अंधाराची अफू

अंधाराच्या अफूची गोळी गिळलेली
रात्र कधीच संपू नये
रात्रीची नशा मला चढते
तिच्या गर्भात पडलेला मी
भाग्याची, उष:कालाची स्वप्नं बघतो
प्रकाशातली सत्यं विसरून
झिंगत राहतो निद्रेच्या
किनाऱ्यावर.
कधीतरी रात्र संपते
स्वप्नांचे पडदे फाडून
किरणांच्या सोनेरी कट्यारी
हळव्या स्वप्नधुंद पापण्यांना
भोसकतात
आणि मग उठावंच लागतं.
मात्र उठल्याबरोबर लक्षात येतं…
खरं म्हणजे आपण
आपल्याच स्वप्नांची प्रेतं
निमूट वाहणारी गाढवं आहोत.

*

वाचा
इतर कविता
‘महाडचे दिवस’
(कादंबरी)
कथा


+ posts

1 Comment

  1. अनुया कुलकर्णी

    खूपच सुंदर कविता आहे!!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :