Dileep-limaye-don-mulanchi-goshta-marathi-lalit-lekh-gujababachi-goshta-gulabjamun-story-chitraksahre

मी रोजच्यासारखा जोशीबुवांच्या दुकानात गेलो.
मला दोन झेरॉक्स हव्या होत्या. एक कुरियरला पाकीट द्यायचं होतं. आणि घरी हिंगाची एक मध्यम अशी डबी न्यायची होती. अजिबात गप्पा न मारता सामान घेतलं. झेरॉक्स काढल्या. त्या पाकिटात बंद केल्या. पत्ते लिहिले.. ते पुढील कारवाईसाठी जोशीबुवांच्या हातात सुपूर्द केलं.

मग गप्पा सुरू झाल्या.
‘‘काका, आज नातवाला नाही आणलंत? मी त्याची वाट पाहात होतो…” बुवा म्हणाले.
मला नातवाचं कालचं बोलणं एकाएकी आठवलं.
मी म्हणालो,
“अहो, अजून झोपलाय..
हां. बरं आठवलं, तुमच्याकडं गुलाबजाम आहेत का?”
जोशीबुवांचा चेहरा थोडा पडला.
“आम्ही नाही नं ठेवत… तुम्ही असं करा.. समोर ‘पूर्वा’मध्ये विचारा.”

मग मी रस्ता ओलांडला. चार पायऱ्या चढून ‘पूर्वा’मध्ये गेलो.
मालक पाटणे खुर्चीत बसून मी येताना पाहत होते.
“काय लिमयेकाका, काय देऊ? इडल्या आत्ताच आल्यात. गरमागरम. बघा पाकिटाला हात लावून. पोळंल बघा.”
पाटणे आमचे सातारावाले. ‘पोळंल..’ ऐकून मी खूशच झालो होतो. पुण्यात नाही कुणी वापरत हा शब्द.
मी मोठ्या आशेनं म्हणालो,
‘‘अहो पाटणे, मला वेगळंच हवंय..”
मला बाकी काही न विचारता म्हणाले,
“काका, आज नातवाला नाही आणलंत? मी त्याची वाट पाहात होतो…” पाटणे म्हणाले.
“अहो, अजून झोपलाय. मध्यरात्रीपर्यंत दंगा घालत असतो.
हां. बरं आठवलं, तुमच्याकडं गुलाबजाम आहेत का?’’
आम्ही नाही नं ठेवत. तुम्ही असं करा.. समोर ‘श्रीराम’मध्ये विचारा.”

मग मी मुकाट पायऱ्या उतरलो.
रस्ता ओलांडला. समोर ‘श्रीराम’मध्ये गेलो.
जहागीरदारांनी नुकतंच श्रीराम दुग्धालय हे दुकान सुरू केलंय. त्यांच्याकडे श्रीखंड, आम्रखंड हमखास असतं. जहागीरदार जुन्या ओळखीतले.
मला दुकानात येताना पाहून ते म्हणाले,
“या या, दिलीप लिमये. लेखककाका. आज नातवाला नाही आणलंत? मी त्याची वाट पाहात होतो..” जहागीरदार म्हणाले.

ते मित्र होते. त्यांनी नवीन दुकान सुरू केलं होतं. वयानं माझ्या बरोबरीचे. तेव्हा त्यांना माझी फिरकी घेण्याचा अधिकार होता. मला ‘लेखक’ म्हणून झालेली शिवीगाळ ऐकून शेजारी उभ्या असलेल्या एका ताईंनी पटकन दुधाच्या पिशवीची खरेदी कापडाच्या पिशवीत टाकली अन्‌ त्या बाणेदार पावलं टाकीत निघून गेल्या.
“अहो, अजून झोपलाय. मध्यरात्रीपर्यंत  खेळत असतो. गप्पागोष्टी ऐकायच्या असतात. काल त्यानं फर्मान काढलंय. मला उद्या गुजाबाबा आण, म्हणून.”
“गुजाबाबा? आं?? हा कुठला नवा जिन्नस आणलात हुडकून?’’ जहागीरदारांचा चेहरा बुचकळ्यात पडला होता.
“अहो, तो अजून लहान आहे नं… त्याला गुलाबजाम भारी प्रिय. पण नाव उच्चारता नाही येत. मग तो ‘गुजाबाबा’ म्हणतो. हां. बरं, मला सांगा, तुमच्याकडं गुलाबजाम आहेत का?’’
जहागीरदारांनी पाच बोटांच्या द्रोणात हनुवटी कुरवाळली अन् म्हणाले.
“अरे अरे अरे… आत्ता एवढ्यात समोरचे देशपांडे आले होते. त्यांनी होते नव्हते ते सगळे गुलाबजाम नेले. त्यांना हवे होते अर्धा किलो. नंतर शंभरेक ग्रॅम्स उरत होते. मीच त्यांना गळ घातली सगळे घ्या.. देशपांडे गोतावळ्यात सगळे संपतील सहज म्हणून. अन् सगळं पातेलं रिकामं केलं. म्हटलं वाटी-दीडवाटी माल कुठं सांभाळत बसू? तेही तुमच्यासारखे स्नेही आहेत, म्हटलं, घेऊन जा.. नेले की होs. आता तुम्ही असं करा..
सायकल आहे नं तुमची? बेष्ट. टांग मारा अन् नदी ओलांडा.
ताथवडे बागेच्या जवळ चौकात ‘भावेश’ म्हणून दुकान आहे. तिथं नक्की मिळतील.”

मी निमूटपणे नाकावर रुमाल बांधला.
डोळ्यावर गॉगल चढवला आणि सायकलवर टांग मारली.
सायकल पिदडत दुकान शोधून काढलं.

दुकान एकदम लोभस होतं. काचेची मोठ्ठी कपाटं बिस्किटांनी, फरसाणाच्या अन्‌ कसल्याकसल्या पुड्यांनी, डब्यांनी अन्‌ बाटल्यांनी भरलेली.
समोर एक तरुण माणूस उभा होता. तरतरीत. गोरागोमटा. गर्दी अजिबातच नव्हती. बाहेर रस्त्यावर चुन्यानं रंगवलेले पांढरे गोल रिकामे होते.
मी त्यांना जरासं घाबरत विचारलं.
“तुमच्याकडं ‘गुजाबाबा’ आहेत का?’’ त्यालाही हे मिठाईचं नाव नवं होतं. तोही नवाच असावा. कारण त्यानं भाबडेपणानं पटकन फोनच उचलला. म्हणाला,
“एक मिनिट काका, हा कोणता जिन्नस आहे, ते बाबांना विचारून घेतो..”
मी ओशाळलो.
“अहो नाही नाही.. मला गुलाबजाम हवेत, गुलाबजाम. कोरडे नकोत. पाकातले. आमचा राया आहे नं, त्याला ते खूप आवडतात. आत्ताशी अडीचेक वर्षं वय असेल त्याचं. तो लहान असल्यापासून गुजाबाबा म्हणतो. चुकून माझ्या जिभेवर तो शब्द चढला बघा.”
आम्ही दोघंही हसलो.
“काका, एकदम ताजे आहेत. मी रायाला अगदी छान डब्यात घालून देतो.”
खाली असलेल्या एका कपाटाची काच त्यानं सरकवली. आत एक मोठ्ठंs पातेलं होतं. त्याच्याशेजारी आणखीही पातेली होती. त्यात कसलेकसले ढवळे, केशरी गुलाबी गोळे पाकात तरंगत होते.
त्यानं तपकिरी सोनेरी पाकातला डाव असा अलवार हलवला. आणि आत डुंबत असलेले काही गोळे डावानं अलगद उचलले. एका डब्यात हळुवार सोडले. मग वरून दोन पळ्या पाकाचा अभिषेक केला. डबा बंद केला. त्याला पाक सांडू नये म्हणून चिकटपट्टी लावली. मला डबा दिला.
“काका, आता रायानं खाल्ले की त्याला सांगा फोन करायला. येस्स.. पुढच्या वेळी त्याल घेऊनच या.”
गडी पाकासारखाच मिठ्ठू होता. माझा दोस्तच झाला. माझा धीर चेपला. मी त्याला विचारलं,
“अरे बॉस, हे ताटात चेंडू कसले ठेवलेत? राया क्रिकेट खेळताना असले चेंडू असा काय मारतो की बाल्कनीतून उडून तो चेंडू खाली पार्किंगमध्ये जाऊन पडतो. पण त्याचा चेंडू आहे लाल, असा तपकिरी नाही.”
मग तो खदाखदा हसला. गिऱ्हाईकाला असं दात दाखवणं बरं दिसतं का?
हसणं आवरून तो म्हणाला..
“अहो क्काय काका, हे चेंडू नव्हेत. लाडू आहेत, लाडू. हे समोर आहेत ते बेसनाचे. त्याला काजूची पाकळी अन् बेदाणे चिकटवलेत बघा. रायाला खूप आवडतात. मला माहित्येय.. हे पण न्या. अजूनही आहेत रव्याचे, केशरी.. मोतीचुराचे केशरी केशरी.. डिंकाचे चक्क काळे.. आता पुढल्या वेळी ताजे आले की देईन.”
बोलता बोलता त्यानं पाच लाडू डब्यात भरून मला आज्ञा केली.
“जा घेऊन..”
तेवढ्यात माझं लक्ष कपाटात ठेवलेल्या पांढऱ्या, केशरी डब्यांकडे गेलं.
काय असेल बरं या डब्यात, हा प्रष्ण (प्रश्न नाही..) काकांनी हेरला अन्‌ म्हणाले,
“काका, पांढरे डबे आहेत नं, ते श्रीखंडाचे.. फिकट केशरी आहेत, त्यात अननसखंड आहे. अन्‌ पक्का केशरी रंगाचा  डबा आहे, त्यात हापूसचा आम्रखंड.. तुम्ही रायाच्या समोर तिन्ही नमुने ठेवा.. आमच्याकडे स्पेशल छोटे डबेसुद्धा आहेत म्हटलं, आमच्या छोट्या मित्रांसाठी.”
त्यानं शीतकपाटातून तीन ब्रम्हा-विष्णू-महेश काढून ठेवले.
मी म्हणालो,
“आता पुढच्या खेपेला गुलाबी डब्यात गुलाबखंड आणा. तेही त्याला आवडत असेल.”
मी थट्टा केली.
मिठ्ठूमियां गंभीर होते.
“नो नो काका, तो रंग गुलाबी नाही.. त्याला ‘गुबाली’ म्हणतात रायाच्या भाषेत…”
झालं. आम्ही पुन्हा हसायला लागलो.

दुकानातून बाहेर पडताना पाहिलं तर, एका आचाऱ्यानं शेगडीवर कढई ठेवली होते. आत तुपाचा डबा ओतला असावा. तो समुद्र उकळू लागला होता. बुवानं हातातली दुधाची पिशवी दाबून गोलगोल अशी सरबरीत पिठाची नक्षी तेलावर काढायला आरंभ केला. ती ‘अमूर्त शैली’तली भानगड तळायला लागला. खमंग वास सुटला होता. मग त्यानं झाऱ्यानं तो पसारा बाहेर काढला. ठकठक आवाज करून त्यातलं जादाचं तूप निथळू जाऊ दिलं.. आणि ते प्रकरण शेजारच्या परातीत सोडलं त्या परातीत दाटसर केशरी असा पाक होता.. त्यात तळाशी जाऊन ते प्रकरण विसावलं.
मला कळेना, ही काय चीज असेल बरं?
मग मिठ्ठूमियानं मला हाळी दिली. मी दुकानात गेलो. त्याला विचारलं,
“हा नेमका काय प्रकार आहे?’’
मिठ्ठू पोटभर हसला.
“कम्माल आहे हं.. काका तुमची… तुम्हाला अजून ही गंमत माहीत नाही? तुमचा जन्म काय कांगोत, नाहीतर सिरियात झाला अन्‌ आयुष्य दक्षिण ध्रुवावरच्या मोहिमेत गेलंय का? हा साधा जिन्नस तुम्हाला अजून ठावका नाही?
मी देतो बांधून अडीचशे ग्रॅम्स. द्या रायाला. त्याला नक्की आवडतो हा…”
मिठ्ठूमियाला अजून पावशेर नाही म्हणता येत? कहर आहे…
मी पैसे दिले. सायकलवर टांग मारली. ती पावशेर तळणाची पिशवी उनऊन होती अन्‌ ब्रम्ह-विष्णू-महेश बर्फाच्या खड्यासारखे गारेगार… दोन वायल्या पिशव्या. माझी तारांबळ उडाली सांभाळून आणताना.
आणि आलोss एकदाचा तुझ्या घरी तुला ‘गुजाबाबा’ द्यायला…

>>> 

रायाच्या डोळ्यांसमोर खाऊ नाच करत होता. त्यातून सगळा गोडवा फुलपाखरांचा थवा भिरभिरावा तसा फिरत होता आणि या सगळ्या किस्सा कथनात रायाची ‘ताई’ माझ्यापास कधी येऊन बसली ते आम्हा दोघा मित्रामित्रांना कळलंसुद्धा नाही.
“ओ हिरो, उठा आता. अंघोळीला चला.
अहो फादर, त्याला गोष्ट सांगता सांगता चांगला चोळूनधुवून काढा. चला, आवरा.”
असा रायाच्या आईनं हुकूम केला.

आमची दोघांची अंघोळ झाली.
त्याला कपडे घालून भांग पाडत होतो. तितक्यात माझी लेक म्हंजे रायाची आई तरातरा आली. तिच्या एका हातात लाटणं होतं. दुसरा हात कमरेवर.
“न बोलता चल. आबाजी घास करून देतोय. तव्यावरची पोळी. साखरांबा. काकडीची कोशिंबीर. पोटभर जेव.. आबाजीच्या थापा ऐकून काय पोट भरतं की काय आं..?’’
टम्म फुगलेल्या फुग्यातली हवा ती हलकेच कमी करत होती.
रायानं माझा हात गच्च धरून ठेवला. आईला आर्जवू लागला.
“अगं आई, खलंच आबाजी गेलावता. मी पन होतो नं आबाजी. तुज्या बलोबल? मग तू, मी, लेवाताई, आबीपण होती, शलदबाबा, अकलाज्जी, शगले होतो.. गौतमबाबा पन होता.
ताथवलेबागेत आमी गेलोवतो.. अन्‌ शागले गलमगलम जिबली खात होतो नं..
माजा तल पोताच भल्ला..”

>> 

किती दिवस झाले,
अजूनही गुजाबाबाची गोष्ट चालूच आहे…

*

वाचा
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा
चित्रकथा
कविता


+ posts

दिलीप लिमये हे लेखक, कवी, चित्रकार आणि छायाचित्रकार आहेत.

1 Comment

  1. अनुया कुलकर्णी

    गुजाबाबा सारखीच गोड गोष्ट! छान लिहीलीय ! हे नातंच खूप गोड आहे, ती गोडी पुरेपूर उतरलीय !

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :