दृढ नात्याच्या, हळुवार मैत्रीचा गहिरा रंग!

reunion-fred-uhlman-marathi-anuvad-mugdha-karnik-madhushri-publication-pustak-olakh-samikshan-sangita-hari-narke-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-book-about-german-jew-boy

‘रीयुनियन’ (पुनर्भेट) ही फ्रेड उल्मान या जन्मानं ज्यू जर्मन असलेल्या चित्रकार, वकील, लेखकाची आत्मचरित्रात्मक कादंबरी.
दोन षोडशवर्षीय मित्रांची, त्यांच्या हृदयस्पर्शी अतूट नात्याची ही गोष्ट घडते १९३२-३३ मधील नाझी जर्मनीत. दोन स्वतंत्र विचारधारा असलेल्या या जिवलगांच्या निरागस मैत्रीवर नाझी फॅसिजम कसा आणि काय परिणाम करतो, याची ही नाजूक व कलात्मक गोष्ट आपण पाहतो ‘हॅन्स’च्या नजरेतून.

आजच्या ‘व्हॉट्स ॲप’ व ‘फेसबुक’च्या जमान्यात अनेक पुनर्भेटी (reunion) सहजगत्या होताना आपण बघतो. मेळावे, सहली आयोजित करून त्याचे सोहळेही साजरे केले जातात; पण आपल्या भवतालची राजकीय परिस्थिती व सामाजिक वास्तव या मित्रत्वाच्या नात्याला नकळत हादरे देत आहे आणि ही नाती भेगाळत आहेत. आयटी सेलच्या फॉरवर्ड्सनी अत्यंत धारदार व टोकदार झालेली मते व मने आपली वर्षानुवर्षांची मैत्री पणाला लावताना दिसत आहेत.

कोरोना संकटाने आर्थिक घडीचे तीनतेरा वाजवले आहेत. भारतीय गरिब जनता दोन वेळच्या अन्नाच्या विवंचनेत हरवली आहे, तर मध्यम व उच्च मध्यमवर्ग आपल्या सुरक्षित मनोऱ्यात रममाण आहे.

आपापल्या धर्माच्या, जातीच्या गढ्या उभारून धर्माधारित व जातीआधारित राजकारण धार्मिक, जातीय, प्रांतीय कट्टरतेला खतपाणी घालत ती आणखी घट्ट, बळकट करीत आहे. त्यामुळं मनाच्या कोपऱ्यात लपून बसलेला धर्मभेद, जातिभेद, प्रांतभेद, लिंगभेद दबक्या पावलानं वर डोकं काढताना दिसतोय अन् तो भारतीय समाजमनावर स्वार होऊन उधळण्याच्या तयारीत आहे. हातात हात घेऊन चालणारी इथली हिंदू-मुस्लीम धर्मपरंपरा द्वेषाच्या वाटेवर पावलं टाकताना दिसत आहे. सवर्णांकडून दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना, शेतकऱ्यांचं आंदोलन, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि मनुवादाचे जाहीररीत्या समर्थन काय सांगत आहे? धार्मिक कट्टरतेला मनोवेधक राष्ट्रवादाचा मुलामा चढवून नवराष्ट्र उभारणीच्या मृगजळाकडे समाजमनाला डोळे लावून बसवण्यात आलं आहे.

कट्टरतावादाच्या बळी प्रथम महिलाच ठरतात, असं दिसून आलं आहे. २०२१चा ‘जागतिक आर्थिक मंचा’चा अहवाल सांगतो, ‘लिंगभाव समानता निर्देशांकात १४० व्या क्रमांकावर असलेल्या भारताची २८ अंकांची घसरण होऊन तो ११२ वर आला आहे. महिलांचा कामगार-कर्मचारी सहभाग २४.८% वरून २२.३% वर, व्यवसाय व तंत्रज्ञानात्मक सहभाग कमी होऊन २९.२% तर वरिष्ठ व व्यवस्थापकीय सहभाग १४.६% आहे. भारतातील पुरुषांच्या तुलनेत महिलांचं उत्पन्न एक पंचमांश आहे, त्यामुळं भारत खालच्या दहा देशात गेला आहे. महिलांच्या घटत्या संख्येमुळं राजकीय सक्षमीकरणही २३.१% (२०१९) वरून ९.१% इतकं खाली घसरलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजावी.

राजकारण्यांच्या या आपमातलबी खेळीपासून वेळीच सावध झालो नाही तर हा धार्मिक, जातीय कट्टरतेचा भस्मासूर आपल्याला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही याचं भान आपण ठेवलं पाहिजे.

‘रीयुनियन’ तिची आजची प्रस्तुतता (relevance) आणि महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करते.

‘कॉन्राडिन होहेन्फेस’ शाळेत दाखल होईपर्यंत ‘हॅन्स श्वार्झ’ला कोणीही मित्र नसतो. कारण त्याच्या मते, वर्गातील इतर सर्व मुलं ही कल्पनाहीन, सुमार बुद्धीची आहेत आणि त्याच्या मैत्रीच्या कसोटीवर जिला संपूर्ण निष्ठेची, स्वार्थ-त्यागाची, विश्वासाची बैठक आहे, त्यावर खरी उतरणारी नाहीत. मैत्रीच्या या काव्यात्म कल्पनेवर हॅन्सचा जबरदस्त विश्वास आहे आणि हॅन्स व कॉन्राडिन या दोघांच्या निर्वाज्य घट्ट मैत्रीचा हाच खरा पाया आहे.

दोनशेपेक्षा जास्त वर्षे जर्मनीतील श्टुटगार्टमध्ये रहात आलेल्या पिढ्या आणि जर्मन देशप्रेमानं ओतप्रोत भरलेल्या मध्यमवर्गीय ‘ज्यू’ कुटुंबात जन्मलेला ‘हॅन्स’, तर ‘कॉन्राडिन’ हा गढीत राहणारा, अतिश्रीमंत, नऊशे वर्षांचा पराक्रमी झगमगता इतिहास असलेल्या ज्यू द्वेष्ट्या राजघराण्यातील मुलगा. दोघांचे आर्थिक, सामाजिक स्तर वेगळे. हॅन्स विचार स्वातंत्र्य असलेल्या घरातला, तर कॉन्राडिन दुराग्रही, कट्टर उजव्या विचारांच्या घरातील, हॅन्स धर्म चिकित्सक व निरीश्वरवादी तर कॉन्राडिन कट्टर प्रोटेस्टंट पंथी, ईश्वरवादी; परंतु ही मतभिन्नता त्यांच्या मैत्रीवर तसूभरही परिणाम करत नाही. उलट एकमेकांचे विचार जाणून, समजून घेत त्यांची मैत्री अधिक गहिरी, समृद्ध होत जाते. विषय कोणताही असो त्यावर खुली, सखोल चर्चा करण्यात त्यांचे मन रमत असे.
जीवनाचे ध्येय काय?, धर्म, मृत्यू , ग्रह-तारे, प्रभाववाद (impressionism), अभिव्यक्तीवाद (Expressionism) ते पुस्तके, नाटक, कविता, ऑपेरा अशा सर्व प्रांतात ते लीलया भटकंती करीत, ते ही कधी नदी, जंगल, डोंगरमाथा, शहराच्या गल्ल्या, दुर्ग-किल्ले, सराया यांच्या साक्षीनं!

अशा या जादुई मैत्रीला अधूनमधून भावनिक धक्केही बसत, ते देशात चालू असलेल्या राजकीय घडामोडींमुळं. या दोघांचं उण्यापुऱ्या एक वर्षाचं हे मैत्र, त्यांचं भावविश्व समूळ उपटले जाईल, त्यांची ताटातूट होईल, असं त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं.

अखेर दूर दूर वाटत असलेलं, ज्याला ते तात्पुरता आजार समजत होते, ते नाझी वादळ श्टुटगार्टमध्ये येऊन थडकतं. हॅन्सला अमेरिकेत सुरक्षित स्थळी पाठविण्यात येतं. हॅन्सच्या डॉक्टर वडलांची अमाप लोकप्रियता, महापौरांकडून त्यांचा झालेला सन्मान, पहिल्या महायुद्धात त्यांनी देशासाठी गाजवलेलं शौर्य आणि आपण पक्कं जर्मन आहोत, आपली पाळेमुळं इथंच रुजलेली आहेत, ही त्यांची अथक श्रद्धा त्यांना वाचवू शकत नाही.

कॉन्राडिनची हिटलरवर नितांत श्रद्धा व भक्ती आहे. तोच जर्मनीला वाचवू शकेल अन् जर्मनीचं हरपलेलं नैतिक श्रेष्ठत्व परत मिळवू शकेल, असा भाबडा विश्वास कॉन्राडिनला आहे आणि नव्या जर्मनीत ‘चांगला ज्यू’ असलेल्या हॅन्सचं स्वागत करायला तो उत्सुक आहे.

या मित्रांची पुनर्भेट होते का? झाली तर कधी? कशी?

नायकाला ज्यू म्हणून हीन, अस्पृश्य वागणूक मिळालेली आहे, आई-वडिलांना गमवावं लागलेलं आहे, आपला देश, जिवलग मित्र कायमचे सोडून जावं लागलेलं आहे. यामुळं जर्मनांबद्दल नायकाच्या मनात साचलेली कटुता लपविण्याचा लेखकानं अजिबात प्रयत्न केलेला नाही. हिरोईजमच्या आहारी जाण्याची असलेली सगळी शक्यता, मोह नाकारून मानवी स्वभावाला अनुसरून केलेली सच्ची मांडणी अतिशय भावणारी.

शब्दाशब्दांत झळकणारे अनेकविध रंग लेखक चित्रकार आल्याची साक्ष देतात. ओघवती शब्दचित्र शैली व सहजसुंदर मांडणी सिनेमॅटिक मूल्यं असलेली. नदी, डोंगर, बागा, फुलं, फळं, घर, शहर यांची दृष्यमय वर्णनं वाचकाला थेट तिथं नेऊन पोचवतात. मित्रांच्या चर्चेत शब्दबंबाळपणा नाही की, किचकट, बोजड तत्त्वज्ञान नाही. मैत्रीतील भावनिक उतार-चढाव संवेदनशीलतेनं, अलवारपणे हाताळणारी, वाचकाच्या मनाचा पूर्ण ताबा घेणारी, दोन्ही मित्रांच्या विवेकी, समरस, समंजस मैत्रीचा हेवा वाटायला लावणारी आहे ही पुनर्भेट. विद्वेषाचा व श्रेष्ठत्वाचा कैफ क्षणिक असतो; पण तो खोलवर जखमा करतो आणि त्याचे व्रण दीर्घकालीन असतात, या भावनेनं सुन्न करणारी, संपूर्ण ढवळून काढणारी, जीवाला चटका लावणारी आगळीवेगळी ही कादंबरी म्हणजे छोटा पॅकेट, बडा धमाका!

प्रथम १९७१ मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी खरंतर दुर्लक्षित राहिलेली. १९७७ मध्ये ती नामवंत लेखक, पत्रकार ऑर्थर कोस्लरच्या नजरेनं हेरली आणि तिचा ‘उत्कृष्टतेचा छोटा नमुना’ (minor masterpiece) असा गौरव केला आणि मग ती लोकप्रिय ठरली.

अतिशय सोप्या इंग्रजीत लिहिलेल्या या कादंबरीचा डॉ. मुग्धा कर्णिक यांनी केलेला मराठी अनुवादही तितकाच सहजसुंदर. त्यांची दोन पानांची छोटीशी प्रस्तावनाही अत्यंत विचारप्रवृत्त करणारी व विचार मंथनात्मक.

– संगीता नरके

*

रीयुनियन
लेखक : फ्रेड उल्मान
अनुवाद : डॉ. मुग्धा कर्णिक
मधुश्री पब्लिकेशन
२०२०, प्रथम आवृत्ती
१३५ पाने
२०० रु.

*

वाचा
पुस्तक परिचय
कविता
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा

+ posts

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :