मला जाग आली. मी डोळे उघडून पाहिलं तर माझं एकलंच अंथरूण.लाजच वाटली. अवघं घर हलत होतं.दबक्यास्वरात बोलत होतं.मलाजाग आलेली पाहिल्यावर मूळ आवाजात एक एक जण बोलायला लागले. दादा तोंडभरून हसले आणि म्हणाले,
“भाऊ शिंपण बघायला गेलाय. तुम्ही रात्री आलात म्हणून, नाहीतर केव्हाच…”
मी कोपऱ्यात बसून पहात होतो की घरातला प्रत्येक जण तोटक्या जागेत धावाधाव करतोय. बाहेर अर्धवट पाऊस आणि घरात सकाळचे प्रसन्न चेहरे. माझ्यापुढं वाफाळलेला, आलं घातलेला चहा आणि फोडणी तडतडल्यावरचा आवाज. आई म्हणाल्या,
“जरा लवकरच खायला करतीये. भाऊ म्हणाला की जरा विनयला घेऊन फिरवून आणतो. तुम्ही बाहेर पडाल तेव्हा पहिल्यांदा लक्ष्मीकेशवच्या देवळात जा, पण आधी आमचे घरातले पारोसे देव पाहून घ्या. ह्यांना आज पूजेला थोडा उशीरच झाला आहे. माई गेलीये फुलं गोळा करायला. ती आली की हे आंघोळीला जातील. पूजा झाली की तुला लक्ष्मीकेशवची कहाणी साग्रसंगीत सांगतील.”
क्षणभर वाटलं की आईला म्हणावं मला माहितीये. भाऊंनी कालच येताना सांगितलीये, पण त्यांचा उत्साह वाढावा म्हणून म्हटलं,
“हो, हो.. मला आवडेल ऐकायला.”
माझ्याकडं कुतुहलानं चौदा-पंधरा वर्षांचा श्रीकांतचा धाकटा भाऊ बघत होता, पण बोलत नव्हता. नुसता एकटक बघत होता. त्याच्या डोळ्यात कमालीची उत्सुकता. दादांनी त्याला खांद्याला धरून माझ्यापुढं उभं करून म्हटलं,
“हा रवी, आमचं शेंडेफळ. पलीकडं कांदा चिरतीये ती निमू म्हणजे निर्मला. रवीच्या वरची.”
आई म्हणाल्या,
“आमचा चतुर्मास असतो, पण तुझ्यासाठी कांदा घालून सांजा करतीये. निमू जरा बडबडी, पण रवी मात्र पहिल्यापासून घुमा. भाऊ समोर असला की डोळ्यांनीही तो बोलणार नाही. भाऊ यायच्या आत जरा रवी, निमूशी बोलून घे.”
आई हे बोलताच परवानगी मिळाल्यासारखी निमू विचारायला लागली,
“तुझं नाव विनय ना? भाऊच्या बोलण्यात बऱ्याचदा तुझं नाव असतं, म्हणून आम्हाला माहितीये. तू आणि भाऊ एकाच खोलीत राहता ना महाडला?” मी नाही म्हणताच ती म्हणाली,
“मग तू कुठं राहतोस?”
मी सहजपणे म्हटलं, “महाडच्या मुस्लिम मोहल्ल्यात.”
निमू काही क्षण गप्प झाली. रवी दोन पाऊल मागं सरकला. दादा म्हणाले,
“मला वाटलं, तू महाडला ब्राम्हण आळीत म्हणजे काकर तळ्यावर राहत असशील. मुस्लिम मोहल्ल्यात का राहायला गेलास? भाऊ काही म्हणाला नाही तुला त्याबद्दल?”
मला नेमका काय खुलासा करावा समजेना. त्यावर निमू म्हणाली,
“तुम्ही चिपळुणातून बाहेर पडला, तेव्हा तुला मशीद दिसली असेल. आमच्या इथंही बरेच मुसलमान आहेत. पण कधी त्यांच्याशी गप्पा नाही मारल्या. मुसलमान मुली फारच कमी असतात शाळेत. या मुसलमान लोकांशी बोलायची उगाचच भीती वाटते. तुला नाही वाटली कधी?”
