रसायनांच्या भाषेतील संशय!

।। १ ।।

एक आरोग्यविषयक लेख वाचत होतो. त्यात लिंगपिसाट माणसाच्या शरीरांतर्गत रसायनांच्या रचनेबद्दलची माहिती दिली होती. त्यात लिंगपिसाट असण्याची भावना ही मेंदूतल्या रसायनांच्या भाषेत उलगडून दाखविली होती. ते वाचता वाचता असं लक्षात आलं, की माणसाच्या शरीरावर या रसायनांचा प्रचंड अंमल आहे. माणसाच्या स्वभावाला मेंदूतली, सबंध शरीरातली ही रसायनं कारणीभूत असतात. माणसाच्या बोलण्या-वागण्यातून जी प्रतिक्रिया एकमेकांसमोर उमटते, तो मूळचा या रसायनांचा खेळ आहे. माणसाच्या आतली रसायनं चांगली तर बाहेरचा माणूस चांगला. अन्यथा तो वाईट. हा चांगला-वाईट भेद आपण करतो. मानवी पातळीवर रसायनांच्या दुनियेत चांगलं-वाईट असं काहीही नसतं. रसायनं ही रसायनं असतात फक्त. या रसायनांच्या मिश्रणातून माणूस बनतो. माणसाच्या शरीरातली मूळची रसायनं सारखी असली, मनावर होणार्‍या शिकवणुकीमुळे या रसायनांची रचना घडत-बिघडत असावी. या घडण्या-बिघडण्यात इतकी विविधता आहे, की एक माणूस दुसर्‍या माणसासारखा नाही. गणिती भाषेत सांगायचं तर माणूस म्हणजे या रसायनांच्या ‘परमिटेशन्स-कॉम्बिनेशन्स’चा खेळ आहे. हा ‘परमिटेशन्स-कॉम्बिनेशन’चा खेळ कसा रचला जातो हे सध्या माणूस विज्ञानाच्या आधारावर शोधू पाहतोय. हा खेळ लक्षात आला, तर मग हवा तसा माणूस ‘घडविता’ येऊ शकतो. तोपर्यंत नाही. 

।। २ ।।

मनाशी उमटणार्‍या प्रत्येक भावनेचं काही ना काही रसायन असतंच. संशयाचंही रसायन असतं. हे संशयाचं रसायन मनात कसं तयार होतं, हे मात्र आज आपल्याला ठाऊक नाही. विज्ञानाच्या आधारावर कदाचित काही वर्षांनी या रसायनाचं सूत्र-समीकरण मांडता येईल. मनात उगवणार्‍या या संशयी रसायनाचे प्रकार तसे असंख्य असतात. तूर्त आपण स्त्री-पुरुष नात्यात निर्माण होणार्‍या संशयाबद्दल बोलूया.

या दोन लिंगांमधले संशय हे बहुदा वासनेशी निगडित असतात. संशयाचं जसं रसायन शरीरात तयार होतं तसं वासनेचंही रसायन तयार होतंच. पण संशयाच्या रसायनाचं विशेष म्हणजे, ते तयार होतं कोणत्याही बाह्य कारणानं. आणि हे रसायन तयार झाल्या झाल्या मनात तेव्हा सुरू असणार्‍या सर्व विचारांच्या रसायनांवर ताबा मिळवतं. हे रसायन कोणत्याही कारणानं क्रियाशील होऊ शकतं. आणि क्रियाशील झाल्या झाल्या ते मोठ्ठंच्या मोठ्ठं रूप धारण करतं. टोक गाठतं. आणि ज्याच्याबद्दल संशय आहे, त्याच्या वासनेच्या आसपास हे टोक फिरत राहतं. हे रसायन जन्माला येतं ते कधीही न मरण्यासाठी. म्हणजे हे रसायन कोणत्या ना कोणत्या कारणावरून क्रियाशील होतं. शांतही होतं. धुपतही राहतं. आणि कोणत्याही कारणानं पुन्हा पेटही घेतं. माणसाचा चेहरा शांत असला तरी या रसायनाचं विझणं, धुपणं आणि पुन्हा क्रियाशील होत पेट घेणं हे मनाच्या प्रयोगशाळेत सुरू असतं. वासनेच्या रसायनाचं तसं नसतं. हे रसायन क्रियाशील झालं अगदी अचानकपणे, तरी ते फार काळ टिकत नाही. याचा जीव फार छोटुकला. हे रसायन ‘अ‍ॅक्टिव्ह’ होणं आणि ‘डिअ‍ॅक्टिव्ह’ होणं यात काही क्षणांचं अंतर असावं. बाकी इतर वेळेला हे रसायन शरीरात निपचित पडून राहत असावं, या निपचित पडलेल्या वासनेच्या रसायनाचा आणि या बाबतच्या संशयी रसायनाचा काही ना काही संबंध असणारंच. शोधून काढायला हवं. 

।। ३ ।।

नवरा आणि बायकोचं नातं. या नात्यात संशयाचा जंतू असं बर्‍याचदा पाहायला मिळतं. संशयाचं रसायन आडवं आलं तर साहजिकच भांडणाचा जन्म होतो. कधी मध्ये समजूतदारपणाची मदत घेत ही संशयाची वादळं शांतही केली जातात. पण या सगळ्या प्रक्रियेत होतं काय, की संशय या एका गोष्टीमुळं नवरा-बायको हे दोघंही एकमेकांचे विरोधक होऊन जातात. संशयी रसायनाची जागा विश्वासाच्या रसायनानं भरून टाकली तर काय होईल? असा विचार मनात आला. नात्यात ‘विश्वास ठेवणं’ ही गोष्ट नसेल, तर ही संशयाची वादळं कधीही मिळणार नाही. नाती ही त्यामुळंच विश्वासाच्या पायावर बांधली जायला हवीत हा विश्वास जरासा कमी पडला, तर झालेल्या पोकळीत संशयाचं रसायन निर्माण होण्याची शक्यता वाढते असं मला वाटतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नात्यातली किंवा नात्याबाहेरची कोणतीही गोष्ट शांतपणे ऐकविण्याची आणि ऐकून घेण्याची तयारी दोघांनीही दाखवायला हवी. समजा नात्यातील एखाद्याकडून नातं सांभाळताना झाल्याच काही चुका, आणि त्या चुकांचं ‘कन्फेशन’ जोडीदाराला द्यायचं आहे, तर ते ‘कन्फेशन’ आहे, तसं स्वीकारण्याची जोडीदाराचीही ताकद हवी. बर्‍याचदा या ताकीदचाच अभाव असतो. खरं घडलेलं ऐकण्याची तयारी, आणि ते ऐकून घेतल्यानंतर ऐवजी पूर्वग्रह, गैरसमज निर्माण होतील, अशी अवस्था जर नात्याची असेल, तर ते काहीही उपयोगाचं नाही. उलट खरं, पारदर्शी बोलण्याचा सन्मान करण्याऐवजी बर्‍याचदा त्याचाच वापर संशयांसाठी, पूर्वग्रहासाठी केला जातो. खरं बोलणार्‍याचा हा एक प्रकारे अपमानच आहे, असं मला वाटतं. खरं बोलायला वागायला जसं धाडस लागतं तसं खरं ऐकायलाही धाडस लागतंच. म्हणूनच ‘कन्फेस’ करण्याची जागा नात्यात हवीच हवी. अगदी काहीही सांगण्याची जागा नात्यात हवी, मग ते ऐकमेकांच्या बाजूचं असो किंवा विरोधातलं असो. पूर्वग्रह, गैरसमज करून न घेता खरं ऐकून घेण्याची पात्रता असलेली नाती निर्माण व्हायला हवीत. म्हणजे संशयी रसायनाचा जन्मदर आटोक्यात येईल, असं वाटतं.

।। ४ ।।

मला नेहमी वाटतं, की ज्यात एकदाही भांडणाचं रसायन जन्माला येणार नाही, असं एखादं नातं असावं. अर्थात हे रसायन एकाच वेळी दोन वेगवेगळ्या माणसांमध्ये निर्माण होणं तसं अशक्यच म्हणावं लागेल. पण बाह्य सवयींमुळं मूळची रसायनं नियंत्रित करता येतात यावर माझी अपार श्रद्धा आहे. समजुतीचं रसायन मनात क्रियाशील झालं की ते भांडणाच्या रसायनाचंही विघटन करतं. मग जर असं होत असेल, तर भांडणाच्या रसायनाला क्रियाशील का होऊ द्यायचं? त्यापेक्षा मनातल्या समजुतदारपणाच्या रसायनाची क्रियाशीलता वाढवली तर काय बिघडलं? ‘नवरा बायकोच्या नात्यात भांड्याला भांडं लागणारंच आपण भांडतो कुणाशी तर ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच ना…’ ही वाक्य मला निरर्थक वाटतात. ‘सुनंदाला आठवताना…’ ही छोटी पुस्तिका वाचनात आली. त्यात अनिल अवचट यांचा लेख होता. त्यांच्यात आणि त्यांची बायको डॉ. सुनंदा यांच्यात खूप भांडणं व्हायची. मग त्यांनी भांडणाचा कालावधीच ठरवून घेतला. म्हणजे जेव्हा केव्हा भांडण सुरू होईल त्यानंतर ही भांडणाची स्थिती फक्त काही कालावधीसाठी पाळायची. तो कालावधी संपला की पुन्हा आहे, तसं मनमोकळं एकमेकांशी वागायचं. यामुळं त्यांच्यातली भांडणं अटोक्यात येऊ लागली. अनिल अवचट यांच्या लेखामुळं भांडणांकडे पाहण्याची दृष्टी विकसित केली. 

।। ५ ।।

माणसाचं आयुष्याचं मोल काय, ते किती मोलाचं आहे, दुर्मीळ आहे… ही गोष्ट राजन खान यांच्यामुळं मनोमन पटली. ‘आयुष्य एकदाच मिळतं, जगून घ्या.’ ही शिकवणही मनात पक्की बसली. या अर्थानं कोणत्याही कारणानं आपण एकमेकांशी भांडत बसलो, एकमेकांचा द्वेष करत बसलो, एकमेकांना नेहमीच संशयाच्या तराजूत तोलत बसलो, जगणं जगता येणार नाही. नाही म्हटलं तरी जगण्याचा थोडा काळ, या भांडणांनी खाल्लाच आहे, हे क्षण भांडणासाठी न वापरता एकमेकांचं जगण्यासाठी वापरता आले असते की…

पण ही समज तेव्हा नव्हती. आताही पूर्ण आहे, असं नाही; पण भांडणाच्या बाजूनं पाय लगेच घसरत नाही, तो सावरण्याचा प्रयत्न होतो, हे नक्की ! 

कोणत्याही नात्यात अशी अबोल्याची भांडणं कधीही कुणाशीच होऊ नयेत, असं वाटतं. मतभेद असतील; पण तिथंही अबोला नको. एकदाच मिळणार्‍या आयुष्यातली नाती ही कधीही द्वेषाच्या पातळीवर जायला नकोत, नात्यांनी कायम मायेनं एकमेकांशी बांधून राहायला हवं. असं वाटतं. त्यासाठी भांडणाच्या, संशयाच्या रसायनाचं विघटन करता यायला हवं आणि समजूतदारपणाच्या रसायनाला कायमच क्रियाशील ठेवता येणं जमायला हवं. 

जमेल.

***

| Website | + posts

अभिजित सोनावणे सारद मजकूरचे संचालक असून ते लेखक आणि पत्रकार आहेत.

7 Comments

  1. Avatar

    अप्रतिम अभि! 😊

    1. Avatar

      किचकट वाटतं वाचताना पण छान लिहिलंयस…

  2. Avatar

    खूपच छान

  3. Avatar

    अप्रतिम मांडनी सुंदर लेख नवीन काही वाचायला मिळाले.. धन्यवाद

  4. Deepali Datar

    अतिशय वेगळी माहिती वाचायला मिळाली.

  5. Avatar

    रसायनांचं खुपच सुंदर विश्लेषण अभिजित.
    खुपच छान लेख आणि सहज लिहणं.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :