महाडचे दिवस ६६: शिफारस पत्र

उन्हाळा वाढला होता, त्यामुळं पाण्याची टंचाई तीव्र झाली होती. पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी कोरड्या पडलेल्या नदी पात्रात खड्डे घेऊन पाणी गोळा करावं लागत होतं. नांदगावपाशी आमचा सर्व्हे चालला होता. गेले दोन-तीन दिवस मी पहात होतो, शिवा कमरेला टॉवेल बांधून येत होता. उत्सुकतेपोटी मी त्याला कारण विचारलं. तो धडपणं काही बोलत नव्हता. शेवटी मी त्याच्या खनपटीला बसलो तेव्हा तो म्हणाला, “फडका पोटाला घट बांधला म्हंजी भूक लागलेली कळात नाय.” मला ब्रह्मांड आठवलं.

खोलीवर आल्यानंतर मी अशोकला हे सांगितलं. तो म्हणाला,
“या लोकांना सध्या काम नाही. काय कौलं पाडायचं काम असेल तेव्हढंच. एकदा रानडुकराची शिकार झाली की भातशेतीची पावसाळ्यापूर्वीची थोडीफार कामं निघतील. पाऊस सुरु झाला की रग्गड कामं. मग यांच्या हाताला सवड नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या तारखा मिळवण्यासाठी मिनतवाऱ्या कराव्या लागतात.”
मी त्याला म्हटलं,
“मला दोन गोष्टी समजल्या नाहीत. कौलं पाडणं आणि रानडुकराची शिकार?”
अशोकनं आवाज दिला,
“टकले काका, जरा चहा ठेवा आणि कांदा घालून शेव-चिवडा द्या. आणि हो, दोन सिगारेटी पण पाठवा. हं… कौलं पाडणं. तुम्ही आसपास बघत असाल, सागाच्या वगैरे झाडाच्या छोट्या डहाळ्या कोयतीनं तोडून त्याचे कट्टे शेतात मारलेले असतात. पानं सुकली की ती शेतात पसरवतात आणि पेटवतात. त्यामुळं जमीन भाजली जाते आणि पेरणी करायला मोकळी होते. शेतातली किडामुंगी नाहीशी झाल्यानं बियाणं सुरक्षित राहतात. याला कौलं पाडणं म्हणतात. आता तुमची दुसरी शंका, रानडुकराची शिकार. लागवडीची कामं सुरु करण्यापूर्वी अशी शिकार करायचा रिवाज आहे. गावातली पोरंसोरं हाकारे घालत रानडुकरांच्या मागं धावतात. त्याला मारून वाश्याला बांधून मिरवत गावात आणतात. त्याला कापून त्याच्या मांसाचे वाटे घरोघर पोहचवतात. आम्ही तसलं खात नाही म्हणून आमच्याकडं देत नाहीत. तुम्हाला डुक्कर चालत असेल तर तुमच्याकडं वाटा पोहचवायला सांगता येईल. या मटणात चरबी खूप असते, त्यामुळं शिजवताना अजिबात तेल घालावं लागत नाही.”

कातकरी लोकांचा नाचण्याचा कार्यक्रम झाल्यापासून अशोक मोकळा झाला होता. एकदम आठवून तो म्हणाला,
“मोकाशी साहेबांबरोबरचे फोटो आलेत. मी त्याच्या तीन कॉपी काढल्यात. तुम्हाला आणि साहेबांना देता येतील.”

फोटो खूपच स्वच्छ आणि चांगले आले होते. अशोक बोलत असताना मला चैन पडत नव्हती. हातापायाच्या बोटांना खाज सुटत होती.

बोलता बोलता तो मधेच थांबत होता. त्याला काहीतरी वेगळं सांगायचंय हे जाणवत होतं, पण संकोचानं तो बोलत नाही असं वाटलं. मी म्हटलं,
“अरे बोल ना. आता मी काय परका राहिलोय का?”
तो म्हणाला,
“आमच्या भागात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच असतील, पण बायांचा प्रॉब्लेम आहे. बहुतेक घरी कुणी ना कुणी माणूस मिलिट्रीमध्ये असतो. वर्षभर तो बायकोपासून दूर असतो. त्याला रजा मिळाली तर दोन महिने गावी येतो. स्त्रीसुख, न मिळाल्यानं, आधाशासारखं तो या रजेच्या काळात घेत राहतो. बायकोलाही त्याची गोडी लागते. आणि त्याची रजा संपते. तो ड्युटीवर जॉईन होतो. रोज लागलेली गोडी ती बायको विसरू शकत नाही. तिची वाढलेली भूक तिला चैन पडू देत नाही. आणि मग क्वचित चार-दोन बायका संयम पाळू शकत नाहीत. याचा फायदा आजूबाजूचे टगे घेतात. हुंगेगिरी करणारे हे टोळभैरव आणि निलाजऱ्या अशा बायका यांच्यामुळं सांस्कृतिक जीवन धोक्यात येतं.”

मला कुरेशी आठवला आणि अशोकच्या सांगण्याच्या पद्धतीचं कौतुकसुद्धा वाटलं. न राहून मी विचारलं,
“अशोक, तुझं शिक्षण काय झालंय?”
तो म्हणाला,
“मी हट्टानं एमए केलंय. घरातले लोकं मला सायन्सला जा म्हणून मागं लागले होते.”
अशोक बोलत होता पण खाजवण्यानं मला सुचत नव्हतं.

रात्री शांत झोप लागली नाही. सर्व्हे करत असताना गुंतून राहिल्यानं फारसं खाजवत नव्हतो, पण निवांतपणा आला की…  

दोन-तीन दिवसात खाजवण्याची जागा वाढत चालली. शेवटी मी महाडला डॉक्टरांकडं जायचं ठरवलं. शहापूरकर कोंझरला होता, त्यामुळं खोलीत मी एकटाच होतो. पण त्यामुळं जास्तच खाजवणं होत होतं. मी बर्वेकाकांना असं होतंय म्हणून सांगितलं. तेव्हा ते म्हणाले,
“गवळ आळीत एक सुर्वे म्हणून होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडं जाऊन बघा. अनेकांना चांगला गुण आलाय त्यांचा.”
बर्वेकाकांशी गप्पा मारायचा माझा मूडच नव्हता.

डॉक्टरांनी हात बघितले आणि हसून म्हणाले,
“खरूज झालीये. होईल बरी आठ दिवसात. पूर्वी कधी होमिओपॅथीची औषधं घेतली नसतील तर सांगतो.. औषधं सुरु केली की दुखणं बळावतं. हे लक्षण औषध लागू पडल्याचं असतं. नंतर आराम पडतो. बाहेर कुठं जाऊ नका आणि कुणाच्या थेट संपर्कात येऊ नका. चार दिवसांनी वाटलंच तर दाखवायला या. आठ दिवसांनी बरं वाटलं तर नक्की दाखवायला या.”
आता मला महाडमध्येच राहणं भाग होतं.

चौथ्या-पाचव्या दिवशी दुखणं चांगलंच वाढलं. रात्री मी चक्क नागडा झोपत होतो. अंगाला कपडा लागू देत नव्हता. नंतर झपाट्यानं फरक पडला. पहिले दोन दिवस बर्वेकाका डबा आणून देत होते. मी परत नव्या उमेदीनं नात्याला गेलो. मागच्या काविळीच्या दुखण्यात एनएमवर ताण पडला होता, आता चव्हाणवर. मला खूपच अपराधी वाटत राहिलं.

पेणला शिफारस पत्र घ्यायला गेलो. मोकाशीसाहेबांनी पत्र दिलं. त्यांना मी नात्यामधले फोटो दिले. ते फोटो पाहून ते प्रसन्न हसले आणि म्हणाले,
“हे फोटो बाकी कुणाला दाखवू नका. एका फोटोत किलोमीटरचा दगड दिसतोय ‘महाड सहा किलोमीटर.’ मी तुमचा प्रवास भत्ता, बिलं पास करतोय. हेड क्वार्टरपासून कॅम्पचं ठिकाण आठ किलोमीटरपेक्षा जास्त असेल तरच नियमांनी डीए देता येतो. कारण नसताना मी अडचणीत येईन.”

साहेबांच्यासमोर एक गृहस्थ बसले होते. साहेबांनी त्यांची ओळख करून दिली,
“हे बक्षी. पेण सबडिव्हिजनचे डेप्युटी इंजिनियर. पुढच्या पंधरवड्यात साळी रजेवर जाणार आहेत, तेव्हा तुमच्या सबडिव्हिजनचा चार्ज यांच्याकडे असेल. बक्षी मी आलोच दहा मिनिटात.”

बक्षीसाहेब विचारत राहिले की, ‘कसलं पत्र?’ मी त्यांना वाचायला दिलं. त्यांनी माझं नाव मोठ्यांदा वाचलं, ‘विनय प्रभाकर जोशी.’ मला विचारलं,
“वडील काय करतात?” मी म्हटलं,
“ते पुणे महानगरपालिकेत इंजिनियर आहेत.”
“अरे वा! म्हणजे तुम्ही पुण्याचे. नारायण पेठेत एक प्रभाकर जोशी नावाचे लेखक राहायचे. एकदा राज्य नाट्यस्पर्धेमधे त्यांच्याकडे त्यांचं नाटक करायची परवानगी मागण्यासाठी गेलो होतो. तुमचं नाव वाचून त्यांची आठवण आली. तुम्ही कोथरूडला राहताय, असं दिसतंय अर्जावरून. मला शंका आली तेच तुमचे वडील काय?”

माझी चुळबुळ सुरु झाली. शेवटी मी बक्षीसाहेबांना सांगून टाकलं की, हो ते माझे वडील. तेव्हढ्यात मोकाशीसाहेब आले. त्यांना बक्षीसाहेब म्हणाले,
“साहेब, हे जोशी कोण आहेत माहितीये का? लेखक प्रभाकर जोशींचे सुपुत्र.”
साहेब म्हणाले,
“जोशी, ते मघाशी दिलेलं पत्र बघू. मला नाही तुमची शिफारस करायची. असा माणूस आम्ही का गमावू?”

पूर्वीच्या अर्जाला अनुलक्षून हे पत्र मी त्या संस्थेला पाठवून दिलं.

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :