आज्जीची गोधडी । पत्र सहावं

aajjichi-godhadi-patra-6-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-1-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

प्रिय आज्जी,

अजूनही या ना त्या कारणाने ‘फिगर आउट’ आणि माझी नोकरी यावर वाद, विवाद आणि विनोद चालूच आहेत. म्हणजे पप्पा तसं फार काही बोलत नाहीत; पण मम्मी एक संधी सोडत नाही. ती हरप्रकारे मी कसं काही करत नाही, हे मला जाणवून देत असते. कुलकर्ण्यांच्या मुलाचं कौतुक अजून चालू आहेच. अश्विनीला नोकरी लागल्याचं कळल्यापासून ‘आता तिचं लग्न लवकर होईल’, ‘मुलगी गुणी आहेच, त्यामुळं कुणीतरी चांगला, कर्ता मुलगा मिळेल’ वगैरे डायलॉग चालू आहेतच; पण मी काहीच बोलत नाही. दोन कान दिलेत त्याचा पूर्ण वापर करतो. अश्विनी आणि माझ्या रिलेशनशिपबद्दल मी तिला अजून काही सांगितलं नाहीये.

पप्पांचा चेहरा सतत इतका कोरडा असतो की त्यांच्याकडे कधीही पाहिलं तरी असं वाटतं, की आपण आत्ता केलेली गोष्ट यांना पटलेली नाही. म्हणजे त्यादिवशी मी मम्मीला एक जोक सांगितला, तेही त्याच खोलीत बसले होते. जोक काही फार खास नव्हता हे मान्य; पण त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. काही लोकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, की आपण त्यांना या ना त्या कारणानं निराश केलं आहे; अशी भावना आपल्याच मनात निर्माण होते आणि मग माणूस स्वत:कडे उगाचच एका शंकेनं पाहू लागतो. ‘कशाचाही परिणाम चेहऱ्यावर कसा दाखवायचा नाही’ यावर पप्पा एखादं पुस्तक नक्कीच लिहू शकतील. त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी भाव दिसतील या अपेक्षेनं म्हणून मी एक-दोन दिवस काउंटरवर जाऊन बसलो; पण फार काही फरक पडला नाही. तिसऱ्या दिवशी मी ‘येत नाहीये’ असं म्हटलं तर मम्मीच रागावली; पण ते काही न बोलता निघून गेले. गंमत म्हणजे आता मला ते माझ्या लहानपणी कसे होते; हसायचे का; कशामुळं ते इतके निरुत्साही झाले असतील वगैरे असे प्रश्न पडत नाहीत किंवा त्यांचा छान आनंदी, हसरा चेहराही आठवत नाही. आता वाटतं ते असाच निर्विकार आणि थंड चेहरा घेऊन जन्मले असतील. खरं आहे का हे आज्जी?

तर मम्मीचं सततचं बोलणं ऐकत आणि ते समोर असताना पप्पांचा शांत, निर्विकार चेहरा पाहत माझा दिवस जातो. एक प्रयत्न म्हणून मी अविनाशबरोबर मयुरीलाही जॉबसाठी सांगून ठेवलं आहे. मी मयुरीशी बोललो. तिला बहुधा माझी सगळी अस्वस्थता समजते आहे. ती पटकन म्हणाली, ‘आत्ता तुझी आज्जी असती तर जरा सोपं गेलं असतं; नाही का?’ तिला काय उत्तर द्यावं तेच मला कळलं नाही. मी हसलो थोडासा पण तेवढ्यात पप्पांनी माझ्याकडे बघितलं आणि बेरोजगार असताना असं हसल्याचा गिल्ट आला. तू असतीस तर मला हे सगळं कितपत सोपं गेलं असतं माहीत नाही, पण तुझ्या असण्याने पप्पांच्या या कोरडेपणाचा कदाचित कमी त्रास झाला असता… नोकरीचं काय ते कळवतो पुढच्या पत्रात…

– वरद      

*

वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता

चित्रकथा
कथा


Freelance Translator, Content Writer, Editor at Saarad Majkur | + posts

निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :