महाडचे दिवस ११: नवा चेहरा

संध्याकाळी उद्या पुण्याला जाताना बरोबर काय न्यायचं ते आठवत होतो. घर, घरातली माणसं, वाडा आणि सारी नारायण पेठ जमा झाली. एकदम गुप्ते काकूंचा चेहरा समोर आला. त्यांना सरप्राईझ द्यावं का? येस, एवढाच शब्द मी उच्चारला. कुरेशींनी विचारलं, ‘काय झालं?’ मनात आलं गुप्तेकाकूंना जे सरप्राईझ द्यायचंय ते आणण्यासाठी कुरेशी बरोबर हवा. पण दुसऱ्याक्षणी  विचार आला नको. कुरेशीला नाही घ्यायचं बरोबर. म्हणून म्हटलं, नो.
कुरेशी म्हणाला, ‘‘काय चाललंय तुझं येस… नो.’’
मी म्हटलं, ‘‘काही नाही तुला सांगायचं होतं की एन. एम. आणि कोल्हेनी येस म्हटलंय आणि शहापूरकरनी नो.’’
‘‘ये हुई ना बात. म्हणजे बघ चाचानी भाडं पन्नास मागितलंय. आपण आता चौघे.. प्रत्येकी साडेबारा रुपये. जम गया. आणि हो तुला सांगायचं राहिलं चाचा म्हणाले की डिपॉझिटका कुछ भी नहीं. आप लोगों की जबान यही रहा मेरा डिपॉझिट.’’
चाचांविषयी कृतज्ञता कुरेशीच्या स्वरात जाणवत होती. माझ्या नजरेतली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी चाचांच्या घराकडं पाहिलं. खिडकी पूर्ण उघडली. मुन्ना पाट्यावर वाटत बसली होती. खिडकी उघडलेली पाहून मुन्ना गोड हसली. माझ्यामागं कुरेशी उभा होता.

मासळी बाजारात गेलो. सगळीकडं कलकलाट. असा कलकलाट सुरू झाला की, ‘मासळी बाजार’ का म्हणतात ते लक्षात आलं. अनेक तऱ्हेचे मासे. लहान, मोठे अगदी पेराएवढेदेखील. मासे घेताना काही लोक माश्याच्या पाठीवरच्या पंखासारखे भाग उचकटून बघत होते. हे काय चाललंय मला कळत नव्हतं. म्हणून कुरेशी बरोबर हवा होता. ही लोकं असं का करतात ही शंका मला कुणाला विचारावी, हा प्रश्न पडला होता. एका कोळीणीला मी हा प्रश्न विचारताच ती हसली. म्हणाली, ‘‘महाडमध्ये नवीन दिसताय आणि माश्याची चौकशी करायलाही पहिल्यांदा आलेले दिसताय. मी काहीच बोललो नाही, त्यावर ती म्हणाली, ‘‘याला कल्ले म्हणतात बामना”.

गिऱ्हाईकं हे कल्ले जसे फाकवून बघतात तसे तिनी फाकवून दाखवले. आत गुलाबी रंग न मुरल्यासारखा दिसत होता. ती म्हणाली, ‘‘हा लाल रंग आहे ना तो बघतात. त्यांना असं वाटतं की रंग जेवढा लाल तेवढा मासा ताजा. पण असं बघणारं गिऱ्हाईक हे महाडातलं नाही, बाहेर गावाचं. त्यांना माहीत नाही की महाडात मच्छी कधी शिळी विकायला येत नाही आणि दुसऱ्या गावातबी लाल रंग अगोदरच लावून ठेवतात. गिऱ्हाईकं खूश ताजं मास घेतलं आणि कोळीणबाई बी खूश. बोला काय देऊ?”
मी तिची नजर टाळत म्हटलं,
‘‘काही नकोय, असंच बघत होतो.”
मनात म्हटलं हिला समजलंय आपण अडाणी आहोत. माल देईल चांगला पण भाव नक्की ज्यादा सांगेल. जी लोकं आपल्या अडाणी प्रश्नाला उत्तरं देतात ती लोकं आपल्याला फसवणारे असतात. हा माझा अनुभव नव्हता; परंतु कयास होता.

मी पुढं जात राहिलो. एका ठिकाणी मोठे मासे नव्हते; पण सगळे वाळवलेले, खारवलेले छोटे छोटे मासे. मी अंदाज केला यालाच सुकट म्हणत असावेत. मी पावकिलो द्यायला सांगितले. पैसे दिले. वर्तमानपत्राच्या पुड्यात बांधलेले ते सुकट घेऊन खोलीवर आलो. मुन्ना पाट्यावर. मी तिला जवळ जाऊन पुडा दाखवला. आता यात लाजण्याजोगं काय होतं? ती आत पळाली. मी खोलीत जाण्यासाठी वळालो. पायरीवर कुरेशी उभा होता.

पहाटे जुन्या पोस्टाशी आलो. एकाला विचारलं, ‘‘सहाची पुणे गाडी अजून आली नाही का?’’
तो म्हणाला, ‘‘तिचं टायमिंग बदललंय. आता ती पावणेसातला येते.’’
घड्याळात पाहिलं, सहालादेखील दहा मिनिटं कमी होती. ठरवलं पुणे गाडी स्टॅण्डवर गाठायची. नक्की बसायला जागा तरी मिळेल.

पुण्यात साडेबाराला पोचलो. एक महिन्यानी येत होतो. रिक्षातून घरापाशी उतरलो; पण घरात शिरायची ओढच वाटत नव्हती. हातातील बॅगला सुकटाचा वास येतोय. आजी काय म्हणेल? मी घरात शिरण्यापूर्वी खिडकीशी कोळशाचे हौद बांधले होते तिथं तो पुडा ठेवला. अर्धवट लोटलेलं दार उघडलं. आजी कुठाय? मला ओढ वाटायचीच होती तर ती एकमेव व्यक्ती होती. घरात सामसूम. मी घरभर नजर फिरवून बॅग ठेवली. अंगणातून धावत धाकटी बहीण आली. मी विचारलं, “कुठं गेलेत सगळे?”
ती म्हणाली, “पाध्येकाका गेले. आज त्यांचा दहावा आहे. आजी, आई आणि दादा ओंकारेश्वरावर तिलांजली देण्यासाठी गेलेत.”
क्षणभर वाटलं आपणही जावं का? मी या तिघांची वाट पाहत होतो आणि तिघी बहिणींशी बोलत बसलो.

पाऊण-एक तासानी ओंकारेश्वर आटपून हे आले. आल्या आल्या आजीनी मला जवळ घेतलं. दादांनी माझी नजरेनी दखल घेतली. तेव्हा आई म्हणाली,
“विनय कळवायचे नाहीस का येणार आहेस ते? चल, मी चटकन पोळ्या करते जेऊन घे.”

कोकणे खानावळीत चपाती खात होतो, आज पोळी. आजी नाकाला पदर लावत म्हणाली, “विनूभाऊ, बॅगला कसला घाण वास येतोय का? का बाहेरून येतोय? मला पश्चाताप झाला. या सगळ्यांना घरी यायला वेळ लागतोय, हे समजताच गुप्तेकाकूंना सरप्राईझ द्यायला हवं होतं. आता आजी माझ्या बॅगपासून सुरुवात करत नाकात पदर कोंबणार.

पंधरा-वीस मिनिटं मी कसा आलो, महाडची व्यवस्था कशी लागली, माणसं कशी आहेत हा पूर्वी पत्रातून लिहिलेला मजकूर लाईव्ह सांगून झाला. दादांकडं बघितलं की सारखं वाटत होतं की हे आता विचारणार.. बाकी ठीक आहे पण अभ्यासाचं काय? मी त्यांची नजर टाळत होतो आणि दादा विचारणं. बहुदा आईनी त्यांना दटावलं असणार की, आल्या आल्या त्याला असले प्रश्न नका विचारू. त्याला घरात रुळू दे.. मग विचारा. त्यापेक्षा तो महाडला रुळलाय का, हे विचारा.

आईनी पानं घेतली. जेवण झालं. आता मी नेहमीसारखा घरातला झालो होतो. त्यामुळं प्रश्न  संपले. उत्तरं द्यायचं दायित्व मी निभावलं होतं. आता गुप्तेकाकू.
मी आईला म्हटलं, “आई जरा जाऊन येतो.”
मी दारातून बाहेर पडत असताना दादांचे शब्द कानावर आले, ‘‘चिरंजीव आले, निघाले बिड्या फुंकायला.’’
मी त्याकडं दुर्लक्ष केलं. कोळशाच्या हौदावरचा पुडा हातात घ्यावा आणि काकूंकडे जाऊन यावं म्हणून हात पुढं केला. माझी चाहूल लागल्यानं मांजर पारिजातकाच्या शेंड्यावर चढून माझा अंदाज घेत होतं. हौदावर सुकटाचा पुडा छिन्नविछिन्न होऊन पडला होता. आता मला काकूंकडे जाण्यात काही मतलब राहिला नव्हता. दादांची इच्छा पुरी करण्यासाठी मी टपरीवर गेलो. त्यांनी माझ्या हातावर पनामा ठेवली. मी ती त्याला परत करत म्हटलं, “बर्कले दे.”
टपरीमागच्या खोलीत जाऊन बसलो. चोरून सिगारेट ओढणाऱ्यांची भाऊगर्दी होती.

घरात परत आलो तर कोरम फुल. एक नवा चेहरा दिसला. मी बहिणीकडे पाहिलं. ती म्हणाली, “ही नीला खानोलकर. तुला मागं मी सांगितलं होतं ना, माझी एक मैत्रीण क्रिकेट खेळते एका क्लबकडून, तीच ही. आम्ही आज बॅडमिंटन खेळायला चाललोय. तूही येणार असशील तर ये.” मी बघू म्हटलं. त्यावर ती नीला म्हणाली, ‘‘गौरी मी जाते.. तुझा भाऊ खूप दिवसांनी आलाय. संध्याकाळी ये कोर्टवर. बरं आहे विनय.”

मी चक्रावलो. गौरीनी तिची ओळख करून दिली होती, माझी नाही. तरीही ती नाव घेऊन मला जाते म्हटली. गौरीनी माझ्याबद्दल तिला सांगितलेलं दिसतंय. मी पाच वाजण्याची वाट पहात बसलो. कोर्टवर गौरीबरोबर येण्यासाठी मी बघू म्हणालो होतो.. पण आता जावंच.

पाच वाजले. मी आणि गौरी कोर्टवर गेलो. नीला आलेलीच होती. दुपारी पाहिलं तेव्हा तिनी अंगभर कपडे घातलेले होते. आता मात्र ती हाफ पॅन्ट आणि टी शर्टमध्ये होती. तिच्या काळ्या चेहऱ्यापेक्षा दिसणाऱ्या मांड्या कमी काळसर होत्या. दुपारी वेणीत बांधलेले केस मोकळे होते. देहयष्टी खेळाडू असल्याचं सांगत होती. थोडसं व्यक्तिमत्त्व पुरुषीपणाकडं झुकणारं होतं. आकर्षक तर अजिबात नव्हतं. तरीही ती नीला नावाची मुलगी होती. सराईतपणे ती आणि गौरी कोर्टवर बागडत होत्या. मी खेळायचा प्रयत्न केला; परंतु शटल रॅकेटच्या कडांवरच जास्त आपटत होतं. हा खेळ पहिल्यांदाच खेळत होतो आणि तोही कोर्टवर. वाड्यात आम्ही फुलबॅट खेळायचो. ती नीतकोर बॅट आणि ही बुंदीच्या झाऱ्यासारखी रॅकेट. ते प्लॅस्टिकचे फूल आणि हे शटल. ते जास्तीत जास्त तीन फूट सरकत मारलेलं फूल आणि इथं सात-आठ फूट पळापळ करून शटलपर्यंत पोचणं. फुलबॅट आणि बॅडमिंटन एकाच वळणाचे. जसं कॅरम आणि बिलियर्ड्स एकाच घराण्याचे. गौरी इतकी छान खेळतीय, मला हे नवीन होतं. महाडला जाण्यापूर्वी मी गौरीचं हे रूप पहिल्याचं आठवत नव्हतं. नीलाची आणि गौरीची गहिरी दोस्ती आहे, हे जाणवत होतं.

बॅडमिंटन खेळायचा एक अपयशी प्रयत्न माझा झाला होता, याची खंत वाटतीय हे मनाशी कबूल केलं. पण जेव्हा गौरी म्हणाली की, ‘‘विनय पहिल्यांदा खेळण्याच्या मानानी तू बरा खेळलास” तेव्हा बरं वाटलं. त्यावर नीला म्हणाली, ‘‘निदान शटल फ्लोअरवर पडण्याआधी रॅकेटच्या ब्रॅकेटला तरी लागत होतं.’’
हे वाक्य ऐकलं आणि आणखी बरं वाटलं.

मागं कँटीन होतं. कॉफी सांगताना मी कँटीन मालकांशी दोन वाक्यं बोललो आणि टेबलावर आलो. गौरी म्हणाली, “काय विचारत होतास त्यांना?”
त्यावर नीला म्हणाली, “मी गेस करू? तो सिगारेट आहे का विचारत असणार.”
मी आश्चर्यचकित. गौरी तिला म्हणाली, “तू कसं काय ओळखलंस?”
ती म्हणाली, “विनयचे ओठ बघ ना. काळे पडत चाललेत.”
आता मी जास्तच आश्चर्यचकित. माझ्याशी प्रथमच कुठली मुलगी अशा खेळकर पद्धतीनं बोलत होती आणि तेदेखील माझ्या ओठांविषयी.

घरी आलो तेव्हा एका लाल सायकलवरून एक मुलगा आला. सरळ घरात आला. मी त्याला ‘कोण हवंय’, विचारायच्या आत त्यानी कॉटखालून पेटी बाहेर काढली, कॉटवर ठेवली. सफाईदारपण त्यावरून बोटं फिरवली. ‘बिनाका सरताज गीत’मधल्या गाजलेल्या गाण्याची सरगम छेडली. गौरीनी तंबोऱ्याची गवसणी काढत म्हटलं,
“विनय, हा प्रदीप गोरे. आमच्या गाण्याच्या ग्रुपमधला. पुढच्या महिन्यात गांधर्व महाविद्यालयातर्फे शास्त्रीय गाण्याची स्पर्धा आहे. त्यात मी भाग घ्यावा अशी याची इच्छा आहे. मी काही फार सिरीयस नाही त्याबाबतीत, पण हा आहे.”

आजच्या दिवसात दोन परकी माणसं येऊन गेली घरात. एक नीला आणि दुसरा प्रदीप. प्रदीपचं गौरीसाठी येणं एरवी मला जेलस करून गेलं असतं. परंतु आज तसं वाटलं नाही. कारण नीला येऊन गेली होती. हे दोघेही गौरीसाठी आले होते. आमची शाळा आणि डिप्लोमाचं वाडिया कॉलेज दोन्हीमध्ये कधी मुली नव्हत्या. त्यामुळं को-एज्युकेशन मला माहिती नव्हतं. त्यामुळंच मैत्रिणी असण्याची शक्यता नव्हती. गौरीदेखील मुलींच्या शाळेत, नंतर एसएनडीटी या मुलींच्या कॉलेजमध्ये. तिलाही को-एज्युकेशन माहिती नव्हतं. तरीही तिला मित्र होते. काय फरक होता आम्हा भावा-बहिणींच्या जगण्यात? फरक होताच. गौरी कलेच्या क्षेत्रात होती. मी ना कलेच्या क्षेत्रात ना क्रीडेच्या क्षेत्रात, ना ॲकेडेमिक करियर क्षेत्रात. या तुलनेचा मला एरवी खूप त्रास झाला असता. पण आज होत नव्हता. कारण नीला. मी विचार करतोय नीला काय माझ्या आयुष्यात आलीय? केवळ आज जुजबी बोललीय. मी तिच्याकडं ओढला जावं असं काही आहे का तिच्यात? काळी, पुरुषी वर्तनाची, कुरूप म्हणावी अशी नीला. तरीही मी सुखावलोय. कारण एकच मला दाढी आहे आणि नीलाला…

तीन दिवस पुण्यात राहून महाडला परत जाण्यासाठी मी एसटीमध्ये बसलो. एका गोष्टीचा आनंद होत होता आणि वाईटदेखील वाटत होतं, या तीन दिवसात दादांनी अभ्यास कसा चाललंय विचारलं नाही. या न विचारण्यातून त्यांनी बरंच काही विचारलं. मला जबाबदारीची जाणीव करून दिलीय. खरंच महाडला पोचलो की अभ्यासाला लागायला हवंय. परीक्षेला अजून एक महिना अवकाश आहे. बॅगच्या तळाशी लपवून ठेवल्यासारखं ठेवलेलं पुस्तक बाहेर काढायला हवं, त्याला हवा द्यायची फार गरज आहे.

महाडच्या एसटी स्टॅण्डवर उतरलो तर समोर गुजर पती-पत्नी. गुजर त्यांच्या लग्नातील सफरीमध्ये तर वहिनी पैठणीत. नाकात फक्त नथ नाही.
मी विचारलं, ‘‘कुठं?’’
वहिनी म्हणाल्या, “पोलादपूरला. जयश्रीच्या लग्नाच्या याद्या आहेत आज.”

(क्रमशः)

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :