प्रिय आज्जी,
मी मम्मीला विचारलं परवा, की ‘पप्पांचा चेहरा असा का असतो? तुला त्रास होतो का?’ ती म्हणाली, ‘त्रास कसला त्यात? आपल्याला त्रास होतो म्हणून आपल्याला त्यांचा चेहरा बदलून कुणी देणारे का?’ आणि मग एकदम ती म्हणाली की, ‘घरात अशी परिस्थिती असताना त्यांनी काय करावं असं वाटतं तुला? हसावं, नाचावं का आपली दोन मुलं यशस्वी झाली याबद्दल सतत आनंदी राहून आपला एक मुलगा आळशी असून तो बेरोजगार आहे याबद्दल काहीच वाटून घेऊ नये. काय करावं त्यांनी?’ मग मी काहीच बोललो नाहीपण मला खूप वाईट वाटलं, स्वत:चाच राग आला. मी अविनाशला फोन केला आणि त्याने मागे सुचवलेल्या कंपनीत अजून जॉब आहे का ते त्याला विचारायला सांगितलं. माझा सीव्ही अजून एक दोन ठिकाणी अपलोड केला.
दुपारी अविनाशचा फोन आला आणि त्या कंपनीतून मला एक-दोन दिवसात फोन येईल, असं त्यानं सांगितलं. मी मम्मीला सांगितलं आणि तिलाही बरं वाटलं. मी संध्याकाळी अश्विनीला भेटलो. तिची नोकरी कन्फर्म झाल्यापासून आम्ही भेटलोच नव्हतो. माधव काका आणि मानसी काकू पण आनंदात आहेत. तिनं मला विचारलं की नोकरी करण्याची मला इतकी भीती का वाटते, तिला काय नक्की उत्तर द्यावं याचा विचार करता-करताच अचानक पाऊस पडायला लागला आणि नेहमीप्रमाणं लाईट गेले. आणि एकदम तिच्या प्रश्नाशी संबंधित एक जुना प्रसंग मला आठवला. आता तुला आठवत असेल का ते माहिती नाही.
लहानपणी मला अंधाराची खूप भीती वाटायची ना तर मम्मी-पप्पा नसताना असंच एकदा पाऊस पडत होता, लाईट गेलेच होते. विनायक दादानं मला एका खोलीत ढकललं आणि कडी लावून घेतली. पूर्वा ताई कडी काढायला आली तर तिला त्यानं डायलॉग टाकला, ‘त्याला अंधाराची भीती घालवायची असेल तर त्याला त्या भीतीचा सामना केला पाहिजे.’ तेव्हा तो अकरावीत आणि मी चौथीत होतो बहुधा. मी दाराआडून सगळं ऐकत होतो. मला काही फार कळत नव्हतं. कुठून तरी तू आलीस आणि कडी उघडून त्या अंधारात मला जवळ घेतलंस. तू काहीच बोलली नाहीस. एक पाच मिनिटानं आपण खोलीबाहेर आलो.
अश्विनीच्या प्रश्नाला उत्तर म्हणून मला तिला सांगायचं होतं की, नोकरी म्हणजे अशा एका अंधाऱ्या खोलीत कुणीतरी आपल्याला डांबून ठेवलं आहे, असं वाटतं आणि लहानपणी जशी आज्जी मला शांतपणे त्या अंधाऱ्या खोलीतून घेऊन बाहेर आली, तसं कुणीतरी आता येणार नाही असं वाटतं. मी अश्विनीला यातलं काहीच सांगितलं नाही. पण माझ्या एकूणच शांततेमुळं तिच्या चेहऱ्यावर आलेली निराशा मला कळल्यावर ‘मी आता पुढच्या इंटरव्यूची तयारी करणार आहे’ असं म्हटलं आणि विषय टाळला. तुझ्यानंतर माझ्या वागण्यानं कुणी निराश झाल्याचा मला त्रास होत असेल तर ती म्हणजे अश्विनी त्यामुळं मी आता तयारी करेन. तुम्हाला दोघींनाही निराश न करण्याचा प्रयत्न करेन… काय होईल ते कळवेनच.
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.