महाडचे दिवस ४: ऑफिस नावाचं प्रकरण

mahadche-diwas-lekhak-deepak-parkhi-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-free-read-marathi-kadambari-chapter-4-office-navacha-prakaran-vacha-marathi-kadambari-online-free-thumbnail

कालपर्यंत येऊ की नको म्हणणारा पाऊस आज कोसळत होता. गोकुळच्या समोरच्या दुकानात छत्र्या टांगलेल्या दिसल्या. वयस्कर दुकानदारांना म्हटलं,
‘‘एक अगदी साधी छत्री द्या.’’
तो म्हणाला,
‘‘का.. घेऊन घ्यायची तर निदान तीन पावसाळे जातील अशी तरी घ्या.”
बेफिकीरीनं मी म्हटलं,
‘‘साधी यासाठी द्या की कुठं विसरली तर फार वाईट वाटायला नको.”
ते मनमुराद हसले आणि म्हणाले,
‘‘महाडमध्ये, कोकणात नवीन दिसताय. तुम्ही चप्पल विसरता का?”
मी म्हटलं,
‘‘ती कशी विसरेन, बाहेर पाऊल टाकताना थोडीच चप्पलची आठवण ठेवावी लागते.”
हसण्याचा परीघ वाढला म्हणून पाहिलं. आलेलं एक गिऱ्हाईक म्हणाले,
‘‘अहो, महाडात छत्री कधीच विसरली जात नाही. कारण पाऊस कधीच थांबत नाही.’’

ऑफिसला गेलो तर बाहेर ठेवलेल्या बादलीत दोन छत्र्या निथळत ठेवलेल्या. आत गेलो. स्वामी होता. एका छत्रीचा मालक मिळाला. दुसरी कुणाची? आतल्या खोलीत माझ्यापेक्षा चार-सहा पावसाळे जास्त पाहिलेला एक गंभीर चेहऱ्याचा माणूस. स्वामींनी ओळख करून दिली,
‘‘हे शहापूरकर, इंजिनीयर आहेत. माणगावहून बदलून आलेत.”
मला बरं वाटलं. चला, एक आणखी भिडू मिळाला. स्वामींची ओळख दोन दिवसांपूर्वीच झाली असल्यानं आणि आलेले शहापूरकर इंजिनीयर असल्यानं मी त्यांच्याजवळ बसलो. वाटलं होतं की त्यांच्याही भावना माझ्यासारख्याच असतील. पण त्यांनी माझी ओळख करून घ्यायचा जराही प्रयत्न केला नाही. मीच माझी ओळख करून दिली. स्वामींनी त्यांची करून दिलेली ओळख त्यांना पुरी वाटली असावी. ते ढिम्मच. आपलं किंचित सुटलेलं पोट सावरत ते बसलेले. त्यांना बोलतं करण्यासाठी म्हटलं,
‘‘चला चहा घेऊ.”

चहा पिताना त्यांनी खिशातून बर्कले सिगारेट काढली. एक-दोन झुरके मारत म्हणाले,
‘‘तू सिगारेट ओढतोस?”
चला, म्हणजे सिगारेटलाही भिडू मिळाला. आणि त्यांनी तू म्हटल्यानं मीही ‘अरे तुरे’ करायला मोकळा झालो. त्याच्या पाकिटातील सिगारेट घ्यावी म्हणून हात पुढं केला तर त्यांनी हातातली सिगारेट ओठापर्यंत नेलेली माझ्या हातात दिली. सिगारेट शेयर करतोय म्हणजे मैत्री स्वीकारतोय. त्यांनी माहिती दिली,
‘‘आज फक्त ऑफिस कुठं आहे ते बघायला आलो. माझं सामान माणगावलाच आहे. तीन-चार दिवसांनी जॉईन होईन.”
“तुला ऑफिस सापडायला त्रास नाही झाला?”
त्याच्या गंभीर चेहऱ्यावर थोडंसं हसू फुटलं. म्हणाला,
‘‘त्याचं काय आहे, माणगावला महाड खूप जवळ आहे. जेमतेम पंचवीस किलोमीटर. त्यामुळं माझं महाडला येणं होतंच. दुसरी गोष्ट म्हणजे हे ऑफिस चटकन सापडत नाही, हा रिपोर्ट डिव्हिजनला गेल्यानं नव्या ऑर्डरबरोबर पत्ता पण द्यायला लागलेत. तुला ऑफिस शोधताना त्रास झाला हे तू येण्याअगोदर स्वामी मला सांगत होता. तू सिव्हिल इंजिनीयर का?”
मला आश्चर्यच वाटलं. हा असं काय विचारतोय. मी म्हटलं, ‘‘हो’’
त्यावर तो म्हणाला,
‘‘मी इलेक्ट्रिकल इंजिनीयर आहे. सत्तर साली सोलापूर पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा झाला. दोन वर्षं माणगावला आहे. तू डिप्लोमा कुठून केलास?’’
मी म्हटलं,
‘‘कुसरो वाडीया कॉलेज… पुण्यातून. पण एक सांगू का, माझा डिप्लोमा पूर्ण झालेला नाही. तोवर घरात कुठं बसायचं म्हणून ही नोकरी स्वीकारली. डिप्लोमा झाला की पुण्यातच दुसरीकडं बघणार आहे.”
“ते बरोबर आहे तुझं. कारण पुण्यात खूप नोकऱ्या मिळतील. ही नोकरी म्हणजे लेव्हल दांडा घेऊन फिरायची नोकरी. यात एक्झिक्युशन नाही, कंत्राटदार नाही, वरकमाई नाही..”

हा विषय तसा मला नवीन होता. पण लेव्हल दांडा घेऊन फिरायचं म्हणजे काय? मला अर्थबोध होईना. मी त्याबद्दल विचारताच तो म्हणाला,
‘‘अरे.. आपली सबडिव्हिजन आयपीआय आहे, म्हणजे केवळ सर्व्हे करणारी. सर्व्हे करताना डंपी लेव्हल आणि स्टाफ (मोजपट्टी) घेऊन फिरावं लागतं. म्हणून ‘लेव्हल दांडा नोकरी’ म्हणतात याला.’’
तरीही मला फारसं उमगलं नाही. मग तो म्हणाला,
‘‘मी जॉईन झालो की सांगीन समजावून.”
जुन्या पोस्टपाशीच त्याला माणगावची एसटी मिळाली. बसमध्ये बसताना सिगारेटचं पाकीट माझ्या हातात देत म्हणाला,
‘‘यात एकच आहे, होईल तुला.”
बस हलली. मला कशाचं तरी वाईट वाटायला लागलं. शहापूरकरचं चार दिवसांसाठी जाणं की लेव्हल दांडा खुलाशाचं?

पुन्हा आख्खा दिवस मी आणि स्वामी. दुपारी तीनपर्यंत कसाबसा तग धरला. शेवटी तीन वाजता दोघांनी ऑफिस सोडलं. बाजारात फिरत राहिलो. मासळीचा भपकारा आला, तेव्हा चार वाडे पलीकडं राहणाऱ्या गुप्ते काकूंचा चेहरा डोळ्यापुढं आला. मी महाडला जातोय समजल्यावर त्या म्हणाल्या होत्या,
‘‘बरं झालं बाई, तू महाडहून येताना सुकट तरी आणशील. आम्हा सीकेपी लोकांना मासे मिळणारं गाव म्हणजे माहेर वाटतं रे. या नारायण पेठेतल्या ब्राह्मणी संस्कृतीत आम्ही आमचे खाद्यसंस्कार विसरलोय.”
स्वामी एके स्वामी आणि धूमकेतूसारखा उगवलेला शहापूरकर. रात्री कॉटवर पाठ टेकल्यावर माझी दिवसभराची एवढीच कामं होती.

सकाळ झाली. एकदम दादांनी केलेली सूचना आठवली. महाडला गेलास की पहिलं एखाद्या बँकेत खातं उघड. गोकुळच्या शेजारी ‘बँक ऑफ ब्रॉड’. तिथं गेलो, खातं सुरू करायचा फॉर्म घेतला. भरला. आणि बँकेत मागं बसलेल्या अधिकाऱ्याकडे गेलो. त्यांनी फॉर्म बघितला आणि परत माझ्या हातात ठेवत म्हटलं,
‘‘अहो, पण यावर इंट्रोड्युसड बाय कॉलम भरा ना. एखाद्या या बँकेतील खातेदाराची सही हवी.”
मी गप्प. आता हा खातेदार कुठं शोधू? स्वामींचं खातं असण्याची शक्यता नव्हती. माझी कावरीबावरी नजर पहात एक गृहस्थ उभे. पांढरे स्वच्छ धोतर आणि निर्मळ चेहरा. माझ्याजवळ येत ते म्हणाले,
‘‘मी वडके, इथं पलीकडं माझं भांड्यांचं दुकान आहे. आणा तो फॉर्म इकडं, मी करतो सही. हे बँकवाले ना परक्या गावात आलेल्यांची अडचणच समजून घेत नाहीत. यामुळं आमचं भांड्यांचं आणि अडलेल्या नाडलेल्यांना लोकांना मदत करायचं, अशी दोन्ही दुकानं चाललीत.”
बँक खातं आणि वडक्यांशी दोस्ती खातं, दोन्ही एकदमच उघडली. काही भांडी घ्यावी लागली तर नक्की यांच्याच दुकानातून घ्यायची.

ऑफिसला गेलो. एक नवी छत्री दिसली. उत्सुकतेनं आत गेलो. माझ्यापेक्षा एखाद्या वर्षानं लहान असलेला एकजण दिसला. स्वामींनी ओळख करून दिली,
‘‘हे चव्हाण, ज्युनियर इंजिनियर आहेत. आठ दिवसांपूर्वीच जॉईन झालेत. बेळगावचे आहेत.”
मी स्वामीला थांबवत म्हटलं,
‘‘मला बोलू दे ना त्यांच्याशी.”
मी बोलायचा प्रयत्न केला. तो घुमाच निघाला. एकच उत्तर मिळालं की तो तांबट आळीमध्ये महाड सहकारी बंकरसमोर एका खोलीत राहतोय. नेटानं मी विचारलं,
‘‘एकटाच राहतोयस?”
“नाही. बी. एस. पाटील आणि डी. जे. पाटील हे दोन ज्युनियर इंजिनीयर असे तिघे मिळून राहतो.”
बाकी दिवसभर त्याच्याशी बोलणं नाही. संध्याकाळी आम्हीच जाहीर केलं, ‘ऑफिस सुटलंय.’

गोकुळकडं जाताना चव्हाणही बरोबर. मी गोकुळमधे शिरताना तो म्हणाला,
“थांब जोशी.. चल, आमची खोली दाखवतो.”
माझी अपेक्षा होती की त्याच्या खोलीवर गेलो की तो कुलूप काढेल. आम्ही जिना चढून वर गेलो तर दार उघडं. मला वाटलं तो आश्चर्यचकित होईल. पण तसं काहीच झालं नाही. आत एकजण डोळे मिटून काहीतरी स्तोत्रासारखं म्हणत होता. आमची चाहूल लागताच तो उठून उभा राहिला. चव्हाण म्हणाला,
‘‘हा डी. जे. पाटील. उमरगा जवळच्या गावातून आलाय. जैनांचा आहे आणि हा विनय जोशी. जे. इ. म्हणून आपल्याकडं जॉईन झालाय. जोशी, तू पुण्याचा ना?’’
मला ‘डी. जे. जैनांचा आहे’, या खुलाशाचा अर्थबोध झाला नाही. पण चव्हाणानी आपण हिंदू असल्याचा अभिमान नकळत दाखवला होता.

डी. जे. पाटील बोलायला लागला.
‘‘जोशी तू उभा का ठाकलाय? बस ना निवांत हाथरीवर.”
बसता बसता ‘उभा का ठाकलाय’ आणि ‘हाथरी’ या शब्दांची गम्मत अनुभवत होतो. एकूणातच, त्याची भाषा मराठवाड्यातली वेगळ्या धाटणीची वाटली. कपाटाला तो ‘आलमारी’ म्हणाला. हिंदी भाषेचा प्रभाव त्याच्या भाषेवर का विचारलं तेव्हा तो म्हणाला,
‘‘आमची गावं पूर्वी निजामशाहीत होती. त्यामुळं आमचं मराठी आणि तुमचं पुण्याकडंच मराठी वायलं. तुमच्यावानी मराठी बोलताना आमची जीभ दुखायला लागते.”
हा विनोद होता की वस्तुस्थिती?

आम्ही अर्धा तास बोलत बसलो, तेवढ्यात समोरच्या घरातून एक गृहस्थ आत आले. चव्हाणच्या खोलीतल्या गॅलरीत गेले. दोरीवर अंथरलेला टॉवेल घेऊन अंगावरून जायला लागले. डीजेनी त्यांना थांबवलं आणि म्हटलं,
‘‘हा जोशी, नवीन जॉईन झालाय आणि जोशी हे गुजर. समोर दहा वर्षं राहतायत. रस्त्याची छोटी कामं घेतात.”
आमचं बोलणं चालू असताना त्यांची बायको पदराखाली काहीतरी घेऊन आली. नवऱ्याला ओलांडून चव्हाणशेजारी उभी राहत म्हणाली,
‘‘भाऊजी, मुगाचे लाडू आणलेत.”
डिश ठेवून ती जाईल असं वाटत असताना तिचा नवरा घरात गेला. ती आणखीनच मोकळी झाली.

चव्हाण आणि डीजे यांच्या खोलीवर मी आलो तेव्हा ते दोघे बोलले त्याच्या पाचपट ती बोलत राहिली. मी पुण्याचा म्हटल्यावर म्हणाली,
‘‘मी अजुनी पुणं पाहिलं नाही. शनवारवाडा, पर्वती, सारसबाग… तिची चौकशी संपेना. मी काही उत्तर दिलं की त्या अनुषंगानं पुन्हा आणखी चौकशी. पार अंधार पडला. तिच्या नवऱ्याची उंबऱ्यातली ये-जा मी पाचवेळा पाहिली. तिची चव्हाण आणि डीजेशी वागणूक सहवासानं मोकळी झालीय, असं मी समजू शकत होतो. पण माझी? अवघ्या काही मिनिटांची. परंतु गप्पा मारायची पद्धत, दाखवायची आपुलकी, क्वचित स्वतःची घुसमट पोचवायची असोशी.. मला ती फार आवडून गेली. या खोलीत राहणारे मला माहिती झालेले चव्हाण, डीजे आणि अजुनी न पाहिलेला बी. एस. पाटील यांनाही ती नक्कीच आवडत असणार. पण इतक्या उशिरा संध्याकाळपर्यंत तिचं या खोलीत वावरणं तिच्या नवऱ्याला आवडत नसावं. कारण आता त्यांनी उंबऱ्याशी ये-जा देखील थांबवली होती.

सकाळ झाली. माझं आवरून झालं. ऑफिसला निघालो. गोकुळाचा जिना उतरल्यावर डावीकडं वळायचं सोडून तांबट आळीकडं वळलो. चव्हाणच्या खोलीवर दार बंद. अरे बापरे, ही मंडळी इतक्या लवकर ऑफिसला गेलीत वाटतं.
मी जीना उतरत होतो तर समोरून हाक, ‘जोशीभाऊ…’
जिन्याच्या चौथऱ्यावर ती उभी. मी खालच्या पायरीवर उभा.
‘‘हे सगळे नाश्ता करायला गेलेत.”
“हो का.. मग मीही जातो,” मी म्हटलं.
‘‘थांबा की, थोडा चहा टाकते.’’

चहाला उकळी तीन-चार मिनिटात आली, पण तिच्या गप्पांची वाफ जिरेना. अवघडून म्हटलं,
‘‘गुजर कुठं दिसत नाहीत.”
“ते होय.. सकाळी लवकरच पोलादपूरला गेलेत, कामाची मापं काढायला. मला चहाला सोबत हवी होती, ती मिळाली.. घ्या चहा.”
माझा चहा संपेपर्यंत लक्षात असं आलं की तिला शिकायचं होतं. पण जास्त शिकली तर तोलामोलाचा मुलगा पाहावा लागेल. त्याचा लग्नखर्च झेपणार का? म्हणून अकरावी झाल्या झाल्या लग्न उरकून टाकलं. ‘रडले, भेकले पण त्याचा परिणाम लग्नापूर्वी आईवडलांवर झाला नाही आणि लग्नानंतर नवऱ्यावर,’ हे सांगताना ती रडत नव्हती तरी आतून गदगदत होती. स्वतःच्या खंतावण्यानं आपलं व्यथित होणं हे दुसऱ्याच्या दुःखानं होरपळण्याइतकंच दाहक असतं.

मी ऑफिसला गेलो. साहेब नाहीत. काम नाही. या शांतपणात मनात विचार यायला हवे होते ते आजी, दादा, आई आणि बहिणी यांचे. पण येत होते शहापूरकर, गुजरवहिनी यांचे.
ऑफिसमधून चहाला येताना जुन्या पोस्टातील स्टँडवरून येत होतो. हातात बॅग घेतलेले दोघं जण एका एसटीतून उतरले. ते दोघं आणि त्यांच्या मागं मी ऑफिसमध्ये शिरलो. स्वामी एकदम आदबीनं पुढं आला. त्यातला एकजण दोन्ही खोल्या मागं टाकत नळावर गेला. एकजण लाकडी खुर्चीवर बसला. स्वामी त्याच्यापुढं उभा. तेव्हा लक्षात आलं, या गृहस्थांना ‘अरे तुरे’ करता येणार नाही. हेच साळीसाहेब दिसतायत. मी आत गेलो. नळावरून तोंडावर पाणी मारून तो आत आला. त्याला मला ‘अरे तुरे’ करता येणार होतं, कारण तो बी. एस. पाटील होता.

ओकंबोकं ऑफिस एकदम भारदस्त झालं. स्वामींनी ठेवलेलं टपाल साहेबांनी नजरेखालून घातलं आणि स्वामीला म्हटलं,
‘‘कोण ते जोशी आलेत, त्यांना पाठवून द्या.”
मी आत गेलो. माझ्या जॉइनिंग रिपोर्टवर त्यांनी सही केली आणि तो माझ्याकडं देत म्हणाले,
‘‘स्वामींना द्या, आणि नंतर जरा समोर बसा.”
मी अवघडून बसावं की मोकळं याचा विचार करत होतो. तेव्हा ते मात्र अवघडून बसलेत, हे जाणवलं. अस्वस्थपणे ते टेबलावरच्या काचेला मधल्या बोटानं पुसत होते. त्यांची ही अवस्था माझ्या लक्षात आलीय म्हटल्यावर ते म्हणाले,
‘‘बाकीच्या जेइंनी तुम्हाला कामाचं काही सांगितलं का?”

मी जर ‘नाही’ म्हणालो असतो तर आपल्या माघारी ऑफिस त्या अर्थानी बंद होतं हे त्यांना समजलं असतं. म्हणून मी चटकन ‘हो’ म्हणालो. माझा होकार पाहून ते म्हणाले,
‘‘दीपावळीनंतरच आपलं सर्व्हेचं काम सुरु होईल. पण त्यापूर्वी बुडीत क्षेत्रातली जी गावं आहेत त्यांचे व्हिलेज मॅप, गट आणि हिस्सा नंबर, शेतकऱ्यांची सात-बारावरची नावं, सारा वगैरे माहिती त्या त्या गावातील तलाठ्याकडून घ्यायचीय. तुम्ही असं करा, उद्या ‘तुडील’ला जा. दासगाववरून जावं लागतं तुडीलमध्ये जाण्यासाठी. तिथल्या तलाठ्यांना भेटा आणि जी माहिती भेटेल ती घेऊन या. मग पुढं बघू काय करायचं ते. बीएस पाटीलांच्याकडं टोपो शीट आहेत, त्यावर वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या खुणा केल्या आहेत. त्या नजरेखालून घाला तोपर्यंत. आणखी एक, रजा मंजूर करून घेतल्याशिवाय पुण्याला जाऊ नका. इथं कुणाला तशी सवय नाही. मी कधी गावाकडं परस्पर जात नाही. तुम्हीही जाऊ नका. काय स्वामी, बरोबर बोलतोय ना मी?”

स्वामींनी साहेबांकडं आणि मी स्वामीकडं बघायचं टाळलं. साहेबांनी कामासंदर्भात केलेल्या सूचना माझ्या साफ डोक्यावरून गेल्या होत्या. एकच लक्षात आलं की आपली अजुनी ओळख न झालेला बी. एस. पाटील, साहेबांचा ‘हा’ आहे. त्याच्याशी सलगीनं वागून चालणार नाही, आणि आपल्याला जे ई म्हणून ऑफिसमध्ये वावरताना बी. एस. पाटील शिवाय पर्याय नाही.

(क्रमशः)

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

3 Comments

  1. Avatar

    Chhan. Koknatala sunder vaatavaran dolyaasamor sale.

  2. अनुया कुलकर्णी

    खूप छान सुरू आहे कादंबरी..

  3. Avatar

    Very interesting.. keep it up!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :