प्रिय आज्जी,
मागच्या पत्रात म्हटल्याप्रमाणं अविनाशनं सांगितलेल्या कंपनीतून दोन दिवसांतच फोन आला. आता एक-दोन दिवसात इंटरव्यू आहे. माझा जॉबचा इंटरव्यू आहे म्हटल्यावर पप्पांचा चेहरा सोडून सगळ्या गोष्टी हळूहळू बदलल्या आहेत. ‘फिगर आउट’बद्दलचे विनोद, कुलकर्ण्यांच्या मुलाचं कौतुक, माझा मोबाईलचा इतरवेळी खटकणारा अतिवापर हे सगळं तात्पुरतं बंद झालं आहे. मम्मीला तर मला नोकरी मिळेलच याची खात्री आहे. नुसत्या इंटरव्यू या शब्दानं एवढा चमत्कार घडू शकतो, हे मी पहिल्यांदाच पाहतो आहे. म्हणजे याआधीही हे सगळं झालं असेल, पण तेव्हा मी पुण्यात होतो.
अविनाशला मी फोन आल्याचं सांगितलं तर मला म्हणाला, ‘वेल डन भाई. आता माती खाऊ नका.’ बाकी वेळी अगदी समजूतदार आणि फिलोसॉफिकल डायलॉग टाकणारा हा मुलगा एकदम भाई वगैरे म्हटल्यावर मला मजाच वाटली. तो म्हणाला की, ‘काही प्रश्न विचारले तर उत्तरं तयार करून ठेव. इंटरव्यूच्या वेळी तू नेहमी देतोस तसली अगदी प्रामाणिक उत्तरं चालतातच असं नाही. थोडी विश्वास बसेल अशी स्टोरी बनव, या सहा महिन्यात काय केलंस त्याची… व्हॅल्यू अॅडिशन म्हणून एखादं सॉफ्टवेअर शिकून घेतलं ऑनलाईन असं सांग.’ तो बराच वेळ काही ना काही टिप्स देत राहिला आणि मी ऐकत राहिलो. पण मला ते सारं फार काही पटत नाहीये; पण आजूबाजूला बदललेलं वातावरण आणि मला रातोरात मिळालेला सुपरस्टार स्टेटस गमवायचा नसेल तर थोडं खोटं बोलावं लागेल असं वाटतंय.
मला या दोन-तीन दिवसात असं रिअलाईझ झालंय की, आपल्यासारख्या कुटुंबामधे आणि मम्मी-पप्पांच्या आणि काही प्रमाणात तुमच्याही पिढीला स्थैर्य या गोष्टीचं फिक्सेशन आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी सेटल व्हायला पाहिजे लवकरात लवकर. तशी शक्यता दिसली तरी तुम्ही लोक किती खूश होता. तसं नाही झालं तर काही तरी चुकतंय. स्थैर्य आलं की सुख, समाधान, शांतता येते असं वाटतं. तुमचं व्यावहारिकदृष्ट्या बरोबर असलं तरी आमच्या पिढीचा अनुभव असा आहे की स्थैर्य नवे प्रश्न आणि समस्या घेऊन येतं आणि मग ते सोडवायचे आणि स्थैर्य पण टिकवायचं यात दमछाक होते. आम्हाला असं दमून जायचं नाहीये. मला नोकरी नको म्हणजे स्थैर्य नको, असं नाहीये गं आज्जी. मम्मीला हे सगळं सांगावं असं वाटतं; पण मला नोकरी लागेल या शक्यतेनं मम्मीच्या आवाजातला आनंद ऐकला की, तिला काहीच सांगू नये. इंटरव्यू द्यावा, नोकरी करावी, सेटल व्हावं आणि यातून सुटावं, असं वाटतं.
मयुरीला मी इंटरव्यूचं सांगितलं तर तिनं आधी अभिनंदनाचा मेसेज केला आणि मग मी कंपनीबद्दल तिला सांगितलं. सगळं झाल्यावर तिनं विचारलं की, ‘हाऊ आर यू फिलिंग?’ आणि मग मला अविनाश प्रामाणिकपणाबद्दल जे म्हणाला ते आठवलं आणि मग मी म्हटलं की, मी मजेत आहे. मग पुढं काही बोलली नाही ती.
पूर्वा ताई परत मला म्हणाली की, मी विचार करायला पाहिजे, घाई करायला नको. असं होतं, ही फेज असते, नोकरीला लागून सगळे प्रश्न सुटणार नाहीत वगैरे वगैरे… ती खूप काळजीनं बोलते, मला जे काही वाटतं त्याबद्दल तिला नक्की माहिती आहे, असं वाटतं आणि मग तिच्याशी प्रामाणिक न राहणं अवघड जातं. तिच्यातला समजूतदारपणा पाहिला की तू आठवतेस… त्यादिवशी तिच्याशी बोलून झाल्यावर वाटलं की आता अंधाऱ्या खोलीत अडकलो तर कुणाचेही डायलॉग न ऐकता ती येईल मला सोडवायला… खूप छान वाटलं. बाकी आता इंटरव्यूसाठीच्या कथा रचतो…
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.