निमूच्या अनेक शंका ती बोलून दाखवत होती. रवी अजूनही माझ्याकडं नुसताच बघत होता. आपलं नाही म्हणून काहीतरी बोलावं, यासाठी म्हणाला,
“तू भाऊबरोबर देवळात जाऊन ये, पण नदीवर मात्र माझ्याबरोबर ये. तुला तांबी नदीतली मगर दाखवायचीये. अंतर फार आहे म्हणून नाही जाता यायचं, पण रामपूरलाही तुला नेलं असतं.”
रवीचं डोळ्यांनी बोलणं किंचित उमलायला लागलं. तेवढ्यात श्रीकांत आला. त्याच्या मागोमाग त्याची मोठी बहीण पण परडीत गोळा केलेली फुलं घेऊन आली. श्रीकांत आलेला पहाताच रवी गप्प झाला. पुन्हा त्याच्या डोळ्यांनी मौन स्वीकारलं. परडीतली फुलं देवापाशी ठेवताना ती म्हणाली,
“मी भाऊची मोठी बहीण. माझं नाव कलावती. मला बाहेरचे सगळे ‘कलू’ म्हणतात, तर घरातले ‘माई’. आमची सर्वात मोठी बहीण ताई देवरुखला असते. नंतरची आक्का, ती गुहागरात. भाऊ घेऊन जात असला तर उद्या परवा आक्काकडं गुहागरला जाऊन या. पण ते कसं शक्य आहे म्हणा, कारण सोमवारचा महाड एसटी डेपो अकाउंट सेक्शन चालू करायला भाऊला जायचं असणार. म्हणजे तुम्हाला उद्याच दुपारून निघावं लागणार. भाऊला वाटतं की एसटी त्याच्याखेरीज बंद पडेल. पगार मिळतो अडीचशे रुपये, पण एसटीचं काम करतो अडीच हजाराचं. एकेकाचा स्वभाव दुसरं काय..”
आईनं केलेला सांजा खात होतो, तेव्हा त्या अंगणात गेल्या. पावसाळी पत्रे घातलेला आणि त्यावर गवताच्या पेंढ्या रचलेला तुटपुंजा मांडव आणि सारवट जमिनीवर… जातं पुढ्यात घेऊन आईनं एक पाय मुडपला, दुसरा ताणला. ‘घर्रर्र घर्रर्र’ आवाज सुरु झाला. त्यांनी ओव्या थांबवत म्हटलं,
“हे जातं असतं ना त्याला ओवीचा नैवेद्य लागतो.”
पूजा करता करता दादा काही मंत्र म्हणत होते. मंत्र आणि ओवी यांचं एक अद्वैत मी अनुभवत होतो. घरातल्या दोन मोठ्या तुळया सुभाषितांनी भरून आणि भारून गेलेल्या. मी त्या अक्षरांकडं पहात राहिलो. मोत्याच्या दाण्यासारखं अक्षर म्हणजे काय, हे समजत होतं. दादा म्हणाले,
“हे भाऊनी लिहिलंय. त्याचं एक स्वप्न आहे की शेतामधे भात न लावता माड, पोफळी, फणस आणि आंब्याची कलमं यांनी ते भरून टाकायचं. मोठं थोरलं चिऱ्यामध्ये घर बांधायचं. त्यातल्या प्रत्येक तुळईवर सुभाषितं लिहायची. आल्या-गेलेल्याला त्याचा अर्थ समजावयाचा. गुहागरच्या शाळेत पाठ केलेल्या कविता झोपाळ्यावर बसून गायच्या. रामनवमीच्या निमित्तानं आलेला प्रत्येक पाहुणा या घरात पुन्हा पुन्हा आला पाहिजे.. त्याचं हे स्वप्न कधी पुरं होणार माहिती नाही. बुद्धीनं तल्लख असूनही शिक्षण अर्धवट सोडून त्याला नोकरीला लागायला लागलं. विनय, तू काय शिकलायस?”
“दादा तो मोठा इंजिनियर आहे पाटबंधारे खात्यात. तो गोष्टीही लिहीत असतो वडीलांसारख्या. त्याला लिहायला येतं, पण बडबडता येत नाही.. मला बडबडता हवं तेवढं येतं, पण लिहायचा आत्मविश्वास नाही.. अशी ढवळ्या-पवळ्याची जोडी आहे आमची.” श्रीकांतनी माझ्याबद्दल हे सांगितलं आणि डुचमळायला लागलं. अनेक आपट्या खात कसाबसा पूर्ण केलेला डिप्लोमा आणि वारंवार साभार परत येणाऱ्या कथा हे वास्तव श्रीकांतला कुठं माहित होतं?
काल निजलेलं घर चैतन्यानं न्हाऊन निघालं होतं. माझं मन होकारार्थी विचारांनी विभोर झालं. काल या घराविषयी झालेला गैरसमज आणि आता होत असलेला समज या दोन विरुद्धार्थी शब्दात इतकं अंतर असतं?
रविवार सकाळचे अकरा वाजलेले. दुपारी परत जायला निघायचंय, या विचारानं माझी घालमेल व्हायला लागली. श्रीकांत म्हणाला,
“चल, जरा तुला भातलावणी दाखवतो.”
जेमतेम अर्ध्या गुंठ्याचं शेत. एक गडी आणि चार बाया गाणी म्हणत गुढगाभर चिखलात आणि रिमझिम पावसात कर्मयोग साधत होत्या. पॅन्ट वर गुंडाळून मी चिखलात शिरलो. चिखलाचा हा लोण्यासारख्या मऊशार स्पर्श… काहीतरी अमूल्य आपण मिळवतोय असं वाटत राहिलं. थोड्या वेळातच महाडला जायला निघायचं नसतं तर गुढग्यापर्यंत गुंडाळलेली पॅन्ट आणि शर्ट काढून फेकून देत मी मातीत विलीन झालो असतो.
शेजारीच अर्ध्या किलोमीटर अंतरावरचं साठ्यांचं ऐसपैस घर. भला थोरला मांडव, सारवलेलं आणि रांगोळी रेखाटलेलं अंगण. मी म्हटलं,
“श्रीकांत, या घरात तुळशी वृंदावन कसं नाही?”
तो हसला आणि परसदारी घेऊन गेला. तिथल्या देखण्या वृंदावनात नांदती तुळस दाखवून म्हणाला,
“ब्राह्मणेतर घरात पुढच्या अंगणात तुळस असते. ब्राह्मणांच्या घरात मागच्या अंगणात तुळशीवृंदावन असतं. कारण तिथं बायकांचा वावर असतो. बाहेरून येणारा ओळखीचा बिन ओळखीचा पुरुष माणूस पुढच्या अंगणातून येतो. कळतंय ना, तुला मी काय म्हणतोय ते? आणखी एक गंमत सांगतो. वाण्याच्या दुकानात ब्राम्हण माणूस उदबत्ती मागतो, तर ब्राह्मणेतर अगरबत्ती.”
त्याच्या घाऱ्या डोळ्यात पूर्ण चित्पावन कोकणस्थीपणा पाझरत होता. मी नारायणपेठी असूनही मला हा जातीचा, ज्ञातीचा अभिमान भिडत नव्हता.
अचानक साठ्यांच्या घराच्या दिशेनं गलका ऐकू आला. एका मुंबईच्या पाव्हण्याला त्याच्या काखेत हात घालून लंगडत चालवत दोन लोक घेऊन आले. त्याला झोपाळ्यावर बसवलं. पाणी दिलं. त्याचा पाय चालता चालता मुरगळला होता. वेदना त्याला सहन होत नव्हत्या. साठे बाहेर आले. त्याचा सुजलेला पाय त्यांनी बघितला आणि हाक दिली,
“रामा… रामा होsss…”
पाठोपाठ “जी आलू आलू” म्हणत एक कातकरी आला. त्यांनी साठ्यांच्या सारखाच त्याचा पाय बघितला आणि हाक दिली,
“बांगडीची फुटकी काच. ती जुनी नको, नवी हवी. एक रस्सीचा दोन वीत तुकडा. चुना, गूळ, हळद, कापूस आणि स्वच्छ फडका.”
रामानं पाव्हण्याच्या पायाच्या सूजेचा अंदाज घेत वरच्या बाजूला दोरी घट्ट बांधली. काचेच्या तुकड्यानं सूज असलेल्या भागावर हळूहळू टोचे मारले. हलक्या हातानं सूज असलेल्या भागावर चोळायला सुरवात केली. सुजलेल्या भागातून काळंनिळं रक्त बाहेर यायला लागलं. ते त्यांनी कापसानं पुसून घेतलं. दोरी सोडली. दोन मिनिटं जाऊ दिली. पुन्हा दोरी बांधली. पुन्हा तीच क्रिया केली. त्याचं पाचवं आवर्तन संपलं, तेव्हा लालभडक रक्त ठिबकत बाहेर येत होतं. समाधानानं त्यांनी पाव्हण्याकडं पाहिलं. मारलेल्या टोच्यांमुळं झालेल्या जखमांवर गूळ, चुना आणि हळद एकत्र करून लेप दिला. त्यावर कापूस आणि फडकं बांधलं. उरलेला गूळ आणि पाणी त्याला प्यायला दिलं. दहा मिनिटांनी त्याला बसतं केलं. मग उठतं केलं आणि म्हणाला,
“पाव्हणं घ्या देवाचं नाव आणि टाका पाऊल म्होरं.”
पाव्हणा कुणाच्याही मदतीशिवाय दहा पावलं चालला. तेव्हा रामा म्हणाला,
“वहिनीबाय, आता पाव्हण्यासनी आणि रामाला च्या टाका. साखर जरा हातासरशी वाढवा.”
एक मोठी शस्त्रक्रिया डॉक्टर रामानं पार पाडली होती. आपल्या पडशीत अर्ध घमेलं तांदूळ घेऊन तो दिसेनासा झाला.
आमची एसटीची वेळ झाली होती. तांबी पुलापाशी मी आणि श्रीकांत उभे होतो. श्रीकांतनं विचारलं,
“बॅग भरताना सगळं घेतलंस ना?”
क्षणभर वाटून गेलं आपण उगाच काटेकोरपणं बॅग भरली. बसमध्ये बसल्यावर मीश्रीकांतला “रामाचं हस्तकौशल्य पाहून थक्क झालो,” असं म्हटलं.
त्यावर तो म्हणाला,
“हे गावठी उपाय नेहमीच परिणामकारक असतात. आमच्याकडं जर कुणाला साप चावला, तर कोंबडी लावतात. तू कोंबडीच्या गुदद्वाराकडं कधी पाहिलंस? ते सतत आकुंचन प्रसरण करत असतं. त्याचा पाकपूक आवाज फक्त कोंबड्यालाच ऐकू येतो. तर जिथं साप चावला असेल त्या व्रणावर ही कोंबडीची मागची बाजू दाबून धरतात. तिच्या गुदद्वाराची हालचाल पंपासारखं काम करते. दंशातलं सगळं विष गुदद्वारावाटे कोंबडी आपल्या स्वतःच्या शरीरात रिचवते. हे विष भिनल्यामुळं कोंबडी मरते. मग दुसरी कोंबडी, मग तिसरी… विषाचा अंमल किती आहे, यावर ती संख्या कमी-जास्त होते. एकवेळ अशी येते, की कोंबडी कितीही वेळ दाबून ठेवली तरी मरत नाही. याचा अर्थ अणूभर विषदेखील त्या माणसाच्या शरीरात उरलेलं नाही. तू रामाकडं नीट पाहिलं नसशील. त्याच्या एका बोटाचं पेर तुटलेलं आहे. एकदा रानात त्याला साप डसला. जवळ काही नव्हतं. तेव्हा विष पसरू नये म्हणून त्यांनी दगडावर बोट ठेवलं आणि कमरेची कोयती काढून पेर उडवलं.” मालघरला येताना मी सापाचा विषय काढल्यावर माझ्या तोंडावर हात ठेवणारा श्रीकांत मला साप, त्याचा डंख आणि उपचार याविषयी भरभरून माहिती देत होता. रामाबरोबर श्रीकांतनं अनोखी माहिती देऊन माझी पडशी जड करून टाकली. कोंबडी लावण्याबद्दल मी कुणाला सांगेल तेव्हा एकच बदल करीन, श्रीकांतसारखं कोंबडीचं ‘गुदद्वार’ असं न म्हणता सरळ ‘ढुंगण’ म्हणेन. तेवढ्यात कंडक्टर म्हणाला,
“भाऊ बापट, खूप झाल्या गप्पा… महाड आलं.”
(क्रमशः)
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)