दादांच्यापासून हे इंटरव्ह्यु प्रकरण दाबून ठेवणं तसं त्रासदायक होतं. पण मी नाही बोललो. कारण, हे सांगितलं असतं तर कदाचित ओळखी काढून त्यात त्यांनी ढवळाढवळ केली असती. माझं सिलेक्शन झालं असतं तर ते गुणवत्तेवर न होता वशिलेबाजीनं झालंय, असं मला वाटत राहिलं असतं. आणि समजा सिलेक्शन नाहीच झालं तर दादांना काही कळणार नव्हतं. मी थोडाच बिननोकरीचा बेकार होतो.
मी महाडला आलो. स्टॅण्डवर उतरलो तेव्हा समजलं की बाजारपेठेत पाणी भरलंय. गेल्या दोन वर्षात असं झालं नव्हतं. पण चार दिवसाच्या कुलाबा जिल्ह्यातल्या तुफानी पावसानं समुद्राचं पाणी सावित्रीच्या खाडीत शिरल्यामुळं महाडची ही अवस्था झाली होती. लोकांमध्ये कुठलीही चलबिचल नव्हती कारण पावसाळ्यात हे नित्याचं होतं. जुना पोस्ट, मंडई आणि पिंपळ गणपती या भागात रस्त्यानं बोटी फिरत होत्या. लोकांची आणि सामानाची हलवाहलव या बोटी करत होत्या. मला थोडी खोलीतल्या माझ्या सामानाची काळजी वाटत होती, पण शहापूरकरनं सगळं मॅनेज केलं असणार याची खात्री होती. राजेवाडी फाट्यावर ऑफिसचा शिपाई भेटला. मी त्याला शहापूरकर ऑफिसला आहेत का? विचारलं. तेव्हा तो म्हणाला,
“नाय बा, साहेबांनी त्यांना कागद घेऊन माणगावला धाडलंय.”
आता मात्र मी काळजीत पडलो. मला माझ्या बॅगेत ठेवलेले कथांचे कागद, डायरीत नोंदवलेली कथाबीजं दिसायला लागली. खोलीच्या संडासाच्या मागून वहात असलेला नाला दिसायला लागला. डोळ्यापुढं चिखल आणि चिखल. मी असहाय्यपणे पाणी उतरायची वाट पहात राहिलो. दोन तासांनी पाणी गुडघ्याइतकं उतरलं. रस्त्यावरचा चिखल तुडवत खोलीकडं आलो. वरच्या मजल्यावर घरमालक पानसरे उभे होते. ते म्हणाले,
“खोलीत जायची घाई करू नका. पाणी पूर्ण ओसरू द्या. तुम्हाला चिखल काढावा लागेल. झालंच तर मरून पडलेले उंदीर, घुशी आणि सापदेखील गोळा करावे लागतील. आमच्याकडं वर या. पोटात काही नसेल. थोडंसं खाऊन घ्या. आणि हो खोलीतल्या सामानाची काळजी करू नका. पाणी वाढतंय म्हटल्यावर बर्वे आचारी इथं आले. तुमच्या खोलीची चावी घेतली आणि तुमचं आणि शहापूरकरांचं सगळं सामान आमच्याकडं वर आणून टाकलंय.”
मला एकदम हायसं वाटलं. बर्वेकाका तुमचे आणि माझे काय ऋणानुबंध आहेत. श्रीकांतनं केवळ तुमची ओळख करून दिली म्हणून मी जेवायला यायला लागलो. असं प्रेम करायची आपली बोली कधी झाली होती?
खोलीची अवस्था बिकट होती. रात्री झोपायला मी बर्वेकाकांकडं गेलो. त्यांच्याकडं झोपायची वेळ कधीच आली नव्हती. काका-काकू आणि मी पाच-तीन-दोन खेळत बसलो. सकाळी उठलो तेव्हा वाटलं आपण काकांच्या कुशीतून जागं झालोय…
साहेबांनी बेअरिंग घेण्यावरून मला झापलं होतं, ते योग्यच होतं. डाटा ड्रॉईंग पेपरवर प्लॉट करताना मला खूप अडचणी येत होत्या. एकदा तर मला भर पावसात नाते, नांदगाव भागात कॅनॉल बेसलाईनवरून गडगे शोधत फिरावं लागलं. ज्या शेतात गडगे भरत होते त्या शेतकऱ्याची गाठ घेऊन गट क्रमांक, हिस्सा क्रमांक घेऊन लोकेशन गाव नकाशावर फिक्स करावं लागलं.
इंटरव्ह्युच्या आदल्या दिवशी मी पुण्याला आलो. दादा म्हणाले,
“हे काय? दहा-बारा दिवसांपूर्वीच येऊन गेला होतास ना.”
मी काहीच बोललो नाही. सकाळी उठून पहिले ठेवणीतले कपडे काढले आणि दाढी करत बसलो. केतकी म्हणाली,
“विनय, आज अगदी घोटून दाढी. मुलगी बघायला चाललास की काय?”
इंटरव्ह्यु देण्यासाठी ऑफिसला पोहचलो. दशपुत्रे लिस्ट घेऊन बसले होते. मला बघून ते ओळखीचं हसले. बाहेरच्या खुर्च्यांवर पाच जण बसले होते. दशपुत्रेंनी मला तिथं बसून घ्या म्हणून खुणावलं. माझ्या शेजारी पब्लिक हेल्थमध्ये काम करणारे साठे बसले होते. माझ्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठे असावेत. बीइ असलेले ते चेहऱ्यावरून खूप तल्लख वाटत होते. न कळत मी त्यांच्याकडं ओढला गेलो. त्यांच्या सर्टिफिकेटमध्ये एक लांबलचक लिस्ट असलेला कागद दिसला. त्यावर अनेक प्रश्न. मी त्यांना विचारलं,
“साठेसाहेब, तुम्ही इंटरव्ह्यु द्यायला आलात की घ्यायला?”
ते दिलखुलास हसत म्हणाले,
“इंटरव्ह्यु म्हणजे काय फक्त त्यांनी प्रश्न विचारायचे आणि आपण उत्तर द्यायची? मीही प्रश्न विचारणार आहे. मी त्यांच्याकडून ती लिस्ट घेतली. प्रश्न होते,
१ – ही नोकरी कायम स्वरूपाची आहे का?
२ – स्केल देताना आमची पूर्वीची नोकरी विचारात घेतली जाणार आहे का?
३ – प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे का?
४ – इतर फॅसिलिटीज मिळणार आहेत का? असल्यास त्याचं स्वरूप काय असेल?
५ – कुठल्याही प्रकारचा बॉन्ड द्यावा लागेल का?
मी साठेंच्याकडं आदरानं पाहिलं. साठेंना आतून बोलावणं आलं. साठ्यांच्या प्रश्न मालिकेनं माझ्या विचारांना चालना मिळाली होती. नोकरीकडं किती गांभीर्यानं पहायला हवं, याची जाण मला आली. दादांना या इंटरव्ह्युची कल्पना न देण्यानं मी नेमकं काय साध्य केलंय? मोकाशीसाहेबांशी मोकळेपणानं बोलणारा मी दादांच्या बाबतीत असा का वागतोय?
वीस मिनिटांनी साठे बाहेर आले. त्यांची देहबोली सांगत होती की, इंटरव्ह्यु त्यांना हवा तसा झालाय. खुर्चीवर न टेकता हातातील फाईल या हातातून त्या हातात नाचवत ते म्हणाले,
“यांनी माझं सिलेक्शन केलं तर यांचं सिलेक्शन करायला मी अळंटळं करणार नाही. बेस्ट लक जोशी. भेटूच आपण लवकर!
आणखी दोन जण आत जाऊन बाहेर आले. पण ते निर्विकार वाटले. दशपुत्रेंनी माझं नाव पुकारलं. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले,
“बाहेर तुम्ही मघाशी येऊन गेलेल्या साठेंशी बोलत होता. तुमच्याही मनात त्यांनी विचारलेले प्रश्न आहेत का?”
मी म्हटलं,
“सर, प्रश्न तुम्ही विचारावेत म्हणून मी आलोय.”
शेजारी एक पारशी गृहस्थ बसले होते. ते म्हणाले,
“डिकरा, आपुन क्वश्चन-आन्सर नको करू. डायलॉग करू. हे साहेब बोल्ले तू इरिगेशनच्या हाय. अमी लोग तुला बिल्डिंगा बांधाया ऑर्डर करणार. कसं करशील?”
“सर, बिल्डिंग असो नाहीतर रस्ता, सिव्हिल इंजिनियरिंग सगळीकडं सारखंच. कॉलेजमध्ये आमचे सर म्हणायचे की, इंजिनीरिंग इज नथिंग बट स्ट्रॉंग कॉमन सेन्स.”
आणखी पलीकडचे साहेब म्हणाले,
“लूक मिस्टर जोशी, इंटरव्ह्यु म्हणजे कँडिडेटला काय येत नाही, हे शोधून त्याला हैराण करणं नसतं. तर काय येतं हे पाहणं असतं. सपोज, आमची संस्था घरं बांधणारी आणि पब्लिक अमेनिटीज देणारी आहे. यामुळं उद्या वॉटर सप्लायसाठी एखादा विअर (अगदी छोटं धरण) बांधायचा ठरलं तर तुमचं इरिगेशन नॉलेज आम्हाला उपयोगी पडू शकत. नाऊ ट्राय टू एज्युकेट अस अबाऊट सिलेक्शन ऑफ विअर साईट. त्याचा डाटा गोळा करण्यासाठी सर्व्हे, एस्टिमेशन वगैरे प्रोसेस सांगा.”
मी डोळ्यापुढं साळी आणि मोकाशीसाहेब आणले. मनोमनी त्यांना नमस्कार करून सांगायला सुरवात केली. माझं बोलून संपलं तेव्हा ते पारशी म्हणाले,
“स्लाब या बीम मंदी मेन स्टील कुठं ठेवतात. यु मे ड्रॉ स्केच.”
“सिम्पली सपोर्टेड असेल तर तळामध्ये आणि कॅंटीलिव्हर असेल तर वरच्या बाजूला आणि सपोर्टजवळ, नेसेसरीली वर.”
“नाऊ टेल अस, ड्रेनेज लाईन टाकायची असेल तर स्लोप कसा चेक करणार?”
“डंपी लेव्हल अव्हेलेबल असेल तर लेव्हल तपासून आणि नसेल तर गावठी पद्धतीनं. म्हणजे डब्यातलं पाणी चढाच्या बाजूनं पाइपात फेकायचं आणि ते रिटर्न कसं येतंय, ते पहायचं. जंटल स्लोपला ते सावकाश येईल. हेवी स्लोप डिझाईनमध्ये असेल तर थोडं वेगानं येईल. त्याचा वेग आणि डिझाईनमधला अपेक्षित स्लोप जुळला तर ओके.”
पारशी म्हणाले,
“तुझ्या बायोडेटात तू गोष्टी लिहायला पसंत करतो लिवलंयस. बापाचं नाव प्रभाकर हाय. आमच्याकडं एक जोशी हाय, तो बी लिवतो. तुमचा काय कनेक्शन?”
मी म्हटलं,
“सर, तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत बोलत असाल तर ते माझे वडील आहेत.”
माझा इंटरव्ह्यु झाला. दशपुत्रे म्हणाले की कळवू. मी घरी आलो.
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)