शेतकरी आसूड यात्रा (पूर्वार्ध): ‘हिम्मत है तो चला गोली…’

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-mla-prahar-sanghatana-raj-mahore-karyakarta-bacchu-kadu-vadnagar-gujarat-police-arrest-shetakaryanche-andolan

‘हिम्मत है तो चला गोली…’
हा संवाद काही चित्रपटातील नाही; हा संवाद आहे शेतकऱ्याचा, सर्वसामान्य माणसाचा ‘रियल हिरो’ असलेला नेता आणि एक आयपीएस अधिकारी यांच्यामधला. 

नवापूर चेकपोस्ट आणि टोल नाक्यावर महाराष्ट्र व गुजरात पोलीस उभे होते. अन् आमदार बच्चूभाऊ कडू ‘शेतकरी आसूड यात्रे’च्या ताफ्यासह धडकले.
भाऊ गाडीतून खाली उतरले. हजारो शेतकरी, दिव्यांग, महिला, प्रहार, शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही वाहनातून उतरले…
जोरदार घोषणाबाजी सुरू झाली…
‘कोण आला रे कोण आला, शेतकऱ्यांचा वाघ आला…’
‘बच्चूभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है।’ 

गगनभेदी नाऱ्यातच महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी आमदार बच्चूभाऊ कडू यांना समजावत होते, 
“भाऊ, तुम्ही समोर जाऊ नका. गुजरात पोलिसांच्या मनात वेगळं काहीतरी चाललं आहे….”

संपूर्ण आसूड यात्रेत ठिकठिकाणी महाराष्ट्रात पोलिसांनी सहकार्य केलं होतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांनाही जाणीव होती. शेवटी ती माणसंसुद्धा शेतकरी कुटुंबातलीच होती. 
पण भाऊंनी ‘जो होगा, देखा जायेगा’ म्हणत आक्रमक भूमिका घेतली. आणि महाराष्ट्र पोलिसांनी टोलवरील बॅरिकेट काढले. काही गुजरात पोलिसांचे अधिकारी तेथे होते, ते मात्र गोंधळून गेले.
‘हॅलो, हॅलो… वो बॉर्डर क्रॉस कर चुके है…’
तेथून १-२ किलोमीटरवर चौपदरी रस्त्यावर समोर हजारावर गुजरात पोलीस सज्ज होते. जणू काही हे युद्ध होतं, एका राज्याचे दुसऱ्या राज्यावर आक्रमण होते.

पुन्हा ‘आसूड’चा ताफा अडवण्यात आला होता. भाऊंनी गाडीतून उतरून चौपदरी रस्ता ओलांडला, कुणाला काहीही कळत नव्हते. ते बाजूच्या शेतातल्या ढेकळातून वाघाच्या चालीनं पुढं पावलं टाकत होते. काय होत होतं, ते त्या गुजरात पोलिसांनाही कळत नव्हतं.
सुमारे ५०० मीटर अंतर भाऊ चालतच होते; मग पोलीस ताफा भाऊंच्या दिशेने धाव करून आला.
एक तरुण आयपीएस अधिकारी भाऊंना आडवा झाला. 
‘तु आगे नही जा सकता,’ त्याची भाषा एकेरी व मग्रूरीची होती.
‘क्यू?’
‘मै बोल रहा हु मतलब, यहा से वापस जा…’
आता मात्र भाऊंचा संयम सुटला. ते चार पावलं समोर आले अन् थेट त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या छातीला भिडले. त्याचा हात कमरेवरच्या रिव्हॉल्व्हर होता.
‘क्या करेगा? गोली मारेगा? चल मार गोली. देखता हु तेरे मे कितनी हिम्मत है…’
त्या दोन वाक्याच्या वेळात काय घडलं असतं, कसा प्रसंग असेल तो…
आणि या प्रसंगाचा मी व आमचे शेकडो सहकारी साक्षीदार होतो. आमच्या काळजाची धडधड त्या एका मिनिटात प्रचंड वाढली होती.
त्या आयपीएसनं त्याच्या स्टाईलनं हात करून बोलण्याचा प्रयत्न केला; पण भाऊंनी उत्तर दिलं, 
‘तू हात नीचे कर.. हम क्या पाकिस्तान के है क्या? तू तेरा काम कर, हम हमारा काम करते हैं…’

कदाचित तो दिवस शेतकरी संघर्षाच्या चळवळीतील रक्तरंजित काळा दिवस ठरला असता. एक गोळी चालली असती तर? रक्ताचा सडा त्या शेतात पडला असता तर…?अटक, सुटका, नजरकैद…
गुजरात पोलिसांनी केले आंदोलक शेतकऱ्यांचे हाल..
कोण दिवस येई कसा? एक डीवायएसपी समजदार होता. त्यानं आपल्या तरुण आयपीएस अधिकाऱ्याला तेथून दूर नेले.

मुळात हा संघर्ष पोलिसांविरुद्ध नव्हताच. मग बच्चूभाऊ यांनी पुन्हा पैतरा बदलला. आणि पुन्हा महामार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूच्या शेतात धाव घेतली. प्रचंड ऊन, पारा ४५ डिग्रीवर.. अशात एका शेतात काही झाडं होती. त्यांच्या सावलीला भाऊ व आंदोलकांनी ठिय्या दिला. दुपारचे एक वाजले होते. प्यायला पाणी नाही. समोर २० किलोमीटरवर गुजरातच्या भावेशभाई पटेल नावाच्या शेतकरी नेत्यानं ‘आसूड यात्रे’च्या भोजनाची व्यवस्था केली होती. त्यांनी भोजनाचे डब्बे आणले, पण पोलिसांनी ते जप्त करून गुजरातच्या कार्यकर्त्यांना तेथून परत पाठवले. गुजरात पोलिसांची ही वागणूक अतिशय निर्दयी होती.

पोटात अन्नपाणी नसतांनादेखील सर्व शेतकरी, कार्यकर्ते प्रचंड घोषणाबाजी करत होते. तो सिनिअर डीवायएसपी भाऊंना म्हणत होता, “जाने दो ना भाऊ, हमारे उपर बहोत प्रेशर है.. आप वापस नही गये तो आपको जबरदस्ती अरेस्ट करने का ऑर्डर दिया है..”
पण भाऊ वडनगर जाण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम होते. अर्धा तास उलटला अन् मग दोन-तीनशे पोलिसांचा ताफा भाऊंच्या दिशेनं चाल करून आला. आमदार बच्चूभाऊ कडू यांना त्यांनी जबरदस्तीनं, बळजबरीनं ताब्यात घेतलं. आणि शेतातून पोलीस वाहनाकडे नेत असतांना अनेक दिव्यांग आडवे आले, रस्त्यावर आडवे झोपले. त्यांच्यावरदेखील पोलिसांनी बळाचा वापर केला. कार्यकर्ते आणि दिव्यांग-महिलांना अक्षरशः फरफटत नेलं. तीन पोलीस वाहनात सुमारे १५० वर कार्यकर्ते कोंबून वाहनं समोर नजीकच्या पोलीस स्टेशनच्या दिशेनं निघाली. आम्ही इतर सर्वांनी आपापली वाहनं परत महाराष्ट्राच्या दिशेनं वळवली.

भाऊंना अटक झाली होती. आम्ही सुमारे ४००-५०० कार्यकर्ते आपल्या राज्याच्या हद्दीत आलो अन् एका धाब्यावर थांबलो.
तिकडं काय घडत असेल याबद्दल सर्वांनाच चिंता होती. एव्हाना बच्चूभाऊ यांना अटक झाल्याची बातमी राज्यभर पसरली होती.
जास्त वेळ बच्चू कडू यांना ताब्यात ठेवणं महागात पडेल हे माहीत असल्यानं गुजरात पोलिसांनी ‘डिटेन’ करून दोन तासात त्यांना व इतरांना पुन्हा महाराष्ट्र हद्दीत आणून सोडलं.

आता आंदोलन संपलं..
‘बच्चू कडू कल गुजरात के वडनगर पहुँच नहीं सकते’ या भ्रमात गुजरात पोलीस खुश होते. बच्चूभाऊंना रोखून मोठी कामगिरी केल्याचा अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यांवर होता. भाऊ परत आले.

‘आंदोलन संपलं असून आता प्रत्येकानं इथून आपापल्या गावाकडे निघावं’ अशी घोषणा करण्यास मला सांगण्यात आलं.
त्यानंतर भाऊंनी सर्वांचे आभार मानले. अन् भाऊ एका वाहनातून नवापूरला निघून गेले. पण गुजरात पोलिसांनी भाऊंचा पिच्छा सोडला नाही. नवापूर विश्रामगृहात भाऊंना नजरकैद करण्यात आलं होतं.

‘आसूड यात्रे’चा उद्याचा शेवटचा दिवस होता. रक्तदानानं वडनगरला सांगता होणार होती. पण भाऊंनी आम्हाला परत पाठवलं होतं…
नवापूरच्या विश्रामगृहाला पोलिसांनी वेढलं होतं. एकदा का आजची रात्र निघून गेली की मग बच्चूभाऊ कडू वडनगर पोहचूच शकत नाहीत हा पोलिसांचा अंदाज होता पण…

(क्रमशः)

प्रस्तुत लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी:
शेतकरी आसूड यात्रा (उत्तरार्ध): गनिमी कावा

*

वाचा
राज माहोरे यांचं साहित्य
समाजकारण
कथा

कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी


+ posts

राज माहोरे हे प्रहार संघटनेचे तिवसा तालुका प्रमुख असून गेल्या वीस वर्षांपासून ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते ना. बच्चू कडू यांचे विश्वासू कार्यकर्ते असून सामाजिक व राजकीय उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

2 Comments

  1. अनुया कुलकर्णी

    धडधड व उत्कंठा वाढलीय …


आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :