वेळ

goshta-creations-saarad-majkur-chitrakshare-rama-jadhav-hospital-experience-marathi-lekh

डोळे उघडत होते हळूहळू.. वेगळाच प्रकाश दिसत होता लांबून.. खूप सुंदर अनुभव घेतला होता मी.. मला देव भेटला होता!

आयसीयूबाहेरचा तो लांबच लांब कॉरीडोर.. भकास, शांत. दोन-तीन बाकडी टाकलेली त्या तिथं. एका स्ट्रेचरवर मी झोपलेली, वाट बघत.. समोर स्पेशल रूम नं. १ दिसतेय. इतका अविस्मरणीय अनुभव घेऊन मी कधी एकदा आईला भेटेन असं झालेलं मला आणि मला इथंच का ठेवलंय? इतकं काय खास झालं होतं?? मला देव भेटला होता.
आयसीयूमधून काढून रूममध्ये न्यायला इतका का वेळ? माझी चिडचिड व्हायला लागलेली.. स्ट्रेचरवर पडल्या पडल्या मी इकडंतिकडं बघतेय.. शेजारच्या त्या बाकावर एक बाई बसलेली…

कमालीचा ओळखीचा वाटतो नाही का चेहरा हिचा? अगदी शांत, सौम्य वगैरे.. वात्सल्याला मूर्त रूप दिलं, तर अगदी अशीच दिसेल. मी उगीचच बघतेय का हिच्याकडं केव्हाची? का ही टक लाऊन बसली आहे माझ्याकडं? बोलावं का काही? हिचं कोणी अ‍ॅडमिट असेल का इथं? नक्कीच बरं झालेलं असेल. इतकी शांत, समाधानी दिसती आहे.. की डॉक्टर असेल? पण कपडे तर डॉक्टरचे वाटत नाहीत..
अचानक तीच बोलायला लागते,
“बरं वाटतंय का आता?”
किती शांत आणि आपुलकीचा आवाज आहे हिचा…
मी – “अं.. हो, बरं वाटतंय आता. खूप शांत पण वाटतंय. तूम्ही माझ्या घरच्यांना पाहीलं का हो कुठं आसपास? मला आता इथून रूममध्ये हलवणार आहेत म्हणे..”
ती – “पडून रहा शांत, येतील थोड्या वेळात.”
माझा नुकताच घेतलेला अनुभव सांगावा का हिला? हसेलच मला ही.. पण हसेना का?
मी – “अहो, किती वाजलेत? रात्र आहे ना आता?”
ती इतकी गोड हसली..
ती – “नाही गं, दुपार आहे. येतील तुझ्या घरचे. बोलायचंय का तुला? बोल माझ्याशी तोपर्यंत..”
मी – “तुमचं कुणी अ‍ॅडमिट आहे का इथं?”
ती – “हो, मैत्रीण आहे माझी.”
प्रस्तावना न करता पटकन सांगून टाकावं हिला..
मी – “अहो.. मला ना.. मला देव भेटला होता हो आत्ता…”
ती खळखळून हसली.
मी (अतिशय उत्साहानं) – “कसं सांगू तुम्हाला, निव्वळ अवर्णनिय… असा निळसर, शांत, केशरी प्रकाश… आणि असा एक आश्वासक हात मला धीर द्यायला… खरं सांगतेय मी. मला बरं नव्हतं ना.. मी, मी मरून जाईन असं वाटत होतं. पण मग त्या वरांड्याचा कोपरा दिसतोय ना तो अंधारा, तिथंच होता देव… माझ्याशी बोलला.. ‘तुझी वेळ नाही आली अजून, आत्ता एवढीच भेट पुरे’ असं म्हणाला…”
मी इतकी उत्साहानं सांगतेय, आणि हिच्या चेहर्‍यावरची माशी हलेना.
ती – “देव भेटला होता? बरं, छानच की मग. कसा होता दिसायला? बाई होता, की पुरुष होता?”
खरंच की, मला आतापर्यंत हा प्रश्नच पडला नव्हता. खरंच, कसा होता दिसायला?
मी – “नाही हो, असा चेहरा नव्हता.. आणि बाई की पुरुष काही आठवत नाहीये, पण मला खरंच त्या तिथल्या कोपर्‍यात दिसला, त्या प्रकाशात देव. “
ती नुसतीच बघत राहिली माझ्याकडं. माझी आता चिडचिड व्हायला लागली. मी इतका उत्कट प्रसंग शेअर करतेय आणि ही आपली खिल्ली उडवतेय की काय? जाऊ देत. मला काय करायचंय? घरचे का येत नाही आहेत अजून? किती वेळ झालाय.. माझा धीर सुटत चाललेला आता..
“डॉक्टर, नर्स..”
मी ओरडतेय पण कोणी ढिम्म थांबायला तयार नाही. कोण, कुठली ही बाई, आणि एखाद्या जुन्या मैत्रीणीसारखी गप्पा मारतेय..
ती – “कोल्हापूरची ना तू?”
मला परत उत्साह..
मी – “हो, तुम्ही कसं ओळखलं?”
ती – “तू गीता पाठांतर स्पर्धेत भाग घेतला होतास ना? पाहिलंय मी तुला..”
मी – “अहो, पण ते शाळेत. खूप, खूप वर्षं झाली त्याला.”
ती – “तो श्लोक आठवतोय का? नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः? आठवतोय का अर्थ?”
मी (ब्लँक) – “हो म्हणजे, थोडा, थोडा. त्याचं एकंदर सार म्हणजे, आत्म्याचा नाश कधीही होत नाही, तो अविनाशी आहे.. असं काहीसं आहे ना? कोणतंही शस्त्र त्याचे तुकडे करू शकत नाही की, कोणतंही…”
माझे शब्द विरत जात आहेत.. आणि माझा स्ट्रेचर हालायला लागतो.. आणि हे काय? मी इथंच आहे अजून हिच्याशी बोलत,
“अहो, मला घेऊन जा ना, मी इथं आहे..”

शेवटी मीच पळत जाऊन बेडमध्ये शिरते. खूप सारा निळा प्रकाश सगळीकडं… डोळे दिपून जातात परत… डोळे उघडले तर आई-बाबा समोर.
“आत्ता उठलीस, बरं वाटतंय का बब्या? आम्ही इथंच आहोत, तुझ्यासोबत.”
मी बाहेर बघतेय, ती कुठे गेली? बाहेर त्या लांब कॉरीडोरमध्ये कुणीच नाही. अचानक त्या कोपर्‍यात ती म्हणत जाताना दिसते,
“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः”
परत तोच वात्यल्यरूपी चेहरा आणि तोच शांत आवाज..
“तुझी वेळ नाही आली अजून, आत्ता एवढीच भेट पुरे…”

*

वाचा
रमा जाधव यांचं साहित्य
चित्रपटविषय लेख
कविता
चित्रकथा
कथा


+ posts

'चित्रपट' हा रमा जाधव यांचा श्वास आहे. चित्रपट बघणं, त्यावर व्यक्त होणं त्यांना आवडतं..

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :