प्रिय आज्जी,
तर इंटरव्यू ठरल्यानुसार पार पडला आणि मम्मी परीक्षेच्या रिझल्टची वाट पाहत असल्यासारखी ‘त्यांच्याकडून काही फोन आला का’, अशी चौकशी रोज करते, त्यांच्या वेबसाईटवर बघत राहा, असं सांगते. पप्पांच्या चेहऱ्याकडे बघून मला ही नोकरीही मिळणार नाही, याची त्यांना खात्री असल्यासारखं वाटतं आणि मग मला मम्मीचा डायलॉग आठवतो, ‘आपल्याला त्रास होतो म्हणून त्यांचा चेहरा कुणी बदलून देणार नाही.’
तीन-चार दिवस झाले अजून काही त्यांचा फोन आला नाही. गेले तीन-चार दिवस मी त्यांना दिलेली उत्तरं तपासून पाहतो आहे. अविनाशनं सांगितल्याप्रमाणं मी काही कथाबिथा रचून त्यांना सांगितलेल्या नाहीत. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी मला योग्य वाटली ती उत्तरं दिली. आधीची नोकरी का सोडली असं त्यांनी विचारलं तेव्हा बॉसबद्दल न सांगता मी केवळ मानसिक त्रास झाला, असं सांगितलं. मानसिक त्रास झाला म्हणजे काय झालं असं त्यांनी एक्स्प्लेन करायला सांगितलं तेव्हा मला काही विशेष सांगताच आलं नाही आणि मग मी युज्युअल ऑफिस पॉलिटिक्स असं म्हणून विषय पुढं ढकलला. हे सांगताना बॉसचा ‘युजलेस’ हा शब्द सारखा मनात येत राहिला आणि वाटून गेलं की मानसिक त्रास एक्स्प्लेन करता येत असता तर किती बरं झालं असतं.
येत्या पाच वर्षांत तुम्ही स्वत:ला कुठं पाहता, असा प्रश्न त्यांनी विचारला. हा प्रश्न ते सगळ्यांना सगळ्या इंटरव्यूमधून विचारतात. याचं ठोस कारण मला अजूनही समजलं नाही. म्हणजे पाच वर्षात खूप काही बदलतं, नाही का? तर त्यांनी प्रश्न विचारला तेव्हा काही सेकंदासाठी मला प्रामाणिकपणाचा तीव्र झटका येऊन गेला आणि मला वाटलं की त्यांना खणखणीत सांगून टाकावं की येत्या पाच वर्षात मी स्वत:ला जॉब, अप्रेझल, वर्क लाईफ बॅलन्स, प्रॉडक्टिव्हिटी, प्रमोशन आणि विशेषकरून तुमच्यासारख्या क्रूर लोकांपासून दूर कुठंतरी शांत आणि निवांत ठिकाणी पाहतो आहे, पण मला वाटलं की ते उद्धटपणाचं होईल. मग मी त्यांना पटेल असं उत्तर दिलं.
तो इंटरव्यू देताना मला पूर्वाताईचं बोलणं आणि मयुरीचा प्रश्न सतत आठवत राहिला आणि माझ्या नोकरीच्या शक्यतेनं आनंदी झालेली मम्मी, तिनं माझ्या नोकरीबद्दल सांगितलेल्या तिच्या मैत्रिणी व अश्विनी या सगळ्यांचे चेहरे आठवत राहिले आणि या सगळ्यांच्या पलीकडे तुझ्या खोलीत आणि माझ्यापासून काही अंतरावर शांत जप करत बसलेली तूही दिसलीस. माझा काही काळासाठी गोंधळ उडाला.इंटरव्यू झाल्यावर बराच काळ मला तुझं आणि सुजयच्या आज्जीचं बोलणं आठवत राहिलं. प्रपंच आणि परमार्थ हे शब्द आठवत राहिले. प्रपंच झाला की परमार्थ. या दोन्हीतून सुटका नाही वगैरे असलं तू काय काय बोलायचीस. मला या सहा महिन्यातच प्रपंचाचा वैताग आलाय आणि मला काही परमार्थात इंटरेस्ट नाही. कशातही फारसा इंटरेस्ट नसलेल्या आणि काही एन्जॉय करू न शकणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना काही वरदान-बिरदान देईल का गणपती? विचार की जरा.
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.