परवाच्या सकाळी बकुळला बाळ झालं.
आता त्या गोष्टीला त्रेसष्ट तास झाले… त्यात दोन रात्री येऊन गेल्यात… पण अजूनही संगती लागत नाहीय. आठवणी मागंपुढं होताहेत.. जणू एकच प्रदीर्घ दिवस. मी जास्त धावाधाव करत नाहीय. भारतीची मात्र धांदल चाललीय…
आम्हाला एकमेकांत बोलायला निवांतपणा लाभला नाहीय.. एरवीसुद्धा आम्ही एकमेकांत असे काय गोग्गोड संवाद साधत असतो म्हणा… पण, आज मला हे जाणवतंय.
सकाळी सव्वानऊला मी घर सोडलं. भारतीनं डबा दिला बकुळसाठी.
“अहो.. आता लगेच निघा रिक्षानं. डबा उभा ठेवा. आडवा होऊ देऊ नका. तिला आवडणारी ज्वारी-बाजरीची भाकरी दिलीय कुस्करून. पाच डाळींचं वरण मुद्दाम फिकट केलंय. तिथं मीठ आहे, लसणीची चटणी आहे. छोट्या डबीत. लग्गेच खाऊन घे म्हणावं.. आणि कपडे दिलेत. सगळं व्यवस्थित न्या.. आणि लवकर या घरी परत. नाहीतर, वानवडी लाडकी म्हणून बसाल फिरत…”
सगळं ऐकून घेतलं. दवाखान्यात गेलो.
बाळ झोपलं होतं. बकुळ पण झोपलेली.
मी आपला शांत होऊन सगळं इस्पितळ डोळ्यांनी पाहत होतो.
साडेबाराला घरी आलो.
भारती दिवसभर भिंगरी झाली होती. आत्ता साडेसातला शांतपणे जेवलो.
रात्रीची जेवणं झाली.
भारती भांडी धुणं, दुपारच्या झोडपावसात जपून आणलेली साखर डब्यात भरणं, तांदूळ त्याच्या डब्यात टाकणं, मध्येच फोनवर “अग्गबाई.. होsनं, पेढा कसला, पेढे अनेकवचनी…” चाललेला संवाद.
मग एकदम मला उठवलं. मी लोकमतमधलं शब्दकोडं सोडवत बसलो होतो.
“अहो, जरा एवढे कपडे वाळत घाला नं..”
मग मी उठलो. तिच्या हातून बादली घेतली. व्हरांड्यात आलो. एकेक कपडा बादलीतून काढू लागलो.
पाणी निथळत होतं. कपडे घाईघाईत धुतले होते. मग मी एकेक लंगोट घट्ट पिळला. झटकला. मांडणीला अनेक आडव्या सळया आहेत, त्यावर पसरून वाळत घालण्याआधी तळव्यांवर ठोकून चुण्या काढल्या. उगीच बाळाला चुण्याच्या कडा टोचायला नकोत…
चार लंगोट. एक टोपी. वाडग्यासारखी. निळ्या रंगाची, फ्ल्यानेलची. मऊमऊ. एक टोपडं, दोन बंद असलेलं…
आणि सरतेशेवटी एक पायजमा. जेमतेम वीतभर. पिल्लुपिल्लू.
काल नुसतंच लंगोट होतं.
आज बाळ अजून मोठ्ठं झालं.
पायजमा घालण्याइतकं…
अंधाराचा फायदा घेत मी डोळे पुसले. अचानक.
बासष्टला राघुअण्णा गेले, तेव्हा अजय फार लहान होता. चार वर्षांचा. आईवेडा. आईशिवाय एक पळसुद्धा चैन नाही पडायचं त्याला.. आईच्या कुशीत झोपायचा. हट्ट करायचो.. आम्ही दोघंही.
आई म्हणायची,
“हिंदी सिनेमात असतं, तसं गाणं असायला हवं रे.. पहिल्या कडव्यात आई बाळाला जोजवते, आन्दुळते. दुसऱ्या कडव्यात ती शाळेत निघालेल्या लेकाला डबा देते भरून शाळेत जाताना, अन् लेकीची वेणी घालून पापी घेते तिची… तिसऱ्या कडव्यात कॉलेजमधून बाप्या झालेला लेक मोठा करंडक स्पर्धेत जिंकून आईच्या हातात देतो… अन् कंबरेत वीतभर वाकून उजवा हात पायाला लावतो… तुमचं बाळपण, अन् तुमचे हट्ट.. कधी सरणार रे रामा, रामराया हो…”
>
माझं लंगोट अन् अजयची दुपटी धुणारी माझी म्हातारी आई मघाशी टीव्हीची अफू पोटभर गिळून सावकाश चालत तिच्या खोलीत गेली. तेवढ्या श्रमानं थकून तिच्या अंथरुणावर झोपली आहे. बकुळच्या डब्यासाठी केलेला मऊ भात घासभर खाऊन.. ती झोपली आहे.
सकाळी तिच्यासाठी येणारी सुरेखामावशी तिला अंघोळ घालेल. तिचे कपडे, पलंगपोस घासघासून स्वच्छ धुवेल.. मग मशीनला लावेल व वाळत घालेल.
मी सकाळी वाळलेले बाळाचे कपडे गोळा करीन, त्यातले जंतू जळावेत म्हणून इस्त्री फिरवेन आणि साडेनवाच्या ठोक्याला इस्पितळाचा रस्ता धरेन.
>
सहज हिशोब करतोय. देवाची मर्जी खफा असेल तर मी जेव्हा एक्याऐंशी वर्षांचा होईन, तेव्हा बकुळ कशी असेल? भारतीसारखी?
आणि आत्ताचा माझा लंगोटवाला तरणाबांड गडी चांगला एकोणीस वर्षांचा झाला असेल. मिसरूड फुटलं असेल तेव्हा… रेवाचे दोनाचे चार झालेले असतील.. ती सत्तावीस वर्षांची झाली असेल…
आणि हा, माझा नातू त्याच्या भाच्याचे लंगोट असाच वाळत घालत असेल.
माझे कपडे बाजूला सरकवून…
रिकामी बादली घेऊन मी घरात आलो.
भारती म्हणाली,
“का हो.. चार कपडे वाळत घालायला इतका वेळ लागतो होय?
आणि हे काय?
डोळे का ओलावलेत?”
*
वाचा
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
चित्रकथा
कविता
दिलीप लिमये हे लेखक, कवी, चित्रकार आणि छायाचित्रकार आहेत.