पहाटे पहाटे जाग आली. या पहाटेचं मी काय करू? कुरेशी, एनएम आणि कोल्हे तिघेही जाम झोपलेत. दार उघडून बाहेर डोकावलं. पाट्यावर मुन्ना वाटत बसली नव्हती. मला त्या दृश्याची इतकी सवय झाली होती की, तो पाटा ओकाबोका झालेला मला बघवेना. मला मुन्नाविषयी आत्मीयता वाटत होती. घरात तीन बहिणी असूनही ही बहीण मला आपली करावीशी का वाटत होती? मी विचार करत राहिलो तिच्या आयुष्याचा. शिक्षण नाही. कधी कुठली मैत्रीण आलेली पाहिली नाही. पाटा हीच तिची मैत्रीण आणि मित्र. चाचांना एकदा हडसून खडसून विचारावं का.. की तुम्ही मुन्नाचं आयुष्य तुमच्या हातात आहे म्हणून तिला असं वागवताय?
एरवी सगळ्यांची काळजी घेणारे चाचा आपल्या मुलीच्या आयुष्याचा काहीच कसा विचार करत नाहीत? मला जाणवत होतं की तिचं पोरवय संपून ती थोडी मोठी होण्याची ते वाट पाहतायत. तिचं बालपण सरून ती मोठी दिसायला लागली की, तिचा निकाह लावणं इतकीच महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात आहे. तिच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेचं काय? विचार करताना जाणवलं की महत्त्वाकांक्षा ही फक्त मुलांच्यात निर्माण करायची हा आपल्या समाजाचा स्थायीभाव. मुलींमध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण होऊनच द्यायची नाही. जर चुकूनमाकून मुलींच्या मनात ती घर करायला लागली तर कुणाचं तरी घर लग्नमाध्यमातून जवळ करणं दुरापास्त होईल. असं काही या लोकांना वाटत असेल का? मला एकदम दादांच्या नाटकात काम केलेल्या अनघाताई आठवल्या.
एकदा आम्ही त्यांच्याकडं गेलो होतो तेव्हा बाल्कनीमध्ये कुंडीत लावलेलं एक कसलसं झाड दिसलं. झाड चांगलं डवरलेलं.. पाच-सहा वर्षांचं. तरीही कुंडीत. कुंडीत असूनही पूर्ण विकसित झालेलं. मी झाडाकडे बघत असताना ताई सांगायला लागल्या की याला बोन्साय म्हणतात. छोटं रोप कुंडीत लावायचं. ते थोडसं वाढायला लागलं की त्याची पालवी, नव्या डहाळ्या थोड्याथोड्या कापायच्या. काही दिवसांनी हलक्या हातानी ते झाड मातीपासून अलग करायचं. त्याची वाढत चाललेली, विस्तारलेली मूळं थोडीथोडी कातरून टाकायची. पुन्हा ती मातीत रोवून टाकायची. असं केलं की ते झाड वयानं मोठं होतं; पण आकारानं तेवढंच राहतं.. कारण त्याला कुंडी अपुरी पडतीय, हे सत्य समजू द्यायचं नसतं. त्या झाडाकडे बघून मला रडू यायला लागलं.
असंच रडू मला मी सगुणाला लकडीपुलावर पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आलं होतं. सगुणा वय असेल पंचवीस; पण उंची अडीच फूट. भीक मागून जगताना लोकांच्या अचकट विचकट प्रश्नांना उत्तर देत आतल्या आत रडणारी. तिच्या बुद्धीची वाढ ज्या निसर्गानं केली त्यांनीच तिच्या शरीराची वाढ खुंटवली.
माझं ते त्यावेळचं रडू येणं आणि मुन्नाकडं बघून वाईट वाटणं एकाच प्रकारचं होतं. मनात एक इच्छा निर्माण व्हायला लागली की, चाचांना म्हणावं मी मुन्नाला घरच्या घरी शिकवू का? माझी हिम्मत होत नव्हती. बोन्साय आणि मुन्ना एक विचित्र गोफ तयार होत होता.
किलकिल्या केलेल्या दारातून बाहेर हालचाल जाणवली. चाचा बंब पेटवत होते. नोव्हेंबरमधली पहाटेची थंडी. मी बाहेर आलो. बंबाशी शेकत बसलो. मला माहीत नव्हतं की माझ्याकडं कुणी बघतंय. अचानक चाचांचा हात पुढं आला. त्यात चहाचा कप होता. आम्ही दोघे चहा पीत पीत गप्पा मारायला लागलो. मी वळसे घेत मुन्नाचा विषय काढला. अचानक त्यांचे डोळे भरून आले. मला म्हणाले,
“मेरी बेटी.. उसके दिमागपर असर हुवा है. रोज का कामधाम वो सब करती है लेकिन उसका दिमाग चलता नहीं. आप लोगोंको शायद मालूम नहीं वो जिस को अम्मी बोलती है वो सौतेली माँ है. वो मुन्ना से बहोत प्यार करती है.. ऊन दोनों का कुछ सवाल नहीं, लेकिन मुन्ना अंदर से बहोत अकेलापन महसूस करती है. उसकी माँ जब गुजर गयी तब वो आठ बरसकी थी. स्कुल जाती थी. लेकिन माँ के गुजरने से उसको शॉक जैसे लगा. बहोत डागदर, हकीम किये, पर वो दिमाग से बडी नहीं हो सकी. अभि इस हालत में इसकी शादी के बारे में सोच भी नहीं सकता.”
चाचा बरंच बोलले. बोन्साय करणारा माळी क्रूर वाटतो; पण झाड फुलावं असं वाटणारा माळी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तरीही झाड फुलत नाही, याला काय करावं? मोठ्या शिवारात बांधावर झाड लावत नाही. त्याला जगवायचं आहे. ते कुंडीत जगू शकतंय, हे लक्षात आलं की कुंडी हेच जग आहे एवढाच दिलासा देऊ शकतो आपण.
चाचांशी बोलून नेमकं काय वाटून घ्यावं? मी खोलीत आलो. मुन्ना थैमान घालत होती. तिचं हसणं हे इतकं वेदनादायी असेल, असं वाटलं नव्हतं आणि वेदना केवळ मुन्नाची नव्हती. चाचांची होती. मी कधीच न बोललेल्या अम्मीची होती का? माहीत नाही.
आतल्या खोलीत आलो. मधलं दार घट्ट लावून घेतलं. बॅग उघडली. आतले दोन कागद बाहेर काढले, त्यावर पेन उघडून ठेवलं आणि वाट पहात बसलो हाताला स्फुरण यायची.
मला फार प्रतीक्षा करावी लागली नाही. बोन्साय केवळ वाढू इच्छिणाऱ्या झाडांचं असतं की वाढू पहाणाऱ्या मानवी शरीराचं, मानवी इच्छांचं असू शकतं? विचार करत राहिलो. एक कथानक आकार घ्यायला लागलं. तूर्त मी कागद बाजूला ठेवले. चप्पल घातली आणि बाहेर पडलो. पहाटेचं चवदार तळं बघायला, मनातल्या तळ्याचा ठाव शोधायला. परत आलो तेव्हा मनात कथा तयार झाली होती; परंतु खोलीला जाग आली होती. पहाटेच्या जागरणांनी पुन्हा झोपून गेलो.
कुरेशीनी हलवून उठवलं. “ए बाबा साडेआठ झालेत, उठत का नाहीस?” कुरेशीच्या काळजीनी भांबावलो. काय उत्तर द्यावं?
एकदम सांगून टाकलं, “कुरेशी रात्री थोडा ताप होता. मला नाही वाटत उठावंसं. ऑफिसला येऊ शकीन असंही वाटत नाही.”
कुरेशीनी त्याची बॅग उघडली. माझ्या हातावर कसलीशी गोळी ठेवत म्हणाला,
“फिकर मत करो. ही गोळी खा, बरं वाटेल. आज नकोच येऊ ऑफिसला. आज आपला डॉन पेणला चाललाय.”
ही बातमी ऐकून मला न आलेला ताप उतरल्यासारखं वाटलं. पडत्या फळाची आज्ञा म्हणून पांघरूण ओढून घेतलं. सगळे ऑफिसला गेलेत, याची खात्री पटताच पांघरुणाला लाथ मारली. दार घट्ट लावून घेतलं. सकाळी काढून ठेवलेले कागद, पेन हिरहिरीनी बाहेर काढलं. झरझर लिहीत राहिलो.
दुपारचे बारा वाजून गेले होते. दीड-दोन तासात लिहिलेल्या इच्छांच्या बोन्सायची कथा स्वतःशी वाचली. आपण दुसऱ्या कुणी लिहिलेलं लिखाण वाचतोय, इतक्या तन्मयतेनं. ‘व्वा, किती छान लिहिलीयंस कथा’ असं कुणीतरी म्हणतंय असा भास झाला.
एक भला मोठा बंगला. घरात दोन माणसं. एक उद्योगपती नवरा आणि नवऱ्याचं कर्तृत्व हे आपलं कर्तृत्व मानणारी त्याची बायको. या सुखी संसारात आणखी दोन पात्र. एक आलिशान गाडी आणि तिचे लाडकोड पुरवणारा ड्रायव्हर. दिवसभर गाडी आणि मालक यांना फिरवणारा तो बंगल्यावर येताना सायकलवरून येतो. संध्याकाळी खूप उशिरा गाडी बंगल्यातील गॅरेजमध्ये लावतो आणि सायकलवरून घरी परत येतो. त्याची दीड वर्षांपूर्वी लग्न झालेली बायको तो आलेला बघताच खुदकन हसत त्याचं हवं नको बघत रहाते.
एक दिवस सकाळी साहेब म्हणतात,
“ड्रायव्हर मला आज दिल्लीला जायचंय. तू असं कर मला एअरपोर्टवर सोड आणि गाडी बंगल्यावर लावून टाक. उद्या संध्याकाळच्या फ्लाईटनी मी येईन तेव्हा मला घ्यायला ये.”
‘जी’ म्हणत तो गाडी बाहेर काढतो. साहेब विमानतळावर प्रवेश करताना पहातो, गाडी बंगल्याच्या दिशेनी चालवत रहातो. आरशात पहातो, मागच्या सीटवर कुणीच नसतं. तो आणखी पुढं येतो. पुन्हा आरशात पहातो. मागं सीटवर त्याला बायको दिसते. नवं लुगडं नेसलेली, नाकात नथ, कपाळावर रुपयाएवढं कुंकू आणि मोकळेपणा आल्यानं एरवी डोक्यावरून असणारा पदर खांद्यावर घेऊन आजूबाजूला टकामका बघतीय. हे दृश्य वारंवार बघून त्याला झिंग यायला लागते. गाडी थांबते तेव्हा बंगला आलेला नसतो तर त्याचं झोपडपट्टीतलं घर.
तो घरात शिरतो. अवचित आलेला नवरा पाहून ती काळजीत पडते. त्याच्या कपाळावर पालथा हात ठेवते तेव्हा तो हसत असतो. तो इतकंच म्हणतो,
“बयो, दहा मिनिटात तयार हो. तू म्हणत होतीस ना दहा कोसावरल्या देवीला जायचंय. नवस फेडायचाय. चल जाऊन येऊ.”
ती नवऱ्याकडं प्रश्नार्थक नजरेनी पहात म्हणते, “धनी, पण तिकडं जाणारी येष्टी आत्ता नाही.”
तो तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणतो, “असू दे.. हो तयार.”
ती बाहेर येते. चापूनचोपून नेसलेली नऊवारी, केसाचा अंबाडा, रुपयाएवढं कुंकू, हातात पूजेचं तबक. फक्त नथीऐवजी चमकी. तिला गाडीत कुठं बसावं कळत नाही. तो तिला शेजारी बसायला सांगतो. इतकावेळ आरशात बघितलेली ती मागं बसल्यामुळं अस्पर्श होती. आता शेजारी बसलेली ती त्याच्या हाताच्या आवाक्यात आलेली.
दोन अडीच तासात लांबलांबच्या रस्त्यानी तिला देवळात नेऊन आणतो. ज्या इच्छा तिच्या मनात कधी आल्या नव्हत्या त्या पूर्ण झाल्याचं समाधान. ज्या इच्छा वारंवार निर्माण झाल्या होत्या; पण आपण त्या खुडून टाकत होतो, त्या पुऱ्या होत असल्याची स्वप्नवत जाणीव. तो तिला घरी सोडतो तेव्हा अंबाड्यातील फुलांच्या वेणीतील बरीच फुलं सांडलेली. त्याच्या हाताला शेवन्तीचा सुगंध.
बायकोला सोडून तो बंगल्यावर येतो. गाडी गॅरेजमध्ये लावायचीय म्हणून बाईसाहेबांकडून किल्ली घेण्यासाठी पोर्चमध्ये गाडी उभी करतो. पायऱ्यांवर अस्वस्थ उभे असलेले साहेब दिसतात.
“कुठं उलथला होतास?” ते खेकसतात.
‘‘माझी फ्लाईट कॅन्सल झाली, हे समजलं तोपर्यंत तू गेलेला होतास. शेवटी टॅक्सी करून आलो तर तुझा पत्ता नाही. गाडीने काही त्रास दिला का?”
साहेबांच्या प्रश्नाला साहेबांनीच उत्तर दिलं. बंद पडलेल्या गाडीचं त्यांनी रसभरीत वर्णन केलं. गाडी गॅरेजमध्ये लावताना सीटखाली पडलेली उदबत्ती, दोन झेंडूची फुलं उचलून टाकली. आपली स्वप्न आपण उचकटून टाकलीत, असं मात्र त्याला अजिबात वाटत नाही. साहेबांच्या त्रस्त चेहऱ्यापुढं बायकोचं मधाळ हसणं रुंजी घालत रहातं…!
या कथेला ‘साभार परत’ हा शिक्का लागणार नाही, याची मला खात्री वाटतीय. एका कथास्पर्धेला ही कथा पाठवायचीय. स्पर्धेचं पहिलं बक्षीस पाचशे रुपयाचं आहे, म्हणजे मोठे लेखकदेखील भाग घेतील. पाठवताना प्रेझेंटेबल असायला हवी. टाइपिंग मस्ट.
मी कागद उचलले. चवदार तळ्याशी उदय ओक याच्या दुकानी गेलो. तो काहीतरी टाईप करत असताना समोर स्टुलावर एक चाळिशीचे गृहस्थ बसलेले. ते कागद उदयपुढं ठेवत म्हटलं,
“हे काम ऑफिसचं नाही. मी लिहिलेली कथा आहे. संध्याकाळपर्यँत करून ठेवा.”
उदय हसत म्हणाला,
“आज कथा बडवणं हेच काम लागलंय मला. या साहेबांची कथाच टाईप करतोय.”
ते गृहस्थ म्हणाले,
“तूही कथा लिहितोस?”
मी ‘हो’ म्हणताच ते म्हणाले,
“मी भिसे गुरुजी. माझ्याही कथा मासिकात येत असतात. कुठं असतोस तू?”
त्यांनी माझा एकेरी उल्लेख केलेला खटकला. मी मनाशी म्हटलं की कथास्पर्धेचा निकाल मी यांना सांगीन तेव्हा मीच ‘अहोजाहो’ नाही करणार, तेदेखील करतील!
(क्रमशः)
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)