महाडचे दिवस ३: बंगलीवजा चिऱ्यात बांधलेलं घर

mahadche-diwas-lekhak-deepak-parkhi-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-free-read-marathi-kadambari-chapter-3-thumbnail

केसातलं पाणी झटकून स्टँडच्या बाहेर आलो. रिक्षा स्टँड दिसेना. एकजण म्हणाला,
‘‘काय शोधत आहात?’’
म्हटलं, ‘‘रिक्षा स्टॅन्ड.”
तो हसला आणि विचारलं, ‘‘मुंबई?’’
मी म्हटलं, ‘‘नाही.’’
‘‘मग पुणं?’’
मी ‘हो’ म्हटलं. त्याच्या चेहऱ्यावर किंचित आपुलकी दिसली आणि ती खरी ठरली. तो लगेच म्हणाला, ‘‘कसबा पेठ?’’
मी ‘नाही’ म्हणताच त्याचा चेहरा बदलला. मी खुलासा केला, ‘नारायण पेठ.’
तरीही तो खुलला नाही. एक नोंद घेतली की बाजीराव रस्त्यापलीकडचे नारायण, शनिवार आणि हो सदाशिवपेठ याबद्दल लोक तुटकपणा दाखवतात. हे मनात आलं आणि माझाच चेहरा बदलला.

तो निघून गेला. मी एकाकी झालो. सामान उचललं आणि एका सरळसोट रस्त्यानं चालायला लागलो. डाव्या-उजव्या बाजूला घरं आणि दुकानं. बहुदा हा रस्ता बाजारपेठेचा असावा. अर्धा किमी चालत गेलो तेव्हा पाटी दिसली ‘आसरा लॉज.’ आत गेल्यावर काळ्या फळ्यावर लिहिलेलं वाचलं सिंगल रूम वीस रुपये, डबल रूम पस्तीस रुपये आणि कॉट दहा रुपये.
एका हॉलमध्ये सात कॉट. चार रिकाम्या. तीनवर काही बॅगा. रिकामी कॉट पाहून त्याखाली सामान ठेवलं. काउंटरवर पुन्हा आलो. त्या माणसानं विचारलं,
‘‘चहा हवाय?’’
माझी कळी खुलली. चहा घेताना त्याला विचारलं, ‘‘इरिगेशनचं ऑफिस कुठंय?’’
‘‘नाही माहिती हो.’’
पण हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि अपराधीपण दोन्ही जाणवलं.

बाजारपेठेतल्या रस्त्यानं फिरत राहिलो. शोभिवंत नसलेली दुकानं, लगबग नसलेली माणसं, चिऱ्यांमध्ये बांधलेली बैठी घरं आणि काही भागात मासळीचा वास. तास-दीडतास दोनअडीच किमी रस्ता पालथा घातला. जवळपास दहा-बारा ठिकाणी ऑफिसची चौकशी केली. लोकांच्या नाही म्हणणाऱ्या माना पाहून विचारात पडलो. एका ठिकाणी झिजवट पाटी दिसली –
‘सरकारी विश्रामगृहाकडे’
काहीतरी सुचून मी बाणाच्या दिशेनं जात राहिलो. समोर वास्तूचं देखणेपण दर्शवणारी बैठी इमारत. बंद गेटपाशी उभा राहिलो. चाहूल घेत असताना अर्धी चड्डी, बनियन, अस्ताव्यस्त केस, झाडांचं कटिंग करणारी हातात मोठी कात्री, असा तो दिसला.
गेटमधूनच मी विचारलं,
‘‘इरिगेशनचं ऑफिस?”
तो उत्साहानं पुढं आला आणि म्हणाला,
‘‘गवळ आळीत हाय जनू’’

आलो होतो त्याच रस्त्यानं गवळी आळी शोधून काढली. एका दुमजली इमारतीवर पाटी दिसली –
मायनर इरिगेशन सबडिव्हिजन, महाड (कुलाबा)
आत गेलो. एकाला माझी ऑर्डर दाखवली. त्यांनी ती वाचली आणि म्हणाला,
‘‘अहो, हे मायनरचे ऑफिस आहे. तुमची ऑर्डर आयपीआयची दिसतीय.’’
मी पूर्ण गोंधळून गेलो. त्यांनी विश्वासात घेत म्हटलं,
‘‘आम्ही एक्झिक्युशन करतो, तुम्हाला जॉईन व्हायचंय ते ऑफिस फक्त सर्व्ह करतं.’’

मला माझी लाज वाटली. इरिगेशनच्या या दोन कामातील फरकाचा मला पत्ताच नव्हता. स्वतःला सावरत त्यांना विचारलं,
‘‘कुठं आहे आयपीआय सबडिव्हिजन?”
तो मुकाच. याला हाक मार.. त्याला हाक मार. मी पुन्हा साशंक. एकानं माहिती दिली की विरेश्वराच्या देवळापाशी एक नवं ऑफिस झालंय. तेच असेल. ही माहिती घेऊन मी पुन्हा मघाच्याच रस्त्यानं विरेश्वर मंदिर विचारत गेलो. देऊळ सापडलं, पण ऑफिस…

खूप जुनं काळ्याभोर दगडातलं, पवित्र वाटावं असं देखणं मंदिर. बाजूला एक छोटं तळं. देवळात बसल्यावर बरं वाटलं. बाहेर एक सजवता येईल अशी पालखी. एकानं माहिती दिली, ‘यातून विरेश्वराचा छबिना निघतो.’ छबिना.. मला काही अर्थबोध होईना. ती जिज्ञासा दाबून धरत मी ऑफिसची चौकशी केली. त्यांनी कळसाचं दर्शन घेत आठवत ‘नाही’ म्हटलं. एकदम तो म्हणाला,
‘‘या तळ्याच्या कडेला चाळवजा घरात कुणी साहेब राहतात, त्यांना विचारा’’
मी चाळीपुढं उभा. एक बाई कुतूहलानं मला न्याहाळतात. मी त्या अज्ञात साहेबांबद्दल विचारताच एका बंद दरवाज्याकडं बोट दाखवत ती म्हणाली, ‘‘इथं राहतात ते. पण घरात दिसत नाहीत. वहिनी बाजारात गेल्यात वाटतं.’’
ती बाई आणखी काही बोलणार असं दिसताच मी म्हटलं,
‘‘पण या साहेबांचं ऑफिस कुठंय?’’
तिनं समोर बोट दाखवलं. एक बंगलीवजा चिऱ्यात बांधलेलं घर. कसली तरी दोन-तीन झाडं, वर कौलं आणि पूर्वी बाहेर गेट असल्याच्या खुणा.

समोर बंद दार. त्यावर खडूनं काही तरी लिहिलेलं. मी वाचायचा प्रयत्न केला. आयपीआय… बाकीची अक्षरं गायब. ती अक्षरं वाचली आणि शांत झालो. आता हे कुलूप कधी का उघडेना. मी लॉजकडं जात म्हटलं. तीन तासात चारवेळा बंद दाराला धडका मारून आलो. संध्याकाळ झाली. ऑफिस शोधण्याच्या नादात बऱ्याचवेळा बाजारपेठेचं दर्शन झालं होतं. पण मनात ऑफिस शोधणं होतं. त्यामुळं बाजारपेठ ठसली नव्हती. प्रथमदर्शनी या बाजारपेठेचं आकर्षण वाटावं, असं काहीच नव्हतं. खूप उशिरा परत विरेश्वराच्या सभामंडपात बसलो. हंड्या, झुंबर, भाविक आणि कुत्र्यांचं भुंकणं. एक पन्नाशीचे गृहस्थ खांबाला टेकून डोळे मिटून बसलेले. मी त्यांनी डोळे उघडायची वाट पाहिली. माझ्याजवळ तेच स्वतः होऊन आले.
‘‘महाडमध्ये नवीन का?’’
मी ‘हो’ म्हटलं आणि विचारलं,
‘‘तुम्ही महाडचे का?”
उगाच काही विचारायचं म्हणून विचारलं. ते म्हणाले ‘नाही’. पुन्हा काही क्षणांनी त्यांनी विचारलं, ‘‘गाव कुठलं?”
मी म्हणालो, ‘‘पुणं”
“अरे, व्वा! मीही पुण्याचा, शनिवार पेठेतला. माझी आणि त्यांची दोघांची कळी खुलली,
‘‘पुण्यात कुठं?”
त्यावर मी म्हटलं,
‘‘नारायण पेठेत, कन्याशाळेजवळ.”
” कन्याशाळेजवळ कुठं?”
“नातूंच्या श्रीमंगल कार्यालयासमोर.”
“आं.. नाव काय म्हणालात?”
“मी विनय जोशी.”
“म्हणजे प्रभाकरपंत जोशींचे कोण?”
संभाषणाला गती येत चालली होती.
मी म्हटलं, ‘‘मुलगा.”
मुलगा म्हणताच त्यांनी विचारलं,
‘‘आमच्या सुमीचे भाच्चे का?”
मला लक्षात येईना. ते म्हणाले,
‘‘सुमी म्हणजे आताची विद्या देशपांडे.”
माझ्या डोक्यात प्रकाश पडला, म्हटलं, ‘‘हो.. हो.. ती माझी मामी.”
त्यांनी माझे खांदे दाबत म्हटलं,
‘‘अरे, जवळचे आहात. मी सुमीचा भाऊ. ती मला दादा म्हणते. आपण घरगुती समारंभात भेटलेही असू.”

