानं आज सांगता येणार नाही. (आणि बहुदा कधीच सांगता येणार नाही.)
हा शोध घेत सांगताना एक ‘कन्फेशन’ही मनात आहे. ते माहीत असलेल्या आणि नसलेल्या असंख्य ‘तिच्या’बद्दलचं आहे. जसं माझ्या मनातलं ‘स्त्री’ पात्र बिघडत-घडत गेलं आहे. तसं पुरुष म्हणून मीही असंख्य वेळा घडलो आहे आणि त्याचवेळी बिघडलोही आहे. ‘कन्फेशन’ आहे ते हेच आहे. आज हे लिहिताना स्त्रीबाबत ‘पुरुष म्हणून केव्हा केव्हा अधिक बरोबर वागलो आहे’, हे जसं मनात येतं तसंच ‘पुरुष म्हणून मी केव्हा केव्हा चुकीचं वागलो’ तेही डोळ्यासमोर येतं आहे. पुरुष म्हणून बरोबर वागण्याचे क्षण माझ्या आयुष्यात आहेत तसेच पुरुष म्हणून चुकीचं वागल्याचे क्षणही माझ्या आयुष्यात आहेत. या चुकीच्या क्षणांमुळं पुरुष म्हणून मी दोन पावलं मागं आलो आहे. ही चूक जाणवण्याचा क्षण मला ‘त्याच्या नजरेतली ती’ साकार होतानाचा क्षण म्हणून खूप
महत्त्वाचा वाटतो. हा ‘चूक जाणवणारा’ क्षण आतल्या आत मला पुरुष म्हणून समृद्ध होण्याचा वाटतो. थोडं अधिक विस्तारानं सांगायचं झालं तर अमुक एखाद्या वेळी दिसलेल्या मुलीकडं मी तशा नजरेनं पाहायला नको होतं, ही गोष्ट जेव्हा मला जाणवते, तेव्हा ती चूक तर असतेच; पण हे जाणवणं पुरुष म्हणून अधिक समृद्धतेकडे नेणारंही असतं, असं मला वाटत आलं आहे.
।। ३ ।।
हे सगळं मी मांडलं खरं, पण माझ्या नजरेत आजवर जमा झालेली ‘ती’ ही नेमकी कशी आहे त्याबद्दलही सांगायला हवं.
ती शांत आहे, ती प्रेमळ आहे, ती अबोल आहे, ती बडबडी आहे, ती एकाचवेळी रागानं आणि मायेनं भारलेली आहे, ती कंजूष आणि उदारही आहे, ती टणक आणि त्याच वेळी अतीव भावूक आहे, ती आनंदी आहे, ती उदास आहे, ती बळ देणारी आहे, ती खचलेल्या मनाला उभारी देणारी आहे, ती आधार देणारी आहे, ती नातं जपणारी आहे आणि नातं झिडकारणारीही आहे, ती आणिही खूप काही आहे…
लहानपणापासून ते आजवरच्या माझ्या आयुष्यात आलेल्या ‘स्त्री’ पात्रांतून माझ्या मनात
साकारलेली ‘ती’ ही अशी आहे. अजूनही स्त्रीत्वाचे खूप सारे गुण-अवगुण, पैलू समजायचे आहेत. तुम्ही म्हणाल, हे फक्त स्त्रीत्वाचे नाही तर सबंध माणसाचे गुण-अवगुण आहेत. ते तसे आहेतही! खास स्त्रीत्वाबद्दल सांगायचं झालं तर एक निरीक्षण (आरोप नव्हे) मला आवर्जून नोंदवावसं वाटतं, ते म्हणजे आजवरच्या माझ्या पुरुषपणाच्या प्रवासात एकदाही ‘पूर्ण समंजस’ अशा स्त्रीत्वाचं दर्शन मला झालेलं नाही.
या ‘पूर्ण समंजस’ स्त्रीत्वाचं दर्शन, पूर्ण समंजस अशा ‘ती’चं दर्शन घेण्यासाठी मी खूप आतुर आहे. त्यासाठीच तर माझ्याही मनात मी कायम स्त्रीत्व रेंगाळत ठेवून आहे. कायम जागं ठेवून आहे. इतकंच!
*
अभिजित सोनावणे सारद मजकूरचे संचालक असून ते लेखक आणि पत्रकार आहेत.
मला खूप आवडला तुझा लेख. त्यातला प्रामाणिकपणाही जाणवला आणि आवडला. पूर्ण पुरूष किंवा पूर्ण स्त्री प्रत्येकालाच हवी असते. पण ते वास्तव होऊच शकत नाही. तिथंच प्रेम ती उणीव भरून काढतं आणि अमृतासारखी भक्कम किंमत होते आपल्या साथीदाराची.
किती छान प्रतिक्रिया!💐😊
अभिनंदन अभिजीत! फारच सुंदर लिहिले आणि मुख्य म्हणजे प्रांजळपणे मांडले आहे.. तुझे स्व- अवलोकन ही छान आहे. तुला ‘ पूर्ण ‘ म्हणजे ,परिपक्वता असंही म्हणायचे आहे असे मी समजते . ही पातळी कमी-जास्त असते प्रत्येकीत. पण कुणी ‘ पूर्ण ‘ कसे असेल , कारण आपण सगळे माणसंच असतो ना रे ….
स्त्री, पुरुष कायमच एकमेकांना अनाकलनीय राहिले आहेत. कारण शारीरिक निकटते च्या पलीकडेही एक निकटता असते हे अभावानेच कुणाला कळते. अभि, तुम्ही तसा प्रयत्न करीत आहात.
तुमची निरागसता येथे जाणवते. खूप सुंदर लिहिलं .
– अशोक थोरात .