काल रात्री बऱ्याच उशिरापर्यंत आम्ही पत्ते खेळत बसलो होतो. एरवी तीन पानी किंवा रमी खेळणारे आम्ही रात्री बदाम सात, झब्बू असे सभ्य खेळ खेळलो, याचं एकमेव कारण होतं साळीसाहेब. मुलात मूल होऊन खेळावं तसं आम्ही खेळत होतो. मोठ्या माणसासारखं फक्त साहेब खेळत होते; परंतु याचा परिणाम एकच झाला झब्बूसारख्या बंडल खेळात ते अनेकदा गाढव झाले होते. वरकरणी ते ही गोष्ट हसून गोड करत होते; पण आतमध्ये ते उसवले गेले होते. आपण या सगळ्यांचे साहेब आहोत, या भावनेनंच खेळण्यामुळं अतिसावध खेळून ते स्वतःला गाढव होण्यापासून वाचवत होते. ते गाढव होऊ नयेत यासाठी आम्ही काळजी घेत होतो, तरीही सतत मॅच फिक्सिंग जमत नव्हतं.
किंचित जाग्रणानं एरवी पहाटे साडेपाचला उठणारे आम्ही पावणेसातला जागे झालो. आमची सगळ्यांची अंथरूण पांघरूण अस्ताव्यस्त पडलेली; पण साहेबांची वळकटी बांधून तयार. त्यांचे लाल डोळे चुरचुर करतायंत त्याचा आवाज माझ्या कानांपर्यंत येत होता. कनिष्ठ झोपलेत आणि वरिष्ठ केवळ जागा झालाय हेदेखील साहेबांना खटकत असावं. काल दिवसभराचं साहेबांचं हवंहवंस रूप सकाळी बदललं होतं. अनेकदा गाढव होण्याचा चांगलाच परिणाम त्यांच्यावर झाला होता. ते एरवीचे साळीसाहेब झाले होते.
बाहेर लेबर केव्हाच येऊन बसले होते. आम्ही आमचं आवरून बाहेर पडलो. साहेब सगळ्यात पहिल्यांदा उठूनही आम्ही बाहेर पडताना पेंगत होते. उठायला थोडा उशीर झाला तरी आमचा सर्व्हे नेहमीच्या वेळात सुरू झाला. कारण आज आम्हाला तंगडतोड करावी लागली नव्हती. साहेब आल्यामुळं जीप होती. जीपचा फायदा आम्हाला आणि लेबरलासुद्धा मिळाला होता.
आमचा सर्व्हे गोपाळवाडीच्या जवळ आला होता. नऊ-साडेनऊच्या सुमारास जीप घेऊन साहेब आले. त्यांनी सर्व्हेमध्ये फारसं लक्ष घातलं नाही. ते निरोप सांगायला आले होते. मी स्टाफ कुठं धरायचा, हे दाखवायला कुशाबाला घेऊन जरा दूर गेलो होतो. साहेब जीपमध्ये बसून होते. कुशाबा योग्य ठिकाणी स्टाफ घेऊन उभा आहे याची खातरजमा करून घेऊन मी लेव्हल लावली होती तिथं आलो. जीपमध्ये बसलेल्या साहेबांनी मला खुणेनंच जवळ बोलावलं आणि म्हणाले,
‘‘जोशी, तुमचा सर्व्हे संपला की महाडला या. पुढचे काही दिवस कोंझरला जा. कारण शहापूरकर पाच-सहा दिवस नाहीत. सोलापूरला चाललेत.”
साहेब गेले त्या दिशेनी मी पहात राहिलो. साहेबांनी केवळ शहापूरकर नाहीत म्हणून मला कोंझरला जायला सांगितलं, का तिथला सर्व्हे रेंगाळतोय त्याला गती यावी म्हणून माझी पाठवणी करायचा निर्णय घेतलाय? काय माहीत. हा आपला सन्मान आहे, अशी मी समजूत करून घेतली; पण आत कुठंतरी वाईट वाटत राहिलं. मी कापड्यात रुळलो होतो. पण वरिष्ठ आज्ञा झाली होती. मला कोंझरला जावं लागतंय कारण शहापूरकर सोलापूरला चाललाय. म्हणजे त्याचं काही लग्नाचं ठरतंय का?, या विचारानं एकदम उभारी आली. होऊ दे बिचाऱ्याचं बरं. पाय ओढत चालल्यासारखा मी उरलेला सर्व्हे संपवला.
कोंझरला माझा सहावा दिवस. बीएस, एनएम बरोबर काम करताना जी मजा वाटत होती ती चव्हाण, डीजे बरोबर वाटत नव्हती. माझी सुटका इथून केव्हा होणार, हा विचार मी संध्याकाळी करत होतो. लांबून एक स्थूल आकृती संथ गतीनं येत होती. हातात एक सिगारेट होती. मी दोनशे फुटावरूनही सिगारेटचा ब्रँड ओळखला. बर्कले.
शहापूरकर जवळजवळ येत चालला. त्याचे उदासवाणे असलेले डोळे पाहायची सवय असलेला मी त्याच्या कारंज्यासारख्या नाचऱ्या डोळ्यांकडं पहात राहिलो. मला घट्ट मिठी मारत तो म्हणाला,
‘‘जोशी ठरलं एकदाचं. आणखी तीन महिन्यांनी मी दुकटा होणार. मला तुझे आभार मानायला हवेत. तुझ्या सांगण्यावरून माझा सीमेन काउंट रिपोर्ट मी दादा वहिनींना दाखवला. मग चक्र फिरली. वहिनी मी समजूत करून घेतली तशी वाईट नव्हती रे. आता माझी तसली काळजी संपल्यानं वहिनींनी भराभरा तीन-चार स्थळं दाखवली. एक मुलगी पसंत केली. खेड्यातली आहे पण निदान एसएससी झालीय. चुणचुणीत वाटलीय. वयात अंतर दहा वर्षाचं आहे; पण त्या लोकांना चालतंय म्हटल्यावर वहिनींनीही चालतंय म्हटलं.’’
शहापूरकरनी साहेबांचा एक निरोप माझ्यासाठी आणला होता. ‘जोशींना म्हणावं की उद्या तुम्ही महाडमध्ये न येता थेट कापड्याला गेलात तरी चालेल.’ माझा पाय इथून निघत नाही असं मी खोटंच चव्हाण आणि डीजेला सांगितलं. पण हेच वाक्य मी शहापूरकरला खरं सांगितलं. हे खरं बोललो होतो का? हे स्वतःच्या प्रामाणिक मनाला विचारत होतो तोवर एसटी पोलादपूर वरून कापड्याच्या दिशेनं निघाली होती.
कापड्याला आपल्या माणसात येऊन पोचलो तेव्हा साडेदहा वाजले होते. आणखी तासाभरातच बीएस आणि एनएम येतील. मगच खोलीवर एकत्र जाऊ, हा विचार करत भाजीच्या कॉटवर बसलो. घरात डोकावलं. आमदार नाहीत. ताई नाही. कुशाबा सर्व्हेला गेला म्हणून नाही. मी स्वयंपाकघराच्या खिडकीतून तळ्याकडं पाहिलं. तळ्याकडं जाणाऱ्या उतरंडीच्या पाऊलवाटेवर माणसाची सावली नव्हती.
अर्धा तास होऊन गेला. मी पिशवीतली श्री. ना. पेंडसे यांची कादंबरी काढली. गारंबीमधल्या पऱ्ह्याच्या साकवावर विठोबा उभा होता. त्याच्याकडं अंतर्बाह्य बघण्यासाठी मी नजर उचलली. समोर रखमाई उभी.
‘‘जोशीभाऊ, बरं झालं तुम्ही आलात. आज किनई…”
एकदम ती बोलायची थांबली. या आत म्हणाली. आढ्याला एक फडकं टांगलेलं होतं. फडक्यातून पाणी ठिबकत होतं. त्याच्या टपक टपक आवाजात मी ताईचा अंदाज घेत होतो. तिच्या हालचाली वेगवान झाल्या होत्या. तिच्या हातांना आणि पायांना सवड नव्हती.
मी त्या फडक्याकडं पहातोय, हे लक्षात येताच म्हणाली,
‘‘हे तुम्हाला नवीन दिसतंय.. दही टांगलंय. होईल दुपारपर्यंत चक्का तयार.’’