नाळ जुळली. ते म्हणाले,
‘‘मी महाडमध्ये अधूनमधून येत असतो. तुझे मामा- वसंतरावांना मी एकदा महाडला येत असतो, हे ओझरतं सांगितलं होत.”
मी आतून कासावीस होत होतो. मामाच्या उल्लेखानं आत कळ आली. मी कुठं सांगत बसू की  कौटुंबिक कारणानं आम्ही हल्ली मामाकडे जात येत नाही. मामाची तीव्रतेनं आठवण आली. गेल्या दोन वर्षांत त्याला पाहिलंही नव्हतं. मामाच्या बरोबर घालवलेलं लहानपण आठवलं. यातून बाहेर येत विचारलं,
‘‘महाडला कशासाठी येणं होतं?”
मी सिनेमाची रीळ पोचवायचं काम करतो. इथं सुंदर आणि गांधी अशा दोन टॉकीज आहेत. एका गुरुवारी एका सिनेमाची रिळ सुंदर टॉकिजला द्यायची आणि मागच्या आठवड्यासाठी दिलेल्या सिनेमाची रिळ कल्लेक्ट करून तीच माणगावला घेऊन जायची. त्यांच्या बोलण्यातून महाड आणि पंचक्रोशी यांचा इतिहास आणि भूगोल समजला.

‘‘महाडचं चवदार तळं पाहिलं की नाही.”
मी म्हटलं,
‘‘कालच आलोय फारसं हिंडलेलो नाही.”
“ठीक आहे, चला जाऊ आपण चवदार तळ्यावर”
एक ओबडधोबड विस्तीर्ण तळं आम्ही गाठलं. ते खूप बोलत होते. मला विचारलं,
‘‘रात्रीचं जेवणाचं काय?”
मी खांदे उडवताच म्हणाले,
‘‘चला आपण गोकुळला जाऊ’’
मी निमूट त्यांच्यामागं. एका गुजराथी पद्धतीच्या खानावळीत गेलो. जेवण खूपच रुचकर परंतु गोड. मला ते म्हणाले,
‘‘हे गुजराथी जेवण त्यातल्यात्यात आपल्या ब्राह्मणी चवीचं असतं. यांचं लॉज पण आहे. मघाशी तू म्हणालास आसरामध्ये उतरला आहेस. त्यापेक्षा इथं ये, जरा बरं वातावरण आहे या लॉजचं.’’

सकाळ झाली. मी आसराचा निरोप घेऊन गोकुळ रहिवासी झालो. कॉट दर रोज बारा रुपये. किंचित महाग पण स्वच्छ. थोडंसं बोलणं झालं तर माणसं आपलीशी होतात. आयुष्यात प्रथमच परकी माणसं जवळ करायला सुरुवात केली.

ऑफिसपाशी आलो. दार उघडं. म्हटलं चला प्रतीक्षा संपली एकदाची. दारातून आत आलो. सकाळचे अकरा वाजूनही अंधार. खिडक्या बंद. बाहेरच्या खोलीत अंधार. काहीसा अधिकार प्राप्त झाल्यासारखा खिडकी उघडली. आतून एक चिरका आवाज आला,
‘‘पाणी भरलंस का?’’
भांबावून जात मी आतल्या खोलीत गेलो. एक ४ x 4 बाय तीन फुटांचं टेबल. टेबलामागं लाकडी खुर्ची, पुढं दोन लोखंडी खुर्च्या. त्याच्या मागच्या खोलीत गेलो, तिथं मात्र उजेड. तिथं छोट्या आकाराची चार टेबलं आणि लोखंडी साताठ खुर्च्या. एका टेबलावर काळ्या रंगाचा माझ्याच वयाचा माणूस एकटा मान खाली घालून बसलेला. मी आत जाताच तो माझ्याकडं न बघताच म्हणाला,
‘‘तुला कितींदा सांगू बे.. दहाला येत जा. झाडलेलं नाही, पाणी भरलेलं नाही.’’
तो मला साफसफाई करणारा आलाय, असं समजत होता. मी गप्प. त्यांनी मान वर केली.
‘‘अं ..’’ तो दचकला. म्हणाला, ‘‘कोण हवंय…’’

मी इकडंतिकडं बघितलं. तो उठला. मला बसा म्हणाला आणि मग स्वतः बसला. खरं म्हणजे मी माझा परिचय प्रथम करून द्यायला हवा होता. त्याच्या आतच तो म्हणाला,
‘‘मी भडगंजी. या ऑफिसध्ये ज्युनियर क्लार्क आहे. तुम्ही?’’
‘‘मी विनय जोशी. माझी इथं ज्युनियर इंजिनीयर म्हणून नेमणूक झालीय.”
त्यांनी एक फाईल ओढली. माझीच ऑर्डर मला दाखवत म्हणाले,
‘‘हो हो.. परवाच आलीय. साहेबांनी तुमची कॉपी तुम्हाला द्यायला सांगितलंय. प्लिज घेता का ती सही करून.”

गेल्या पंधरा दिवसात मी प्रथमच मला कुणीतरी प्लिज म्हणताना ऐकलं होतं. व्यवस्थित बसून मी बोलायला लागलो.
“अं.. काय नाव म्हणालात?”
“भडगंजी.. जरा अवघडच आहे. आम्ही सोलापूरचे, लिंगायत समाजाचे. तुम्ही मला स्वामी म्हणालात तरी चालेल.”
मी विचारलं,
‘‘साहेब दिसत नाहीत?” त्यानं सभोवार बघत स्वर खाली आणत म्हटलं,
‘‘साळीसाहेब ना, ते गेलेत त्यांच्या गावी चोपड्याला. इथं अजून काहीच काम नाही. जाताना आम्हाला सांगून गेले की, मी पुण्याला चीफ इंजिनीयर ऑफिसला चाललोय.’’
‘‘आम्हाला .. म्हणजे अजून कोणकोण आहे इथं?’’
त्यांनी सांगायला सुरुवात केली,
‘‘साळीसाहेब सब डिव्हिजनल इंजिनीयर, बी. एस. पाटील, एन. एम. पाटील, डी. जे. पाटील आणि चव्हाण हे ज्युनियर इंजिनीयर. मी एकटा क्लार्क. साळी साहेब पुण्याला जातो म्हणून सांगून गेलेत. कारण हे सगळे इंजिनीयर ऑफिसमध्येच थांबावेत म्हणून. पण बाजारात साहेबांचा गाववाला भेटला. तो बोलून गेला की साहेब गावाकडं गेलेत. चारदिवस तिकडंच असतील. ही समजलेली गोष्ट मी या पाटील मंडळींना सांगावी का.. पण कसं कोणजाणे माझ्या तोंडातून गेली. त्यामुळं हे सगळे आपापल्या गावी पळाले. ही मंडळी साहेब यायच्या आत परत आली म्हणजे मिळवलं. आता तुम्ही आलात, पाटीलपेक्षा वेगळं आडनाव.. बरं वाटलं. तुम्ही लगेच जॉईन होणार की साहेब यायची वाट बघणार?”

चार मिनिटाच्या सहवासात तो स्वामी घडाघडा बोलत होता. त्याच बोलणं एकीकडं चालू असताना मी माझा जॉइनिंग रिपोर्ट लिहितोय. कागद त्याच्या हातात ठेवला, तेव्हा ओशाळवाणं हसून तो म्हणाला,
‘‘असं जॉइनिंग देतात होय.. अजिबात चालणार नाही. चला आपण करमरकर यांचा वडा खाऊ, चहा पिऊ.”
आम्ही बाजारपेठेच्या दिशेनं चालत आलो. मुख्य रस्ता लागला तेव्हा खूप गर्दी दिसली. मला तो म्हणाला,
‘‘जुनं पोस्ट म्हणून ओळखतात या भागाला. सगळ्या एसट्या स्टँडवरून इथं येतात कारण इथपर्यंत येणार पॅसेंजर जास्त. तुम्ही आला तेव्हा स्टँडवर उतरला असणार.. आणि उगाच पायपीट करावी लागली असणार. मला तेव्हा विचारलं असतं तर मी तुम्हाला ‘इथं उतरा’ असं सांगितलं असतं.”
इतकं तो बोलला आणि जीभ चावत म्हणाला,
‘‘मी तरी काय बोलतोय, आपलीतुपली ओळख अवघी पंधरा मिनिटाची.”

‘भगवानदास बेकरी ‘अशी ठळक पाटी असलेल्या दुकानाच्यापुढं एक दहा X आठ फुटाचा ओटा, त्यावर एका कोपऱ्यात शेगडीवर मोठी कढई, बाजूला जर्मनच्या परातीत वळून ठेवलेले बटाटे वडे. हातातला झारा एका लयीत फिरवणारे पन्नाशीचं निम्मं टक्कल असलेले, केवळ चड्डी घातलेले उघडे, खांद्यावर टॉवेल आणि रुळणारे जानवं असलेले करमरकर. साताठ गिऱ्हाईक. मी बघतोय. लोक येतायंत. प्लास्टिक डिशमध्ये वडापाव, कोरडी चटणी. ती खाऊन होताच पुन्हा डिश करमरकरांच्या पुढं. पितळी पिपातील पाणी पितायंत. तसंच बेकरीत जातायंत नानकटाई खातायंत. समोरच्या टपरीत ग्लासातून चहा पितायंत. जाताना बेकारी, चहा टपरीकडं दुर्लक्ष करत करमरकरांना मात्र आवर्जून सांगतायत,
‘‘अण्णा, बेश्ट नाश्ता झाला. आता दासगावहून यायला कितीका वाजेनात”
मी स्वामीला म्हटलं, ‘‘चला जाऊया ऑफिसला.”
“कशाला? तुम्ही कुठं उतरलाय?”
“गोकुळ लॉजला.”
“बरं बरं. राजेवाडीकडं जाणाऱ्या रस्त्यावर माझी खोली आहे. जाऊया आपण, मी एकटाच असतो. आपल्याला सगळं येतं. मेथीची भाजी आणि जोंधळ्याची भाकरी.. जोंधळा आमच्या घरचा हं. जेवण करू, गप्पा मारू आणि उद्या ऑफिसला भेटू.”

मी घड्याळात पाहिलं. फक्त सव्वाबारा झाले होते. साडेअकरा ते साडेपाच ऑफिसमध्ये न थांबता कॉलेजमध्ये पिरियड बंक करतो, तसं आम्ही दोघे राजेवाडी रस्त्याला लागलो. आता खऱ्या अर्थानं मी ‘विनय जोशी, ज्युनियर इंजिनियर’ झालो होतो.

(क्रमशः)

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा

डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखक दीपक पारखी कथा, कादंबरी, नाटक, स्फुटलेखन व वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन करतात. आजच्या नंतर उद्याच्या आधी, बिन सावलीचं झाड, पोरकी रात्र भागीले दोन, सी मोअर..., शिदोरी स्व विकासाची ही त्यांची प्रकाशित पुस्तके. महाडचे दिवस ही कादंबरी व एक नाटक तीन एकांकिका हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

2 Comments

  1. महाडचे दिवस छानच आहे! ऑफिसचा शोध तर लागला ! पुढे पाहू …

  2. महाडचे दिवस छानच! ऑफिसचा शोध तर लागला . आता पुढे पाहू ..

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :