प्रस्तुत लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी:
शेतकरी आसूड यात्रा (पूर्वार्ध): ‘हिम्मत है तो चला गोली…’
… गुजरात पोलिसांच्या हातावर ‘तुरी’… शेतकऱ्यांचा वाघ, वादळ अन् आसूडाची गुजरातमध्ये धडक…!
दिवस बुडाला होता. साधारण ७-८ वाजताची वेळ असेल. नवापूरच्या विश्रामगृहात आमदार बच्चूभाऊंनी गुजरात जाण्याची योजना तयार केली. आपल्या सोबत असलेल्या निवडक सहकाऱ्यांना त्याबाबत इतंबूत सूचना केल्या. ठरल्याप्रमाणं रात्री ११ च्या सुमारास विश्रामगृहाच्या मागील बाजूनं कुंपण भिंतीवरून उड्या मारून भाऊ तिथून पसार झाले. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन भाऊंनी वेषांतर केलं.
दोन वाहनं समोर तयारच उभी होती. आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या समवेत मंगेश देशमुख, प्रदीप बंड, गौरव जाधव, अतुल खूपसे, अंकुश जवंजाळ, दीपक भोंगाडे, शाम कडू, राहुल माला, राज माहोरे, सोपान गोडबोले, गणेश उईके हे सर्व दोन वाहनांतून गुजरातच्या दिशेनं निघाले.
इकडे अगोदरच्या दिवशी, ज्या गावात मोदीजी लहान असतांना चहा विकत होते त्याच गुजरातमधल्या वडनगरमध्ये गणेश पुरोहीत, शिवाजी गाडे व इतर कार्यकर्ते अगोदरच पोहचले होते. भाऊंना अटक झाल्याचं वृत्त कळताच गणेश पुरोहित पोलिसांना गुंगारा देत तेथील पाण्याच्या टाकीवर चढले होते. नारे दिले होते. प्रहारचे झेंडे फडकवले होते. शिवाजी गाडे हे दिव्यांग असल्यानं पाण्याच्या टाकीवर चढण्याचा बराच प्रयत्न करूनसुद्धा त्यांना शेवटपर्यंत चढता आलं नव्हतं. वडनगर पोलिसांना खबर मिळताच गणेश पुरोहित पुन्हा तेथून पसार झाले होते.
आता वडनगर पोलीस सतर्क झालं होतं. प्रत्येक लॉज, हॉटेल, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त वाढला होता.
आसूड यात्रा निघतांनाच भाऊंनी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं, ‘तुम्ही थेट वडनगरला या.’ राज्याच्या कानकोपऱ्यातले अनेक शेतकरी, प्रहारचे कार्यकर्ते वडनगरला निघाले होते, पण गुजरातमध्ये त्यांचा प्रवेश होताच त्यांना रोखण्यात आलं होतं. प्रहारचे काही कार्यकर्ते मात्र एक दिवस आधीच वडनगरला धडकले होते. पण ही बातमी माध्यमातून आली नव्हती किंवा येऊ दिली नव्हती.
इकडं दोन वाहनांनी सुमारे १५० किलोमीटर प्रवास करून बच्चूभाऊ व सहकारी एका पेट्रोल पंपावर थांबले. तिथंच जरावेळ अंग टाकलं. सकाळचा चहा, नाष्टा करून ते पुन्हा वडनगरच्या दिशेनं निघाले. आणि काही वेळातच शेतकऱ्यांचा वाघ, वादळ आणि आसूड गुजरातमध्ये धडकलं. ‘आमदार बच्चूभाऊ कडू गुजरातमध्ये धडकले,’ असा गुजरात पोलिसांना धडकी भरवणारा बिनतारी संदेश गेला. लगेच युद्ध पातळीवर नाकाबंदी झाली. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी सुरु झाली. ‘मोदीजी खून लो, मगर किसान की जान मत लो’ हा नारा देऊन निघालेली आसूड यात्रा गुजरात पोलिसांनी अजूनही रोखलेलीच होती.
अनेक प्रयत्नांती आमदार बच्चूभाऊ कडू शेवटी वडनगरमध्ये पोहोचलेच आणि तिथं जाऊन त्यांनी रक्तदान केलंच. पोलिसांनी पुन्हा बच्चूभाऊ कडू यांना अटक केली आणि सायंकाळी सुटकादेखील केली. रक्तदान करण्याचा असा कोणता गुन्हा पोलिसांनी दाखल केला असावा? हा मोठा प्रश्नच आहे. त्याचा जबाब आता पोलीसच जाणो!
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निघालेल्या आसूड यात्रेची सांगता झाली होती. पण आता महाराष्ट्र शेतकरी प्रश्नावर पेटणार होता.
बच्चू भाऊ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारं नेतृत्व म्हणून आता राज्यात नावारूपास आलं होतं. शेतकऱ्यांचा, शेतकऱ्यांच्या तरुण पोरांचा आमदार बच्चूभाऊ कडू यांना मिळणारा वाढता पाठिंबा व समर्थन हा प्रस्थापित राजकारण्यांना आव्हान ठरणारा होता.
राज्यात पुढं शेतकरी आंदोलन कसं उभं राहीलं? काय काय घडलं? आसूड यात्रेचं फलित काय? तुरीचा प्रश्न मिटला? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली?
(क्रमशः)
*
वाचा
राज माहोरे यांचं साहित्य
समाजकारण
कथा
कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
राज माहोरे हे प्रहार संघटनेचे तिवसा तालुका प्रमुख असून गेल्या वीस वर्षांपासून ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते ना. बच्चू कडू यांचे विश्वासू कार्यकर्ते असून सामाजिक व राजकीय उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.