अजूनही स्पष्ट आठवतीये ती दुपार. मुंबईत प्रचंड पाऊस होता. मला पाऊस झेपत नाही म्हणून नेहमीप्रमाणं मी घरातच निवांत लोळत पडलो होतो. तेवढ्यात मित्राचा फोन आला. म्हणाला, ‘चाय प्यायला ये बाहेर, गाडी घेऊन आलोय.’
(तसा तो गाडी घेऊन आला की मला थोडी धडकीच भरते. कारण तो कधी कुठं फिरायचा बेत करेल माहीत नसतं.)
मी गेलो. तो चाय नेहमी टपरीवरच घेतो. टपरीवरचा चाय भारी असतो, कारण तिथं चायसोबत त्याला सिगरेट पिता येते, असं साधं सरळ त्याचं लॉजिक. तर टपरीवर चाय पिता पिता तो बोललाच, ‘चल ट्रेकला जाऊ. कळसूबाईला.’
त्याचं हे वाक्य ऐकलं आणि मी उडालो. पुढचा संवाद आमच्यात साधारण असा झाला.
मी : “पागल आहेस का? भर पावसात, तेही कळसूबाई शिखरावर. मी नाही बाबा. एकतर पावसात भिजलो की माझा आकडा होतो.”
(पण ऐकेल तो मित्र कसला.)
तो : “हे बघ मुकुंद, समोर गाडी आहे. गाडीत टेंट आहे. सीएनजी फुल आहे. पेट्रोलही आत्ताच फुल केलंय. फक्त तुझी ट्रेकिंगची बॅग घरातून घ्यायची बाकी आहे.”
(हे तो त्याच्या नेहमीच्या स्टाईलनं शांतपणे सिगारेटचे झुरके उडवत बोलला.)
मी : “अरे पण असं कसं निघणार अचानक?”
तो : “अचानक केलेलेच प्लॅन भारी असतात.”
मी : “अरे… तरीही… असं कसं जाणार पावसात? “
त्यानं परत एक सिगारेटचा झुरका मारला आणि बोलला, “तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक ‘तू स्वतः घरी जाऊन बॅग भरून घेऊन ये’ किंवा दुसरा असा की ‘मी स्वतःच तुझ्या घरी जाऊन तुझी बॅग उचलून आणतो’ एक काय ते निवड.”
मी : “अरे हे दोन्ही ऑप्शन तर तुझ्याच बाजूचे आहेत. जरा तुझ्या सुटलेल्या पोटाकडे आणि हातातल्या सिगारेटकडे बघ. चढताना दमशील.”
त्यानं परत एक झुरका मारला आणि बोलला, ‘जर तू आज माझ्यासोबत आलास तर आजपासून वर्षभरासाठी सिगरेट सोडली.’
त्याचं एवढं एक प्रॉमिस पुरेसं होतं ट्रेकला निघण्यासाठी. पर्याय माझ्यासमोर नव्हताच. काय करणार? बॅग पॅक करून गाडीत ठेवली.
त्यानं आमच्या एका मैत्रिणीला कॉल केला आणि बोलला, ‘एक तासात येतोय तुझ्या घराजवळ. कळसूबाई ट्रेकला जायचंय. तयार रहा.’ तिला आमच्या असल्या अचानक-भयानक फिरण्याची सवय झालीये. ती तयारच होती. तिला तिच्या घरापासून पिकअप केलं. पुढं खारघरला पुन्हा एक स्टॉप घेत मित्राचा आवडता टपरीवरचा चाय घेतला. मुंबई सोडून खरा प्रवास सुरु करेपर्यंत दिवस मावळला होता.
पावसानं चांगलाच जोर धरला होता. कसारा घाट सुरू होण्याच्या आधी रात्रीचं जेवण आणि सकाळसाठी नाश्ता आणि खाण्याच्या काही चिजा घेतल्या. कसारा घाटातून जाताना १०-१५ फुटांच्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं. पाऊस आणि अंधार, दोन्हींमुळे. माझ्या मनात थोडं धाकधूक होत होतं. या आधी मी कळसुबाई ट्रेक ७ वेळा केला होता, त्यामुळं रस्ता चुकण्याची काळजी नव्हती. पण भीती फक्त एकच होती. मुसळधार पावसामुळे गावातला पाण्याचा ओढा भरून वाहत असेल, तर पलीकडे जाणार कसं? मनातच ठरवलं, जास्त पाणी असेल ओढ्याला तर नको ते साहस करण्यापेक्षा गुपचूप खाली मारुतीच्या मंदिरात रात्र काढायची आणि वर सकाळ झाल्यावर जायचं.
गप्पा मारत कधी घोटी आलं कळलंच नाही. नाशिक हायवेवरून घोटीला आम्ही राईट घेतला. आणि तिथून सुरू झाली मित्राच्या ड्रायव्हिंगची खरी परीक्षा. पावसामुळं रस्त्यावर पाणी चांगलंच साचलं होतं. आणि खड्डे तर इतके मोठमोठे होते, की गाडी चालतेय की डुलतेय तेच कळत नव्हतं.
रात्री ९ च्या सुमारास आम्ही ‘बारी’ गावात पोहोचलो. ‘बारी’ म्हणजे कळसूबाई शिखराच्या पायथ्याचं गाव. याच्या पुढं भंडारदरा.
एव्हाना पाऊस कमी झाला होता. तिघांनी शूज घातले, बॅगा पाठीवर चढवल्या आणि ट्रेकसाठी तयार झालो. आवश्यक त्या सूचना देऊन झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणं नाक खाजवत धीरगंभीर आवाजाचं बेअरिंग घेऊन बोललो,
‘‘गावातून गेलो तर ओढ्याच्या पाण्यातून जावं लागेल आणि रात्री असं करणं धोकादायक आहे. बाजूच्या शेतातून गेलो तर ओढ्यावर बंधारा आहे. त्यावरून उड्या मारत पार व्हायचं”
(आज वाटतंय, ते बेअरिंग फुल फिल्मी होतं.)
मित्रानं मधेच तोडलं. ‘‘हे तू आम्हाला सांगतोय की स्वतःला समजवतोय?’’
मी म्हटलं, ‘‘चला माझ्यामागून. लेट्स मार्च टुवर्डस् द व्हिक्टरी.”
शेताच्या बांधावरून तोल सावरत आम्ही ओढ्यापर्यंत पोचलो. ओढा भरून वाहतच होता; पण बंधाऱ्यावरून उड्या मारत जाता येण्यासारखं होतं. काळजीपूर्वक ओढा पार केला. आता शिखरापर्यंत पोचायला काहीच अडथळा येणार नव्हता. कारण पुढं कुठंही असा मोठा पाण्याचा ओढा लागत नाही.
रातकिड्यांचा आवाज ऐकत आणि चिखलात रुतणाऱ्या पायांना सावरत आम्ही पायथ्याच्या कळसूबाईच्या देवळात पोचलो.
मंदिराच्या बाजूलाच तानाजीदादाचं घर आहे. तानाजीदादाचं घर म्हणजे माझ्या पहिल्या कळसूबाई ट्रेकपासूनचं हक्काचं आणि मायेचं घर. मनात आलं की हाक मारून उठवावं त्यांना; पण मग म्हटलं नको. उगाच एवढ्या रात्री कशाला त्यांची झोप मोड करायची? मग देवळात बसूनच आणलेलं जेवण भरपेट जेवलो. देवीला नमस्कार केला आणि पुढच्या प्रवासाला लागलो.
पहिला टप्पा पार करून वर सपाटीला आल्यावर तिथला अनुभव काही वेगळाच होता. पाऊस कमी होता; पण वारा जोराचा आणि अतिशय थंड होता. डोंगराला धडकणारा वारा एखाद्या सिनेमात साऊंड इफेक्ट ऐकतो तसाच स्पष्ट आम्ही अनुभवत होतो.
थोड्याच वेळात चढण लागली. एक एक शिड्या पार करत आम्ही शेवटच्या सपाटीच्या पट्टयावर आलो. इथून विहीर १० मिनिटांवर आहे. इथं आम्ही पोचलो खरं; पण वरती एवढं धुकं होत की ७-८ फुटांवरचं काही दिसत नव्हतं. त्यात पावसाची सर येऊन गेलेली असल्यामुळं सगळीकडे पाण्याचे ओहोळ वाहत होते. रस्ता कोणता आणि पाण्याचा ओहोळ कोणता हेच नेमकं कळेना. मित्राला म्हटलं, ‘‘थांब २ मिनिट. मला समजत नाहीये रस्ता कोणता ते. थोडा वेळ शांत उभं राहू दे.’’
तर त्याची टिर टिर सुरू झाली.
‘‘तुझ्यावर भरवसा ठेऊन आलोय आणि तूच म्हणतोय थांब. म्हणजे तू चुकवलंय की काय?’’
मला पूर्ण विश्वास होता की, आपण शांत राहिलो की निसर्गच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. मी सहज वर पाहिलं तर मला विजेची तार डोक्यावरून गेलेली दिसली. झटकन सगळा मॅप माझ्या लक्षात आला. रुट कळाला. तारेला डोळ्यासमोर ठेवून आम्ही चालायला लागलो. पण मध्ये मध्ये तारसुद्धा दिसेनाशी व्हायला लागली. कसेबसे आम्ही तसल्या दाट धुक्यातून एकदाचे विहिरीजवळ पोचलो. सोबतच्या दोघांनीही सुटकेचा निश्वास टाकला, ‘आणलं बाबा एकदाचं यानं वर’
विहिरीच्या बाजूला दोन झोपड्या होत्या. टेंट झोपडीमधेच लावायचं ठरलं. पाऊस आणि वाऱ्याचा त्रास कमी व्हावा म्हणून. भिजलेले कपडे चेंज करून आम्ही टेंटमध्ये बसलो. सोबत आणलेला चटरपटर खाऊ खाल्ला. आता निवांत झोपायचं, या विचारानं तिघंही आपापल्या स्लीपिंग बॅगांमध्ये शिरलो. पण पुढं निवांत झोप मिळेल हे स्वप्न, फक्त स्वप्नच राहणार हे आम्हाला कुठं माहीत होतं. दोघं झोपले. मित्र तर घोरायला लागला. पावसाची सर येऊन जात होती. मला मात्र झोपच लागेना. कारण मी खालून थंड पडत चाललो होतो. पावसाच्या पाण्यामुळं माझी स्लीपिंग बॅग भिजली होती. आम्ही जिथं टेंट लावला तिथूनच पाणी वाहत होतं आणि मी दोघांमध्ये असूनही पाण्याला मलाच त्रास द्यायचा होता. मी तळमळत राहिलो बराच वेळ.
आता पाणी टेंटखालून वाहायला लागलं. मी उठून बसलो. थंडी मुळं हात-पाय वळायला लागले. मी स्लीपिंग बॅगमध्ये स्वतःला गुरफटुन घेत कसा बसा बसून होतो. ते दोघं निवांत झोपले होते. मी मात्र कधी एकदाची सकाळ होते, याची वाट बघत ती आख्खी रात्र बसूनच काढली…
सकाळी पटापट आवरून आम्ही शिखराच्या शिरोभागावर गेलो. आम्ही तिघंही वेड्यासारखं सर्व परिसर बघत होतो. धुकं आणि थंड वारा, त्यातून समोर दिसणारे अलंग-मदन-कुलंग, हरिश्चंद्रगड, रतनगड, भंडारदरा. हे सगळे गड या धुक्यातून मी शोधून शोधून त्यांना दाखवत होतो; पण थोड्याच वेळात थंडीमुळं माझी बोबडी वळली आणि मला बोलताच येईना. थंडीनं माझा ‘आकडा’ होऊन मी ‘वाकडा’ झालो होतो. तरीही प्रयत्न करत होतो त्यांना माहिती देण्याचा; पण शरीर साथच देईना. मित्र बोलला, ‘‘ही माहिती आणि हा परिसर बघायला परत येऊ; पण आता आधी तू खाली चल झोपडीमध्ये. तुझी अवस्था लयी बेकार झालीय.’’
मी माझ्या शरीराचा अंदाज घेतला. आपल्याला काही ही थंडी झेपणार नाही हे लक्षात आलं. आणि आम्ही उतरायला सुरुवात केली. टेंटजवळ आलो. थोडा वेळ थांबलो. आणि परतीचा प्रवास सुरू केला.
खाली आलो. गावात येऊन हॉटेलवाल्या काकूंना मस्त गरमागरम चाय बनवायला सांगितला. मित्रानं गाडीतून सिगरेटचं पाकिट काढलं आणि कचऱ्याच्या डब्यात फेकलं. मस्त भुरके देत, माझ्या वळलेल्या बोबडीची मज्जा उडवत आम्ही तिघं वाफाळलेला चाय पिऊ लागलो.
चाय पिऊन झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो – पुन्हा मुंबईच्या धावपळीत अडकण्यासाठी!
(टीप : अति पावसात असा अचानक ट्रेक शक्यतो प्लॅन करू नये. करायचाच असेल तर तिथल्या परिसरात तुम्ही अगोदर जाऊन आलेलं असावं, तिथल्या परिसराची, वाटांची तुम्हाला पूर्ण माहिती हवी.)
*
वाचा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
आज दिनांक
कथा
चित्रकथा
कविता
मी मुकुंद रतन मोरे. शाळेपासूनच नाटक आणि चित्रपटांची आवड असल्यामुळं एका खाजगी इन्स्टिट्यूटमधून चित्रपट संकलनाचं शिक्षण घेतलं. संकलक म्हणून काम करत असतानाच 'रॉम कॉम', 'दोस्तीगिरी', 'विडा', 'छत्रपती शासन', 'कलाकेंद्र' अशा काही मराठी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणूनही कामाला सुरुवात केली. 'ओ ला ला', 'निर्मोण' हे गोयेंन या कोकणी चित्रपटांचंसुद्धा कलादिग्दर्शन केलं आहे.
खूपच सुंदर लिहीलं आहे. सगळा परिसर डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा केला .. चित्रमय शैली आहे ! असे अनुभव फार सुंदर व सदाहरित असतात !
धन्यवाद
एकदम कडक !
Dhanyawaad
सुंदर शब्द आणि अप्रतिम प्रवास वर्णन
Dhanyawaad sir
मुकुंद सर,
खूप छान संकल्पना आहे तुमची…. एखाद्या दिग्दर्शका प्रमाणे…
Nice
Thanks
Mukund khup sundar , tuze pudhache block vachayala nakki ch aawadatil .. aal the best dear
धन्यवाद
अतिशय सुंदर अस लिखाण ..👌👌👌..वाचता वाचता जसा च्या तसा स्वप्नातला कळसूबाई डोळयासमोर दिसतोय …खूपच छान दादा 💐💐💐💐
खुपच सुंदर .. कथा आहे.
छान अनुभव
रायगडच्या मुकुंदची कथा म्हणजेच त्याचा अनुभव छानच असणार. सुंदर लिखाण!
खूपच छान शब्दांकन.
सगळा प्रवास डोळ्यासमोर बघतोय असं वाटलं
सुंदर शब्द रचना आणि भन्नाट अनुभव वर्णन…