१९२१ मध्ये अब्दुल हयीचा जन्म लुधियानामधल्या एका जमीनदार घराण्यात झाला. त्याचं सारं बालपण भीती आणि दंडुकेशाहीनं झाकोळून गेलं होतं. त्याच्या वडिलांनी बरीच लग्नं केली, आणि शेवटी त्याच्या आईनं हिंम्मत करून नवऱ्याला सोडण्याचा निश्चय केला. घराण्याचा एकुलता एक मुलगा व वारस म्हणून, त्याला मिळवण्यासाठी त्याच्या वडिलांनी बरेच प्रयत्न केले. अगदी खुनाच्या धमक्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली. या सततच्या भीतीमुळे दुःख, हरवलेपण आणि एक रितेपणाची जाणीव त्याचा आयुष्यभर पिच्छा पुरवत राहिली. पण या दुःखातूनच जन्माला आली आणि फुलली, ती त्याची कविता! वडलांच्या भयानक आठवणी पुसून टाकण्यासाठी त्यानं त्यांचं मूळ नावही टाकलं, आणि ‘तख़ल्लुस’ म्हणजेच टोपणनाव धारण केलं.. ‘साहिर’! होय, हाच तो प्रसिद्ध कवी व गीतकार साहिर लुधियानवी!
तो काळ चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ होता. मजरुह सुलतानपुरी, शकील बदायुनी, राजिंदर क्रिशन, शैलेंद्र, कैफी आझमी, हसरत जयपुरी असे एकाहून एक सरस कवी चित्रपटासाठी गाणी लिहीत होते.
अशा काळात साहिरचं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं ते एस. डी. बर्मन सोबतच्या एका भेटीतून. त्याआधी साहिर एक उर्दू कवी म्हणून नावारूपाला आला होताच, पण याची कल्पना एसडींना नव्हती. साहिरबरोबरच्या त्या भेटीत एसडींनी ते काम करत असलेल्या काही ओळींची चाल ऐकवली. साहिरनं तात्काळ लिहिलं,
“ठंडी हवाए,
लेहरा के आए
रुत है जवाँ,
हम है यहाँ,
कैसे भुलाए…”
‘नौजवान’ फिल्मसाठी हे गाणं हिट ठरलं. पुढं, ‘बाज़ी’नं हे यश दृढ केलं. साहिर आणि एसडी हे बघता बघता एक जादुई कॉम्बिनेशन झालं. १९५१ ते १९५७ मध्ये साहिरनं एस. डी. बर्मनसोबत १५ फिल्म्स केल्या. ५० च्या दशकातली ती सगळ्यात यशस्वी जोडी म्हणावी लागेल.
साहिरमधला कवी, अनेकवेळा त्याच्यातल्या गीतकाराच्या आड येत असे. कविता ही मुक्त असते; तर चित्रपटगीत लिहिताना गाण्याची चाल, पार्श्वभूमी, नट, पात्रं, भाषा या साऱ्याचीच बंधनं येतात. त्यामुळं हे होत असावं.
साहिरला जसं अलौकिक बुद्धिमत्तेचं वरदान होतं, तसाच विक्षिप्ततेचा शापसुद्धा होता. त्याच्या काव्यामुळे लोक अधिकाधिक त्याच्याकडं आकर्षित होत होती, तर त्याच्या अहंकारामुळं त्याची नाती तुटतसुद्धा चालली होती. ‘लता मंगेशकरपेक्षा एक रुपया जास्त मानधन घेईन,’ अशा हट्टापायी असो किंवा गाण्याचं पूर्ण श्रेय घेण्याच्या सवयीमुळं असो, साहिरचे एसडींसोबतचे इतके घनिष्ठ व्यावसायिक संबंध अखेर संपुष्टात आले.
‘प्यासा’च्या वेळी गुरू दत्तनं दिलीपकुमारला नायक योजलं होतं. पण त्याच्या मनात भाव खाऊन जाणारी वेगळीच व्यक्ती होती – साहिर लुधियानवी! गुरु दत्तनं स्क्रिप्टमध्ये मोकळ्या जागा राखल्या, केवळ साहिरला मुक्त संचार करता यावा म्हणून. आणि साहिरनंही या संधीचं सोनं केलं. उर्दू शायरीतले बारकावे सामान्य माणसाला कळणार नाहीत, म्हणून त्यानं आपल्या नज़्म सोप्या केल्या. अगदी सहज, तरीही क्लासिक! ‘सना-ख़्वान-ए-तक़दीस-ए-मशरीक कहाँ है…’ च्या ऐवजी ‘जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है…’ हेच पहा. प्यासामधल्या ऑनस्क्रीन कवीशी, म्हणजेच ‘विजय’च्या पात्राशी साहिर बराच मिळताजुळता होता. म्हणूनच, त्याचं काव्य हा चित्रपटाचा खरा आत्मा होता.
वाढत्या यशाबरोबर साहिर स्वतःला जास्त महत्व देऊ लागला. त्यानं अशी बरीच वक्तव्यं केली, ज्यानं अनेक लोक दुखावले गेले. त्यानं जाहीर केलं की फक्त आणि फक्त गुरू दत्तच प्यासातील विजयची भूमिका निभावू शकेल. अगदी दिलीपकुमारदेखील नाही. तो हेही म्हणाला, की प्यासाची गाणी निर्विवाद यशस्वी होतील, तीही केवळ त्याच्या कवित्वामुळे. जे खरंही ठरलं, पण इंडस्ट्रीतल्या अनेकांचे अहम् या वक्तव्यांमुळे दुखावले गेले. ही इंडस्ट्री आहेच इतकी बेगडी, की तिला सत्य पचत नाही.
‘साहिर – एक व्यक्ती’ आणि ‘साहिर – एक कवी’ यांना एकमेकांपासून दूर करणं अवघडच. प्रणयातला आनंद असो किंवा अपयशातली कटुता, स्वातंत्र्यानंतरचं समाजवादी स्वप्न, विद्रोहाची ललकारी, सामान्य माणसांचे संघर्ष आणि साहिरचे यासंदर्भातले स्वानुभव… हे सारं त्याच्या गाण्यांमधून दिसून येतं.
“बिछड गया हर साथी दे कर
पल दो पल का साथ
किस को फुरसत है जो थामे
दिवनों का हात
हम को अपना साया तक,
अक्सर बेज़ार मिला
हम ने तो जब कलीयाँ मांगी
काटों का हार मिला…
जाने वो कैसे लोग थे जिनके
प्यार को प्यार मिला…
२५ ऑक्टोबर १९८० ला साहिर हे जग सोडून गेला. याला आज बरोबर ४० वर्षं झाली.
“कल कोई मुझ को याद करे,
क्यूँ कोई मुझ को याद करे?
मसरुफ जमाना, मेरे लिए
क्यूँ वक्त अपना बरबाद करे?”
साहिरच्या या ओळी मात्र खऱ्या ठरल्या नाहीत. कारण त्याची आठवण लोक आजही काढतात.
साहिर तू अमर आहेस…!
*
वाचा
रमा जाधव यांचं साहित्य
चित्रपटविषय लेख
कविता
चित्रकथा
कथा
'चित्रपट' हा रमा जाधव यांचा श्वास आहे. चित्रपट बघणं, त्यावर व्यक्त होणं त्यांना आवडतं..
रमा , सुंदर लिहिले आहे!!