सुमित्रा भावे यांचा, म्हणजे आपल्या लाडक्या मावशींचा, आज वाढदिवस. त्यानिमित्त..
आज माझा एक आवडता सिनेमा आठवला. ‘दहावी फ’. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांचा हा सिनेमा मला आणि माझ्या भावाला तोंडपाठ आहे. शाळेत हुशार मुलांची ‘अ’ तुकडी ते अभ्यासात कच्च्या मुलांची ‘फ’ तुकडी यावर ही कथा बेतलेली आहे. ‘दहावी फ’मध्ये अशीच अभ्यासात कच्ची मंडळी आहेत. शिक्षकांचा हुशार तुकडीच्या मुलांमुळे पक्षपात, सतत बोलणी ऐकून घेणं, या सगळ्यांमुळे अचानक एक दिवस ही कुमारवयीन मुलं शाळेतल्या सामानाची नासधूस करतात. त्यांना कुणी समजून घेतं का? पुन्हा संधी देतं का? त्यासाठी ही मुलं काय काय करू पाहतात? देशमुख सर (अतुल कुलकर्णी) या मुलांच्या वतीनं मुख्याध्यापकांशी बोलणी करतात आणि मुलांना चुकीची जाणीव तर करून देतातच पण त्यांना शाळेच्या तुकड्यांच्या उतरंडीत न अडकवता आपला मार्ग शोधण्यासाठी मदत करू पाहतात. इतर शिक्षक त्यांची थट्टाही करतात, पण देशमुख सर केवळ हसून उत्तर देतात. मुलं त्यांनी सांगितलेला मार्ग निवडतात की अजून काही करतात? शिक्षण न मिळणारा, शाळेत न जाणारा एक मुलगाही यांना सामील होतो. (पार्थ उमराणी)
दहावीत मुलं नुकतीच वयात आलेली असतात किंवा येत असतात. कुमारवयीन काळ तसा नाजूक. या काळात आकार घेणाऱ्या जाणिवा आयुष्यभर मनात, डोक्यात घर करून राहतात. तुकड्यांच्या विभागणीमुळे एकतर मुलांमध्ये न्यूनगंड येतो किंवा नकळत ऊर्जा चुकीच्या गोष्टी करण्यात खर्च होते. मुलांचा विकास होत नाही. पण हीच ऊर्जा जर योग्य रीतीनं चॅनलाईज करून त्यांना योग्य दिशा देणारे शिक्षक मिळाले, तर त्या मुलांमध्ये अमुलाग्र बदल होतो. हे यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
‘फ’मधली काही मुलं काम करून शिकणारी, अभ्यासात कच्ची असली तरी बाकी व्यावहारिक काम जमणारी अशी. कुणी बाजारात ट्रक उतरवणारा, कुणी गॅरेजमध्ये काम करणारा, कुणाचा गळा सुरेल… असाच एक मुलगा आहे – सिद्धू. हॉस्पिटलमध्ये दाईचं काम करणारी (ज्योती सुभाष) हिचा मुलगा. सिध्दु सकाळी घरोघरी पेपर टाकत असतो. त्याच्या घरी देशमुख सर जातात तेव्हाचा प्रसंग फार गोड आहे. घराची परिस्थिती बेताची असली तरीही आपल्या परीनं सरांचा पाहुणचार करणारी आई, गप्पांच्या ओघात वर बघत सरांना म्हणते, “त्याला दिसतंच असेल की.” त्याला म्हणजे कुणाला ते सरांना कळत नाही, तेव्हा आई ‘देवाकडे’ असा निर्देश करते. “कुणाच्या ना कुणाच्या रूपात तो येतोच की मदतीला. आता तुमच्या रूपानं नाय का..” हे बोलणारी ती माय ही धन्य! आणि मुलांना इतकी मदत करूनही त्या माउलीनं आपली देवाशी तुलना केली या विचारानं ओशाळणारे ते सरसुद्धा धन्य!
माझी आई नुकतीच रिटायर झाली, पण तिचं वागणं अगदी या चित्रपटातील देशमुख सरांसारखं. त्यामुळे हा सिनेमा नेहमीच खूप जवळचा वाटत आला आहे. जरूर पहा.
*
वाचा
रमा जाधव यांचं साहित्य
चित्रपटविषय लेख
कविता
चित्रकथा
कथा
'चित्रपट' हा रमा जाधव यांचा श्वास आहे. चित्रपट बघणं, त्यावर व्यक्त होणं त्यांना आवडतं..