मालघरहून महाडला येऊन आठवडा उलटून गेला होता. पण अजूनही मी सागाची झाडं,आंब्याची कलमं,बापटांच्या घराला आणि झोपाळ्याला फळ्या पुरवणारे फणस आणि काजूची उसळ यातून बाहेर येत नव्हतो. कधी नव्हे ते दादांना स्वतःहून पत्र लिहिलं आणि कळवलं की,‘खरं कोकण अनुभवायचं असेल तर मालघरला जा.’
मनाशी विचार करत राहिलो की आपण श्रीकांतच्या मागं लागून मालघरला गेलो. कोकणवैभव अनुभवलंपण श्रीकांत कधीही आपल्याला म्हणल्याचं आठवत नाही की, ‘विनय मला तुझ्या घरी पुण्याला यायचंय.’ तसं पाहिलं तर त्याचं पुण्याला क्वचितच जाणं झालं असणार. पुण्यासारख्या शहराची त्याला उत्सुकता,ओढ कशी वाटत नाही? खरंतर, त्याला एसटीपण फुकट आहे. गडचिरोली, नागपूरपासून ते सावंतवाडीपर्यंत तो मनमुराद फिरू शकतो. असं असूनही… अशी सवलत मला मिळती तर?हे सगळे प्रश्नत्याला विचारण्यासाठी मी उतावीळ झालो होतो. मी वेड्यासारखे हे प्रश्न कुरेशीला विचारत राहिलो. यावर कुरेशी इतकंच म्हणाला,
“जोशी, जरा बापट आणि त्याचं कुठलं गाव ते, यातून बाहेर ये.”
तेव्हाच मी ठरवलं, आपण श्रीकांत आणि मालघरातून बाहेर येण्यापूर्वी कुरेशीतून बाहेर पडायला हवं. याचं कारण कुरेशीचा काउंट आता दहापर्यंत गेला होता. त्याच्या फण्यावरचा दहाचा आकडा मला चीड आणत चालला होता. त्याचं कारणही तसंच झालं..
शनिवारची सकाळ होती. कुरेशी अंघोळ करून बाहेर आला. टॉवेल गुंडाळून तो अंगभर पावडर फिस्कारत दुसरी कोरडी अंघोळ करत होता. दार उघडंच होतं. समोर पाट्यावर मुन्ना बसली होती. उघड्या दारातून तो मुन्नाला न्याहाळत होता. उघड्या दारापलीकडं टॉवेल गुंडाळलेल्या कुरेशीकडं ती पहात होती. हसता हसता लाजत होती. तो निलाजरा हसत होता. तो कमरेच्या टॉवेलशी सैल-घट्ट करत खेळत होता. क्षणात माझ्या डोक्यात प्रकाश पडला. चौदा-पंधरा वर्षांची मुन्ना लाजतीये आणि तो तिला नजरेनं आव्हान देत टॉवेलशी खेळतोय.
मी चटकन उठलो. मुन्ना आणि टॉवेलशी खेळणाऱ्या कुरेशीच्या बरोबरमध्ये उभा राहिलो. दोघांच्या नजरांच्यामध्ये अगदीपहाडासारखा उभा होतो. ढिम्म हललो नाही. कुरेशी अंडरवेअर आणि बनियन घालण्यासाठी आतल्या खोलीत गेला, तेव्हा मी तिथून बाजूला झालो. हे दृश्य आणि माझी कृती पुढल्या अनर्थाला वाचवेल का? मुन्ना…मुन्ना… मला खूप रडावसं वाटलं आणि त्याचवेळी मला शहापूरकरची खोली खुणवायला लागली.
रात्री कोकणेंकडून जेवण करून बाहेर आलो. आज मला जेवायला मजाच वाटली नाही कारण वाढायला गोपी नव्हता. गोपीच्या गळ्यातील चेन आणि कधी साकारणारतेमाहितनसलेलं त्याच्या डोळ्यातील संसाराचं स्वप्न पाहिल्याखेरीज रुचकर अन्नही बेचव भासतं. लगेच खोलीवर जाणं टाळत मी विश्रामगृहाच्या बाजूला फिरत राहिलो. जुन्या पोस्टापाशी आलो. समोरच ताडीचा गुत्ता होता. रॉकेलच्या चिमणीच्या प्रकाशात फुटाणे,शेंगदाणे विकणारा बसलाय. पलीकडं सुके बोंबील तळल्याचा तेलकट वास गुत्त्यातून आत-बाहेर करतोय. गुत्त्याच्या पडद्याआडून भांडणाचे स्वर, समजावण्याचे सूर कधी दाट, कधी विरळ होतायेत. मला खोलीवर जावंसं वाटेना. कसलं तरी भयंकर नैराश्य दाटून येतंय. प्राध्यापक खांबेटेंच्याकडं जावं का?गेलं की ते बोलतात पण निघताना पुन्हा या म्हणत नाहीत,हेदेखील लक्षात आलं होतं. तसंही रात्रीचे दहा वाजले होते, त्यामुळं खांबेटे सरांच्याकडं जाणं हा मुद्दाच गैरलागू होता. स्वतःला शांत करण्यासाठी चवदार तळ्याकडं फिरत राहिलो. आज शनिवार होता. उद्या रविवार. म्हणजे आता उद्याचा दिवस काय करायचं, हाच विचार डोक्यात होता. सॉ मिलकडं जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रोड प्रॉजेक्ट सबडिव्हिजन जवळून जात असताना कानावर पेटीचे स्वर आले. मी सुरांचा पाठलाग करत एका बंद दाराच्या घराशी थांबलो.
पेटीच्या साथीनं गाण्याचे सूर ऐकू आले. समोरच्या घराच्या पायरीवर बंद दाराकडं पहाततिथंच उघड्या कानांनी बसलो. नैराश्य…कसलं नैराश्य? कुणाला आलंय नैराश्य? माझी मीच चौकशी करायला लागलो. माझी दोन व्यक्तिमत्व वरची पायरी आणि खालची पायरी दरम्यान उठबस करत राहिली.
आत कुणीतरी ज्ञानदेवांची विराणी गात होतं. स्वरांची आर्तता मला ढवळून काढत होती. मनापुढं मी एक काल्पनिक चित्र उभं केलं. त्यात मी एक तृषार्त प्रियकर आणि माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी अज्ञात ‘ती’. ती चारुगात्री नव्हती किंवा मी पिळदार शरीरयष्टीचा मदनी पुरुष नव्हतो. तिला माझ्यात विरघळून जायची आस लागलेली होती आणि मला तिच्यापासून लांब जायचे बहाणे करायचे होते. मी खलपुरुष ठरविला जावा, अशी तिची इच्छा नव्हती. पण मला तिच्यापासून लांब जाण्यासाठी जगानं धिक्कारावं, अशी तजवीज करायची होती. माझं हे अनाकलनीय रूप आपण पलटवून टाकावं म्हणून ती गात होती. सुरांचा एक गुच्छ माझ्या पायाशीतिनं आणून वाहिला आणि मी माझं रूप,त्याचा गंध आणि रंग सरड्यासारखा बदलून टाकला. मी तिचा व्हायला लागलो. ती माझी होतीच, पण मी ही तिला हवा तसा प्रतिसाद दिला. तिचे स्वर दूरदूर चाललेत आणि माझे सूर आर्त होत तिच्यापर्यंत पोहचायला निघालेत. मला तिचं अस्तित्व दिसेनासं झालंय. मला वास्तव छळतंय, कारण ती अस्तित्वातच नाही. मी तिला शोधतोय… शोधतोय…
त्या पुरुष गायकाचा गळा दाटून आला आणि कंठातून शब्द बाहेर पडेनासे झाले. पेटीची साथ करणाऱ्या वादकाला संधी साधावीशी वाटली. पेटीवर लीलया बोटं फिरत राहिली. एकाच थाटातील दोन राग दोन वेगवेगळ्या चरणात गुंफत पेटी साथीचं वाद्य न ठरता सोलो वादनाचं दर्शन घडवत राहिली.
गायन आणि वादन ऐकत मी कूस बदलावी तशी पायरीवरची बैठक मोडत-जोडत राहिलो. पाऊणतास मी अदृश्य स्वरांच्या इमारतीत राहतोय असं वाटलं. अचानक सूर,ताल थांबले. बोलण्याचे आवाज ऐकू यायला लागले. बहुदा मैफिल संपली असावी. मी खांद्यावरची शाल काढली.. कानातील फाया हुंगला.. मनगटावरचा गजरा कुरवाळला.. गोऱ्यापान कपाळावरची काळीभोर झुलूपं मानेला झटका देऊन अधिकच विस्कटून टाकली.. माझ्या झब्ब्याला भैरवीचे स्वर चिकटावेत असं वाटत नसतानाच समोरचं दार उघडलं.
एक पन्नाशीचे गृहस्थ बाहेर आले. तळहातावर ते तंबाखू चोळत असताना त्यांचं लक्ष माझ्याकडं गेलं. मंद पावलं टाकत ते माझ्याजवळ आले आणि मायेनं म्हणाले,
“अरेच्चा! कितीवेळ बसलात इथं?”
मी भिजलेला काळ मिनिटांच्या भाषेत सांगितला.
“अरे अरे, तुम्हाला गाण्याची आवड दिसतीये. काही बिघडलं नाही. आमचं मध्यंतर झालंय. या ना आत.”
मी भारावल्यासारखा आत गेलो. वीस बाय बारा फुटाची खोली. त्यात दोन ठिकाणी आधाराचे वासे,तीन बंद केलेल्या खिडक्या, एका स्टुलावर सरस्वतीची ताजा हार घातलेली प्रतिमा, तबल्याच्या बाजूला सोडून ठेवलेली तंबोऱ्याची गवसणी, मधेच काही ठिकाणी झिरझिरीतझालेली सतरंजी, कलामंचाचा आभास निर्माण करणारी एकुलती एक गादी, पन्नाशीपासून पंच्याहत्तरी गाठलेले दहा-बारा श्रोते आणि स्टीलच्या ताटामधून हिंदकळणारे चहाचे कप. संकोचून जात पण हवाहवासा वाटणारा चहाचा कप मी हातात घेतला. ‘अरे जोशी,अलभ्य लाभ’ असं म्हणत भिसेगुरुजींनी हात केला.
सतत स्वयंपाकघराकडं नजर टाकणारे गृहस्थ उठले आणि म्हणाले,
“मी ओक आणि आमचं हे सांगीतिक मंडळ आहे. याचं काही रीतसर बारसं झालेलं नाही, पण सततच्या उल्लेखानं याचं नाव पडून गेलंय ‘शनिवार मंडळ’. तुम्ही काही गाता किंवा वाजवता का?”
माझी चुळबुळ पाहून ते म्हणाले,
“असू दे, असू दे. पण आमचा एक दंडक आहे, की इथं उपस्थित राहणाऱ्यांची मंचावर हजेरी लागली पाहिजे.”
माझी चुळबुळ आणखीच वाढली तेव्हा भिसेगुरुजी म्हणाले,
“अहो अण्णा, तुम्ही त्याला धर्मसंकटात का टाकताय? मला एक जोडीदार मिळालाय जो गात नाही,वाजवत नाहीपण ऐकतो आणि जे येतं ते रुजू करतो. तो गोष्टी लिहितो हे मला माहितीये, त्यामुळं त्याला कथाकथन करायला तुम्ही सांगू शकता.”
भिसे गुरुजींनी माझी सुरांच्या मैफिलीतून सुटका केली, पण दुसरी जबाबदारी टाकली. मी कधी गोष्ट इतक्या लोकांमध्येसांगितली नव्हती. पण स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी भिसेगुरुजींनीव्यासपीठ तयार करून दिलं होतं. भिसेंनी माझा एकेरी केलेला उल्लेख मला खटकेनासा झाला. उलट मी त्यातून जिव्हाळा शोधत राहिलो.
नाट्यगीतं,भावगीतं आणि भीमसेनी भजनं यातून कार्यक्रम रंगत होता. अण्णा ओक पेटीवर आणि एक गृहस्थ तबल्यावर. तबलजींना मी विचारलं,
“आपलं नाव रानडे का?”
माझ्या प्रश्नांनी आश्चर्यचकित होतं ते म्हणाले,
“तुम्हाला कसं माहित?”
मी म्हटलं, “तुमचे चिरंजीव एसटी डेपोत कंट्रोलर आहेत ना.त्यांच्या वाजत्या बोटानं मला अभिमानानं सांगितलं होतं की,‘माझे वडील तबला वाजवतात.’ म्हणून मी तर्क केला आणि तो बरोबर निघाला इतकंच.”
मैफिल संपली तेव्हा मी चार माणसं जोडली होती. भिसेगुरुजी,हार्मोनियम वादक अण्णा ओक,तबलावादक रामभाऊ रानडे आणि कथाकार विनय जोशी.
चवदार तळ्यावरून मोहल्ल्यातील खोलीकडं परतताना मी काही नोंदी घेतल्या. या मंडळात गायन-वादनातील लोकोत्तर गुण असलेलं कुणी नाही. सगळा भर उपशास्त्रीय संगीतावर आहे. मैफलीचा आनंद लुटणारे सगळे पुरुष आहेत.स्त्रियांना मज्जाव नसावा तरीही मांडीला मांडी लावून बसण्याचा आत्मविश्वास या पुरुषांच्या कडोसरीच्या सुपाऱ्यांना नाही.जर गौरीला इथं गायला लावलं तर शुद्ध शास्त्रीय गायनाची चव या मंडळींना चाखता येईल.यामुळं महाडमधील महिलांना गौरीचा स्त्री असण्याचा लाभ उठवत शिरकाव करता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी केवळ विनय जोशी असेन;विनय प्रभाकर जोशी असणार नाही.
(क्रमशः)
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)