महाडचे दिवस ६७: खोली परकी वाटू लागली

mahadche-diwas-67-marathi-kadambari-lekhak-deepak-parkhi-chitrakshare

साळीसाहेबांनी साईटवर येऊन मुलगी झाल्याची बातमी आम्हाला दिली. त्यांनी ती कोरडेपणानं सांगितली. त्यांना मुलगा हवा होता. इतक्या शिकलेल्या माणसाची अशी मानसिकता?

कॅनॉलच्या बेसलाईनचे बेअरिंग (कोन मोजणे) घेतलेली फिल्डबुकं चाळत ते म्हणाले,
“जोशी, चव्हाणांची घेतलेली बेअरिंग पहा आणि त्याच्या नोंदी पहा. प्रत्येक किलोमीटरमधल्या एखाद्यातरी चेनेजचं लोकेशन त्यांनी गाव नकाशावर मार्क केलंय. यामुळं बेअरिंग घेताना चूक झाली असेल तर ती चूक कुठल्या भागात झालीये, हे समजतं. तुम्ही अशा लोकेशनच्या केलेल्या नोंदी कुठंच दिसत नाहीत. उद्या बाकी काही करू नका. मागच्या सहा-सात किलोमीटरचे जे गडगे शाबूत असतील, त्यांचं लोकेशन गाव नकाशावर दाखवा. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.”
साहेब ज्या पद्धतीनं येऊन माझ्याशी बोलून गेले त्यावरून मुलगी होणं त्यांनी किती मनाला लावून घेतलंय, हे कळत होतं.

माझ्या आजारपणात चव्हाणला एकट्यानं सर्व्हे करावा लागला होता. आता माझ्या निष्काळजीपणामुळं मला जुनं काम सुधारून घ्यायला चार दिवस लागणार होते. या कारणानंही त्याला बिचाऱ्याला पुन्हा एकट्यानंच सर्व्हे करावा लागत होता.

आम्ही काम करत असताना आम्हाला शोधत शहापूरकर आला. त्याच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते. मी म्हटलं,
“का रे, अचानक आलास? तुझी किंवा माझी साहेबांनी हलवाहलव तर केली नाही ना?”
तो हसला. म्हणजे मला आलेली शंका खोटी होती. मी रिलॅक्स झालो. तो म्हणाला,
“तुला सांगायला आलोय की माझ्या लग्नाची तारीख बदललीये. कार्यालयाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यामुळं कार्यालय तेच आहे फक्त तारीख अलीकडची नक्की झालीये. म्हटलं तुला हे पहिल्यांदा सांगावं. आणि…”
तो घुटमळला. मी म्हटलं,
“अरे, बोल ना.”
“कसं सांगू…? तू दुसरी जागा बघितलीस तर बरं होईल. जागा बदलण्याचं टेन्शन नको घेऊस. काकर तळ्यावर जाणाऱ्या बाजारपेठेतल्या रस्त्यावर मी तुझ्यासाठी एक छोटी खोली बघितलीये. जर तुला ती पसंत असेल तर काहीच अडचण राहणार नाही. मग कसं करूया?”

मी त्याला विश्वास दिला तेव्हा त्याचा चेहरा उजळला. काम संपताच तो आणि मी महाडला गेलो. त्यानं पाहिलेली जागा बघितली. एका दुमजली हवेलीसारख्या इमारतीत एकट्या आजी रहात होत्या. त्यांचा मुलगा मुंबईला नोकरीनिमित्त राहत होता. सध्या त्या जागेत एक पोलीस हवालदार रहात होते. त्यांची बदली रोह्याला किंवा इंदापूरला होणार होती. आजी म्हणाल्या,
“हवालदार गेले की तुम्ही रहायला यायला हरकत नाही. दीड-एक महिन्यांचाच प्रश्न आहे.”
आधी शहापूरकर त्यावर ‘चालेल’ म्हणाला, मग माझं ‘चालेल’ म्हणणं ओघानं आलं.
मी शहापूरकरला म्हटलं,
“आता जून सरत आलाय. तुझी लग्न तारीख आणि हवालदारांची एक्सिट बरोबर मॅच होतीये. काही अडचण नाही. आणि तसंही जागा मिळायला महाडात काहीच अडचणीचं नाही. सो डन.”

तो आणि मी आमच्या खोलीवर आलो. जवळपास तीन आठवडयांनी मी येत होतो. मला ती खोली एकदम परकी वाटायला लागली. असं वाटण्याचं आणखी एक कारण होतं. मी पाहिलं बाहेरच्या पॅसेजमध्ये उघडणाऱ्या खिडकीच्या काचांवर काळजीपूर्वक ब्राऊन पेपर चिकटवला होता. याचा अर्थ शहापूरकरनं नवदांपत्याचं खाजगीपण जपण्याची तयारी सुरु केली होती. त्याचबरोबर मी दुसरीकडं जायला तयार असल्याची खात्रीही बाळगली होती. तसं पाहिलं तर मी कुरेशीला सोडण्यासाठी या खोलीत यायचं स्वातंत्र्य एखाद्या बांडगुळासारखंच घेतलं होतं. आपल्याला कुणीतरी इतकं गृहीत धरलं की त्रास होतोच.

पाऊस चांगलाच बाळसं धरत होता. सर्व्हे सोडून सगळेजण महाडला आलो होतो. कुरेशी आणि बीएस यांचे संबंध सामान्य झाले होते. चव्हाणच्या खोलीवर तीन पानी पुन्हा सुरु झालं होतं. मी माझं लक्ष लिखाणावर केंद्रित केलं, कारण दिवाळी अंकांच्या निमित्तानं कथा स्पर्धा आयोजित करण्यात येत होत्या.

मध्ये चार दिवस मी पुण्याला यायचं ठरवलं. पहाटेच्या गाडीनं पुण्याला जाण्यासाठी स्टॅण्डवर आलो. पावसाळ्यातील पाटी- ‘वरंधा घाट बंद असल्यानं पुण्याकडं जाणाऱ्या गाड्या इंदापूर चौक-लोणावळा मार्गे जातील.’ म्हणजे पुण्याला जायला तीन तरी वाजणार, असं म्हणत मी गाडीत बसलो. गाडीत एक मुलगी चढली. खाली तिची आई उभी होती. जागा शोधताना तिचं लक्ष माझ्याकडं गेलं. ती म्हणाली,
“जोशी तुम्ही? काही ओळख लागतीये का?”
मला ओळखायला अर्धा मिनिट लागलं. मी म्हटलं,
“पवार बाई, तुम्ही इकडं कुठं?”
मी काही दिवस पिंपरीत नोकरी करत होतो. तिथं ही क्लार्क होती. ती माझ्या शेजारी बसत म्हणाली,
“जोशी, हे काय ऑफिस आहे का बाई म्हणायला? आई, हे जोशी. पूर्वी हे आणि मी एकाच ठिकाणी काम करत होतो.”
खालून तिची आई म्हणाली,
“शके, बरं झालं तुला सोबत मिळाली.”
मी म्हटलं, “शके म्हणजे?”
तिनं खुलासा केला, “शके म्हणजे शकुंतला.”

गोवा हायवे सोडून गाडी वळाली तोवर आम्ही जुन्या ऑफिसच्या गप्पा मारत होतो. त्यानंतर मात्र गप्पा वर्तमान काळातल्या सुरु झाल्या. बोलताना मी ‘शकुंतला’ असा उल्लेख केला तेव्हा उत्तर देताना ती ‘विनय’ म्हणून गेली.

जसं जसं लोणावळा जवळ यायला लागलं तसं गारवा जाणवायला लागला. तिनं शाल लपेटली. मला विचारलं,
“तुम्ही गरम काही आणलं नाही वाटतं?”
मी नाही म्हणत असताना शालीचा अर्धाभाग तिनं माझ्या पाठीवर टाकला. थोड्यावेळानं पर्समधून चॉकलेट बाहेर काढून म्हणाली,
“एकच आहे. चिमणीच्या दातांनी तोडून देऊ?”
वळसा घालावा लागल्यानं लांबलेला प्रवास जाणवला नाही. पुणं जवळ आल्यावर ती म्हणाली,
“कुठं रहाता तुम्ही? एकाच रूटवर असू तर एकच रिक्षा करू. मी औंधला राहते.”
मी नाराज होऊन म्हटलं, “मी कोथरूडला.”

घरात येऊन पडलेली पत्रं घाईनं चाळली. माझं कुठलंच पत्र नव्हतं.
मी जाहिरातीचा कागद काढून पुन्हा वाचला. अर्ज करून दीड महिना झाला होता. अजून ‘साधं इंटरव्ह्यूला या,’ असं पत्रदेखील आलं नव्हतं. मी घरात काहीच बोललो नव्हतो. सरळ त्या ऑफिसमध्ये गेलो. शिवाजीनगरला एका अपार्टमेंटमध्ये छोटेखानी ऑफिस होतं. त्यामुळं दडपण आलं नाही. चौकशी केली तेव्हा एकानं ऑफिस सुपरिटेंडंट दशपुत्रे यांच्याकडं बोट दाखवलं. जाहिरातीचा कागद दाखवून विचारलं,
“साहेब, या जाहिरातीप्रमाणं मी अर्ज केला होता पण मला अजुन काहीच कळवलं गेलं नाही. ज्युनियर इंजिनियर्सच्या जागा भरल्या गेल्या आहेत का?”
ते बेफिकीरीनं म्हणाले,
“नाही.”
“मग इंटरव्ह्यू तरी झालेत का?”
ते म्हणाले, “नाही.”
चला, निदान चौकशी करायला तरी उशीर झाला नाही. मला हायसं वाटलं.
“काय आहे आमची एस्टॅब्लिशमेंट तशी नवी आहे. नव्या भरतीसाठी शासनाकडून मान्यता यायला उशीर झालाय पण आम्ही आठ दिवसापूर्वीच कॉल लेटर पाठवलीत. तुम्हाला मिळायला हवं होतं. एक मिनिट, लेट मी चेक. नाव काय म्हणालात?”
“विनय जोशी.”
त्यांनी एक लिस्ट काढली. त्यावर माझं नाव होतं पण तिथं फुली मारली होती. त्यांनी एका मोठ्या फाईलमधून माझा अर्ज शोधून काढला. त्यावरचा रिमार्क वाचून दाखवला,
“हा उमेदवार इरिगेशन डिपार्टमेंटचा असल्याने विचार करू नये.”
ते पुढं म्हणाले, “हा धोरणात्मक निर्णय आहे. आमच्याकडची कामं ही प्रामुख्यानं इमारती आणि रस्ते बांधणीची तसंच वॉटर सप्लाय आणि ड्रेनेज लाईन टाकण्याची आहेत. तुम्हाला इरिगेशनमध्ये हा अनुभव नसतो त्यामुळं तुम्हाला कॉल पाठवला नाही.”
मला काय बोलावं तेच समजेना. तेवढ्यात आतल्या केबिनमधून एक पन्नाशी पार केलेले अधिकारी बाहेर आले. दशपुत्रेंना म्हणाले,
“काय झालंय?”
दशपुत्रेंनी त्यांना काय झालंय, ते सांगितलं. त्यावर ते म्हणाले,
“इरिगेशन कँडिडेट नीड नॉट अप्लाय, असं आपण जाहिरातीत म्हटलं होतं का? तसं स्पेसिफिक मेन्शन केलं नसेल तर ही हॅज गॉट एव्हरी राईट टू डिमांड कॉल लेटर. असं करा तुम्ही दोघंही केबिनमध्ये या.”
मी दारावरची पाटी वाचली, ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’
आत गेल्यावर ते म्हणाले,
“दशपुत्रे, इरिगेशनच्या उमेदवारांना कॉल द्यायचा नाही हे कुणी ठरवलं?”
“सर, मी आणि अकाउंट ऑफिसरनं.”
“म्हणजे दोन्ही नॉनटेक्निकल लोकांनी. ठीक आहे तुमचा मुद्दा सांगा दशपुत्रे.”
“सर आपली कामं रस्ता आणि इमारती बांधण्याची. यांना त्यातला काहीच अनुभव नाही म्हणून…”
माझी त्या क्षणी भीड चेपली होती. माहित नाही मी कसा बोलून गेलो,
“साहेब, याचा अर्थ वधुपरीक्षेच्या वेळी मुलीला लग्नाचा पूर्व अनुभव नाही म्हणून नकार देण्यासारखं झालं. तिचं वय, रूप आणि शिक्षण बघायला नको?”
साहेबांनी माझ्याकडं चमकून पाहिलं आणि हसून म्हणाले,
“आता इथंच द्या यांना कॉल लेटर. लेट हिम कम.”

मी विजयी मुद्रेने बाहेर आलो. इंटरव्ह्यूची तारीख पंधरा दिवसांनी होती.

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :