‘हाय’
‘बोल’
‘काही नाही, सहज मेसेज टाकला’.
मी तिला घरातली कामे करता करता मेसेज करत होते. तिच्याशी बोलायचं होतं आणि एकाच वेळी डोक्यातली नेहमीची कामे उरकायची होती. त्यात लाईट गेली होती. मोबाईलची बॅटरी कमी होती. बोलता बोलता समोर राहणाऱ्या एक ताई घरी आल्या. बेल वाजली. मी भानावर आले. एका ताटात त्या पोळ्या आणि आमटी घेऊन आल्या. ते पाहून तोंडाला पाणी सुटलं. मी घरातली कामे सोडून, मैत्रिणीशी चॅटिंग करता करता पोळीवर ताव मारला.
खातानाही डोक्यात विचार चालू होते. अशी साजूक आणि चविष्ट पोळी आपल्याला जमत नाही. उद्या काय भाजी करायची, सकाळी नवरा काय बोलला. महिन्याचं बजेट कसं करायचं, ऑफिसमध्ये सुट्टी टाकण्यासाठी काय कारण द्यायचं. विचारांची नुसती खिचडी झाली..
इतक्यात मेसेंजरवर एक मेसेज दिसला.
‘हाय, मी संदीप. फ्रॉम मुंबई हॉस्टेल.’
मी लगेच ओळखलं. मुंबईत राहताना, ज्या मेसमध्ये मी जेवायचे, तिथला संदीप नावाचा आचारी.
खाऊन झाल्यावर मी मैत्रिणीला अखेर बाय केलं. संदीपला म्हंटलं नंतर बोलू. आणि ऑफिसला जायची तयारी करू लागले.
मनातल्या कोपऱ्यात संदीपने जागा घेतली. लग्नाआधी मी मुंबईत राहायचे. हॉस्टेलच्या मेसवर जेवायचे. तेव्हा याच्याशी ओळख झाली. तो माझ्यासाठी खास मला आवडते तशी खिचडी करून द्यायचा, फोडणीचा पास्ता द्यायचा. तो उडुपी होता. इडली मस्त करायचा. माझा हिशेब कधी ठेवायचा नाही. मी कॅन्टीनला आले की मस्त गोड हसायचा. मराठी समजत होती त्याला. पण कधी बोलला नाही फार. नजरेतून बोलायचा.
ऑफिसला जातांना त्याच्याबद्दल उगाच मनात विचार येऊ लागले. त्याला पाहायला, तो स्वयंपाक करताना बघायला मला आवडायचं. मी तासंतास कॅन्टीनमध्ये बसून त्याला पहायची. तोही बघायचा. पण चोरून. किती दिवस झाले असतील आता संपर्कात नाही. किमान सहा वर्षे झाली.
आणि आज अचानक त्याचा मेसेज आला. त्याच्या बद्दलच्या गोष्टी आठवल्या. मनोमन तो कधी आवडायला लागला, हे पण तेव्हा समजलं नव्हतं. पण त्याच दरम्यान माझं लग्न ठरलं. त्या धांदलीत त्याला मी विसरूनही गेले.
ऑफिसला पोचले खरी. पण मनात जास्त करून तोच रेंगाळू लागला. तो कधीच बोलायचा नाही. मीही मेसेच्या पुरती बोलायचे. पण त्याला चोरून पाहत राहायचे. गोड वाटायचं, आवडायचं. त्याला काम करताना पाहायला. माझ्या जुन्या डायरीत त्याच्याबद्दल लिहूनही ठेवलं होतं.
आपण प्रेमात पडलोय हे कळत असूनही मी आई-वडिलांच्या मनानुसार लग्न केलं. नवरा पूर्ण अनोळखी होता. लग्न झाल्यावर महिन्याभरात मी संदीपला विसरूनही गेले. इतकी मी नवऱ्यात अडकले. कधीतरी इडली केली की संदीप आठवायचा. पण तेही फार नाही. मग नवऱ्याने दिलेलं शरीरसुख, सुरक्षितता आणि कुटुंबाची चौकट.. यात इतकी मश्गूल झाले की नुसतं पाहण्यातून, निरीक्षणातून आपण एका व्यक्तीवर प्रेम करायचो, हे पण बाजूला पडत गेलं. तेव्हाच्या भावना मनात आता नाहीत इतका बदल माझ्यात झालाय. स्वतःला किती बदलवत जातो आपण नकळत. किती सोयीने भावना बदलतो. स्वतःला वेगळं करत जातो.
हेही विचार मी बाजूला टाकले आणि कामाला लागले. ऑफिसमध्ये मन गुंतवून ठेवलं. मध्ये मैत्रीण, नवरा, मुलगा आणि आई यांच्याशी बोलले. संदीप थोडासा मनात होता. पण त्याला पुन्हा मेसेज केला नाही. आणि त्याचा मला मेसेज आला हे कुणाशी शेअर पण केलं नाही. आधी वाटलं कुणालातरी सांगावं. पण जे काही त्याच्याबद्दल मला वाटायचं, ते फक्त मला आणि त्यालाच माहीत होतं. आम्ही दोघांनीही ते कधीच एकमेकांना शब्दांनी व्यक्त केलं नव्हतं.
दिवस असाच निघून गेला. रात्री नवऱ्याबरोबर शय्यासुख घेताना पुन्हा संदीप आठवला. त्याचे डोळे आठवले. त्याचं हसणं आठवलं. पण त्याचा विचार बाजूला सारून पुन्हा नवऱ्याच्या कुशीत शिरले. कारण सकाळी लवकर उठून दिवसभराची कामे उरकायची होती. मनाच्या एका सांदीत मी त्याला बंद केलं आणि डोळे मिटून घेतले. शेजारी बनियनवर नवरा बारीक घोरत पडला होता. त्याच्या छातीवर मी हात ठेवला होता.
*
वाचा
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कविता
चित्रकथा
अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.