लॉकडाऊनचे ग्रहयोग

rohit-murmure-vinodi-lekh-lockdownche-grahayog-corona-lockdown-covid-pandemic-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या (भलत्याच!) मोकळ्या वेळाचा सदुपयोग (?) करून मी ज्या विषयात डॉक्टरेट नाही तरी किमान पदविका (तुमच्या भाषेत डिप्लोमा) मिळवण्याइतपत प्रगती केली आहे. त्या जोतिषशास्त्र या विषयावर मी विवेचन करणार आहे.

ज्योतिष दोन प्रकारचे. एक राशीवरून माणूस ओळखणे आणि दुसरं माणूस बघून त्याची रास ओळखणे. आम्ही दुसऱ्या प्रकारातले. सध्या ‘कोरोना’ या विदेशी विषाणूने हैदोस घातला आहे. लोकांना घरात वनवास भोगायला लावून, खरे वनवासी असणाऱ्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना मात्र खुली सवलत देऊन माणसांवर फार फार मोठा अन्याय केला आहे. खरेतर हा विषाणू जगभरात तांडव करेल, हे सांगायला आमची गरज नव्हती. काही आमच्यासारख्या दूरदर्शी ‘वैज्ञानिकां’नी हा इशारा ३-४ महिने आधीच देऊन ठेवला होता. पण माणसाला स्वतःचं भविष्य बघण्याची जेवढी हौस आहे (खरंतर त्यावरच आमचं चालू आहे.) त्यापेक्षा जास्त दुर्लक्ष तो हे भविष्य वाईट निघाल्यावर करतो. असो. आमचे गुरू श्री. श्री. पुरुषोत्तमशास्त्री हे हयात होते त्या काळी ‘कनिष्ठभगिनीयोग’, ‘वैषम्ययोग’, ‘बुट्टीअधिकारीयोग’ यासारखे योग प्रामुख्यानं आढळून येत असत. या सक्तीच्या सुट्टीत काही नवे ग्रहयोग निर्माण झाले आहेत. सांप्रतकाळी, हेच ग्रहयोग दारोदारी दिसत असून, या योगांची तीव्रता पुढचे काही दिवस तरी वाढणार आहे. (नक्की किती दिवस ते आम्हाला विचारू नये, ज्योतिषालादेखील मर्यादा असते!).

गृहतिष्ठआलस्ययोग
या योगामध्ये माणसाच्या पत्रिकेत जेवढे काही ग्रह आहेत, त्या सगळ्यांची गती एकाएकी मंदावते. या मंदावण्याचा थेट परिणाम माणसाच्या गतीवर होतो आणि माणूस कमालीचा मंदावतो. याचे फलित म्हणजे प्रत्येक कृतीआधी, कृती दरम्यान आणि कृतीनंतर किमानपक्षी एक जांभई तरी येतेच. सकाळी झोपेतून उठल्यावर ह्यांचे आळोखेपिळोखेच अर्धा-एक तास चालू असतात. याशिवाय बसून कुठलीही गोष्ट करताना एक डुलकी लागणारच – पत्ते खेळताना, टी.व्ही. बघताना, सकाळचे काही विधी उरकताना वगैरे वगैरे. कुठलंही काम सांगितलं रे सांगितलं की ह्यांचं एक पेटंट वाक्य येतंच, ‘मला कंटाळा आलाय.’ आलेल्या कंटाळ्याचा पुरावा म्हणून एक मोठ्ठी जांभई ही आलीच. अहो ‘अशी ही बनवाबनवी’ बघताना जांभई देत डुलक्या देणारी ही माणसं आहेत. या योगापासून वाचण्याचा उपाय एकच – अशा माणसापासून दूर राहणं. कारण हा योग कोरोनापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.

अणुसाखळीयोग
या योगाची लक्षणं आणि फलितं ‘गृहतिष्ठआलस्ययोगा’च्या एकदम उलटी आहेत. या माणसांच्या अंगात पोखरणमध्ये केलेल्या अणुस्फोटाएवढी उर्जा असते. पण या उर्जेचा वापर नेमका कुठं करावा, हे मात्र ह्यांना समजत नाही. लसूण निवडण्याचं जे काम ‘गृहतिष्ठआलस्ययोगा’ची माणसं तासभर घोळवत बसतात, तेच काम हे दहा मिनिटात करून वर वरणात त्याची फोडणी टाकून मोकळे. इथंच त्यांचं सारं गणित चुकतं. कारण तो लसूण हा फोडणीसाठी न वापरता मटणाच्या मसाल्यात घालायचा असतो. अशी माणसं सकाळी व्यायाम करतात, मग त्या केलेल्या व्यायामाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकतात. मा. पंतप्रधानांनी संध्याकाळी ५ वाजता घरात राहून थाळी वाजवायला सांगितली की बाहेर १००-१५० जणांना घेऊन ढोल-ताशासकट मिरवणूक काढतात. काही वेळेपुरती पणत्या लावून ठेवायला सांगितलं की सोसायटीच्या आवारात होळी करतात. मा. अलकाताईंचे ‘सौभाग्यवस्तूभांडार’छाप चित्रपट (म्हणजे अमक्याचं कुंकू, तमक्याची कृपा वगैरे) मोठ्या भक्तिभावानं बघतात. या योगापासून वाचण्याचाही एकच उपाय आहे – साफ दुर्लक्ष करणं. कारण त्याशिवाय आणि या लोकांचे पराक्रम केवळ बघत राहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय आपल्या हाती उरत नाही.

जीर्ण छायाचित्रयोग
या योगाची लक्षणं असणाऱ्या माणसांच्या नशिबी घरातलं केवळ एकच काम येतं, ते म्हणजे सफाईचं. महत्त्वाचं म्हणजे जे ते कधीही पूर्ण करत नाहीत. कारण प्रत्येक सफाईच्या वेळी ह्यांना त्यांचा कधीकाळी हरवलेला अल्बम सापडतो. इतकी वर्षं तो अल्बम डोळ्यासमोर असूनसुद्धा कधीच दिसत नाही. नेमका वरचा माळा झाडताना झाडूच्या पहिल्या फटकाऱ्यातच अल्बम खाली पडतो आणि ह्यांचं सफाईचं कामं तिथंच संपतं. मग कुतूहलापोटी तो अल्बम चाळला जातो आणि नेमका पहिली-दुसरीतल्या स्नेहसंमेलनाचा फोटो सापडतो. मग पाहणारी स्त्री असेल तर ‘अय्या, किती बारीक होते गं मी!’ किंवा ‘कित्ती गोऽऽड मेक-अप केलाय माझा!’ असे उद्गार निघतात. त्या फोटोंचे फोटो मोबाईलमध्ये येतात आणि हजारो वर्षांपासून ओस पडलेल्या प्राथमिक शाळेच्या ग्रुपवर पाठवला जातो. मग एक-दोन दिवसात त्या ग्रुपवर चक्क संवाद सुरू होतात.

हा योग पुरुष जमातीमध्ये सहसा येत नाही. कारण तसे फोटो काढण्यासारखं काम त्याला अशा कार्यक्रमांमध्ये मिळतच नाही. आलाच तर फोटो बघून आधी त्याला गलबलून येतं, नंतर स्वतःच्या अवस्थेची (म्हणजे सुटलेलं पोट, वेडेवाकडे दात वगैरे वगैरे) लाज वाटते आणि मग तो ते दुःख शमवण्यासाठी संध्याकाळी मित्रांना फोन लावतो. ग्रह फारच चांगल्या अवस्थेत असतील तर तो मित्र फोन उचलून चांगल्या गप्पाही मारतो. हा योग प्रस्तुत लेखकाला आणि समस्त जनतेलाही सुखावणारा असल्यानं यावर काही उपाय शोधून काढण्याची गरज नाही. अर्थात जर तुमचा भूतकाळ जर तेवढा अंध:कारमय असेल तर त्याला ज्योतिषही काही करू शकत नाही (लक्षात घ्या, आमचं काम भविष्य वर्तवण्याचं आहे; भूतकाळ उकरून काढायचं नाही.)

बाल्य छायाचित्रयोग
हा ‘जीर्णछायाचित्रयोगा’चाच एक छोटा उपप्रकार आहे. मात्र इथं स्वतःचा बारश्यात किंवा पहिल्या वाढदिवशी काढलेला फोटो सापडतो. फोटो जर ‘क्युट’ जमातीमधला असेल तर तो प्रसिद्धही केला जातो आणि नसेल तर तो पुन्हा त्या अडगळीत घुसडला जातो.

सदैव कर्मयोग
हा योग जरा गंभीर स्वरूपाचा आहे (जरा नाही, बराच). सध्या हा ग्रहयोग डॉक्टर, नर्स, पोलीस, पाणीपुरवठा करणारे, वीजपुरवठा करणारे, विषाणूशास्त्रज्ञ, पॅथॉलॉजी लॅब चालवणारे आणि त्यांचे कुटुंबीय ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. या योगाची लक्षणं गंभीर आहेत; पण हा योग संपल्यावर मात्र ह्यांना देवत्व प्राप्त होतं. या माणसांना सतत मनस्तापाला सामोरं जावं लागते. समोरचा नियम मोडणारा माणूस स्वतःलाच मारतोय, हे सतत जाहीर करूनही ह्यांना आराम नाही. स्वतःच्या आरोग्याकडे, कुटुंबीयांकडे लक्ष द्यायला ह्यांना वेळ नाही, कारण ह्यांना स्वतःच्या कर्तव्यापुढं कशाचीही जाणीव नाही. बरं, ह्यांनी कितीही मन लावून काम केलं तरी लोकांच्या हिशेबी ह्यांना काहीच किंमत नाही. ह्याचं एकच कारण – आमच्या स्वातंत्र्यावर हे गदा आणत आहेत. पण या लोकांवर अशी टीका करणाऱ्या लोकांना हे कळत नाही की हीच स्वातंत्र्याची गदा ह्यांच्याच टाळक्यात बसून स्वतःचा जीव जाईल. योगावर प्रार्थनेशिवाय सध्यातरी काही उपाय नाही.

सौंदर्य संपर्कयोग
या योगात एकेकाळी आपली विशेष आस्था असलेला किंवा असलेली व्यक्ती अचानक आपल्या संपर्कात येतो किंवा येते आणि आपण भूतकाळातल्या त्या सुंदर आणि सोनेरी क्षणांमध्ये हरवून जातो. त्या क्षणांना स्मरून पुन्हा ती व्यक्ती आपल्याला लॉकडाऊननंतर भेटायला तयारही होते; पण तेव्हा लगेच लक्षात येतं की आपण पुण्या-मुंबईत राहतोय आणि ती व्यक्ती परदेशात. हे लक्षात आल्याबरोबर भेटण्याचा बेत तातडीनं रद्द केला जातो आणि केवळ व्हिडिओ कॉलवर भागवलं जातं.

दंडुकायोग
हा योग सध्या तरुणाईमध्ये जास्त दिसून येतो. या योगाच्या माणसांना कोणत्याही प्रकारचे नियम, कायदे बांधून ठेवू शकत नाहीत असं ह्यांनाच वाटतं. त्याची लक्षणं म्हणजे काहीही कारण नसताना रस्त्यावर फिरणं, मॉर्निंग वॉकच्या नावाखाली नाक्यावर तंबाखूची पुडी आणायला जाणं, गल्लीगल्लीत कट्टे तयार करून गप्पा मारत बसणं. या योगाचं फलित मात्र एकच आहे – शरीराच्या मागच्या बाजूवर (उभ्या नकाश्याच्या हिशोबात) उत्तर ते दक्षिण भागात कुठंही दंडुक्याचे रट्टे खाणं. म्हणूनच पोलिसांमध्ये हा योग खासकरून लोकप्रिय आहे. कारण ‘सदैवकर्मयोगा’मुळं आलेला मनस्ताप मनसोक्तपणे बाहेर काढता येतो. या योगावरही कोणताच उपाय उपलब्ध नाही – ज्याचं त्याचं नशीब!!

अशा रीतीनं लॉकडाऊनच्या काळात उत्पन्न झालेल्या काही नवीन ग्रहयोगाचे आमच्या कुवतीप्रमाणं आम्ही विस्तृत विवेचन केलं आहे. याविषयी अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करून नये. कारण आमच्या नशिबी तो योग नाही.

लेखक: रोहित शाम मुरमुरे

*

वाचा
विनोदी
राजेश दाभोळकर यांचे इतर लेख
‘महाडचे दिवस’
(कादंबरी)
कथा
कविता


+ posts

रोहित ब्लॉगर असून सध्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शास्त्र शाखेत द्वितीय वर्षात शिकत आहे.

1 Comment

  1. व्वा, मस्तच लेखन!! आम्हा वाचकांना हा ‘ बहारदार वाचन योग ‘ बहाल केल्या बद्दल धन्यवाद !!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :