१९६५ साल. कन्या शाळेसमोर एका वाड्यात माझ्या मित्राकडं खेळायला गेलो. त्या वाड्यात ना. ग. करमरकर नावाचे दिग्दर्शक राहत होते. खेळून दमल्यावर त्यांच्याकडं पाणी पीत होतो. अचानक त्यांनी विचारलं की बालनाट्यात काम करशील का? भारत गायन समाज इथं संध्याकाळी आम्ही तालमीसाठी जमतो.
मी गेलो. माझा रोल केवळ तीन मिनिटांचा आणि पाच वाक्यांचा. मला नवीन मराठी शाळेतील तो दिलेला छोटा रोल आणि त्यातून काढून टाकल्याच्या वेदना आठवल्या. आताही तसंच झालं तर? मी आतून घरी पोचलो होतो. खाली मान घालून बसलेल्या मला एका चाळीशीच्या बाईंनी हलवलं आणि म्हटलं,
“अरे उठ, ना. ग. बोलावतायत ना तुला.” (त्या बाई भारती गोसावी होत्या.)
मी जड पावलांनी उठलो. शाळेतील वेदना झिडकारली आणि पदरी पडलेलं पात्र आपलंसं केलं. तीन मिनिटांची पाच वाक्यं बोलून झाली आणि दोनतीन जणांचे टाळ्यांचे आवाज ऐकले. माझ्याकडून तो रोल काढून घेण्यात आला होता आणि त्याहून मोठा रोल देण्यात आला.
जवळपास तीन आठवडे मी तालमींना जात होतो. माझा नवा रोल वीस मिनिटांचा, बारा वाक्यांचा आणि ढीगभर अभिनय पैलू दाखविण्याचा होता. मी एक वाया गेलेला प्रतिष्ठिताचा मुलगा होतो. हा मुलगा लहानमोठं न पहाता उद्दामपणे वागणारा होता. मिळणारा पॉकेट मनी जुगार सदृश गोष्टीत उधळून टाकणारा होता. करायचा अभ्यास दप्तरातल्या कोऱ्या राहिलेल्या पुस्तकात कोंबणारा होता.
माझा संघर्ष होता तो गावातील एका सालस मुलाशी. ज्याचं आठवड्यातलं एखादं जेवण परिस्थितीनं हुकत होतं, पण त्याचा अभ्यास वेळच्यावेळी होत होता. त्याचा पूर्ण दिवस ‘श्याम’चे संस्कार दाखवण्यात जात होता. याचे वडील साखर कारखान्यात मजूर पुढारी होते आणि माझे वडील त्याचे चेअरमन. या दोन वडिलांमध्ये सत्तासंघर्ष होता आणि त्यातले वैर उगाचच पुढच्या पिढीत पोचलेलं होतं. इतक्या गंभीर विषयाला लेखक बालनाट्य म्हणत होते.
यातला गमतीचा भाग असा होता की मी नारायणपेठी संस्कृतीत वाढलेला असून मला दुराचारी पात्र रंगवायचं होतं. तर सदाचारी पात्र रंगवणारा मुलगा पूर्व पुणं आणि कॅम्प पुणं याच्या दरम्यान वास्तव्य असणारा. त्या वयातही तो मटका आणि धूम्रपान करत असे.
शाळेच्या वर्गातून मुलं घरी जाण्यासाठी बाहेर पडतात, असं दृश्य होतं. तालमीच्या वेळी आम्ही चांगली मुलं आहोत हे दाखविण्याच्या हव्यासापोटी सगळे रांगेत बाहेर पडले. ना. ग. काका म्हणाले,
“तुम्ही मुलं असून तुम्हाला मुलांची मानसिकता समजत नाही. मुलं बाहेर पडताना गोलाकार वळणं घेत बाहेर पडतात.”
य. शं. गोडबोले सर हे मास्तरकी करून आम्हाला अभिनय शिकवणारे होते, तर ना. ग. काका आम्हाला ठाऊक नसलेला अभिनय गुण आमच्या नकळत काढून घेत होते. मी ज्यात काम करत होतो, त्या नाटकाचं नाव ‘पायाचे दगड’ होतं. त्याच लेखकांचं दुसरं नाटकही बसवलं जात होतं, त्यात स्मिता ओक (त्यावेळची करंदीकर) काम करत होती. म्हणजे मी त्यावेळी नाव असलेल्या भारती गोसावी आणि पुढं नाव झालेल्या स्मिता ओक यांच्या सहवासात होतो.
नाटकाचे दोन प्रयोग गोखले हॉल इथं झाले. वर्तमानपत्रांनी या प्रयोगांची आणि माझ्या अभिनयाची दखल घेतली.
माझ्याबरोबरच्या मुलांना मानधन नाही मिळालं, पण मला मिळालं. प्रयोगादरम्यान मी साकारत असलेलं पात्र जुगारी आहे हे ठसवण्यासाठी मला एक खेळ दिला होता. सुटी नाणी मी जमिनीवर टाकतो आणि हातातील गोटीनी त्यांचा वेध घेतो. माझे इतर भिडू त्यांचा नेम मुद्दाम चुकवत होते आणि माझा नेम चुकला तरी ते प्रेक्षकांच्या लक्षात यायच्या आत गलका करून मी जिंकलोय हे कबूल करायचे. खेळ संपल्यावर मी नाणी गोळा केली आणि ती खिशात तशीच राहिली. प्रयोगाच्या वेळी ही नाणी मला ना. ग. काकांनी दिली होती. दोन दिवसांनी मी ती परत करायला गेलो तेव्हा माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले,
“तू काम छान केल्यामुळं नाटक उठावदार झालं. राहू देत हे पैसे.. तुझं मानधन समज.”
मी पैसे मोजले, ते त्र्याण्णव पैसे होते. आमच्या शाळेच्या कॅंटीनमध्ये बटाटेवडा सात पैशाला मिळत होता.
*
वाचा
विंगेतून : दीपक पारखी
‘महाडचे दिवस’ (कादंबरी) – दीपक पारखी
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखक दीपक पारखी कथा, कादंबरी, नाटक, स्फुटलेखन व वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन करतात. आजच्या नंतर उद्याच्या आधी, बिन सावलीचं झाड, पोरकी रात्र भागीले दोन, सी मोअर..., शिदोरी स्व विकासाची ही त्यांची प्रकाशित पुस्तके. महाडचे दिवस ही कादंबरी व एक नाटक तीन एकांकिका हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.