आज्जीची गोधडी । पत्र चौथं

aajjichi-godhadi-patra-4-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-1-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

प्रिय आज्जी,

मागची दोन पत्रं जरा उगाचच हेवी होती का गं? मला सारखं वाटत राहिलं की तुला उगाच टेन्शन येईल, तू मस्त जपबीप करत असशील तिकडे आणि माझं आपलं उगाच काहीतरी फिलोसॉफिकल रडगाणं… पण मग मी स्वत:चीच समजूत घातली आणि म्हटलं की, हे म्हणजे काय परीक्षेतलं चार मार्काचं पत्र नव्हे. अगदी इथं असताना जर तू ती पत्रं वाचली असतीस तर म्हणाली असतीस, “वसुधा* काम करते ते घरात मदत म्हणून… तिला वाटतं, जमतंय तोवर करावं, तिला काही सिद्ध करायचं नसतं; असलेली परिस्थिती बदलण्याचा तिचा प्रयत्न असतो तो. तू प्रयत्न केलेस तर तुलाही मिळेल आवडीची नोकरी आणि मग तुलाही मजा येईल काम करायला”
वगैरे… मग मी म्हटलं असतं,
“माझ्या त्या बॉसला भेटली असतीस म्हणजे कळलं असतं.”
तर दोन दिवसांपूर्वी तो कुलकर्ण्यांचा मुलगा नव्या नोकरीचे पेढे देऊन गेला. (हे कुलकर्णी ते त्या कदमांच्या घरात राहायला आलेत. कदमकाका घर विकून मुलाकडे राहायला गेले मुंबईत.) त्याला बघितलं की मला ना हसूच येतं. तो ना मला नाटकी वाटतो अगदी… चहाचा कप सिंकमध्ये ठेवतानाही अगदी “असू दे काकू… मी ठेवतो ना… मी घरात मदत करतो आईला” वगैरे असं बोलतो तो. तो त्याच्या नोकरीचे पेढे देऊन गेला आणि आपल्याकडे मात्र माझ्या नोकरीचा विषय आलाच.

पप्पा म्हटले की, ‘मी त्यांना आता दुकानात मदत करावी. आठवड्यातले दोन-तीन दिवस मी काउंटरवर बसावं.’ मम्मी म्हटली की, ‘जर मला दुकानात बसायचं नसेल तर मी इथंच कुठंतरी छोटीशी नोकरी करावी किंवा ती तिच्या साहेबांशी बोलेल आणि ते मला एखादी नोकरी देतील.’ मी म्हटलं की, ‘मला आत्ता काहीच करावसं वाटत नाहीये. बट आय ॲम ट्राइंग टू फिगर आउट की काय करावं, मला थोडा वेळ द्या…’ हे ऐकून ते दोघं प्रचंड चिडले, मग त्यांनी टिपिकल डायलॉग टाकायला सुरुवात केली…
“आम्ही तुम्हाला एवढं शिकवलं, वाढवलं ते कशासाठी?” इथपासून ते “वडील या वयात एवढे कष्ट करतात त्यांना मदतही करावीशी कशी वाटत नाही तुला?” आणि मग मध्येच मम्मी एकदम “अरे ते फिगर आउट का काय ते करायला वेळ लागला तर लग्न कधी करणार तू… वेळच्यावेळी गोष्टी झालेल्या बऱ्या…” असं म्हटली आणि मग मी तिथून सटकलोच.

तर हे असं आहे… परवा तर मम्मी म्हणाली की, ‘फिगर आउट करून झालं तर चहा घ्यायला ये’ आणि मला हसूच आवरेना आज्जी… इंपॉसिबल आहेत बघ हे दोघं… पण मी आता पूर्वाताईशी बोलतो आणि अविनाशशीही. आम्ही फिगर आउट करू काहीतरी.. डोंट वरी आज्जी… वेळ लागेल पण होईल सगळं व्यवस्थित… मी चुकीचं नाही वागणार… तू नको टेन्शन घेऊ. भेटूच पुढच्या पत्रात…

– वरद

*वसुधा: सुजयची आज्जी

*

वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता

चित्रकथा
कथा


Freelance Translator, Content Writer, Editor at Saarad Majkur | + posts

निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.

3 Comments

  1. पत्रांमधून विचारांचा झालेला प्रवास आवडला. 👌

    1. Thank you, जुईली😊

  2. आज्जीची गोधडी आत्ता रंगत घेत आहे
    रविवारची वाट पाहत…….

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :