मी त्याची वाट सकाळी पाहात असतो. त्याचं येणं घड्याळाच्या काट्यांवर निश्चित नसतं. पंधरा मिनिटं मागं पुढं.
पण मी त्याची वाट पाहत थांबलेला असतो.
आज तो आला तेव्हा मला त्याची चाहूल लागली नाही. मी आतल्या खोलीत काहीतरी काम काढून बसलो होतो. त्याची आजी अंघोळीला गेलेली होती. त्याला घेऊन त्याची आई आली. तिनं हाका मारल्या,
‘‘आई, ए आई! मी त्याला घेऊन आलेय गं. त्याला बाहेर पलंगावर बसवलंय. टेबलावर स्टीलचा छोटा डबा आहे बघ, त्यात डाळिंबाचे दाणे आहेत. त्यानं कोको प्यालाय. तो मागेल तेव्हा त्याला डाळिंबाचे दाणे दे.
मी निघते गं…’’

मी बाहेरच्या खोलीत आलो. काम अर्धवट टाकून.
तो लोडाला टेकून आडवा झाला होता. त्याची चुळबूळ चालली होती.
झोप नीट झाली नसेल. पोटात ग्लासभर दूध गेल्यानंतर आलेली सुस्ती असेल.
मी त्याच्याजवळ गेलो. त्याच्या केसांतून हात फिरवला. दोन्ही पंजे खांद्यांवर ठेवले. अगदी सौम्यसा जोर देऊन खांदे दाबू लागलो.
त्यानं डोळे मिटले. त्याला हे आवडतं. मग तो वळला. पोटावर आडवा झाला. मग म्हणाला,
‘‘आबाजी, पाठ खाजवून दे नं…’’
मग मी पाठीवर हात फिरवू लागलो. नखांचे ओरखडे पडू नयेत, याची काळजी घ्यावी लागते. मी तर दिवसाआड नखं कापून टाकतो.
पाठ खाजवणं संपल्यावर उजवा पंजा पोकळ करून पाठीवर थापटू लागलो. हे त्याला खूप हवं असतं. मग तो तोंड मिटून उंउंउंउं असं गाणं गाऊ लागला. रोजच्या सारखा. मग तो स्वर लांबत जातो आणि आजही त्याचं उंsउंsउंsउंs असं गाणं सुरू झालं. खोलीभर पसरू लागलं.

रात्रभर पावसाची धार सुरू आहे. हवा आंबटओली झालीय. दिवस निस्तेज होतोय. आणि सगळ्या घराचा एक भलामोठा पाळणा झालाय.
त्याला उठावंसं वाटत नाहीय. मलाही त्यानं अन् मी उठावंसं वाटत नाही.
त्याच्या आजीची अंघोळ झाली आणि ती पंचा खांद्यावर टाकून न्हाणीघरातून बाहेर आली.
‘‘अगं बै.. आला वाटतं. चला चला… मी तुझ्यासाठी धिरडी करणारै… बाळाला आवडतात नं? अन्‌ चटणी केली. बिनतिखटाची… चला, उठउठउठ… आत्ता अर्चना मावशी येईल धुणं भिजवायला हवं.’’
आजीकडं वेळ नाही. कधीच नसतो.
त्यानं डोळे किलकिले केले.
मग उठला. माझ्या मागून चालत शेजघरात आला. चालू असलेला कॉम्प्युटर बंद करायला मी खुर्चीवर बसलो.
तो माझ्या मांडीवर येऊन बसला. मला म्हणाला,
“बाबाला बोलंव. मला बाबाची पापी हवीय.”
मग मी कॉम्प्युटरची दालनं बंद करण्याऐवजी एकेक करत उघडत गेलो.
एका दालनात त्याच्या आणि बाबाच्या, आईच्या, त्याच्या ताईच्या अनेक प्रतिमा ओळीनं आहेत.
ती वही उघडली आणि तीन-चार फोटो मागंपुढं करत एक फोटो निवडला. मोठ्ठा केला. रांचीला असताना घेतलेला हा साताठ महिन्यांचा पिटकू होता तेव्हा. बाबा चहा पीत टेबलाशी बसलेला आहे… मित्राच्या आईनं दुपट्यात गुंडाळलेलं गाठोडं बाबाच्या डाव्या हातात हळूच ठेवलंय. बाबानं चहाचा मग टेबलावर ठेवलाय. आणि तो बाळाची पापी घेतोय… मागून आजी अन् तिची लेक शेरेबाजी करताहेत, ‘‘झाsलं. झाला यांचा कॅमेरा सुरू. सकाळ नाही, रात्र नाही… कशाला हवेत खंडीभर फोटो..”

माझ्या मांडीवर बसलेल्या मित्रानं समोरच्या फोटोत टक लावलीय.
“माझा बाबा…” असं म्हणत त्यानं झेप घेतली निर्जीव पडद्याला खेटून. अगदी जवळ आणि बाबाच्या फोटोतील गालांवरून त्याच्या उजव्या बोटाची तर्जनी फिरवत राहिला. बऱ्याच वेळानं मला म्हणाला,
‘‘आबाजी, बाबाच्या मांडीवर कोन बशलंय?’’
‘‘अरे, तूच आहेस…’’
‘‘मग मला ती गोश्त शांग नं…’’
मी चष्मा काढला. गाल कोरडे केले.
‘‘आपण रांचीला होतो नं..’’
‘‘तेव्हा मी होतो..?’’
‘‘अरे म्हंजे काय.. तू होतासच नं… पण इवलुशा पिल्लुपिल्लु होताश. आपण सगळेच होतो. बाबा होता, आई होती, रेवामाईची सकाळची शाळा होती. तिची घाई होती. आजीनं तिला तोतो घातली. वेणी घातली हेअरपिना लावल्या अन्‌ तिला थालीपीठ केलं होतं. आई तुझं दूध कोमट करत होती.’’
‘‘तू होतास तितं? काय कडत होताश?’’
‘‘अरे, मी फोटो नव्हतो का काढत?’’
त्याला बाबाची गोष्ट हवी होती.
खरंतर बाबा हवा होता.
मग त्यानं पुन्हा इकडं बाबाच्या चित्रातील गालांवरून हात फिरवला. ती बोटं आपल्या ओठवत टेकवली.
मी अनिच्छेनं म्हणालो,
‘‘चल चल, उतर आता मांडीवरून. आपण आता चटचट आवरायला हवं. असं करू. अंघोळ करू. मग पावडर. कपडे… ते आजी मस्त करेल. मग तू मुटूमुटू धिरडं खाऊन घे. मग अत्तर लावू. अन् पुन्हा बाबा बघू… आता बाबाला ऑफिसला जायची घाई असेल. चला.’’
मी कॉम्प्युटर बंद केला. त्याचा पंचा, माझा पंचा..घेऊन न्हाणीघर गाठलं.
तो आला. त्यानं कपडे काढले.
‘‘आबाजी मी तुला अंघोळ घालणार हां.’’
बादलीत गरम पाण्याची मोठीशी धार पडू लागली. त्यात गार पाण्याची बारीकशी धारही मिसळू लागली.
मी त्याच्या बसायच्या लोखंडी तिकाटण्यावर तांब्याभर गरम पाणी ओतलं. त्याला लोखंडाचा थंडगार स्पर्श शहारे आणतो ते टाळायला म्हणून.
मी माझा बनियन काढला.
त्याच्या अंगावर गरम पाण्याचे तांब्ये एकेक ओतू लागलो.
डोक्याला साबण लावायला त्याची फार खळखळ असते. माझ्याकडे त्याला गोपीचंद राजासारखी अंघोळ घालायला खूप वेळ असतो. मी त्याला अगदी हळू आवाजात थापा मारून गोडीगुलाबी लावत साबणाचा फेस लावला. केसांतून फेसाळ बोटे कालवण्याआधी डोळे मिटायला सांगितले. मग डोकं धुतलं की, कसं काळं घाण पाणी वाहून गेलं हे सांगितलं. मग त्याचे केस दाबून पाणी निथळले. माझा हात कपाळ, डोळे, कानांचे चुम्फे यावर फिरू लागला.
मग साबणाची वडी त्यानं आपल्या हातात घेतली. चोळून चोळून केलेला फेस फासून त्यानं आपले पोट धुतले. तोवर मी त्याला चोळूनमोळून झकास अंघोळ घातली.
मग तो म्हणाला,
‘‘आबाजी, आता मी तुना अंघोल घालनार काय. शाबन लावनार. ललु नकोश. डोले मिटून घे…”
मग त्याचे इवले तळवे माझ्या डोईवरून फिरू लागले. मधूनच पाणी उडवू लागले.
मग साबण पाठीवरून फिरू लागला. गेले कैक दिवस आम्ही एकत्र अंघोळ साजरी करतोय. पण आज त्याला बाबाची आठवण गडद येत असावी. उन्हाळ्यात बाबा पुण्यात सुट्टीवर आला होता. त्याचं जाणं अनिश्चित काळासाठी लांबलं. देवाची दया. त्यामुळं दोघांना एकमेकांचा सहवास घडला. बाबा रोज त्याच्या लेकाला अंघोळ घालीत असावा आणि मग दोघं एकमेकांना अंघोळ घालत असावेत…

माझ्या पाठीवरून, डोक्यातून फिरणारा त्याचा हात मला तान्हा करत गेला..
मला फार लळा लावणाऱ्या आईनं आणि अण्णांनी माझ्या अंगावर फिरवलेला हात आठवत गेला. किती वर्षं झाली? नक्की साठपेक्षा जास्त. माझी माईसुद्धा मला अशीच अंघोळ घालत असेल.
त्यानं उजव्या तळव्याची ओंजळ केली अन् इवलंइवलं पाणी ओतत त्यानं माझं कपाळ, मान, गळा… सगळं धुवून काढलं. मला म्हणाला, ‘‘ताई मला अशीच च्योलूच्योलू कडते… मी आता मोठ्ठा झ्यालो नं. मी पण तुला अशी तोतो घालनाल…’’
तेवढयात आज्जीबाई न्हाणीघरात आली. तिनं धिरडं तव्यावर पसरलं होतं. उलटायला अवकाश होता. तेवढ्या मधल्या वेळात तिनं नातवाला पंच्यात गुंडाळलं.
मी माझी उरलेली अंघोळ उरकून आलो तोवर त्यानं कपडे केलेले होते. आजी त्याची हनुवटी हातात धरून फणीनं केस विंचरत होती.
नंतर तो माझ्या मांडीत बसला.
आम्ही वर्तमानपत्राचे कागद मांडून बसलो. त्याला जाहिराती बघायच्या होत्या.
मग मोटारसायकलीची पानभर जाहिरात वाचून झाली. काकानं जीनची जाड तुमान घातलीय. काळे बूट आहेत. हातात काळे चामड्याचे मोजे आहेत. हेल्मेट आहे. इथपासून गाडीचे अवयव बारकाईनं ओळखून झाले.
हे निरुपण चालू असताना आजीनं चपळाईनं धिरड्याचे घास भरले होते.
सकाळ संपत आली. पोट भरलं होतं. खिडकीतून दिसणारं क्रिकेट आज नव्हतं. पावसानं डाव मांडला नव्हता.
मी त्याला कॉम्प्युटर असलेल्या खोलीपासून लांब ठेवलं. त्याला पुन्हा बाबाची आठवण झाली असती. मग माझे हाल सुरु झाले असते.
मग तो मला म्हणाला,
‘‘आबाजी, मना मांडी.”
मग मी मांडी घातली. त्याला मांडीत बसून गोष्ट हवी होती.
मग मी त्याला दुकानबंदीच्या हल्लीच्या काळात त्याचे लाडके गुजाबाबा कसे आणले ते सांगत बसलो. गुजाबाबा म्हणजे गुलाबजाम. त्याचा सगळ्यात जास्त आवडता जिन्नस.
ही गुजाबाबाची गोष्ट खूप मोठी आहे.
तुम्हाला सांगू का? आत्ता नाही. पुन्हा कधीतरी.
ही गोष्ट ऐकून त्याची आई, ताई, आज्जी आता कंटाळले आहेत. मला सांगायचा आळस नाही आला. त्याला ऐकायचा वीट नाही आला.
तो माझ्या मांडीत पेंगुळायच्या वाटेवर होता.
त्याच्या पाठीला असलेले चिमुकले झोपेचे नाजूक पंख हलू लागले होते.
मी इतका वेळ सांभाळलेले डोळ्यांतले पाणी आता उतू जाऊ पाहत होते.
साडेबाराच्या ठोक्याला दार वाजलं.
त्याला न्यायला त्याची आई आली.
ती माहेरच्या घरात काही पावले बागडली; पण त्यात काही माहेरपण नव्हतं.
मायलेकींच्या गोष्टी झाल्या.
तिनं मग लेकाचं बखोट धरलं.
‘‘अगं बै.. झोपेला आला वाटतं. चला चला..मी तुझ्यासाठी वननभात्ता करणारै… बाळाला आवडतो नं? अन् आमटी करणार. बिनतिखटाची… चला, उठउठउठ… आत्ता सुरेखा मावशी येईल धुणं भिजवायला हवं. ताईला अभ्यास दिलाय…”
मग घरट्यात निजू पाहणारं पाखरू हुसकलं गेलं.
खूप फडफडाट. आणि आक्रांत. मग चढलेले आवाज.
मग दार धाडकन लागले.
लिफ्ट उघडल्याचा आवाज. त्या लिफ्टचं दारही फटाक आवाज करत विव्हळलं.
मग विरत गेलेला एक आवाज. हुंदक्याचा.

असेच आवाज कितीक घरांनी ऐकले असतील.
असतील??
पण आजोबांचे आवाज मात्र कुणीच ऐकले नसावेत.
ही गोष्ट खूप मोठी आहे.
आजोबांच्या हुंदक्यांची गोष्ट तुम्हाला सांगू का?
आत्ता नाही. पुन्हा कधीतरी.
गुजाबाबाची गोष्ट ऐकून त्याची आई, ताई, आज्जी आता कंटाळले आहेत. मला सांगायचा आळस नाही आला. त्याला ऐकायचा वीट नाही आला.
एक मित्र दुसऱ्या मित्राला एक गोष्ट सांगतो आणि ऐकणारा दुसरा त्याला पुनःपुन्हा गळ घालतो. “मला सांग नं ती गोष्ट. हं. सांग”
मग पहिला ती गोष्ट सांगत जातो. दुसऱ्याचा हट्ट पुरवत राहतो.
मग ती दोन मित्रांची गोष्ट होते.

*

वाचा
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा
चित्रकथा
कविता


+ posts

दिलीप लिमये हे लेखक, कवी, चित्रकार आणि छायाचित्रकार आहेत.

9 Comments

  1. Avatar

    लिमये!, तुम्ही डोळ्यांत पाणी आणता. साधंसंच पण खरं खरं लिहून…

    1. Avatar

      “मला सांगायचा आळस नाही आला,त्याला ऐकायचा वीट नाही आला.” ही तर चित्राक्षराची जन्मकथा.

      1. Avatar

        मला कधी आजोबा अनुभवायला मिळाले नाही. तुमचा मित्र खूपच भाग्यवान आहे. मस्तच वाटलं वाचून. 💐

  2. Avatar

    छान आहे कथा.गोष्ट संपत नसते.आपल्या कथेत वाचकाचं रंगाळत राहणं,गुंतत जाणं आणि समरस होणं या घटना सहज होत जातात.प्रवाही आणि प्रभावी संवाद.जवळपास स्वाती भवती हे घडत आहे असंच वाटण्या इतके तरल लिखाण.
    सुंदर वर्णने अतिशय बारकाव्यसह छान केलीत.
    मस्त आहे कथा

  3. Avatar

    दिलीप भाऊ, डोळे भरून आले हो…. आज हीच कथा कित्येक घराघरात प्रत्यक्ष घडते आहे…. नेमके काय चुकते कळत नाही, आणि डोळ्याचे पाणी खळत नाही… खूपच सुंदर लिहीलं आहे.. अप्रतिम!

  4. Avatar

    खुपच छान

  5. Avatar

    आई आणि आजीला खरंssssच वेळ नसतो हो.बरोब्बर लिहिलंत. राया आणि आबाजीचं मेतकूट मस्त.

  6. अशोक थोरात

    खूप सुंदर !
    सध्या मी हेच जगतो आहे.

  7. अनुया कुलकर्णी

    दिलीप दादा, डोळे वाहू लागले आहेत! कुठे काय चुकतय , काय सलतंय कळत नाही… पण हे अश्रू… थोपवायचे तरी किती ! फारच सुंदर, अप्रतिम लिहिले आहे!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :