असित सेन दिग्दर्शित ‘ख़ामोशी’ हा त्यांनी त्यांच्या ‘दीप ज्वेले जाय’ या बंगाली सिनेमावरून बनवला. या सिनेमाचं मूळ म्हणजे आशुतोष मुखर्जी लिखित ‘नर्स मित्रा’ ही लघुकथा.
अप्रतिमरित्या शूट केलेला हा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बहुत करून इन-डोअर घडतो. एका मेंटल हॉस्पिटलमध्ये. जिथं ट्रीटमेंटची एक वेगळी पद्धत आजमावून पहिली जात असते. वहिदा रेहमानची अतिशय सुंदर अदाकारी, हेमंतकुमारचं आर्त संगीत, गुलज़ारचे लिरिक्स आणि कमल बोस यांची कमाल सिनेमॅटोग्राफी ही या सिनेमाची वैशिष्टयं.
ख़ामोशी… एक प्रगल्भ शोक! जीवघेण्या शांततेला छेद देऊन आपल्याला भारावूनच नाही तर झपाटून टाकणारं संगीत म्हणजे ख़ामोशी. आपुलकी आणि प्रेमानं मनोरुग्णांच्या सोबत एक नातं जोडून त्यांना बरं करता येऊ शकतं असं संशोधन करणारे कर्नल (जे सायकियाट्रिस्टही असतात), ज्यांच्यासाठी अशा प्रकारचे रुग्ण हे एक ‘स्पेशल आणि महत्त्वाची केस’ असतात… वेगवेगळ्या रुग्णांनी भरलेला वॉर्ड, डॉक्टर्स, सिस्टर्स आणि रुग्णांच्या खोल्या..
सिस्टर राधा (वहिदा रहमान), जी खूपच कामसू आहे.. रुग्णांना समजून घेणाऱ्या राधानं अशा प्रकारची केस पूर्वी हाताळली आहे. देव (धर्मेंद्र) हा याच हॉस्पिटलमधला एक रुग्ण आहे. त्याच्या सोबत राधाचं एक प्रकारचं नातं निर्माण झालेलं असतं. तो बरा होऊन घरीसुद्धा जातो. पण पुन्हा अशा प्रकारची केस घेण्यास राधाचा नकार असतो. बऱ्याच नकारांनंतर अरुणची (राजेश खन्ना) केस घ्यायला शेवटी ती तयार होते. या दोघांशी राधाचं कशा पद्धतीचं नातं असतं? अशी ही इतक्या नात्यांमध्ये गुरफटलेली, नातं दाखवणारी, ते नातं निभावणारी सिस्टर राधा… आणि गुंतागुंतीच्या नात्यांनी भरलेला हा चित्रपट…
ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीचा एक उत्कृष्ट नमुना आहे हा. कमल बोस यांना यासाठी त्यावेळी फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ‘तुम पुकार लो..’, ‘वो शाम कुछ अजीब थी..’, ‘हमने देखी है..’ अशी कमाल गाणी.. ज्यांच्यामध्ये एक सुंदर उदासीनता आहे, दुःख आहे.. आणि तरीही ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकल्याशिवाय राहवत नाही.
‘तुम पुकार लो..’ गाण्यातलं हमिंग आणि ती शीळ आपल्याला बोलवत आहे असं वाटतं.
“मी केव्हापासून तुझी वाट पाहतोय, मला हाक तरी मार.. बोलाव.. रात्र इतकी अस्वस्थ आहे.. स्वप्न मोजत बसली आहे… जी गोष्ट तुला सांगायची आहे ती ओठांशी आणून अजून किती रात्री जागवू? तुझ्यावर प्रेम आहे माझं.. इतकी साधीशी गोष्ट आहे.. मी केव्हापासून तुझी वाट पाहतोय..“
पुढचं कडवं माझं आवडतं आहे – ‘दिल बहल तो जाएगा, इस ख़यालसे…’
“तुझी स्थितीही तीच आहे या विचारानं मन निदान थोडं तरी निर्धास्त होईल.. ही निर्धास्त रात्र आता अस्वस्थ आहे.. मी केव्हापासून तुझी वाट पाहतोय..”
‘तुम पुकार लो…’
*
वाचा
रमा जाधव यांचं साहित्य
चित्रपटविषय लेख
चित्रकथा
कथा
कविता
'चित्रपट' हा रमा जाधव यांचा श्वास आहे. चित्रपट बघणं, त्यावर व्यक्त होणं त्यांना आवडतं..
व्वा, मस्तच