मला खरंच ही चक्का करायची कल्पना नवी होती. ताई म्हणाली,
‘‘भाऊ, तुम्हाला पुण्याचा कुठला तो चक्का खायची सवय. कुठला हो तो चक्का, बाकरवडीवालं दुकान?’’
मी पटकन चितळे म्हटलं. ‘‘मला मेलीला ते नावच आठवेना. आज खास बेत आहे. श्रीखंड आणि पुरी. तुम्हाला पंचामृत आवडतं नाही का. तेही घेते करायला.’’
ताईची लगबग सुरू. मी विचारलं,
‘‘आज काही विशेष?’’ आपलं हसू दाबत ती म्हणाली,
‘‘आमदारांच्या घरात रोजच विशेष. बुचकळ्यात पडलात ना. थोडं दोन तास थांबा.. तुमचं तुम्हालाच कळेल.’’
तेवढ्यात आमदार आले आणि ताईला म्हणाले,
‘‘भानू आलीय का पोलादपूरहून?’’
मला काहीच समजेना. भानुलाच विचारतायंत आमदार की, भानू आलीय का? मी आमदारांकडं पाहात राहिलो. तेव्हा ते म्हणाले,
‘‘अरे हो, तुम्ही आठवडाभर नव्हता नाही का. आज जेवायला भानू येणार आहे. भानू माने. कापड्यातलीच आहे. पण दोन भानूत बराच फरक आहे. ही भानू आमदाराची तर ती भानू.. माहीत नाही कुणाची होणार आहे?”
आज आमदार, ताई अशी कोडी का घालतायंत? मी म्हटलं,
‘‘ताई मला जरा समजेल असं बोला ना.’’
त्यावर ताई काही उत्तर देणार त्याच्या आतच आमदार म्हणाले,
‘‘तुमचे बीएस देतील उत्तर. भानू.. जोशीबुवा लैच गोंधळलेत. मी सांगूनच टाकतो ना.. काय ठरलंय ते. आज बघण्याचा कार्यक्रम आहे. आमची कापड्यातली भानू माने तुमच्या बीएसना दाखवायचीय. आता कळलं असंल की चक्का का टांगलाय.’’
बीएस रस्त्यानं समोरून येईल म्हणून मी वाट बघत बसलो. बारा वाजून गेले तेव्हा मी ताईला म्हटलं,
‘‘मी जरा खोलीवर जाऊन येतो अर्ध्यापाऊण तासात.“
टेकाड चढून मी खोलीकडे पाहिलं तर लेबर खोलीत सर्व्हेचं सामान आत टाकून परत जात होते. मी त्यांना हटकलं आणि विचारलं,
‘‘साहेब लोक कुठायत?’’
‘‘हायती. खोलीवर गेलेत. लै नट्टापट्टा चाललाय साहेबांचा.’’ मी ताईच्या घरी त्यांची वाट पाहतोय आणि ते दुसऱ्या वाटेनं खोलीवर गेलेदेखील होते.
मी खोलीत पाऊल टाकलं. समोर बीएस. मी त्याला म्हटलं, ‘‘छान दिसतोयस.’’
मला वाटलं तो लाजेल; पण तसं काहीच झालं नाही. कारण त्याला कुठं माहीत होतं की मी तासभर आमदारांच्या घरी होतो. मला सगळं समजलंय. उगाच खुलासा करण्याच्या नादात तो म्हणाला,
‘‘जोशी, तू कोंझरला गेल्यापासून दाढी केली नव्हती. आज मुहूर्त सापडला आणि तू आलास.’’
तासाभरात मी आणि एनएम खाली यायला निघालो. बीएस मात्र येता-जाता आरशात स्वतःला न्याहाळतच होता. मला कडकडून भूक लागली होती. आता हा बीएस कधी येणार आणि श्रीखंड खाणार? मी घायकुतीला आलो आणि हा निवांत कसा याचं आश्चर्य करत राहिलो.
आमदारांच्या घरात पोचलो. तासापूर्वीचं त्यांचं घर आणि आत्ताचं घर यात जाम फरक पडला होता. ताईंनी घर अतिशय नीटनेटकं आवरलं होतं. एरवी अस्ताव्यस्त असणार हे घर बीएसनी पाहिलं होतं. ती कोण भानू तिनंही पाहिलं असणार. पण आज मात्र तेच नीट आवरलेलं घर ती दोघं नव्यानं पाहणार होते.
बीएस यायच्या अगोदरच ती मुलगी आली. मी काही तिला पूर्वी पाहिलं नव्हतं. ती साडी नेसून आली होती. तिचं अकारण पदर सावरणं, निऱ्या ठाकठीक करणं, टाचेनं साडीचा बोंगा दाबत राहणं पाहिलं, तेव्हा वाटून गेलं तिला साडी नेसायची सवय नाही. हळदी-कुंकवाच्यावेळी गौरी साडी नेसायची तेव्हा ती असंच करायची आणि आई तिच्याकडं कौतुकानं बघायची. आता या भानूकडं ही भानू अशीच कौतुकानं पाहत होती.
जेवायला सगळेच एकत्र बसलो. जेवून सगळे एकत्रच उठलो. आता एकत्रच गप्पा मारायच्या तर ताई मला आणि एनएमला म्हणाली, ‘‘चला बाहेर बसू गप्पा मारत.’’ रस्ता ओलांडून आम्ही चौघंही शाळेपर्यंत फिरून आलो. घरात आलो तेव्हा बाहेरची खोली रिकामी. स्वयंपाकघराचं दार बंद. आमचा आवाज ऐकताच मधलं दार उघडलं गेलं. विस्कटलेल्या केसांचा बीएस बाहेर आला. वरच्या खोलीवर पुन्हापुन्हा केसांवरून कंगवा फिरवणाऱ्या बीएसला आता विस्कटलेल्या केसांचं भान नव्हतं. दोन मिनिटांनी ती बाहेर आली. मघापेक्षा जास्त नीट साडी नेसलेली. मघाशी नव्हती ती फुलाची वेणी केसात माळलेली. मघाची भिरभिरती नजर आता जास्त स्थिर.
‘‘आमदारकाका, ताई मी येते.’’ असं म्हणून ती मागं वळूनवळून पहात तिच्या घराच्या दिशेनं गेली. ताईंनी बीएसला विचारलं, ‘‘झाला पाहण्याचा कार्यक्रम.. आता जरा हसा की.’’
आमदारांनी एक कागद पुढं ओढला. त्यावर ‘श्री’ लिहिलं आणि बीएसला विचारत राहिले.. वडलांचं नाव, आईचं नाव, भावंड किती, काका मामा कुठं असतात. जमीनजुमला किती, बागायत किती, जिरायत किती. वय किती, उंची किती वगैरे वगैरे.
बीएस प्रत्येक पोटप्रश्नांची माहिती देताना अवघडलेला. तर इकडं ताईंनी एका कागदावर भानू मानेची माहिती लिहून पूर्ण केली. आमदारांपेक्षा तिचा वेग आणि उरक जास्त होता. आमदारांना माहिती गोळा करून लिहायची होती तर ताईला माहीत असलेली माहिती उतरवून काढायची होती. आमदारांनी त्यांनी लिहिलेला कागद वाचून दाखवला. ताईंनी भानू मानेची माहिती असलेला कागद बीएसला दिला आणि म्हटलं, ‘‘हा कागद द्या पाठवून गावाकडं आणि बजावा होकार आठ दिवसात कळवा, नाहीतर तुमच्या मुलाचं कामात लक्ष लागणार नाही.’’
खोलीची चढण चढताना बीएस म्हणाला,
‘‘हे लोक फार घाई करतायंत. मी यातलं काहीच घरी सांगितलेलं नाही. घाटावरची माणसं लग्नाच्या बाबतीत कशी असतात, ते या कोकणी लोकांना माहिती नसावं.’’
ती भानू माने चेहरा उजळवून घरी गेली होती. इकडं बीएस असंख्य शंकांचं जाळं कपाळावर विणत बसला होता. मी खोलीत पोचलो ते संमिश्र भावनेनं. शहापूरकर लग्नाचं ठरलेलं उत्साहानं बोलून मला कोंझरहून निरोप देत होता. तर इथं बीएस लग्नाचं ठरतंय म्हणून कावराबावरा होऊन माझं खोलीत पुनश्च स्वागत करणं विसरून गेला होता.
(क्रमशः)
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)