नाटक आणि त्याचे माझ्या व्यक्तिमत्वावर झालेले परिणाम: ३

wingetun-deepak-parakhi-chitrakshare-natak-ani-tyache-majhya-vyaktimatvavar-jhalele-parinam-3

मे महिना, साल १९६२. इयत्ता पाचवीतून इयत्ता सहावीत मी गेलेलो. निकालाच्या दिवशी प्रगतिपुस्तकाबरोबर एक माहितीपत्रक. १ मे ते २८ मे शाळेत सुट्टीतील वर्ग चालू होणार. एका वर्गाचे शुल्क रुपये तीन आणि जास्तीत जास्त तीन वर्ग लावता येतील. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर या वर्गांचा मोठा प्रभाव पडेल, असं अभिवचन. मुलं कलासक्त आणि ज्ञानी होतील, असा विश्वास.

अनेक पालकांनी शाळा काहीतरी खुळं काढतीय असं म्हणत तो कागद अन्य कारणासाठी वापरला, तर काही पालकांनी पोरं नुसता हैदोस घालतात घरात.. त्यापेक्षा अडकवून टाकू त्यात, असा स्वतःची सुटका पाहणारा विचार केला.

माझ्या वडिलांचं लक्ष ‘नाट्य प्रशिक्षण वर्ग’ याकडं गेलं. आणि तीन रुपये घेऊन मी शाळेत गेलो. मा. य. शं. गोडबोले सर वर्ग घेणार होते. पहिल्या दिवशी मी आणि आणखी एक सहाध्यायी याना त्यांनी नाटकातील दोन पात्रांमधील प्रवेश वाचायला दिला. आमचं वाचन ठीक कसं नाही, हे त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. यातून फारसं काही हाती लागत नाही हे लक्षात येताच ते म्हणाले,
“तुमची नजर वाचताना पुस्तकावर असते. यामुळं आवश्यक एक्स्प्रेशन मिळत नाहीत. आता पुस्तकात पाहून वाक्य मनाशी वाचा आणि नंतर तेच वाक्य एकमेकांकडं पाहून म्हणा.”
आम्ही तसं केलं आणि आम्हीच हसलो. फरक जाणवला होता. त्यावर ते म्हणाले,
“ही वाक्य तुम्ही बाकावर बसून बोलताय, यामुळं तुमचं शरीर लिखाणातील भावाप्रमाणे हालत नाही. आता हीच वाक्य उभं राहून बोला.”
आम्ही तसं केलं. आता सर आणि आम्ही दोघंही हसलो.
आम्ही यशस्वी झालोत असं वाटत असताना ते म्हणाले,
“आणखी एक सुधारणा करायला हवी. एकानी एक वाक्य उच्चारल्यावर दुसरा जो प्रतिसाद देतो तो कसा आहे बघा. स्क्रिप्ट वाचलं असल्यानं पुढं काय होणार हे तुम्हाला ठाऊक आहे. यामुळं तुम्ही तशा पद्धतीनं बोलता. तुम्ही नाटकातील पात्र आहात, तुम्हाला पुढं काय घडणार आहे हे माहित नाही, हे लक्षात घेऊन वाक्याची फेक करा.”
आम्ही तसं केलं. आता आम्ही पुन्हा हसलो तर सरानी टाळ्या वाजवल्या.

बहुदा सुभद्राहरण नाटकातील एक प्रवेश रंगमंचावर प्रेक्षकांपुढं आम्हाला सादर करायचा होता. दोन भिक्षुकी करणारे भटजी यांचा प्रवेश मला आणि दीपक कुलकर्णी यांना बसवायचा होता. प्रवेश चालू झाल्यापासून संपेपर्यंत मी सतत माझी शेंडी चाचपत असतो. याचं नेमकं प्रयोजन माझ्या लक्षात येत नव्हतं, म्हणून मी तसं सरांना विचारलं. ते म्हणाले,
“एखादा वाद्य वाजवणारा असतो त्याला सतत आपल्या बोटांची काळजी असते. एखादा फुटबॉल खेळणारा असतो त्याला कायम आपल्या पायांची निगा राखायची असते. त्याचप्रमाणे भटजी लोकांचा अभिमान (त्यांना त्यावेळी अस्मिता शब्द वापरायचा असावा, पण मला कळणार नाही अशी त्यांची भावना झाली होती) म्हणजे त्यांची शेंडी असते. त्यांच्या व्यवसायाचं ते भांडवल असत. म्हणून हा भटजी सतत शेंडी जागेवर आहे ना याची खात्री करून घेत असतो.”
सर पुढं म्हणाले,
“हे मला का सुचलं.. माझ्या लहानपणी एका खोडकर मुलानी झोपलेल्या भटजींची शेंडी कापून टाकली होती, तेव्हा ती शेंडी पूर्वी इतक्या लांबीची होईस्तोवर ते अस्वस्थ असायचे. त्यानंतरदेखील ते कायम शेंडी चाचपून बघायचे.”
नाटक करण्याच्या आदल्या दिवशी मी सरांना विचारलं,”सर, सगळे संवाद मला तुम्ही नाकात आवाज काढून का बोलायला लावता?” त्यावर ते म्हणाले,
“हे भटजी कोकणातून आलेले आहेत आणि कोकणातील लोक असंच नाकातून म्हणजे अनुनासिक स्वरात बोलतात.”

नाटकाच्या वेशभूषेत मला धोतर नेसायचं होतं, पण प्रत्यक्षात माझी उंची खूप कमी असल्यानं माझ्या आजोबांचं उपरणं धोतरासारखं नेसवलं. माईकच्या वायरला पाय अडखळणं सोडलं तर आम्ही संवाद न अडखळता शिकवले तसे सादर केले.

खूप वर्षांनी मी कोकणात गेलो तेव्हा ब्राह्मण समाजातील अनेक लोक अनुनासिक स्वरात बोलताना ऐकले. पण अधिक विचार केल्यावर लक्षात आलं की असा स्वर प्रादेशिकतेमुळे निघत नाहीय. तो पिढ्या-पिढ्यांच्या अनुकरणाचा भाग आहे.

*

वाचा
विंगेतून : दीपक पारखी
‘महाडचे दिवस’ (कादंबरी) – दीपक पारखी
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखक दीपक पारखी कथा, कादंबरी, नाटक, स्फुटलेखन व वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन करतात. आजच्या नंतर उद्याच्या आधी, बिन सावलीचं झाड, पोरकी रात्र भागीले दोन, सी मोअर..., शिदोरी स्व विकासाची ही त्यांची प्रकाशित पुस्तके. महाडचे दिवस ही कादंबरी व एक नाटक तीन एकांकिका हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :