१६ वर्षांपूर्वी तू या जगात होतीस तेव्हा मी १५ वर्षांची होते. तुझ्याबद्दल फक्त ऐकून होते. पण कधी तुझ्याबद्दल फार उत्सुकता जाणवली नाही. तू तेव्हा तशी सेलिब्रिटीच होती, आणि मी शाळेत जाणारी, नुकतीच वयात आलेली एक मुलगी होते. तू गेल्यावर अनेक वर्तमानपत्रांत बातम्या आल्या असतील. पण मला त्यातलं काहीच माहित नव्हतं. मग मी कॉलेजला जायला लागले, आणि लायब्ररीतून तुझं पुस्तक घेतलं. उत्सुकता म्हणून ते चाळून पाहिलं, जरा वेगळं वाटलं आणि मग वाचायचं ठरवलं. तुझा कथासंग्रह ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ तेव्हा वाचला. तेव्हापासूनच तू मनात राहिलीस.
पुढं खूप वर्षं मी तुला भेटले नाही आणि मग जगण्यातली व्यवधानं आड आली. काहीच कारण नसताना, बऱ्याचदा तुझं वाचायचं राहून जायचं. त्याबद्दल मनात खंत पण असायची. पण कधीतरी तू लायब्ररीच्या एखाद्या मासिकात किंवा घरातल्या पुस्तकांत भेटायचीस आणि मग तू भेटलीस की परत तू सगळी वाचली पाहिजेस, तुझे सिनेमे पाहिले पाहिजे, तुझ्या मालिका पाहिल्या पाहिजे असं वाटत राहायचं. पण तेही माझ्याकडून राहून जायचं. कधीतरी मी तुझा ‘मुंबईचा फौजदार’ हा सिनेमा टीव्हीवर पाहिला आणि तू मला एक खडूस बाईच वाटलीस. पण तुझ्या कथा वाचून मनात तू मात्र असायचीस, आणि कधीतरी लिहिताना, वाचतांना माझ्यात डोकवायचीस.
मग तुझी सगळी पुस्तकं वाचायचं मनाशी पक्कं ठरवलं. आणि आत्ता तुझ्याबद्दल लिहिण्याची जेव्हा संधी मिळाली तेव्हा मात्र मी तुला वाचायचं हे पक्कं केलं. दहा-बारा वर्षांपूर्वी जी मनात इच्छा होती ती अखेर पूर्ण झाली. तुला तुझ्या लिखाणातून समजून घ्यायचं हे एक आव्हान मी स्वीकारलं. एक वाचक म्हणून तू माझी आवडती लेखिका आहेस. आधी मी लिहायचे नाही, पण हळूहळू लिखाण करायला लागले आणि जरा बरं वाचायला लागले तेव्हा तुझा आधार मला वाटायला लागला, कारण तुझ्या कथा वाचल्यावर त्या मनात घोळत राहायच्या. कथांमधली तुझी स्त्री पात्रं माझ्याशी बोलायची. मी त्यांना माझ्याशी रिलेट करायचे. आणि त्यांच्यात तुला नकळत शोधायचे.
प्रिया, तू माझं प्रेरणास्थान आहेस. माझ्या लिखाणाला तू पूर्ण नसली तरी थोडीशी कारणीभूत आहेसच. तुझ्या अनेक कथांची पात्रं माझ्या मनाशी नाती जोडून आहेत. कारण ती पात्रं मला माझी वाटत राहतात. तुझ्या कथांतल्या स्त्रिया या मला नेहमीच वेगळ्या भासल्या आहेत. त्या स्वतःला प्रश्न विचारणाऱ्या आहेत, जे समाजात चालू आहे त्याबद्दल स्वतःचं मत मांडणाऱ्या आहेत, आणि अगदी हतबल होऊनही स्वतःला आहेत तश्या स्वीकारणाऱ्यादेखील आहेत. तुझ्या लिखाणात असलेली सहजता, त्यातला थेटपणा माझ्यात यावा असं मला तुला वाचत असताना नेहमी वाटायचं. त्यासाठी मी तुझी पुस्तकं सारखी वाचत राहते. प्रत्येकवेळी मला काहीतरी अर्थ त्यातून सापडत राहतो. लक्षात नाही राहिली एखादी कथा की ती परत वाचायची. तुझ्या कथा दरवेळी जणू काही नवाच अर्थ सांगतात असं वाटत राहतं. तुझ्या कथेतल्या पात्रांशी एकरूप होऊन जायला आवडतं मला.
प्रिया, तू किती सुंदर होतीस. तुझे डोळे किती बोलके होते. तू जेव्हा मॉडेलिंग या क्षेत्रात आलीस तेव्हा तुला मेकअप म्हणजे काय, तो कसा करतात हे अजिबात माहित नव्हतं; तरीही कॅमेरासमोर तू स्वतःला किती बदललं. फक्त गंध-पावडर करणारी प्रिया पुढं मेकअप करण्यात निष्णात झाली हे तू किती सहजपणे तुझ्या पुस्तकांत लिहून ठेवलं आहेस. गुगलवर मी प्रिया तेंडुलकर असं टाकलं की तुझे खूप सारे फोटो येतात. युट्यूबवर तुझ्या चित्रपटांचे अनेक व्हिडीओ आज एका किल्कवर उपलब्ध आहे. तू त्या अर्थानं आमच्यात जिवंत आहेस. गुगल तुला कधी विसरणार नाही, कारण त्यावर तू ‘रजनी’ मालिकेतली प्रिया म्हणून तर असेतच, पण छोट्या काळ्याभोर मोकळ्या केसांची, नाकात मोरनी असलेली, कपाळावर दिसेल अशी टिकली असलेली प्रियादेखील असतेस. तू व्हर्च्युअल रुपात माझ्या डोळ्यांसमोर आली की हिची खूप पूर्वीपासून आपली ओळख आहे असं मला वाटत राहतं.
अर्थात तुला मी कधीच भेटले नाही, किंवा तुझ्याशी तू होतीस तेव्हा कधी संपर्क साधला नाही. पण वाचक म्हणून मी कायम तुझ्या संपर्कात होते आणि आजही आहे. तू गेल्यावर खूप काळानंतर, मी जेव्हा लिहायला लागले तेव्हा तुझ्या जास्तच संपर्कात आले. तुझ्याशी, तुझ्या लेखणीशी मी मैत्री केली. माझी मैत्री एकतर्फी आहे. तुला ती माहित असण्याचा प्रश्नच नाही. तुझा इतका विचार मी करायचे की कधीकधी तू माझ्या स्वप्नांत यायचीस आणि माझी चौकशी करायचीस. तुझ्याशी मोकळेपणानं बोलता यावं म्हणून हा पत्रप्रपंच करते आहे.
आज (१९ सप्टेंबर) तुझा १८ वा स्मृतीदिन. १९ ऑक्टोबरला तुझा वाढदिवस. आत्ता तू असतीस तर साठी ओलांडलेली एक ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका म्हणून जगली असतीस. कदाचित मी तुला प्रत्यक्ष भेटले असते, पण आजही हे लिहिताना तू माझ्या आसपास आहेस असंच वाटतं आहे. मनात एक भीती पण आहेच, तुला प्रत्यक्ष पाहण्याची किंवा बोलण्याची कितीही उत्सुकता मनात असली तरीही तुला माझ्याबद्दल काय वाटेल हा प्रश्न तू नसतानाही मनात डोकावतोच. मग हा विचार करत राहणं किती मूर्खपणाचा आहे हे जाणवतं आणि मग मी तो विचार सोडून देते.
तुझ्या लहानपणी तू किती रडायचीस. त्याचे किस्से तू तुझ्या लेखांतून दिले आहेस. सारखी मुळूमुळू रडणारी आणि आजारी पडणारी प्रिया इतकं ताकदीचं लिहू शकली हे एक आश्चर्यच आहे असंही एकदा मनात आलं. तुला वाचताना तू किती साधी आणि बावळट होतीस हे किती सहज तू लिहीलं आहेस. लिहिताना तू इतकी प्रमाणिक कशी राहू शकलीस? तुला जे वाटतं ते तू लिहिलं, त्यासाठी एवढं धाडस तू कुठून आणलंस? तुझ्याइतका नितळपणा माझ्यात येईल का, असा प्रश्न मी तुझं वाचताना स्वतःला नेहमी विचारते. अर्थात या प्रश्नाचं उत्तर मी काही अजून स्वतःला देऊ शकले नाही.
तू जेव्हा ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट्स’ला जायचा निर्णय घेतलास, विजय तेंडुलकर यांची मुलगी म्हणून जेव्हा पहिल्यांदा तू तिथं गेली, तेव्हा तुला वेगळी वागणूक मिळाली आणि नंतर प्रवेशाच्या वेळी मात्र जेव्हा तिथल्या प्रवेश देणाऱ्या बाईंनी तुला कमी ग्रेड म्हणून प्रवेश नाकारला तेव्हा तू किती रडलीस.. असं इतक्या पटकन तुला रडता कसं यायचं? इतकी हळवी तू कशी काय गं झालीस? कॉलेजला जाताना लोकलच्या प्रवासात तू थकून जायचीस. पण त्या ट्रेनमधल्या बायका तुला खूप भारी वाटायच्या, त्यांच्यासारखं आपण स्वयंभू होऊन दाखवू असं तुला कितीतरी वेळा वाटायचं. त्या रोजच्या प्रवासाची उत्सुकता, ट्रेनमधल्या बायकांची वर्णनं तू किती मस्त केली आहेस. नंतर तुला तो प्रवास नकोसा पण वाटू लागला. पण तरीही ते वाचत असताना जणू काही मी तुझ्या बरोबर मुंबईच्या लोकलचा प्रवास करतेय असं वाटतं.
जेजेतला तुझा चित्रकलेचा प्रवास तू अर्धवट सोडलास, कारण त्यात तुझं मन रमलं नाही. तशी तू कलाकार असूनही जेजेमध्ये, तिथल्या कोर्समध्ये फार काळ रमली नाहीस. एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाहीये, तर त्यापासून आपण दूर जावं याबद्दलचे सगळे निर्णय तू तुझे घेतलेस. घरच्या माणसांच्या मतांचा आदर केलासच, पण तुला जे वाटतं ते तू आधी केलंस. तुझ्यातल्या स्वतःला तू नेहमीच अग्रभागी ठेवत आलीस. तुला हे कसं जमलं?
कॉलेज सोडल्यावर पुढं काय हा प्रश्न तुला जेव्हा तुझे जवळचे लोक विचारायचे, तेव्हा तू नेमकं काय बोलायचीस? तुझ्यात निर्णय घेण्याची ही क्षमता आपोआप आली का? तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असं वाटू लागलं आणि तू एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुलाखतीला गेलीस. आणि ज्या दिवशी मुलाखत दिलीस त्याच दिवशी तू तिथं जॉईन झालीस. घरी गेल्यावर सगळ्यांना सांगितलंस, तू नोकरी करणार म्हणून. तुझ्या घरच्यांनी तुला किती साथ दिली ना..! तुझ्या आई-वडिलांची साथ जर तुला नसती तर तू हे सगळं कसं करू शकली असतीस?
त्या हॉटेलातले तुझे अनुभव तर तू इतक्या ताकदीनं लिहिले आहेस, ते वाचून माझ्या अंगावर काटेच आले. त्या व्यवसायात तू उभी राहून, सतत हसून येणाऱ्या ग्राहकाचं स्वागत करायचीस. टेबल साफ करायचं कामदेखील करायचीस. हे सगळं तू वयाच्या सोळा किंवा सतराव्या वर्षांत केलंस. तिथल्या मॅनेजरला तू चांगला धडा शिकवलास आणि मग तिथली नोकरी सोडली. हॉटेलमध्ये जेव्हा तुझ्यावर अन्याय झाला तेव्हा तू न घाबरता आवाज उठवलास. प्रसंगी भांडलीस. हे सगळं तुला इतक्या लहानपणी कसं काय जमलं?
एका म्हाताऱ्या माणसाला तू हसून प्रेमानं दोन शब्द बोललीस म्हणून त्याला किती आनंद झाला. हॉटेलात जेवायला येणारा तो म्हातारा तुझ्यावर खुश झाला आणि तुझ्यासाठी त्यानं एक कोरा सही केलेला चेक भेट दिला. किती सहजपणे तू त्याची भेट नाकारलीस. असे कितीतरी प्रसंग तुझ्या आयुष्यात घडून गेले असतील. त्यातून तू एक माणूस म्हणून किती चांगली होतीस हे जाणवत राहतं.
तुझ्या ‘झुमकी आणि गुग्गुमची गोष्ट’ वाचून तर मला इतकं भारी वाटलं, की जर त्या कथेतले ते दोघं खरेच असतील तर आपण त्यांना एकदा तरी भेटायला हवं. तुझे झुमकी आणि गुग्गुम किती मोठे झाले असतील आज. तुझ्या कथेतली सगळी पात्रं आज माझ्या आजूबाजूला मी अनुभवत आहे. तुला तुझ्या अभिनयाच्या क्षेत्रातही खूप काम होतं, तरीही तू तुझी लेखणी कधी सोडली नाहीस. वेळात वेळ काढून तू सदर लेखन करायचीस, कथा लिहायचीस. कसं तुला जमलं हे सगळं करायला? आणि इतकं कसं सुचायचं तुला?
तुझ्या कथा वाचतांना मी खूप हसले आणि खूप रडले पण आहे. जास्तकरून.. रडले जास्त आहे. ‘स्त्री वगैरे’ या कथेतली चांगल्या हुद्द्यावर नोकरी करणारी ‘मंदिरा’ तू किती सहज आणि स्पष्ट मांडलीस. तिच्या घरातल्या माणसांशी तिनं केलेला भोचक संवाद एकावेळी हसवतो आणि एकाच वेळी अंतर्मुख करून जातो. अशा कितीतरी तुझ्या गोष्टी सांगता येईल. त्यांच्यातल्या पात्रांचं मनोविश्लेषण तू किती बारकाईनं केलं आहेस. ‘तिहार’मधली ‘वसू’ तिच्या स्वतःच्याच प्रियकरासोबत तिची मुलगी नताशा एकटीच राहील म्हणून किती घाबरते, तिच्या मनात नाहीनाही त्या शंका येतात. एक बाई म्हणून पुरुषाविषयी वाटणारी जी असुरक्षितता असते ती तू किती थेटपणे त्या कथेतून सांगितली आहेस. विवाहबाह्य सबंध ठेवणाऱ्या तुझ्या कथेतल्या अनेक पात्रांचं मनोविश्व, त्यांचा होणारा गोंधळ, त्यांच्या मनात असणारी भीतीची भावना तू किती स्पष्टपणे टिपली आहेस. त्या सर्व पात्रांत तू दडून बसली आहेस असं वाटत राहतं.
तुझ्या कथांमधल्या बायकांची पात्रं तुझ्या स्वतःच्या आयुष्यात येऊन गेली असतील? एक बाई म्हणून त्यांच्या मनात जी काही खळबळ चालू असते ती तू किती सहजपणे तुझ्या कथांमधून मांडलीस. तुझ्या अवघ्या ४८ वर्षांच्या जिवंतपणात तू कितीसारे अनुभव घेतलेस. तू अजून असतीस, तर काय झाले असते? तुझ्या कथांतून तू स्त्रियांच्या मनात जे डोकावलं आहेस, ते इतकं खरं आणि प्रामाणिक आहे की आजच्या आणि पुढच्या काळात जगणाऱ्या स्त्रियांना त्या आपल्यातल्याच आहेत असं वाटत राहील यात अजिबात शंका नाही.
स्त्री-पुरुष नात्यांचे बारकावे टिपून तू किती भन्नाट गोष्टी लिहिल्यास. त्यातली तुझी ‘ हॅपी बर्थडे’ नावाची गोष्ट तर सारखी डोळ्यांसमोर येते. त्यातल्या बहिण आणि भावाच्या नात्याची वीण इतकी घट्टपणे तू तुझ्या शब्दांत मांडली आहेस की ते वाचत असताना एक एक वाक्य अश्रू गाळतंय असं वाटत राहतं. अर्थात हे मला वाटतं, त्यात कदाचित इतरांना अतिशयोक्ती वाटेल पण मी जे वाचताना अनुभवलं ते सांगायचा प्रयत्न करतेय.
तुझी ‘नव्या कोऱ्या पांढऱ्या साडीचा काठ’ या कथेतली सुलूताई आणि तिची तीन वेडी मुलं तर मनाचा तळ पार ढवळून टाकतात. माणूस जन्म घेतो, जगतो आणि एकदा मरतो हे सत्य तू तुझ्या अनेक कथांतून सांगते आहेस. तुला हे सत्य सांगण्यासाठी कथा लिहाव्या वाटल्या. तुझ्या अनेक कथांत मरण, आजारपण, अपराधीपणाची सल, नात्यांचा गुंता यांचा संमिश्र आशय दिसून येतो. मरणाच्या दाराशी टेकलेला माणूस तू तुझ्या कथेतून किती सहज आणि तो जसा आहे तसा मांडला आहेस. ते वाचून कुठलाही वाचक गलबलून जाईल, अंतर्मुख होईल यात शंकाच नाही.
तुझ्या बहुतांश कथेत तू मानवी जगण्याच्या वेदना मांडल्या आहेस. तुझ्या कथा शहरातल्या माणसांच्या आहेत. ज्यांना भावना आहेत, राग, लोभ, द्वेष सारं काही आहे. तू एक स्त्री म्हणून जरी जगली असलीस तरी तुझ्या माणूसपणाचा शोध तू घेते आहेस असं तुझ्या कथा वाचताना जाणवत राहतं. जगण्यातल्या मानवी वृत्तींचा शोध तू कसा घेतला असशील हा प्रश्न मला पडतो, आणि याचं उत्तर शोधायचा मी तुझ्या कथांमधून प्रयत्न करत असते.
तुझ्या पाचही कथासंग्रहांचा ऐवज मी माझ्याकडे जपून ठेवणार आहे, आणि तुझे दोन लेखसंग्रह तर त्यात आहेतच. तुझं लेखन तुझ्या जगण्यातल्या अनुभवांचं एक सुंदर असं दस्तावेज आहे असं वाटत राहतं. ‘असंही’ या लेखसंग्रहातील तुझे लेख वाचकाला त्यांच्या आत नेतात. धर्म म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर तुझ्या भाच्याला सांगत असताना तू जे काही सांगतेस त्यातून तुझी विचारप्रक्रिया किती प्रगल्भ होती आणि तुलाच ते अजून नीट समजत नाही असं तू सांगणारी मला किती प्रामाणिक वाटलीस हे तुला मी शब्दांत सांगूच शकत नाही.
तुझ्या अनेक लेखांमध्ये कथेची बीजं आहेत, त्यात तुझे शुटींगचे अनुभव, बाहेर प्रवास करताना आलेले अनुभव, रोजच्या जगण्यात येणारी माणसं, त्यांचे तुझ्याशी झालेले संवाद तू किती सहज आणि थेटपणे मांडले आहेस. तुला पडणारे प्रश्न मग ते लग्नाविषयी असोत, किंवा नवरा-बायकोच्या संबंधाविषयी असोत, या सगळ्या विषयांवर केलेलं तुझं लिखाण वेगळंच वाटतं.
तुझ्या सगळ्या लिखाणातून तू तुझं व्यक्तिमत्व उभं केलं आहेस. तुझ्यासारखी तूच आहेस. तुझ्या कथांच्या पात्रांना तू थेट वाचकाला भिडायला लावतेस, त्याचप्रमाणे तू तुझ्या खऱ्या आयुष्याला भिडली असशील असं वाटत राहतं. तू तुझी किती स्वतंत्र ओळख निर्माण केलीस. एका मोठ्या लेखकाची मुलगी असूनही तू कधी ते मिरवलं नाहीस. जे तुला वाटतं ते तू जगत आलीस. अनुभवत आलीस आणि ते तुझ्या लेखणीतून मांडायचा प्रयत्न करत राहिलीस.
तू सतत आजारी असायचीस असा उल्लेख तुझ्या बाबांनी एका लेखात केलेला आठवतो. लहानपणापासून तू नाजूक होतीस. तुला तुझ्या आजारपणाबद्दल कुणी विचारपूस केलेली आवडायची नाही. तो विषय तू कटाक्षानं टाळायचीस. ‘बापलेकी’ या संपादित केलेल्या पुस्तकात एका लेखात याचा शेवटी उल्लेख केलेला आहे. जो कुणी तुला तब्बेतीबद्दल विचारायचा त्यांना तू शब्दांनी जाळायचीस. तू झोपेत असताना गेलीस. अगदी शांतपणे गेलीस. जागेपणी तुला तुझा मृत्यू भेटला असता तर तू त्याला थांबवलं असतं असं मला राहून राहून वाटतं. तुझ्या आजारपणात तू कशी जगली असशील? कशी झुंज दिली असशील? तुलाही लिहिण्यासाठी जगावं असं वाटत असणारच की. पण तू लिहिलेलं सगळं इथं सोडून आणि तुझ्या डोक्यात असणारं सगळं स्वतःपाशीच ठेऊन तू निघून गेलीस. तुझ्या लिखाणासाठी तरी तू इथं असायला हवी होतीस असं वाटतं.
तुझ्या ‘असंही’ या पुस्तकाच्या सुरुवातीला विजय तेंडुलकर लिहितात, ‘तिनं कादंबरी लिहिल्याचं ती तिच्या अखेरच्या काळात वारंवार सांगत होती. ती गेल्यावर कादंबरी मिळाली नाही.’ तुझ्या हस्ताक्षरात लिहिलेली ती कादंबरी कुठं गायब झाली असेल? ती कादंबरी आज मिळाली असती तर किती बरं झालं असतं. तुझ्या लिखाणाचा आणखी एक महत्वाचा पैलू सगळ्यांसमोर आला असता. ही खंत कधीही भरून न येणारी आहे.
तुझ्या लेखणीची ताकद माझ्यात मुरून घ्यायची अशी सुप्त इच्छा मला सध्या झाली आहे. तुझ्याइतकं अनुभवविश्व माझं तगडं नाही, पण तरीही तुझ्या बारीक निरीक्षणातून तू ज्या पद्धतीनं माणसांना शब्दांत मांडलंस आणि साहित्याच्या क्षेत्रात एक स्त्री-लेखिका म्हणून तुझं नाव अढळ केलंस ते पाहून तुझ्यासारखी मला मैत्रीण असती तर किती भारी झालं असतं असा मनात कैकदा विचार येतो. तू खूप लवकर या जगाची एक्झिट घेतलीस म्हणून वाईटही वाटतं. पण तुझ्याशी, तुझ्या कथांशी असलेलं माझं मैत्र हे मला एक माणूस म्हणून नेहमीच बळ आणि आधार देतं. सारखं वाचावं असं काही वाटत असेल तर ती तुझी पुस्तकं असतात, त्यातलं एकतरी पुस्तक मी माझ्या जवळ बाळगत असते आणि तुझ्याशी आणखीन सख्ख्य वाढावं, तुझी सख्खी मैत्रीण मी व्हावी म्हणून तुला तुझ्याच पुस्तकांतून वारंवार भेटायचा प्रयत्न मी मुद्दाम करत असते.
(पूर्वप्रसिद्धी: समदा, २०१८ दिवाळी अंक)
*
वाचा
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
आज दिनांक
चित्रपटविषय लेख
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
कथा
कविता
अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.
मस्तच