सध्या राया आणि मी… यांचं एक रहस्य आहे.
त्याला घेऊन फिरायला निघालो की, पायात बूट बांधले जातात. कधी मी बांधतो, तर कधी त्याची आई. बूट जर आईनं बांधले तर तिचं व्याख्यान सुरू होतं.
“आणि हे बघ, चालायचं.. क्काय? चालायचं. आबाजीच्या कडेवर नाही बसायचं. आता तू मोठ्ठा झालास नं? ओके?”
राया त्याला उत्तर म्हणून निर्धारपूर्वक ‘ओक्के’ म्हणतो.
मग गंभीरपणे आम्ही लिफ्टकडे जातो. लिफ्टनं उतरलं की पन्नास पावलं चालत मुख्य रस्त्यावर येतो. तेवढं चालल्यावर त्याला एकाएकी चालायला अडचण येते. त्याचे पाय दुखू लागतात. केवळ नाईलाजानं त्याला कडेवर बसायचं असतं. त्याचं कारण वेगळं आहे. त्याला हवी असते गोष्ट! गोष्ट सांगणाऱ्याचे ओठ अन् ऐकणाऱ्याचे कान अगदी जवळ जवळ हवे असतात त्याला. ती ऐकताना तो हातानं माझ्या शर्टाची कॉलर घट्ट धरून ठेवतो आणि मग मला म्हणतो, “आबाजी, गोत्त शांग नं.”
त्याला आता पक्ष्यांच्या, मोटारींच्या, रेवाताईच्या गोष्टी नको असतात. त्याला पणजोबांच्या गोष्टी ऐकायच्या असतात.
माझे वडील. माझे मित्र. राघू आण्णा. त्यांनी मला खूप सहवास दिलाय. आणि माझे ते अनुभव ऐकायला मला मिळालेला पहिला श्रोता म्हणजे माझा राया – माझा नातू.
परवा गोष्ट सांगताना मी अचानक बोलून गेलो,
“मग आण्णांनी मला उसाचं एक टिपरं बैलगाडीच्या लोखंडी गजावर फोडून दिलं. त्याच्या दोन चिरफळया केल्या, अन् एक माझ्या हातात दिली. मला तर चालायचं नव्हतं. आण्णांच्या खांद्यावर बसायचं होतं. मी भोकाड पसरलं. मग आण्णांनी मला उचलून खांद्यावर घेतलं. मग कुठं मी रडायचं थांबलो…”
मी सांगता सांगता रायानं माझ्या कॉलरला हिसडा दिला. म्हणाला,
“मला खांद्यावर घे.”
मी त्याला खांद्यावर घेतलं. मी त्याचे दोन्ही पाय पंज्यांनी घट्ट धरून ठेवले अन् त्यानं माझं डोकं. राया असा माझ्या खांद्यांवर पूर्वी बसत असे; पण तो तेव्हा नऊ महिन्यांचा होता. त्याच्या रांचीच्या बंगल्याच्या अंगणात मी त्याला असाच फिरवायचो. पुण्यात असं कुणी फिरवत नाही. निदान आमच्या वस्तीत तरी. आजूबाजूनं जाणाऱ्या माणसांनी माना वळवून पाहिलं तरी आम्ही दोघांना ढिम्म फरक पडला नाही.
राया म्हणाला, “आबाजी, मना गोत्त शांग नं.”
“कुणाची?”
“पंज्योबा आबाची. तुला उश दिलावता.. त्याची.”
मला ती गोष्ट हळूहळू सर्व संदर्भांसह आठवू लागली. हल्ली हल्ली मी ती गोष्ट फारशी आठवलेली अशी नाही. इतके दिवस वरवर, थातुरमातुर सांगत होतो.
आत्ता राया जसा माझ्या खांद्यांवर बसलाय, तसा मीही आण्णांच्या खांद्यावर बसून मुलूख न्याहाळला आहे. मला वाटायला लागलं, मी आता आण्णा झालोय अन् राया म्हणजे ‘मी’ – दिलीप!
मग मी त्याला गोष्ट सांगू लागलो.
“मला आण्णांनी खांद्यावर घेतलं होतं. सोबत खूप माणसं होती. बायामाणसं पण होती. त्यांना चालायचा त्रास नको, म्हणून त्या बैलगाडीत बसल्या होत्या. रस्त्यानं गर्दी होती. आम्ही इंदोलीतून बाहेर पडलो होतो. नदी ओलांडून सातारा रस्त्यानं चालत होती माणसं. परसूकाका होते, आणखी कुणीकुणी होते. खंडोबाच्या पालीला निघालो होतो. काहीतरी सण होता. खंडेनवमीही असेल. आण्णांनी दिलेला ऊस मी चघळत होतो…”
रायाचं घर जवळ आलं. सोसायटीच्या आवारात पाय टाकण्याआधी मी त्याला खांद्यावरून उतरवला. तो म्हणाला, “आबाजी, ऊच्चून घे.”
मी त्याला उचलून घेतलं.
मग पुढची गोष्ट मला राया सांगू लागला…
“आबाजी, मी होतो नं तुज्या बलोबल?”
“हो राया, तू होतास की..”
एव्हाना रायाच्या घरातील दिवाणखान्यात आम्ही पोहोचलो होतो. रायानं मला पुढ्यात कार्पेटवर बसवलं. तो माझ्याजवळ, समोर बसला.
त्याचे डोळे लकाकत होते. तो मला पुढची गोष्ट सांगत होता..
“अले आबाजी, आपण शगलेच होतो. बैsगालीत पंजीआज्जी होती. आबी होती. आई होती. लेवापन होती. आणि बाबापन होता. आनीs शलदआबा होता. अकलाज्जी होती..”
त्या यात्रेत मग त्याचे सगळे जिवलग त्याच्यासंगे चालू लागले होते. पणजीआजी बैलगाडीत होती. बकुळा म्हंजे त्याची आई होती. बाबा होता. रेवा होती. त्याच्या बाबांचे आई-वडील शरदआबा अन् अलकाआजीही होती..
त्याचा परिवार खूप मोठा आहे. त्याचं मन खूप विस्तारत जाणारं आकाश आहे. आता त्यात त्याचे पणजोबाही येऊ लागलेत…
आता मला हे पुन्हा त्याच्या संगतीनं शिकायला हवं. जिथं-तिथं मी असतो. जिथं स्मरणं होत असतात, तिथं मी त्यांच्यात असतो हे सांगायला मला आता भगवंत नसला तरी चालेल.
तो सांगतो, “तत्र तिष्ठामि, नारद.”
अन् राया मला निर्वाळा देतो, “आबाजी, मी पन होतो नं थिते..?”
*
वाचा
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
चित्रकथा
कविता
दिलीप लिमये हे लेखक, कवी, चित्रकार आणि छायाचित्रकार आहेत.
दिलीप दादा, राया इतकीच गोड गोष्ट आहे ! पुढच्या पिढीचा हात मागच्या पिढीच्या हतात आहे, घट्ट आपलेपण आहे , निरागस भाव आहे आणि सहजता आहे… हे सगळं फार फार मस्त आहे!!