महाडचे दिवस ६९: नवा विसावा

Mahadche-divas-chapter-69-chitrakshare-deepak-parkhi-marathi-kadambari

आईच्या आग्रहासाठी एक दिवस पुण्यातला मुक्काम वाढवला. परंतु दिवसभर वावरताना दादांच्या समोर जायचं टाळत राहिलो. सारखं वाटायचं की आपण पटकन इंटरव्ह्युचं दादांना बोलून जाऊ. संध्याकाळी दादा ऑफिसमधून आले. मी बाहेर जाण्यासाठी त्यांच्या अंगावरून जात असताना त्यांनी मला थांबवलं आणि म्हणाले,
“विनय, मी पहातोय दोन दिवस तू मला टाळतोयस. त्याची काही गरज नाही. आमचे सिटी इंजिनियर खंबाटा यांनी मला ओझरतं सांगितलंय. बी शुअर, तुझी इच्छा नसेल तर मी नाही लक्ष घालणार यात.”

माझ्या मनावरचं दडपण क्षणात उतरलं. रात्री केतकीला घेऊन बाहेर गेलो आणि फॅमिली पॅक आईस्क्रीम घेऊन आलो. मोकळेपणानं आईला मी पुण्यात परत येण्याची शक्यता बोलून दाखवली, तेव्हा तिची चर्या उजळली.

महाडला पोहचल्यावर झालेल्या इंटरव्ह्युबाबत कुणाशी पहिलं बोलू? शहापूरकर का साळीसाहेब? मी वेगळाच पर्याय निवडला, बर्वेकाका आणि काकू.

नारळीपौर्णिमा होऊन गेली. गणपती विसर्जन पार पडलं. घट बसले. पुण्यातल्या संस्थेकडून काहीच कळवलं जात नव्हतं. दुपारी बर्वेकाकू म्हणाल्या,
“उद्या गणपतीच्या देवळात दुर्गाष्टमीचा सोहळा आहे. सकाळी देवीचा कणकेपासून केलेला मुखवटा बसवला जातो. रात्री घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असतो. सकाळी तो मुखवटा कुमारिकेसारखा दिसतो. दुपारी पस्तीशीच्या आणि संध्याकाळी पन्नाशीच्या प्रौढेसारखा. रात्री दहाच्या सुमारास जख्ख म्हातारीसारखा. आहे की नाही नवल?”
काकुंच्या श्रद्धेला धक्का लागू न देता मी मनाशी म्हटलं,
‘कणिक सुकत गेल्यानं तसं वाटतं. जर रात्री मुखवटा बनवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिला तर उलटं दिसेल.’
तरीही घागरी फुंकणं बघायला हरकत नाही. मी रात्री नऊच्या सुमाराला जेवण उरकून काकूंच्या बरोबर देवळात पोहचलो. काकूंच्या ओच्यात कुंकवाचा करंडा होता.

देवळात दोन नऊवारी, चार पाचवारी आणि एक पंजाबी ड्रेसवाली घागरी फुंकत होत्या. फू फू फू आवाज घुमत होता. नऊवारीच्या नाकावर इतर जणींपेक्षा जास्त घाम जमा झाला होता. ओल्या कपाळावर दोन-तीन ग्रॅम कुंकू चिकटलं होतं. तरीही त्यात भर घालायला बायाबापड्या येतच होत्या. धुपाचा वास आणि श्रद्धाळू मनं वातावरण निर्माण करत होती. मी बराचवेळ ते दृश्य पहात राहिलो. बर्वेकाकुंना माझ्या या तन्मयतेचं कौतुक वाटत होतं. देवीसारखाच मीही मुखवटा चढवला होता…

दहा मिनिटांनी दोन्ही नऊवारींनी हातावरची घागर तोंडाशी न तोलता कमरेशी घेतली. त्या दोघी इकडं तिकडं पहात होत्या. एक बाई आली आणि म्हणाली,
“देवी, मालक सारखं सीक पडतायेत. काही तोडगा सांग.”
एकीनं तोडगा सांगायला सुरवात करताच दुसरी पुढं येत म्हणाली,
“असं नको करू, मी सांगते तसं कर.”
पहिली उसळून म्हणाली,
“बाई, तिचं काय ऐकतीस? तिच्या अंगातली देवी खोटी आहे. माझ्या अंगातली खरी आहे.”
दोघी हुज्जत घालायला लागल्या. मी हसत बाहेर आलो. माझ्या पाठोपाठ काकू. त्या म्हणाल्या,
“हा प्रकार पहिल्याचवेळी मी पहातेय.”
काकूंना मी पायरीवर बसवलं आणि घागरी फुंकण्यामागचं विज्ञान सांगितलं,
“काकू, तुम्ही कधी कुणाला फुगा फुगवून दिलाय का? तो फुगवताना आपल्याला थोडी चक्कर आल्यासारखं होतं. याचं कारण त्यावेळी आपण बाहेरचा प्राणवायू न घेता उच्छवासातून निर्माण झालेला कार्बन मोनॉक्साईड वायू पुन्हा पुन्हा श्वासावाटे घेत राहतो आणि चक्कर येते. इथंदेखील तसंच होतं. घागरीत जमा झालेल्या वायूमुळं धुंदी आल्यासारखं त्या बाईला होतं. तिच्या अनियंत्रित हालचालींना दैवत्वाचं वलय आजूबाजूचे लोक देतात.”
काकू आणि मी दोघांनी एकाचवेळी बाहेर जायचा निर्णय घेतला…

इंटरव्ह्यु देऊन तीन महिने झाले होते. शहापूरकरचं लग्न झालं. मी दुसऱ्या खोलीमध्ये शिफ्ट झालो. आज नवदांपत्य खिडकीला कागद लावलेल्या खोलीत गृहप्रवेश करणार होतं. दोघं शहापूरकर आले. वहिनींचा चेहरा देवीच्या मुखवट्यासारखा प्रसन्न वाटला. डोळ्यात जगण्याबद्दल प्रेम आणि असोशी. त्यांना शुभेच्छा देताना एक पानात गुंडाळलेला गजरा न संकोचता दिला. त्या म्हणाल्या,
“भाऊजी, महागड्या वस्तू सगळेच देतात पण हा गजरा.. हे बोलले होते का तुम्हाला की मला फुलं खूप आवडतात?”
मी चटकन ‘हो’ म्हणताच त्यांनी नजर नवऱ्याकडं वळवली. शहापूरकर रिलॅक्स वाटला, जसा त्यानं लॅबोरेटरीचा रिपोर्ट पाहिल्यावर वाटला होता तसा…

गेले काही दिवस इंटरव्ह्यु देऊन आल्यावर मी ऑफिसात अलिप्तपणे काम करत होतो. त्या संस्थेकडून उत्तर न आल्यानं मी कामात आणि नव्या खोलीत पुन्हा स्वतःला जोडून घेतलं. जणू मध्ये काही घडलंच नव्हतं. पावसाळा संपल्यानं पुन्हा नात्याला जाऊन रहावं का महाड जवळ येत असल्यानं जावून-येऊन सर्व्हे करावा, यावर मी आणि चव्हाण विचार करत होतो.

ऑफिसमध्ये शिपायानं एक पत्र आणून दिलं. संस्थेकडून काही आलंय का, या अपेक्षेनं मी ते हातात घेतलं. ते पत्र दादांचं होतं. एक सिगारेट ओढून आलो. खिशातलं पत्र आवर्जून वाचावं, असं वाटत नव्हतं. तरीही ते वाचलं. दादांनी लिहिलं होतं की, ‘काल खंबाटा साहेबांनी मला बोलावून सांगितलं की तुझं सिलेक्शन झालंय. पण शासनाची परवानगी आली नसल्यानं अपॉइंटमेंट लेटर देता येत नाही. ती मान्यता पंधरा दिवसात अपेक्षित आहे.’

मी पुन्हा आणखी एक सिगारेट ओढायला बाहेर पडलो. ही तळ्यात-मळ्यातली बातमी मी ना साहेबांना सांगू शकत होतो, ना माझ्या सहकारी मित्रांना. मला श्रीकांतची कमी खूप त्रास देऊन गेली. मी कागद पुढं ओढला.

प्रिय श्रीकांत,
…………………………

पत्र पूर्ण केलं आणि मग दादांचं पत्र पूर्ण वाचलं.

कुरेशीवरचा राग मला आता संपवायचा होता. यासाठी त्याच्याशी स्वतःहून बोलायचं मी ठरवलं. पण हा बदल मी ऑफिसमध्ये केला नाही. मी मोहल्ल्यातल्या माझ्या जुन्या खोलीवर गेलो. मला आलेला पहाताच कुरेशी क्षणभर गोंधळला. त्याला काय करावं आणि काय बोलावं सुचेना. स्वतःला सावरत त्यानं मला मिठी मारली. मी माझे अश्रू थोपवू शकलो नाही. मला त्यानं रडू दिलं आणि काळजीनं विचारलं,
“काय झालंय?”
आजी गेलेली त्याला माहिती होतं. बहुदा त्याच्या मनात अशुभ शंकेनं घर केलं असावं. माझं रडं संपवून जेव्हा मी हसलो, तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला. मी त्याला दादांचं पत्र वाचायला दिलं. त्याचे डोळे ओले झाले होते. ओलेत्या डोळ्यांनी तो म्हणाला,
“विनय, इस बात पे सुखा गला गिला होना मंगता.”
आमचे दोन-दोन पेग झाले. मी नव्या नोकरीचं स्वरूप त्याला सांगितलं. ते ऐकल्यावर तो म्हणाला,
“किती छान! इथल्या नोकरीत एक्झिक्युशनचा काहीच अनुभव मिळत नाही. या नव्या ठिकाणी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, रोड, ड्रेनेज वॉटर लाईन्स आणि जमिनी ताब्यात घेऊन त्याचं नव्या नगरीत रूपांतर करायचं प्लॅनिंग इतक्या गोष्टी शिकायला आणि करायला मिळतील. तुझा टीपकागद मोठा आहे. यात तुला अनेक अनुभव गाठीशी मारता येतील. मागून मिळणार नाही, अशी संधी आहे. मी तुला अंडरएस्टीमेट करत नाही पण एक शंका विचारतो, ही नोकरी मिळण्यात दादांचा हात आहे का?”
मी ग्लास पटकन रिकामा केला.

मी साहेबांच्या पुढ्यात नाते आणि नांदगावचे गाव नकाशे आणि कागदावर प्लॉटिंग केलेला डावा कालवा सर्व क्रॉससेक्शनसह ठेवला. हे ठेवताना मला जाणवलं की आपली कामातील गुणवत्ता वाढलीये. याचं एकमेव कारण होतं, आता हे काम करताना माझ्यावर नोकरी टिकवण्याचं दडपण नव्हतं. दडपण नसलं तर प्रगती होते हे सत्य मला अगोदर कळलं असतं तर डिप्लोमा मिळवताना मी दोन वर्षं फुकट घालवली नसती.

माझ्या खोलीवर आलो. गच्चीमध्ये स्टूल टाकून आकाशाकडं एकटक बघत राहिलो. लहानपणी मी आकाशाकडं असंच पहायचो, तेव्हा मनात एखाद्या प्राण्याचा आकार आणायचो आणि ढगांच्या मांदियाळीत मला तोच आकार दिसायचा. आता ढगात मला अपॉइंटमेंट लेटर दिसलं. त्याच्यापुढं महाड एसटी स्टॅन्ड, राजेवाडी फाटा, जुनं पोस्ट, एसटी थांबा, विरेश्वर मंदिर आणि तळं, अंबादास बेकरी, ठोंबरे कापड दुकान, कोकणे खानावळ, अमर पेये, पानसरे सायकल दुकान आणि मागची चाळ, भाजी मंडई, मासळी बाजार, लक्ष्मी हॉटेल, गोकुळ लॉज, गवळ आळी, गांधी टॉकीज, लोहारांचं घर, डॉक्टर सुर्वेंचा दवाखाना, नारळ विक्री दुकानं, मोहल्ला, डॉक्टर देशमुख दवाखाना, गांधारी पूल आणि लेणी, आमची खोली आणि चाचांचं घर, सुंदर टॉकीज, आमचं ऑफिस, चवदार तळं, शनिवार मंडळ, अरुणोदय वाचनालय, काकर तळं आणि सरतेशेवटी बर्वेकाकांचं घर…

ऑफिसमधला सेंड ऑफ आणि सर्वांचे म्लान चेहरे, उषाताई आणि लोहार यांचे चुटपुट लागलेले चेहरे, शनिवार मंडळातली अखेरची हजेरी, गुजर द्वयीची भडभडती नजर, भाऊ कोकणेंनी हातावर ठेवलेलं चॉकलेट, बंब पेटवणारे चाचा आणि पाट्यावर बसलेली मुन्ना आणि सरतेशेवटी बर्वेकाकुंनी कळवळून म्हटलेले शब्द – ‘कधीही आठवण आली तर आपल्या घरी यायचं. काही वर्षात लग्न होईल तेव्हा सुनबाईला आशीर्वादासाठी घेऊन यायचं.’

मी चंबूगबाळं आवरून एसटीच्या टपावर टाकतोय. विसावा हॉटेलवरून आंबेडकर कॉलेजकडं बस चाललीये. मी मागं वळून बघत नाही.

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :