‘गर्ल विथ पर्ल इअरिंग’ हे सतराव्या शतकातल्या ‘योहानेस व्हर्मीअर’ या प्रसिद्ध चित्रकाराचं नावाजलेलं चित्र. ‘मोनालिसा ऑफ द नॉर्थ’ म्हणजेच ‘उत्तरेची मोनालिसा’ अशी ख्याती पावलेल्या या चित्राचा आत्मा आहे त्याची मॉडेल. हे चित्र प्रसिद्ध झालं पण त्यासाठी पोज देणाऱ्या मुलीविषयी फार कोणाला माहीत नाही. ‘गर्ल विथ पर्ल इअरिंग’ ही ‘ग्रीट’ नावाच्या त्या मॉडेलविषयीची फिल्म आहे. तशीच ती व्हर्मीअरच्या निर्मिती प्रक्रियेविषयीची फिल्म आहे. आणि या सगळ्याबरोबर व्हर्मीअर आणि ग्रीट यांच्या नात्याविषयीचीसुद्धा फिल्म आहे…
ग्रीट ही एका लहानश्या खेड्यात राहणारी तरुण मुलगी. चित्रकार असलेल्या वडलांना अंधत्व येतं तसं तिचं कुटुंब आर्थिक अडचणीत सापडतं. कुटुंबाला हातभार लागावा यासाठी ती शहरात जाते आणि व्हर्मीअरच्या घरी मोलकरीण म्हणून काम करू लागते.
एक दिवस व्हर्मीअरची बायको – ‘कॅथरिना’ ग्रीटला घेऊन व्हर्मीअरच्या स्टुडिओजवळ येते. ‘कशाला धक्का लावू नको. जिथल्या वस्तू पुन्हा तिथंच ठेव.’ अशी सूचना देऊन ती ग्रीटवर स्टुडिओच्या स्वच्छतेचं काम सोपवते. ग्रीट स्टुडिओत जाते आणि कामाला सुरुवात करते. कॅथरिना मात्र अडखळत्या पावलांनी स्टुडिओमध्ये प्रवेश करते. अतृप्त डोळ्यांनी स्टुडिओ न्याहाळते. तिच्या आणि व्हर्मीअरच्या नात्यामधल्या अतृप्ततेची ती ठळक खुण असते.
ग्रीटला स्टुडिओची साफसफाई करताना बघतो त्या क्षणी आपण तिच्या प्रेमात पडतो. प्रत्येक वस्तू नाजूकपणे हाताळणं, एक-एक वस्तू हळुवारपणे स्वच्छ करणं, कुठल्याही वस्तूला अजिबात धक्का न लावता स्टुडिओ लख्ख करणं… हे सगळं ती निगुतीनं करत राहते. वाट्याला आलेलं अगदी साधंसुधं कामसुद्धा जीव ओतून करणाऱ्या ग्रीटमधला कलाकार आपल्या नजरेतून निसटणं अशक्य!
बाकीची स्वच्छता झाल्यानंतर ग्रीट कॅथरिनाकडे येते आणि खिडकीच्या काचा पुसाव्यात की नको ते विचारते. असल्या किरकोळ कामांसाठी परवानगी मागणाऱ्या ग्रीटचं कॅथरिनाला हसू येतं. पण ग्रीट त्यावर स्पष्टीकरण देते, “खिडक्यांच्या काचा पुसल्यानं स्टुडिओतला प्रकाश बदलेल.” ग्रीटचं सूक्ष्म निरीक्षण आणि तिला असलेली चित्रकलेची जाण पाहून कॅथरिना चकित होते.
ग्रीटचा बघता बघता स्टुडिओमध्ये वावर वाढतो. व्हर्मीअर तिला आपल्या कामात सहभागी करून घेतो. रंग आणणं, बनवणं, ते पॅलेटमध्ये काढणं, कालवणं अशी कामं तो तिला सांगायला लागतो. छाया-प्रकाशाचा खेळ, त्यातून डोळ्यांना दिसणारं दृश्य, त्या दृश्याचे बारकावे रंगवण्याचं तंत्र अशा अनेक गोष्टी तो तिच्याशी शेअर करू लागतो. ग्रीटसुद्धा व्हर्मीअरच्या चित्रांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवायला लागते. चित्राचं कम्पोजिशन, सब्जेक्टची मनस्थिती अशा गोष्टींवर मतं देऊ लागते. कलेविषयीची संवेदनशीलता हा धागा व्हर्मीअर आणि ग्रीटला जवळ आणतो. व्हर्मीअर ग्रीटचं चित्र काढायचं ठरवतो.
कलाकाराच्या भवतालच्या माणसांचं त्याच्या निर्मितीमध्ये मोठं योगदान असतं. ही माणसं त्याच्या कलाकृतींमध्ये कुठून ना कुठून डोकावत असतात. कधीकधी तर या माणसांना आपल्या असण्यातला एक कण काढून त्या कलाकृतीमध्ये ओतावा लागतो; तेव्हा कुठं ती जिवंत होते. कलाकृती जिवंत झालेली असते, मात्र तिच्यामध्ये ओतलेला जगण्यातला तो कण कायमसाठी त्या माणसामधून वजा झालेला असतो!
‘गर्ल विथ पर्ल इअरिंग’ ही अशीच वजा होत जाण्याची गोष्ट आहे.. जगाला वेड लावणाऱ्या एका गूढ चित्राच्या निर्मितीची गोष्ट आहे!
*
वाचा
चित्रपटविषय लेख
पेंटिंग
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
कथा
कविता
कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.