amruta-desarda-shabdanchi-savli-chitrakshare-avyakt-sandhyakal-vacha-marathi-sahitya-online-free-read

तिच्या मनात पाऊस बरसत होता. त्याच्या आठवणींच्या गारा तिच्या तळाशी साठल्या होत्या. त्याचे सावळे आणि केसाळ गोल हात तिचा पाऊस झेलत होते. त्याची पावसाळी नजर तिच्या जखमा ओल्या करत होती. भरल्या घरात तिला संध्याकाळी पाऊस आला की भरून यायचं. तिला तो दिवस अजूनही धोधो आठवत होता..

‘थांब ना. किती पाऊस आहे. भिजशील तू.’ तो तिला हळूच म्हणाला.
ती काहीच न बोलता खूप बोलत होती. तिलाही खरं थांबायचं होतं. पण खूप उशीर झाला होता. त्याच्यासोबत असताना पावसातही तिचे श्वास गरम झाले होते. अंगात जणू तिच्या वीज चमकत होती.
‘गेलं पाहिजे मला..’ ती भिजून गेलेल्या घड्याळाकडे पाहत म्हणाली. घड्याळाची काच पण ओली झाली होती, काचेच्या आतही पाऊस पडत होता.
‘हं. पण कशी जाणार तू. बस मिळेल ना? ‘
त्याच्या मनातली काळजी तिला जाणवली. तिला जरा मस्त वाटलं. ती गालांनी हसली आणि छत्रीची मूठ थोडी ढिली करून त्याला म्हणाली,
‘बस मिळतील. काळजी नको करुस.’
मग दोघांमध्ये फक्त पाऊस बोलत राहिला. छत्रीतही ती अर्धीनिम्मी ओली झाली होती. तिची सलवार चिखलानं माखली होती. ओढणी तर पाण्याच्या थेंबात गळत होती. तो ही त्याची छत्री घेऊन तिच्या बाजूला उभा राहून पाऊस ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर उडणारे पावसाचे तुषार आणि चमचम करणारे डोळे जणू काही एकमेकांना स्पर्श करून आपलं प्रेम व्यक्त करत होते.
एकमेकांना जुळलेल्या त्याच्या जाड भुवया मस्त बाणासारख्या सुंदर दिसत होत्या. गुळगुळीत दाढी केलेले त्याचे गाल आणि हनुवटी तिला पाहत राहावी वाटली. क्षणभर तिच्या मनात आलं, हीच ती वेळ आहे. प्रेम व्यक्त करण्याची. त्यानं का सांगू नये? मीच बोलावं असं वाटतंय का त्याला? तो का बोलत नाहीय. मी का बोलू? बाई कुठं प्रेम व्यक्त करते? ते तर पुरुषानं व्यक्त करायचं असतं. मी नाहीच काही बोलणार. बघू तो बोलतो की नाही.

पावसाचा वेग थांबला. आडोश्याला उभे राहिलेले ते दोघं एकमेकांच्या नजरा जुळवत होते. लाजत होते, नजरेनं बोलत होते. पण तो तिच्याशी प्रत्यक्ष काहीच बोलला नाही. जाताना त्यानं फक्त त्याचा सावळा आणि ओला झालेला केसाळ हात तिच्या बारक्या, नाजूक हातात अलगद दिला आणि थोडासा दाबला. नजरेनंच कदाचित तो व्यक्त झाला. पण तिला, त्यानं बोलायला हवं होतं.

ती नाराज झाली. घरी आल्यावर खूप रडली. रात्रभर तिच्या मनातला पाऊस कोसळत होता. भावनांचे बांध फुटत चालले होते. तरीही तिनं स्वतःला आवरलं.
फक्त एकदा बोलला असता तो तर काय बिघडलं असतं त्याचं? असंच तिला वाटत राहिलं. पण हे वाटणं तिनं मनातच ठेवलं.

नंतरही तो गप्पच राहिला. अखेरपर्यंत बोलला नाही. फक्त तिच्या आजूबाजूला राहिला. आणि नंतर सगळ्या गोष्टी आपोआप बदलत गेल्या. पण दरवर्षी पाऊस मात्र न चुकवता येत राहिला.

हल्ली रोजच पाऊस येतो. तिच्या बंगल्यातून बंद काचेच्या खिडकीतल्या फ्रेममधून ती तासंतास पाऊस बघत राहते. आणि त्याच्यासोबत घालवलेली ती पावसाळी संध्याकाळ आठवत राहते. आताशा ती भिजत नाही. किंवा छत्री घेऊन बाहेरही जात नाही. उलट पाऊस आला की खिडकीत येऊन फक्त पाऊस काय म्हणतोय हे ऐकत राहते. पावसाच्या सरीत त्याचा आवाज ऐकू येतो तिला.
‘थांब ना, किती पाऊस आहे, भिजशील तू.’ इतकंच.

*

वाचा
शब्दांची सावली: अमृता देसर्डा

‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कविता

चित्रकथा


Website | + posts

अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :