नाटक आणि त्याचे माझ्या व्यक्तिमत्वावर झालेले परिणाम: ५

wingetun-deepak-parakhi-chitrakshare-natak-ani-tyache-majhya-vyaktimatvavar-jhalele-parinam-5

१९६४ साल असावं. मी सातवीत. राज्यनाट्य स्पर्धेचं वारं सुटलेलं. प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन उर्फ पीडीए ही मा. भालबा केळकर अध्यक्ष असलेली संस्था स्पर्धेमध्ये सातत्यानं दर्जेदार नाटकं सादर करीत होती. अशा संस्थेमार्फत आपण लिहिलेलं नाटक व्हावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. यासाठी त्यांनी ‘कोरीव लेणी’ हे सामाजिक नाटक भालबांना वाचायला दिलं होतं. त्या नाटकाला प्राथमिक पसंती मिळाली असल्यानं ते रंगमंचावर येण्याच्या दृष्टीनं त्यावर काही संस्कार होणं गरजेचं होतं. यासाठी वडिलांना चर्चेसाठी भालबांनी महाराष्ट्र मंडळाच्या खुल्या रंगमंदिरात बोलावलं होतं. तिथं पीडीए मार्फत ‘वेड्याचं घर उन्हात’ या नाटकाचा प्रयोग होता. हे नाटक भालबांनी दिग्दर्शित केलं होतं आणि त्यात भूमिकाही केली होती. दोन अंकांच्या मध्यंतर काळात आणि भालबांची रंगमंचावर उपस्थिती नसण्याच्या काळात पारखी आपण तुमच्या नाटकावर बोलू असं त्यांनी वडिलांना सांगितलं होतं. याकरिता वडील तिकडं निघाले होते, तेव्हा मलाही घेऊन गेले. मी उत्साहानं गेलो.

रंगमंदिरात पोचलो तेव्हा पहिल्या अंकाला नुकतीच सुरुवात झाली होती. वडिलांनी मला म्हटलं,
“मी भालबा काकांशी बोलत बसणार आहे. तू नाटक बघत बस. तू बाहेर खुर्चीवर बसून बघणार आहेस का विंगेतून उभा राहून पाहशील?”
मी क्षणभर विचार केला आणि म्हटलं,
“विंगेतून. त्यामुळं मला सगळ्यांचे चेहऱ्यावरील हावभाव जवळून बघता येतील.”

मी विंगेत उभा. समोर रंगमंचावर डॉक्टर श्रीराम लागू. नाटकाच्या कथानकात थोरला भाऊ भालबा होते आणि धाकटा भाऊ डॉक्टर लागू. कौटुंबिक वादामुळे थोरल्या भावाच्या डोक्यावर परिणाम होऊन तो परागंदा होतो. या गोष्टीची अपराधी भावना धाकट्या भावाच्या मनात सतत असते. यामुळं धाकट्या भावाला घरामध्ये कायम थोरल्या भावाच्या अस्तित्वाचे भास होत असतात.

रंगमंचावर जो प्रसंग चालू होता, त्यात एकटा धाकटा भाऊ म्हणजे डॉक्टर लागू असतात. त्यांना भिंती, दारं आणि खिडक्यांमधे थोरला भाऊ भासातून दिसत राहतो. डॉक्टर सतत त्या भावाचा वेध घेत असताना पूर्ण नेपथ्यावर आपली घारी, निळी नजर फिरवत राहतात. ती धारदार नजर फिरत फिरत मी उभा होतो, त्या विंगेवर स्थिरावली. मला त्या नजरेची प्रचंड भीती वाटली. नंतर ती नजर दुसरीकडं वळाली, पण काही सेकंदात ती पुन्हा माझ्यावर आली. आता मात्र मला त्या नजरेचा अर्थ कळाला. मला ते विचारत होते की तू इथं का उभा आहेस? काका माझ्यावर खूप संतापलेत, या कल्पनेनं मी थरथर कापायला लागलो. माझ्या तोंडातून रडका आवाज निघणार, इतक्यात कुणीतरी मला उचलून बाजूला केलं. ते श्रीधर राजगुरू होते.

डॉक्टर लागूंच्या नजरेचा धसका बराच काळ मी घेतला होता.

साधारणपणे २००० साल असावं. गरवारे महाविद्यालयात मा. अविनाश धर्माधिकारी यांचं ‘मला उमजलेले महात्मा गांधी’ या विषयावर व्याख्यान होतं. मी तिथं पोचलो तेव्हा साऱ्या खुर्च्या भरून गेल्या होत्या. यामुळं पहिल्या रांगेच्या पुढं सतरंजी अंथरली होती. मी सतरंजीवर बसलो आणि कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी इकडंतिकडं पहात होतो. माझ्या मागं खुर्चीवर साक्षात डॉक्टर लागू बसले होते. मी त्यांच्या पायाशी बसलो होतो. त्यांच्या पायाच्या चवड्याचा ओझरता स्पर्श माझ्या पाठीला व्हावा यासाठी आसुसलो होतो. धर्माधिकारी यांच्या मुखातून समोर एक महात्मा उलगडत होता आणि मागे एक सुखात्म व्यक्तिमत्व आपल्या घाऱ्या डोळ्यातून अविनाश काय सांगतोय याचा वेध घेत होतं.

*

वाचा
विंगेतून : दीपक पारखी
‘महाडचे दिवस’ (कादंबरी) – दीपक पारखी
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखक दीपक पारखी कथा, कादंबरी, नाटक, स्फुटलेखन व वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन करतात. आजच्या नंतर उद्याच्या आधी, बिन सावलीचं झाड, पोरकी रात्र भागीले दोन, सी मोअर..., शिदोरी स्व विकासाची ही त्यांची प्रकाशित पुस्तके. महाडचे दिवस ही कादंबरी व एक नाटक तीन एकांकिका हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :