chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-amruta-desarda-swapna-athavanincha-shabdanchi-savli

एकदा स्वप्नात एक आठवण आली. ती नकोशी होती. पण ती अखेर आली आणि म्हणाली, ‘माझी आठवण काढत नाहीस, म्हणून मी तुझ्या स्वप्नांत येते आणि माझी आठवण करून देते.’
तिचे हे शब्द ऐकून मी दचकलेच. पण शरीर स्वप्नात इतकं अडकून गेलं की मी हालचाल करूनही त्या स्वप्नातून मला उठता येत नव्हतं. मी घाबरले. जराशी कण्हले. मग मात्र माझी स्वप्नातून उठण्याची धडपड बघून आठवण हसून म्हणाली,
‘तू कर कितीही प्रयत्न. आज माझा योग जुळून आलाय तुझ्या स्वप्नात येण्याचा, तर ही संधी मी कशी बरं सोडेल? तुला मला सहन करावंच लागेल.’

आठवण माझ्या भावविश्वात पिंगे घालू लागली. इकडून, तिकडून, वरून- खालून.. आजूला-बाजूला ती फिरू लागली, तशी मी जास्तच अस्वस्थ होत गेले. त्या आठवणीच्या रुपात मी पुरती अडकून गेले. जणू काही माझे हातपाय कुणीतरी बांधून ठेवून एका खाटेला मी जखडली आहे असं वाटू लागलं. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या दाट केसांपर्यंत ते आठवणींचं स्वप्न माझा पिच्छा पुरवत होतं. त्या अवस्थेत मी पुरती गांगरले होते.

‘तू जा इथून, मला त्रास होतोय. का येतेस तू स्वप्नात? ते अनुभवलेले क्षण पुन्हा मला नाही आठवायचे. तुला मनाच्या अडगळीत कुलुप लावून पेटीत ठेवून दिलं तरीही तू का येतेस? ‘ मी आठवणीला कळकळीची विंनती केली.
‘तू मला का इतकं कुलपात ठेवलं? मी का तुला नकोशी? त्रास देते म्हणून? वेदना होतात म्हणून?’ आठवणीनं मला प्रतिप्रश्न केला.
त्यावर मी म्हणाले, ‘तुझ्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मी बांधील नाही. नशीब समज मी तुला किमान मनाच्या अडगळीत ठेवलं, नाहीतर कधीच फेकून दिलं असतं. पण मी इतकी वाईट नाही. त्यासाठी माझे आभार मान.’

मी उठायचा प्रयत्न केला, पण जागेवरून उठू शकले नाही. जणू काही माझी सगळी शक्ती त्या आठवणीनं नष्ट केली होती. आता तर मी जे बोलतेय, तेही माझं मला ऐकू येत नव्हतं. तरी माझे ओठ काहीतर पुटपुटत होते. काहीतरी गूढ सांगत होते.

इतक्यात कुणीतरी मला हाक मारली. ही हाक स्वप्नातली नव्हती. कुणीतरी जिवंत माणूस माझं नाव घेत होतं. ती हाक ऐकून माझं स्वप्न भंगलं. करकचून बांधलेलं माझं शरीर एकदम हलकं वाटू लागलं. फुललेले श्वास तेवढे नाकपुड्यांना जाणवत होते. ओठांखाली असलेल्या त्वचेवर आलेल्या घामांचे बिंदू मी उजव्या हातानं लगेच पुसून टाकले. तहान लागल्याची जाणीव झाली.

पेटके आलेले माझे दोन्ही पाय गुढग्यात दुमडले. अंगावरचे कपडे आणि पांघरूण नीट केले आणि डोळे उघडले. बघते तर, सगळीकडे अंधार होता. क्षणभर काहीच दिसत नव्हतं. मग हळूहळू आजूबाजूला काय आहे ते दिसलं. घड्याळाची टकटक कानांना नीट ऐकू आली. माझ्या छातीची टकटकदेखील जाणवत होती. एका भयंकर स्वप्नातून मी जागी झाले होते.

पण कुणी मारली असेल मला हाक? चांगल्या आठवणींनी? पण आवाज तर माणसाचा होता. आठवणी कशा काय हाका मारतील? त्यांनीच तर मला त्या वाईट स्वप्नातून वाचवलं नसेल? मला काहीच समजत नव्हतं. पण नकोशा आठवणीचं पडून गेलेलं स्वप्न आठवून माझ्या अंगावर काटा आला.

मी उठले. लाईट लावली. आता खोलीतल्या वस्तू नीट दिसू लागल्या. सगळ्या जागच्या जागी होत्या. घरातली माणसं साखरझोपेत होती. पहाटेचे साडेतीन वाजले होते. झोप पूर्ण उडाली होती. तरीही एक ग्लास पाणी पिऊन, बाथरूमला जाऊन, मी पुन्हा अंगावर पांघरून घेऊन झोपायचा प्रयत्न करत राहिले. सकाळ उजाडेपर्यंत.

*

वाचा
शब्दांची सावली: अमृता देसर्डा

आज दिनांक
चित्रपटविषय लेख
कथा
कविता


संचालक at | Website | + posts

अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :