घराशेजारी बुद्धविहार आहे, तितंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांचे पुतळे होते. त्याच्या बाजूलेच एक मोकळं मैदान होतं. लायन्यापनी या मैदानात रोज दोस्तायसोबत मी खेळायचो. शाळेतून आलो का तेच काम असायचं. या महापुरुषांची जयंती असायची तवा वेगवेगळे सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जायचे. ते मी आवर्जून बघायचो. सगळ्यांची भाषणं मन लावून ऐकायचो. ही भाषणं, सादर होणाऱ्या कविता ऐकून वाटायचं का, आपण मोठं झाल्यावर अशीच भाषणं द्यायची. कार्यक्रम घ्यायचे. मले आठवतं, हा सगळा विचार डोक्यात असताना एकदा घरी गेल्या गेल्या बाबाला जाऊन विचारलं होतं, ‘मले भाषण द्यायचंय, त्यासाठी काय करू?’ बाबा पत्रकार. त्यांनी सांगितलं, त्यासाठी खूप वाचन करावं लागते. मग तुला भाषण देता यील.’
काही दिवस गेले. एकदा बाबानी मला सकाळी सकाळी उठवलं अन गावातल्या सार्वजनिक वाचनालयात नेलं. मला एक ‘चाचा चौधरी’चं पुस्तक दिलं अन म्हणाले, ‘वाचून काढ’. मला पुस्तक देऊन बाबा खुद पेपर वाचत बसले. मले वाटलं, बाबा पेपर वाचत आहे, तर मी कशाले पुस्तक वाचू? मी पण पेपर वाचायला घेतला. मी तवा तिसरी-चौथीत असंल. तवापासून पेपर वाचायला लागलो आणि मोठा होत गेलो.
काही वर्षांनी पेपरात चांदुर बाजारची बातमी वाचली, ‘पालकमंत्र्यांच्या घरात डुक्कर सोडणार.’ बच्चू कडू आणि प्रहार युवा शक्ती संघटनेची ती बातमी होती. ‘डुक्कर छोडो आंदोलना’ची. ही बातमी वाचून तर मी भारावूनच गेलो. एखाद्या पिच्चरमधे गरिबांचा हिरो असतो, तसं चित्र मला दिसायला लागलं. ‘बच्चू कडू’ या नावाचं इतकं माहोल वाटायला लागलं का तवापासून रोज पेपरात त्यांच्याच नावाची बातमी शोधायला लागलो. लय वेळा ‘प्रहार’ची वेगवेगळी आंदोलनं व्हायची. त्याबद्दलच्या बातम्या यायच्या. मी त्या वाचूनच आनंदी व्हायचो. मग एक दिवस ठरवलं का, आपण पण बच्चू कडूंसोबत काम करायला पाहिजे. त्यांची भेट घेतली पाहिजे.
मग असं करत करत २००२ वर्षं आलं. ‘अपना भिडू, बच्चू कडू’ हा नारा तेवा चांगलाच प्रसिद्ध होता. तिवसा तालुक्यातल्या पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, तेवा समजलं का वरखेड पंचायत समिती सर्कलमधून गजू कडू नावाचा एक तरुण प्रहार युवा शक्ती संघटनेचा उमेदवार म्हणून उभा आहे. त्यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू येणार आहेत. तेवा मी जेमतेम सहावी का सातवीत असंल. पण बच्चू कडू येणार ही बातमी वाचून मी आनंदानी नाचायलाच लागलो. मित्रांना सांगायला लागलो का, आता आपली अन बच्चू कडूंची भेट होईल.
मग काही दिवसात कळलं का, सातरगावला संध्याकाळी बच्चू कडूंची सभा आयोजित केली आहे. त्यावेळी बच्चूभाऊ प्रथमच आमदार म्हणून निवडून आले होते. ते पण पालकमंत्र्यांना हरवून. तर पेपरात पाहावं तितं नुसत्या फक्त बच्चू कडूंबद्दलच हेडलाईन होत्या. एक दिवस एका बातमीत वाचलं होतं का, आमदार बच्चू कडूंच्या चपलेला खिळे मारलेत म्हणून. असा हा तुटकी चप्पल घालून लोकांची कामं करणारा लोकप्रतिनिधी आहे. मी लायन्यापनापासून थोडा संशोधक वृत्ती ठेवूनच निर्णय घ्यायचो. म्हणजे स्वतः तपासून वगैरे. मग काय, तपासलं नीट. अन त्याच संध्याकाळी भाड्याची सायकल घेऊन तिवसा ते सातरगाव प्रवास सुरू केला. हे अंतर होतं चार किलोमीटरचं. एकटाच निघालो. भीती नाही, कसला विचार नाही. फक्त एकच ध्यास होता मनात. आज बच्चू भाऊंची भेट घ्यायची म्हणजे घ्यायचीच.
सभेच्या ठिकाणी पोचलो, तवा आख्खं गाव सभेला जमलं होतं. ते पाहून वाटलं का, आता काही आपली भेट होणार नाही. पण मनात जिद्द होती.
मी स्टेजजवळ जाऊन एकाला विचारलं, ‘बच्चूभाऊ कधी येणार? सभा कधी सुरू होणार?’ कारण रात्र झाली तर परत गावी कसं जायचं हा विचार पण मनात येत होता. मग त्या माणसानं सांगितलं का, त्या समोरच्या घरात बच्चू कडू बसलेत. मग परत आनंद झाला. मी लगेच त्या घराजवळ पोचलो. घराच्या दरवाज्याजवळ खूप गर्दी होती.
आत जायला काही संधी नवती. मग मी एकाला विचारलं,
‘‘या मधली बच्चूभाऊंची चप्पल कोणती?’’
त्यानं सांगितलं, ‘ही.’
मी लगेचच ती चप्पल उचलली. बघायला लागलो, खिळे मारलेली आहे का ते.
खरंच चपलेला खिळे होते. मी वाचलेली बातमी खरी ठरली होती! तितक्यात गर्दीतले लोक बाहेर यायला लागले. सगळेच धक्का-बुक्की करत होते, त्यामुळे मी गर्दीतून दूर लोटला गेलो. पण या सगळ्यात एक चप्पल तेवढी सोबत आली. मग जरा वेळानी बच्चूभाऊ खुद बाहेर आले. चप्पल बघायला लागले, तर त्यांना एकच दिसली. त्यांना वाटलं गेली चोरीला.
भाऊ म्हणे जोरात, ‘‘अबे म्याटेहो, चप्पल कोणी नेली एक?’’
मी ते ऐकलं अन गर्दीमधून त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो.
सहा फूट उंची. निर्भय डोळे. चेहऱ्यावर दाढी. केस विस्कटलेले. असा माणूस म्हणजे बच्चूभाऊ. त्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट पहिल्यांदाच होत होती.
मी म्हटलं, ‘भाऊ, हे घ्या तुमची चप्पल.’
‘अरे वा, शाब्बास रे गड्या…’ असं म्हणत भाऊंनी हात पाठीवर ठेवला. भाऊंच्या हाताच्या स्पर्शामुळे शरीरात एक वेगळीच उर्जा-ताकद आल्यासारखं वाटायला लागलं. भाऊ चप्पल घालायला लागले तेव्हा मी त्यांना म्हटलं, ‘‘भाऊ बातमीत वाचलं होतं, तुमच्या चपलेला खिळे मारलेत. ते खरं आहे का पाहायचं होतं, म्हणून हाती घेऊन पाहिली.’’
भाऊ पुन्हा माझ्याशी बोलू लागले. तेही माझ्या डोळ्यात बघून.
‘‘मग दिसले का खिळे?’’
मी म्हटलं, ‘‘हो भाऊ’’
मग म्हणे, ‘‘काय नाव हाय तुयं?’’
‘‘राज माहोरे. तिवसा इथून आलो. भेटीला तुमच्या. भाड्याची सायकल घेऊन. लै दिवसापासून तुमच्या बातम्या वाचत असतो. तवाच म्या मनात ठरवलं होतं का तुमाले भेटावं म्हणून. आज आलो.’’
भाऊंनी जवळ घेतलं आणि बोलले, ‘‘लै हुशार दिसतं बे तू तं. लहान चुकला असून.’’
मी पुन्हा एक वाक्य बोललो, ‘‘मले तुम्ही लै आवडता. तुमच्यासारखं काम कराचं हाय मले.’’
पाठीवर हात ठेवून भाऊ हसून बोलले, ‘‘मंग जमव राज्या. मी तुया सोबत आहे.’’
भाऊंचं हे वाक्य ऐकलं आणि मी जोरात नारा दिला. पहिल्यांदाच, ‘अपना भिडू, बच्चू कडू!’
मग बच्चू भाऊंची सभा झाली. रात्री ११ वाजले. मी ज्याच्या घरी भाऊ बसले होते. त्याच्याच घरी मुक्काम केला अन सकाळी माझ्या गावी गेलो.
या प्रसंगापासून मी ‘प्रहार’शी जोडला गेलो. इथूनच माझा ‘प्रहार’बरोबर सामाजिक-राजकीय प्रवास सुरू झाला. मग ‘मोझरी’ इथं संजयभाऊ देशमुख यांची भेट झाली. ते जिल्हाध्यक्ष होते त्यावेळी. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात-आंदोलनात मी सहभागी व्हायला लागलो. कार्यक्रमाची पोस्टरं लावायला लागलो. पॅम्प्लेट वाटायला लागलो. तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावी जायला लागलो. नवीन कार्यकर्त्यांच्या भेटी घ्यायला लागलो. त्यामधून ओळखी व्हायला लागल्या. त्यातच मला कार्यक्रमाचं संचालन करण्याची संधी मिळाली. मी आपल्या दमदार आवाजात संचालन करायला सुरुवात केली. त्यामुळं तर आणखीन चर्चेत आलो. सोबत घरची कामं करत होतचो. शिक्षण घेत होतो. वेगवेगळी पुस्तकं वाचत होतो. बाबानी सांगितलं होतं. वाचन वाढव म्हणून. त्याची गोडी लागली. बाकी दुनियादारी पण समजायला लागली होती. पुढं निवडणुकीत भाषणं देण्याची जबाबदारी मिळाली. त्यामुळं नाव आणखीन चर्चेत आलं. मोठं होत गेलं. लहानपणी खेळता खेळता प्रश्न पडला होता. मलाही भाषण द्यायला येईल का?. ते तं आता यायला लागलं होतं.
(क्रमशः)
*
वाचा
कार्यकर्ता
समाजकारण
कथा
कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
राज माहोरे हे प्रहार संघटनेचे तिवसा तालुका प्रमुख असून गेल्या वीस वर्षांपासून ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते ना. बच्चू कडू यांचे विश्वासू कार्यकर्ते असून सामाजिक व राजकीय उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व कट्टर प्रहार सेवक राजभाऊ यांचे कटूसत्य!
खूप छान राज तुझी कठोर मेहनत आणि जिद्दीला सलाम…आज मैत्री दिनानिमित्य माझ्या जिवलग मित्राला सारद मजकूर या व्यासपीठानी जागा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार !!!😊
राजभाऊ तुमच्या सारखा मन मिळाऊ व स्पष्ट बोलणारा मिञ मिळत नाही,, पण आम्ही लय नशीबवान
राजभाई, फार छान कार्य आपल्या सामाजिक कार्याला व पुढील वाटचाली करीता माझ्या शुभेच्छा
सर्वप्रथम वाढदिवसाच्या मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजभाई…. तुझा राजकीय प्रवास वाचून खुप छान वाटले. तुझा राजकीय प्रवास सर्वाना आठवणीत राहावा असे चांगले कर्म तुझ्या हातुन घडो….हीच सदिच्छा
Very nice
राज प्रामाणिकपणा व जिद्द हे दोन गुण अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजाशी नाळ जोळलि असली कि आपोआपच मार्ग दिसतो. तुझ्यामध्ये हे आहेच यात काही शंकानाही. खूप मोठा हो आम्हांला अभिमानाने सांगता आल पाहिजे. पुढील मार्गक्रमनासाठी शुभेच्छा.
बच्चु भाऊ बददल तुमची आस्था आणि जिद्द यामुळे तुम्ही आज एक सामाजिक कार्यकर्ता घडले..सलाम तुमच्या जिद्दिला..
खुप छान👌👌
पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌺🌺🌺
आपल्यातील प्रामाणिक जिद्द , संकटकाळी संघर्ष करण्याची तयारी , सामाजिक जाण व भान यामुळेच आपली ही वाटचाल नव्या तरुण पिढीला प्रेरणादायी वाटते…आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
खुप छान ! राज तुझ्यासारख्ये कार्यकरते फार कमी असतात…जी अशी जिद्ध बाळगून समाजात करतात.👏👍🌟
आपल्यातील प्रामाणिक जिद्द , संकटकाळी संघर्ष करण्याची तयारी , सामाजिक जाण व भान यामुळेच आपली ही वाटचाल नव्या तरुण पिढीला प्रेरणादायी वाटते…आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
Great rajbhai
अशीच थोडी वेगळी माझी भाऊंशी जुळलेली नाळ….. जय प्रहार
बाकी कुठल्याही राजकीय पक्षात असे दिसणार नाही अशी कहाणी भाऊंची , कार्यकर्ता आणि प्रहार सोबत जुळलेल्या सर्व व्यक्तींच मनोगत भाऊंशी जुळेलेल आहे.
मना-मनातील राजा माणूस
अपना भिडू बच्चु कडू
खूप छान 👌🇮🇳🙏🏼
खूप छान राजसाहेब… लेख वाचून मन भारावून गेलं..
खुप छाण राजभाउ
”राज साहेब,, आपला लेख वाचुन मन भारावुन गेलय.😢