आम्ही सदाशिव पेठेतल्या घरी राहात होतो. माझा मसूरचा पुतण्या अभय एका दसऱ्याला दुपारी आमच्या घरी आला होता. तो, त्याची पत्नी, त्याची आई – अरुणावहिनी.. अन् त्याचा दोनेक वर्षांचा लेक. त्याचं पाळण्यातील नाव काहीतरी आहे खरं.. हं, आठवलं, प्रथमेश.
पण ते अजूनही जिभेवर नाही रुळलेलं.. त्याला वहिनी ‘घनु’ म्हणत होत्या. माझ्या डोक्यात अजूनही घनुच बसलंय.
सैपाकघरात असलेल्या टेबलाभोवती बसून गप्पा रंगल्या होत्या. मोठ्या माणसांच्या.
मी अन् घनु बाहेरच्या खोलीत रमलो. कागदी होड्या करून झाल्या. कागदांवर रेषा खेळून झाल्या. त्याला रंगीत खडू फारसे आवडले नाहीत.. मग इतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी खेळणी झाल्या.. खुप छान गेला वेळ. मी त्याला म्हणालो, “घनु, आजी, आई, बाबा.. जाऊ दे, परत चिंचवडच्या घरी. आपण तिघं राहू इथं पुण्याच्या घरात.”
भोळं पोर. झालं की तयार! पायात चप्पल घ्यायला तयार नाही. मग मिनतवारीनं कसंबसं त्याच्या मनाला तयार केलं की.. चप्पल तर घाल. आपण सगळेच या लोकांना टाटा करायला खाली जाऊया म्हणून.
या लांडीलबाडीचा मला भारी त्रास होऊ लागला..
“राहिला तर राहू दे की एक दिवस. उद्या मी चिंचवडला आणून सोडीन.” हे माझं कुणी ऐकूनच घेत नव्हतं. नुसती वादावादी.
वहिनी म्हणाल्या, “भाऊजी, तुम्हाला चांगलं खेळणं मिळालंय. सोडा आता त्याला. जरा रडेल.. दहा मिनिटांनी विसरेल तो. पुणं, हे घर, पद्माकाकू.. तुम्हाला पण विसरेल…”
मग घनुला आवडलेल्या माझ्या खेळातल्या वस्तू मी द्यायच्या घनुला पिशवीत घालून.. आणि घनु न रडता जाणार.. असा माझा घनुचा करार झाला.
माझा टूथब्रश आणि बर्म्युडा तुमान पिशवीत घालून घनुला मी दिली. घनु निघाला.
तो या घराचा एक हिस्सा त्याच्या घरी नेत होता…
मी चार मजले उतरून खाली नाही गेलो. मला त्रास होत होता.
माझं काम मग भारतीनं निभावलं. येताना घनुच्या हातून ती पिशवी अलगद काढून तिनं आणली होती. जागच्या जागी सामान लावून पिशवीची घडी खिळ्याला लावताना बोलत होती..
“कसले हे अजब खेळ अन् अस्वली प्रेम म्हणायचं? समजूत काढताना आम्हा बायांचा जीव जातो. लेकरांचं एक समजतं हो.. पण मोठ्या माणसांनीसुद्धा पोरकट व्हायचं? अवघड आहे..”
>>
आज दसरा.
सकाळी लेक बकुळ जेवायला आली. संगे नातवंडे..
“अगं रेवा, जेवायला चल बाई. भात गार होऊ घातला बघ.”
रेवाला जेवायचं नव्हतं. संगणकाच्या पडद्यावर तिचा जन्मसावित्री कार्यक्रम ‘दिल दोस्ती दुनियादारी’ तिला बघायचा होता.
रायाच्या आईनं त्याचं ताट वाढून घेतलं आणि बैठकीच्या खोलीत घास भरवणं सुरु झालं. त्यानं बैठकीवर एक डंपर, एक वाळूचा मिक्सर, दोन बसगाड्या मांडून ठेवल्या अन् त्याच्या गराजमध्ये तो रमला.
त्याच्या खेळात त्याला ‘आबाजी’ हवा असतो. मागंपुढं नाचायला. तो जरा जरी खेळ सोडून नजरेआड झाला तरी, करडया आवाजात फर्मान सुटते. “आबा, च्यल खेलायला.”
हळूहळू खेळ बदलत गेले. आजीच्या रिकाम्या होमिओपॅथीच्या गोळ्यांच्या डब्या, टिकल्यांच्या डब्या, पिशव्या.. पुस्तके, मोबाईलवर विविध क्रीडा.. तास-दीडतास हे विविध गुणदर्शन झाले.
रेवा, राया यांच्या मागोमाग आमचीही जेवणे झाली.
मग मायलेकींच्या गप्पा, माझी अन् रायाची निरुद्देश मांडामांड, रेवाची मालिका..
लेक म्हणाली, “चला.. रेवा, राया.. उठ आता. आता घरी जायचं.”
सगळं खेळणं एका क्षणाला संपलं.
रायाला एक कढई पिशवीत घालून घ्यायची होती. त्याच्या आईला ती न्यायची नव्हती.
मग रडारड व रागवारागवी आळीपाळीनं झाली.
त्याच्या आजीनं ती कढई न बोलता ताडपत्रीच्या पिशवीत घातली. रायानं ती उचलली अन् रडणारी मुद्रा एका क्षणात बदलून तो निघाला.
“आबा, रामशाब, शी ऊ.. खुदा हाफिज.”
सगळं रीतसर झालं..
आजीबाई पोहोचवायला खाली पार्किंगमध्ये गेली.
मी कधीच जात नाही. त्रास होतो. सगळ्यांनाच.
मी खुर्चीत शांत डोळे मिटून बसलो.
दोन-अडीच तास पाटीपूजनापासून चालू झालेला आवाजांचा, माणसांचा सोहळा अखेर संपला. घर एकाएकी शांत शांत झालं…
मिनिटाभरात भारती घरात आली.
तिच्या हातात ताडपत्रीची मोठी पिशवी होती.
कढईसकट…
*
वाचा
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
चित्रकथा
कविता
दिलीप लिमये हे लेखक, कवी, चित्रकार आणि छायाचित्रकार आहेत.
व्वा, खूपच सुंदर लेखन!