पत्र : पहिलं

godhadi-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-1-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-andrew-dunstan-unsplash

प्रिय आज्जी,

काल रात्री आयपीएलमधली माझी आवडती टीम मॅच हरली आणि मला खूप वाईट वाटलं. रडू आलं नाही, पण तेव्हापासून मला कुणाशीही बोलावंसं वाटलंच नाही. या सगळ्यात मध्येच एकदम तू आठवलीस आणि तू जवळ नसण्याच्या जाणीवेने अधिकच त्रास झाला.

२००३ साली वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आपण हरलो आणि त्यावेळी ९ वर्षाचा असलेला मी खूप रडलो. त्या रात्री विनायक दादा, पूर्वा ताई आणि घरातले सगळे माझी खूप चेष्टा करत होते. मी जेवायला तयार नव्हतो आणि मम्मी मला ओरडत होती. मी रडत होतो. या सगळ्यात तू कुठून तरी स्वत: कालवलेला दही-दुध भात घेऊन माझ्यासमोर आलीस आणि मला तुझ्या खोलीत घेऊन गेलीस. मी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, रिकी पॉंटिंग या सगळ्यांबद्दल तक्रार करत असताना एका बाजूने दही दूध भात भरवत राहिलीस. हुंदके देत देत तो मी खाल्ला आणि पोट भरल्यावर भारत हरला हे विसरलो बहुदा. रडून दमलो होतो, त्यामुळे तुझ्याच कॉटवर झोपलो.

हल्ली विनायक दादा माझ्याशी फारसा बोलत नाही. मम्मी-पप्पा तर आयपीएल बघतच नाहीत. पूर्वा ताई चैतन्यच्या मागे असते. तो आता सहा महिन्याचा होत आला. मी वेळ घालवण्यासाठी आयपीएल बघतो. तरी आज सीएसके म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज हरल्यावर मला खूप वाईट वाटलं.

मला माहिती आहे की माझ्या वयाला मॅच हरल्याचं दुःख होणं थोडं बालिश आहे; पण खरं सांगू का आज्जी, त्यांच्या हरण्याचं निमित्त झालं खरंतर. पण त्याने माझ्या आत दडून बसलेल्या, धुमसत असलेल्या, झगडत असलेल्या मला डिवचलं. २६ वयाला, उगाचच छोट्या गोष्टींनी मनात दडलेलं मोठं दुःख जागृत होतं. आणि मग त्यावर तुझ्या दहीभातासारखं सोप्पं सोल्युशन शोधत राहतं, अजून “आपण २६ वर्षाचे आहोत” हे नाकारणारं माझं मन…

सहा-सात महिने झाले मी पुण्यातून नोकरी सोडून आलो त्याला. कुणीतरी इथेच नोकरी द्यावी म्हणून मम्मी पप्पा प्रयत्न करत राहतात आणि मी त्यांनी सांगितलेली नोकरी करणार नाही म्हणतो आणि मग दोन दिवस खूप भांडणं आणि राडा होतो. आता मी तुझ्या खोलीत झोपतो. मला कुणाशीच बोलावंसं वाटत नाही, काहीच करावसं वाटत नाही. मला आतून थंड पडल्यासारखं वाटतं. डाऊनलोड करुन सिनेमे बघत राहतो फक्त. माझं सिनेमाचं वेड काही कमी झालेलं नाही.

मागच्या महिन्यात पूर्वा ताईने तिच्या ओळखीच्या एका काउन्सेलरशी भेट घालून देण्याचा प्रयत्न केला. मी नको म्हटलं. त्या बाई काहीही बोलल्या तरी आतला रिक्तपणा, थंडपणा कमी होणार नाही, याची मला कल्पना आहे. तेच काही ऐकायचंय… मग पूर्वा ताई म्हणाली मी कुणाशी तरी बोलावं, पण तसं डोळ्यासमोर कुणीच आलं नाही. मी अश्विनीला काहीच सांगितलं नाहीये. तिला वाईट वाटेल उगाच. तिला पुण्यात नोकरी मिळालीय त्या आनंदात आहे ती.

खूप बोलायचंय आज्जी… स्वत:चीही तक्रार करायचीय… पत्र मिळालं की तुझ्या गणपतीची परवानगी घेऊन ये… मला वाटतं की तुला मी अशी पत्र लिहीन मध्ये मध्ये आणि मग तू येशील कधी तरी…

– वरद


लेखक: निखिल घाणेकर

*

वाचा
कविता

चित्रकथा
चित्रपटविषयक लेख
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची


Freelance Translator, Content Writer, Editor at Saarad Majkur | + posts

निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :