नाटकाच्या प्रयोगामध्ये रंगमंचाचा, प्रॉपर्टीचा आणि नेपथ्याचा खुबीदार वापर हा प्रयोगाची रंगत वाढवतो. तसंच या माध्यमातून जो संदेश द्यायचा आहे तो परिणामकारक करतो. माझ्या वडिलांचं एक नाटक ‘कथा कुणाची व्यथा कुणा’. या नाटकाची लेखन प्रक्रिया, तालमींमधून हे नाटक रूप घेत जाणं हा अनुभव मी लहानपणी घेतला. या नाटकाच्या काही आठवणी आहेत. यामधून नतमस्तक व्हायला होतं, फजितीनं मनमुराद हसता येतं आणि श्रेय / अपश्रेय घेण्यादेण्याचा मानवी स्वभाव पाहता येतो. या नाटकाची वन लाईन स्टोरी सांगणं आवश्यक आहे.
अरविंद आणि मुग्धा हे प्रणयी जोडपं पहिल्या अंकात तरलपणे घरात वावरत असतं. त्या घराचे मालक हे मुग्धाच्या आईचे माजी प्रियकर असतात. मुग्धाचे वडिलांच्या मनाविरुद्ध तिनी अरविंदशी लग्न केल्याचा त्यांच्या मनात राग असतो. तर आपल्या प्रेयसीची आणि आपली ताटातूट करणारा खलनायक म्हणून घरमालक मुग्धाच्या वडिलांकडं बघत असतात. हे मालक सूड घेण्याच्या इराद्यानं मुग्धाच्या वडिलांचा खून करण्याची योजना आखतात. यासाठी ते एका पोस्टाच्या पाकिटाला डिंकाच्या जागी विष लावतात; परंतु मुग्धाच्या वेंधळेपणातून तिच्यावरच पाकिटाच्या माध्यमातून विषप्रयोग होऊन तिचा मृत्यू होतो. पुढच्या दोन अंकात या केसचा तपास पोलीस करतात.
आता मला या नाटकाच्यावेळचे अनुभव सांगायला सोपं होईल.
या नाटकाचा एक प्रयोग जबलपूर येथील हौशी नाट्यमंडळानं केला होता. पहिल्या अंकात मुग्धा न कळत झालेल्या विष प्राशनानं खाली कोसळते तेव्हा अरविंद डॉक्टरांना बोलावतो. डॉक्टर म्हणून आलेल्या अभिनेत्यानी स्टेथोस्कोपद्वारे तपासायला सुरुवात केली; परंतु त्या नळ्यांचा इअर पीस कानात घालायला तो विसरला. ते पाहून प्रेक्षकांनी हसायला प्रारंभ केला आणि थोड्याच वेळात त्याचा कडेलोट झाला. डॉक्टर मुग्धाचा मृत्यू झाल्याचं जाहीर करतात तेव्हा पहिल्या अंकाचा पडदा पडतो. हा पडदा मुग्धा झालेल्या अभिनेत्रींच्या शवावर असा पडतो की तिचं अर्ध शरीर पडद्याच्या बाहेर आणि अर्ध आत. अंक संपला म्हणून उठून जायची देखील तिची पंचाईत होते.
या नाटकाचा राज्य नाट्यस्पर्धेत महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेनं प्रयोग केला. प्रयोगानंतर संस्थेनी प्रेक्षकांशी संवादाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी एकानी नेपथ्य करणाऱ्यांना विचारलं की हे घर मुंबईमधील आहे तरीही घरात पंखा कसा नाही? नेपथ्य करणारे गडबडलेत हे लक्षात येताच मुळात इंजिनिअर असलेले नाटकाचे लेखक माझे वडील सरसावले आणि म्हणाले की रंगमंचावरील नाटकातील दिवाणखान्याचा अर्धा भाग (सेक्शन लाईन असल्यानं) प्रेक्षकांना दिसतोय, उरलेला अर्धाभाग प्रेक्षकात गेल्यामुळं दिसत नाही. या न दिसणाऱ्या भागात पंखा आहे. उत्तर वेळ मारून नेणार असलं तरी टाळ्यांचा गजर झाला. मात्र पुढच्या प्रयोगावेळी एक टेबल फॅन ठेवला गेला.
हे नाटक एन्व्हलपला लावलेल्या विषाभोवती फिरत राहतं, हे लक्षात घेऊन नेपथ्यकारानी नेपथ्याची रचना उघड्या एन्व्हलपच्या आकाराची केली होती.
अरविंदचं काम करणाऱ्या अभिनेत्याचे खांदे उतरते होते आणि ते फार वाईट दिसत होते. यासाठी दिग्दर्शक राजा नातू यांनी त्या अभिनेत्याच्या खांद्यावर माफक जाडीचे पॅड लावले. ह्याच राजा नातूंच्या चोखंदळपणाची एक आठवण. पहिल्या अंकामध्ये माळी फुलदाणीत ताजी फुलं ठेवून जातो. अंकाच्या शेवटी मुग्धाचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यावर तीन दिवस होऊन गेलेले असताना दुसरा अंक चालू होतो. घरात मृत्यू झाल्यानं फुलदाणीतील फुलांकडे कुणाचं लक्ष गेलेलं नसतं. यामुळं ती फुलं सुकलेली असतात. आता ही फुलं सुकलेली दाखविण्यासाठी सुकलेली फुलं कुठं मिळणार? नातूंनी स्टोव्ह पेटवला आणि ती ताजी फुलं थोडीशी होरपळवली. त्यांना हवा तो परिणाम मिळाला.
या नाटकाचे विविध संस्थांकडून वेगवेगळ्या काळात नाट्यस्पर्धेत प्रयोग होतं असतं. एका संस्थेला आपण प्रयोग उत्तम केल्यानं मुग्धाला अभिनयाचं पारितोषिक मिळणार असं वाटत होतं; प्रत्यक्षात ते मिळालं नाही. त्यातील एका व्यक्तींनी परीक्षकांना पारितोषिक का मिळालं नाही याची विचारणा केली. यावर परीक्षक म्हणाले की त्याच काय आहे आम्ही प्रत्येक नट/नटी यांना प्रत्येक अंकाला गुण देतो आणि तिन्ही अंकातील गुणांची बेरीज विचारार्ह ठेवतो. या नाटकात मुग्धा पहिल्याच अंकात मरते, यामुळं अंक दोन आणि तीनमध्ये तिला गुण देता आले नाहीत. गुणांच्या बेरजेत ती कमी पडली.
*
वाचा
विंगेतून : दीपक पारखी
‘महाडचे दिवस’ (कादंबरी) – दीपक पारखी
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखक दीपक पारखी कथा, कादंबरी, नाटक, स्फुटलेखन व वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन करतात. आजच्या नंतर उद्याच्या आधी, बिन सावलीचं झाड, पोरकी रात्र भागीले दोन, सी मोअर..., शिदोरी स्व विकासाची ही त्यांची प्रकाशित पुस्तके. महाडचे दिवस ही कादंबरी व एक नाटक तीन एकांकिका हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.