जोजो रॅबिट १: हिटलर दाखवणारा आरसा

युद्ध म्हणजे मानवी इतिहासाच्या प्रवासामधलं माणूसपणाला काळिमा फासणारं वळण. या वळणावर महासंहार घडत असतो. घरं, गावं, देश उद्‌ध्वस्त होत असतात. मानवी जगण्याची विविध पातळ्यांवर मोडतोड होत असते. या मोडतोडीच्या आणि संहाराच्या जखमा एवढ्या खोल असतात की, दशकंच्या दशकं उलटूनसुद्धा त्या पूर्णपणे भरून निघत नाहीत. ठणकत राहतात पिढ्यानपिढ्या.

गेल्या वर्षी ‘ऑस्कर’च्या ‘सर्वोत्तम ॲडाप्टेड स्क्रीन प्ले’ पुरस्कारासह इतर महत्त्वाचे पुरस्कार आणि नामांकनं मिळवणारा, ‘बाफ्ता’, ‘गोल्डन ग्लोब’ अशा मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवणारा ‘जो जो रॅबिट’ हा या दशकातला एक महत्त्वाचा चित्रपट आहे. तो महत्त्वाचा असण्याला कारणंसुद्धा बरीच आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडणारी ही कथा धर्मांधता, वंशभेद अशा अंधप्रवृत्तींवर भाष्य करते; पण हे करत असताना केवळ महायुद्धाची माहिती पुरवून आणि तो काळ प्रेक्षकांसमोर उभा करून हा चित्रपट थांबत नाही. तो त्यापुढं जातो आणि विशिष्ट काळात जन्माला आलेली पिढी कशी घडत जाते, बिघडत जाते यांचा उलगडा करून दाखवतो. घडताना एका विशिष्ट काळामध्ये घडत असला तरी ‘जो जो रॅबिट’ आजच्या काळाशी नातं सांगतो आणि देशा-भाषांच्या सीमा ओलांडून थेट तुमच्या-माझ्याशी नातं जोडतो.

‘जो जो रॅबिट’ ही गोष्ट आहे, दहा वर्षं वयाच्या ‘जोहान्स बेट्झलर’ नावाच्या एका जर्मन मुलाची. जोहान्स आपल्या आईबरोबर जर्मनीमध्ये राहत असतो. त्याच्या वडलांना युद्धभूमीवर जाऊन दोन वर्षं लोटली असतात; पण त्यांचा अजून काही पत्ता लागलेला नसतो. जोहान्सची आई त्याला त्याचे वडील बेपत्ता आहेत आणि काही कारणामुळं आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, असं खात्रीनं सांगत असते. मनोमन त्यांच्या सुरक्षिततेची प्रार्थना करत असते; पण वस्तुस्थिती ही असते, की ते नक्की जिवंत तरी आहेत का, याविषयी कोणालाही कसलीही स्पष्टता नसते.

जोहान्स हा हिटलरचा कट्टर चाहता असतो. आपल्याला हिटलरचा पर्सनल गार्ड (सुरक्षा रक्षक) किंवा खास मित्र होता यावं, या एकमेव महत्त्वाकांक्षेनं जोहान्सला पछाडलेलं असतं. या पछाडलेपणानंच त्याला एक खास मित्र मिळवून दिलेला असतो. हा मित्र कोणी हाडामासाचा माणूस नसून एक काल्पनिक व्यक्ती असतो. आणि या व्यक्तीचं नाव असतं, ‘ॲडॉल्फ हिटलर’! (बरोब्बर, ‘मुन्नाभाई एमीबीबीएस’ चित्रपटात ‘मुन्ना’ला जसे ‘गांधीजी’ दिसत असतात, अगदी तसंच.) जोहान्स आपल्या या मित्राला ‘ॲडॉल्फ’ अशी एकेरी हाक मारत असतो. त्याच्याशी तासन्तास गप्पा मारत असतो. आपल्या अडचणी त्याच्यासमोर मांडत असतो. चिडत असतो, प्रसंगी भांडतसुद्धा असतो.

चित्रपटाचा पहिलाच प्रसंग. एक लहान मुलगा म्हणजेच जोहान्स खाकी गणवेश घालत असल्याचे विविध शॉट्स आपण बघतो. यामध्ये मुलाचा चेहरा दिसत नसून केवळ टाय, बेल्ट, बॅजवरील स्टार असे गणवेशाचे विविध तुकडे दिसत राहतात. गणवेश घालून झाल्यानंतर मुलगा आरशातल्या आपल्या रुबाबदार रूपाकडे कौतुकानं बघतो. हा असतो जोहान्सचा आपल्याला दिसलेला पहिला शॉट; पण या पहिल्यावहिल्या शॉटमध्ये जोहान्सचा अर्धाच चेहरा दिग्दर्शक आपल्याला दाखवतो. जोहान्स आपल्याला पूर्ण दिसतो, ते त्याच्या पुढच्या शॉटमध्ये. 

आरशातल्या प्रतिबिंबाकडे पाहत जोहान्स स्वतःशीच बोलतो, “आज तू अतिशय महत्त्वाच्या अशा प्रशिक्षण शिबिराला जाणार आहेस.” जोहान्स स्वतःला बजावतो, “हे शिबीर अवघड असणार आहे; मात्र ते पूर्ण केलं तरच तुला स्वतःला खऱ्या अर्थानं ‘पुरुष’ म्हणता येणार आहे.”

आपली संपूर्ण ऊर्जा आणि ताकद जर्मनीच्या रक्षणकर्त्याला – ‘ॲडॉल्फ हिटलर’ला समर्पित करण्याची प्रतिज्ञा जोहान्स करतो आणि ‘देवा, मला या कार्यामध्ये मदत कर’ या वाक्यानं तो आपल्या स्वगताचा शेवट करतो. तत्क्षणी “होय..” हे ‘ॲडॉल्फ’चं म्हणजेच जोहान्सच्या काल्पनिक मित्राचं वाक्य आपल्या कानावर पडतं. 

ॲडॉल्फ आपल्याला ‘होय’ ऐकू येण्याच्या आधीच दिसलेला असतो. तो जोहान्सच्या भोवती फेऱ्या घालत असतो; मात्र जोहान्सची उंची ॲडॉल्फच्या खांद्यापेक्षाही कमी असते. त्यामुळं त्याच्या भोवती येरझारा घालणाऱ्या ॲडॉल्फचं फक्त धड आपल्याला दिसलेलं असतं. ॲडॉल्फचा चेहरा ना या वाक्याच्या आधी दिसलेला असतो, ना या वाक्याच्या लगेच नंतर. आत्तापर्यंत स्वतःलाच प्रेरणा देणारा जोहान्स क्षणार्धात पालटतो आणि घाबरून म्हणतो, “ॲडॉल्फ, मला नाही वाटत मला हे सगळं जमेल”. येरझारा घालणारा ॲडॉल्फ हे वाक्य ऐकून जागीच थबकतो आणि वाकून जोहान्सच्या शेजारी उभा राहतो. तेव्हा ॲडॉल्फ आपल्याला पहिल्यांदा दिसतो.

चित्रपटाचा हा पहिलाच प्रसंग अतिशय महत्त्वाचा आणि बोलका आहे. हा प्रसंग सशक्तपणे उभा करण्यात योगदान देणाऱ्या तीन महत्वाच्या गोष्टी इथं आवर्जून नमूद कराव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे जोहान्स ज्यांच्याशी गप्पा मारत आहे ते दोघं मित्र. यातला पहिला मित्र आहे स्वतः जोहान्सची आरशातली प्रतिमा! राष्ट्रासाठी तन-मन अर्पण करणं, ही जोहान्सच्या नजरेतली आदर्श जर्मन तरुणाची प्रतिमा आहे; याउलट ‘हे करायला आपल्याला जमेल का’ ही मनात येणारी शंका हे जोहान्सचं वास्तव आहे. आपण आळीपाळीनं जोहान्सची प्रतिमा आणि त्याचं वास्तव बघतो आणि त्याचं वास्तव त्याच्या प्रतिमेशी संवाद साधत असतं, अशी काहीशी गमतीशीर बांधणी इथं लेखक-दिग्दर्शक टायका वैटीटी यानं केली आहे. असा हा दोन पातळ्यांवरचं जगणं जगणारा जोहान्स जेव्हा जेव्हा संभ्रमात सापडतो, तेव्हा तेव्हा त्याच्या मदतीला त्याचा दुसरा मित्र धाऊन येत असतो. तो मित्र म्हणजे अर्थातच ‘ॲडॉल्फ’.

आपण पाहिलेल्या जोहान्सच्या दोघा मित्रांपैकी एकसुद्धा हाडा-मासाचा माणूस नाही. दोघंसुद्धा जोहान्सच्या मनाचे भास आहेत. हा संपूर्ण संवादच वास्तवात अस्तित्वात नसलेल्या मित्रांशी घडत असल्यामुळं संवादामध्ये रंगवण्यात आलेल्या ‘राष्ट्रवादा’सारख्या कल्पनांचं फोलपण आपल्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही. तत्कालीन परिस्थितीमधल्या तरुण पिढीच्या वाट्याला आलेलं मानसिक-भावनिक अर्थाचं पोरकेपण आणि जगण्याविषयीच्या पोकळ आणि भ्रामक कल्पना, हे कडवं वास्तव लेखक-दिग्दर्शकानं या प्रसंगात आणि पुढंसुद्धा अचूक पकडलं आहे.

एरवी साध्या वाटणाऱ्या या प्रसंगाला अनोखं महत्त्व प्रदान करणारी दुसरी गोष्ट म्हणजे ‘ॲडॉल्फ’चं पात्र. आपण संपूर्ण फिल्म बघतो, ती जोहान्सच्या नजरेतून. म्हणूनच सुरुवातीला बराच वेळ आपण फक्त जोहान्सला बघतो. ॲडॉल्फ दिसत नाही, असं नाही; पण फ्रेम सेट केली आहे ती जोहान्सला केंद्रस्थानी ठेवून. जोहान्सच्या फ्रेममध्ये ‘ॲडॉल्फ’ सहजपणे जेवढा दिसेल तेवढाच आपल्याला बघता येतो. ॲडॉल्फला बघण्याची प्रत्यक्ष वेळ येते, तेव्हा दिग्दर्शक एक विलक्षण पद्धत वापरतो. वैटीटीच्या जागी दुसरं कुणीही दिग्दर्शक असतं, तरी सहज कॅमेरा वर करून (टिल्ट अप) किंवा ॲडॉल्फचा थेट वेगळा शॉट लावून त्याला दाखवलं असतं; पण वैटीटी काय करतो? तर ॲडॉल्फला जरासा कमरेत वाकवतो आणि जोहान्सच्या बरोबरीनं आणतो. म्हणजे, ॲडॉल्फला बघण्यासाठी कॅमेरा हलवण्यापेक्षा वैटीटी ॲडॉल्फलाच वाकवून कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये आणतो. ‘हिटलर’ हे पात्र आजपर्यंत बऱ्याच कलाकृतींमध्ये साकारलं गेलं आहे; पण एका छोट्याशा मुलासमोर झुकून त्याच्याशी प्रेमाचा संवाद साधणारा ‘ॲडॉल्फ’ ही निव्वळ अभूतपूर्व निर्मिती आहे!

तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जोहान्स आणि ॲडॉल्फचं नातं. ॲडॉल्फनं उच्चारलेल्या त्याच्या पहिल्या वाक्याची जागा या दोघांचं नातं नेमकेपणानं सांगतं. संभ्रमात पडलेला जोहान्स म्हणतो, ‘देवा मला मदत कर’ आणि ‘होय’ म्हणून ॲडॉल्फ पुढं बोलू लागतो. इथं आपल्याला जोहान्स-ॲडॉल्फचं नातं स्पष्ट होतं. पुढं ॲडॉल्फ जोहान्सला मित्रत्वाच्या नात्यानं वागवताना दिसला, वेडेवाकडे चाळे करत त्याच्याबरोबर नाचत-बिचत असलेला तरी ॲडॉल्फ हा जोहान्ससाठी देवाच्या जागी आहे. जोहान्स-ॲडॉल्फचं नातं हे भक्तीचं आणि श्रद्धेचं नातं आहे.

असा हा पहिलाच प्रसंग एकूण चित्रपटाचा टोन सेट करतो आणि हा टोन हेच चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. वैटीटी त्या काळाशी नातं सांगण्यासाठी मुद्दामहून कुठलेही प्रयत्न करत नाही. उलट केलेच प्रयत्न तर त्या काळाशी विसंगत राहण्याचे करतो. हे ठामपणे म्हणता येतं, कारण चित्रपट निर्मितीचं कुठलंही तंत्रज्ञान तो त्या काळाच्या जवळ नेत नाही. तो चित्रपट ना ब्लॅक अँड व्हाईट करतो, ना गंभीर वळणानं नेतो. उलट एकूण रंगसंगतीमध्ये तो आजच्या शतकातलं पॅलेट वापरतो. पटकथा तर चक्क विनोदाच्या अंगानं पुढं नेतो. हा टोन निव्वळ काहीतरी वेगळं करून बघू, या विचारातून आलेला नाही. उलट, त्या काळातल्या घटनेचं आजच्या काळाशी नातं सांधण्याचा तो दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे. वैटीटी सांगताना इतिहासातली गोष्ट सांगत असला तरी आपल्याला तो आपल्या वर्तमानापासून तोडत नाही. या इतिहासातल्या खुणा आजच्या आपल्या वर्तमानातसुद्धा सापडतात, हेच त्याला यातून म्हणायचं असतं.

जोहान्सच्या आयुष्यातून एक माणूस वजा होणं आणि एका नव्या माणसाचा त्याच्या घरात, त्याच्या आयुष्यात प्रवेश होणं… राजकीय अस्थैर्यामुळं ओढवल्या गेलेल्या अनिष्ट प्रसंगांनी जोहान्सला पोरकं करून सोडणं… याउलट, संपूर्ण देशात वर्णद्वेषाचा वणवा पेटलेला असताना ‘एल्सा’ नावाच्या ज्यू धर्मीय मुलीला मात्र एक प्रेमळ घर मिळणं… चित्रपटात पुढं असं बरंच काही घडत जातं. चित्रपटाची कथा आपल्या विकिपीडियावरसुद्धा मिळेल. त्यामुळं पुन्हा तीच लिहिण्यात, वाचण्यात अर्थ नाही. म्हणूनच नुसती कथा देण्यापेक्षा ती विस्कटून सांगायचं ठरवलं आहे. आणि फक्त कथाच नाही तर चित्रपटाचे विविध बिल्डिंग ब्लॉक्ससुद्धा ‘जो जो रॅबिट’च्या संदर्भांनी तपशिलात मांडणार आहे. हे तपशील पुढच्या लेखांमध्ये वाचता येतील.

***

Film maker | + posts

कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.

19 Comments

  1. Avatar

    खूप छान समीक्षण.चित्रपट पहात असण्याचा अनुभव येईल असेच शब्दांकन.दिग्दर्शकाची अभिव्यक्ती दिग्दर्शनाच्या चष्म्यातून आपण अतिशय उत्तम प्रकारे उलगडून दिली आहे,त्यामुळे हा चित्रपट आता बघावाच लागेल.उत्सुकता लागली.
    खूप छान.

  2. Avatar

    व्वा! उत्सुकता चांगलीच वाढली. लेखन शैली एकटाक आहे, वाचतानाही वाचक प्रवाहितपणे वाचतो. पुढचा मंगळवार लवकर येवो.

  3. Avatar

    आवडलं👌👍👍

  4. Avatar

    अत्यंत नेमक्या शब्दात सखोल मांडणी केलेली आहे..👌👍👌

  5. Avatar

    फारच छान लिहिलय समीक्षण, चित्रपट पाहण्याची इच्छा झाली आहे. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

  6. Avatar

    छान कथा
    पुढील एपिसोड पर्यंत बांधून ठेवल्यासारख वाटतय

  7. Avatar

    छान कथा . मुनाभाई चा संदर्भ दिल्याने कथा आणखी रंगतदार झाली


आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :