आज्जीची गोधडी । पत्र पाचवं

aajjichi-godhadi-patra-5-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-1-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

प्रिय आज्जी,

इथलं वातावरण अजून काही फार बदललेलं नाही. अजूनही ‘फिगर आउट’बद्दल चेष्टा चालू आहेच. तुला पत्र लिहिल्यावर एखादा दिवस जरा मोकळं वाटलं पण मम्मी पप्पांची ‘होतकरू मुलांच्या यशोगाथा’ ही कॅसेट काही दोन तीन दिवसात संपली नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी तर मम्मी म्हणाली की, ‘आम्ही तुमच्या वयाला तुमच्यासारखा फिगर आउट वगैरे करायला वेळ घेतला असता, तर आमचे संसार कसे झाले असते काय माहीत!’ वैताग आलाय गं आज्जी! म्हणजे हे अशी चेष्टा का करतात मी जे काही बोलतो त्याची? मला वाटलं तेच बोललो की मी…

काल मग मी पूर्वाताईला फोन केला आणि घडलेलं सगळं सांगितलं. ती अजूनही म्हणते आहे की मी माझ्या मनाविरुद्ध काही करू नये. कारण मी आज जर दुकानात जाऊन बसायला लागलो तर पप्पा हळूहळू त्याला माझी संमती आहे, असं समजतील आणि नंतर मग मला त्यातून बाहेर पडता येणार नाही. त्याऐवजी मी कौन्सेलिंग करून घ्यावं. मला तिचं म्हणणं पटलंय पण काय सांगायचं त्या कौन्सेलरला तरी? ९८ टक्के आई-वडील असेच असतात.

मम्मी थोडी शांत झाली असेल म्हणून मी तिच्याशी बोलायचाही प्रयत्न केला. मला नोकरी नाही पण काहीतरी वेगळं करायचं आहे, असं मी म्हटलं तर म्हणाली की, ‘वेगळं-बिगळं काय ते सिनेमात करता येतं फक्त आणि जर इतके सगळे लोक नोकरी आणि काम करतायंत त्यात वाईट काही नाहीये तर मग तुलाच असं वेगळं काय करायचंय… नोकरी नको तर पप्पांबरोबर दुकानात जा… बिझी होशील तसं कमी होईल असले विचार डोक्यात यायचं प्रमाण…’ यावर मी काहीच बोललो नाही.

मी अविनाशलाही सगळं सांगितलं तर तो म्हणाला की, ‘मी दुसऱ्या कंपनीत जॉब करून बघावा.’ पण नोकरी म्हटलं की, अजूनही मला धडकीच भरते. त्यामुळं मग मी तो विषय टाळून बघितलेल्या कुठल्यातरी सिनेमाबद्दल बराच वेळ बोलत राहिलो. फोन ठेवताना तो म्हणाला, “चाकोरीबद्ध जगण्याचं, सतत काम करत राहण्याचं व्यसन हा आपल्या पालकांच्या पिढीचा दोष आहे. आपण असं करत नसलो तर गिल्ट वाटायचं काहीच कारण नाही.” हे खरं असलं तरी आपल्या अनेकांच्या बाबतीत तसंच होतं. नाही का? म्हणजे प्रत्येक मागच्या पिढीला वाटतं की नव्या पिढीनं आमच्यासारखं जगावं आणि मग त्यासाठी ते नव्या पिढीला इतका त्रास देत राहतात की, मग नव्या पिढीला प्रयत्न न केल्याचा गिल्ट येत राहतो.

तरी थोडा विचार करून मी पप्पांना म्हटलं की, ‘मी काउंटरवर बसण्याऐवजी होम डिलिव्हरीला सुरुवात करतो.’ तर त्यांचा इगो आड आला; मालकाचा मुलगा घरोघरी माल कसा पोचवेल वगैरे मुद्दे पुढे आले, मग मम्मी पण त्यांच्या बाजूनं झाली आणि मी असंलं काही करणार असेन तर तूर्तास मी घरात बसलो तरी चालेल पण दुकानात नको, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

त्रास होतोय गं आजी सगळ्याचा. कधी सुटणार हे कोडं? विचारशील का तुझ्या गणपतीला?

– वरद

*

वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता

चित्रकथा
कथा


Freelance Translator, Content Writer, Editor at Saarad Majkur | + posts

निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :