महाडचे दिवस १०: तुझी-माझी खोली

chitrakshare-deepak-parkhi-marathi-kadambari-mahadche-diwas-10-tujhi-majhi-kholi

कुरेशी मला विचारतोय, ‘सकाळी तू कुठं होतास?’
स्वतःवर चिडून मी रागात म्हटलं,
‘‘का तू माझ्यामागं लागलायस, कशाला हव्यात तुला चौकशा.. मी सकाळी कुठं गेलो होतो? मला माझं काही स्वातंत्र्य नाही का? सारखं तुझ्याच ओंजळीनं पाणी प्यायला पाहिजे?”
माझा विश्वास बसेना. मी.. मी कुरेशीवर रागावू शकतो? या रागाचं मूळ कुरेशी तुझ्या प्रेमात आहे हे मी कसं समजावू?
माझा राग तो कसा घेईल, याची चिंता मला लागून राहिली, तेव्हा मंद मंद हसत तो म्हणाला,
“जोशी, एखाद्या पोरीसारखा तू रागावलायस. याला म्हणतात पझेसिव्हनेस.”
त्याचं हे वाक्य ऐकलं आणि माझा बांध फुटला. एक वाक्य आठवलं ‘जेव्हा स्त्री खूप रागावते तेव्हा ती रडायला लागते; पुरुषाला जेव्हा खूप रडावसं वाटतं तेव्हा ते लपवण्यासाठी तो रागावतो.’

मनाची ही उलघाल थांबवायची म्हणून मी म्हटलं,
“मग ऐक. सकाळी मी खोली बघतच फिरत होतो. काकरतळं, चवदारतळं या परिसरात.”
“यात न सांगण्याजोगं काय होतं?” होतं न सांगण्याजोगं आणि तुलाच न सांगण्याजोगं. मी चार ठिकाणी खोल्या बघितल्या. त्या मिळूही शकत होत्या. पण प्रत्येक ठिकाणी मला विचारलं गेलं की तुम्ही कोण कोण राहणार. तेव्हा मघाशी तू म्हणालास ती नावं मी घेतली.. कोल्हेचं, एनएमचं आणि तुझंही. जेव्हा मी कुरेशी हे नाव सांगायचो तेव्हा ही लोकं ‘नाही’ म्हणत होती. त्यांना मी चालत होतो, ते माझ्या जानव्यामुळं, कोल्हे, एनएम ही नावं चालू शकत होती, ती हिंदू असण्यामुळं. पण कुरेशी हे नाव त्यांना नको होतं. त्यांच्या तुळशी वृंदावनापुढं त्यांना नमाज पढणारं कुणी चालत नव्हतं. हेच ऐकायचं होतं का तुला? या उलट दोन तासापूर्वी आपण चाचांना भेटलो. त्यांनी एका शब्दानंही कोणकोण राहणार आहेत, हे विचारलं नाही. त्यांच्या नमाझी घरात व्यंकटेश स्तोत्र म्हणणारा मी त्यांना खुपत नव्हता. एनएमसारखा दिगंबर जैन त्यांना परका वाटत नव्हता. माझं बोलणं संपलय. मला माझ्या लोकांची विचार करण्याची पद्धत त्रास देतीय.”
कुरेशीनी माझा हात हातात घेत म्हटलं,
“तुला मी दुसऱ्यांदा सांगतोय की बोलण्यातसुद्धा ही माझी लोकं.. ही तुमची लोकं असं आणू नको. अशी तुलना करू नकोस. त्याचा तुला त्रास होतोय म्हणजे तू माणूस आहेस. मला त्याचा त्रास होत नाही कारण मी माणूस आहे. फरक इतकाच आहे तू माणूस आहेस सुरक्षित कोशात वाढलेला.. मी माणूस आहे दुनियादारी बघितलेला. तुला काय वाटतं हिंदू-मुसलमान वागायला, बोलायला वेगळे आहेत? तसं काही नाही. तू माझ्या जखमेवरची खपली काढलीस म्हणून एक अनुभव सांगतो. ऐक.

तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. औरंगाबादला माझा एक मित्र होता हुसेन. तो नोकरीसाठी गल्फमध्ये गेला. भारतात घरी त्याचे फक्त वडील होते. तो औरंगाबादेत असताना त्याचं माझं जाणं-येणं बरंच होतं. त्याचे अब्बा माझ्यावर त्याच्या इतकीच माया करत होते. झालं असं की अब्बाना हार्ट अटॅक आला. हुसेनचे वडील म्हणजे माझे अब्बाच मी मानत होतो. आपला मुलगा आपल्याजवळ नाही, याचं टेन्शन त्यांना आलं होतं. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांचे नातेवाईक पहिले एक-दोन दिवस येत-जात होते. पण त्यांची उत्सुकता संपताच त्यांचं येणं थांबत चाललं. त्यामुळं प्रत्यक्षात करायला कुणीच पुढं येत नाही, अशी अवस्था होती. त्यांचं औषधपाणी आणि बाकीचा खर्च मी करत राहिलो. कारण एकच, ते एकटे पडलेले माझे अब्बा होते. रात्रंदिवस मी हॉस्पिटल लाऊंजमध्ये असायचो. तिथंच झोपायचो, जेवायचो, अंघोळ करायचो. हॉस्पिटल हे मी आणि अब्बा दोघांचं घर झालं होतं. मला खूप एकटं वाटत होतं. अब्बाना निदान माझी सोबत होती. बेशुद्धीमुळं त्यांना इतरांकडूनच्या अपेक्षाभंगाचं दुःख कळत नव्हतं. आठ-दहा दिवस मी त्यांचं खूप केलं. अगदी मनापासून. आणि तो दिवस उजाडला. अब्बा गेले. त्यांचं प्रेत माझा मित्र येईपर्यंत शवागारात ठेवलं. हुसेन आला. माझ्या गळ्यात पडून रडला. आता अब्बाना निरोप द्यायचा होता. दफनविधीची व्यवस्था मी लावत होतो. प्रत्यक्ष दफनविधी सुरू झाले तेव्हा हुसेनचे मेव्हणे त्याला बाजूला घेऊन माझ्याबद्दल काही तरी सांगत होते. हुसेन माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘मुर्तुझा, आप लोग सुन्नी है. हम ठहरे शिया. जो कुछ तूने हमारे लिये किया है उसके लिये हम एहसानमंद है. लेकिन.. लेकिन अब तुम हमारे साथ कब्रस्थान नही आ सकते. क्यूकी तुम सुन्नी हो.’

जोशी मला सांग माझं काय झालं असेल तेव्हा. तेव्हा तुमची लोकं.. आमची लोकं यात काही फरक नाही. सगळेच ‘प्रेमळ’ असतात. ज्याचं त्याचं प्रेम हे त्यांच्या त्यांच्या स्वार्थाशी जोडलेलं असतं.”
मी कुरेशींकडं पाहायचं टाळलं आणि दिवा बंद केला. अंधारातही कुरेशींची चाहूल घेत राहिलो. त्याची कॉट रिकामी होती. गॅलरीचं दार अर्धवट उघडं होतं.

सकाळी मला ऑफिसला लवकर जावंसं वाटत होतं. कोल्हे, एनएम यांना आम्ही खोली बघितलंय, तुमची इच्छा असेल तर बघा, आपण चौघं राहू, हे सांगायला मी अधीर झालो होतो. साहेब पेणला गेले असल्यानं ऑफिसमध्ये तसा आनंदच होता. पहिला समोर आला तो शहापूरकर. माझा उमललेला चेहरा पाहूनही त्याच्या उदासवाण्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाहीत. मला हे खोलीचं पहिल्यांदा त्याला सांगायचं नव्हतं. ज्यांना सांगायचं होतं ते कोल्हे, एनएम यांचा पत्ता नव्हता. मी खैराचं झाड ते रस्ता, असं येरझाऱ्या घालत असताना शहापूरकर बघत होता. त्यानी मला बरोबर खैराच्या झाडाशी गाठलं. या झाडाशी त्याचं काय समीकरण जुळलं होतं माहीत नाही, पण त्या झाडावर त्याची बुटकी, धीरगंभीर सावली पडली रे पडली की त्याला बर्कले सिगारेटची आठवण यायची. सिगारेट शेअर करायला त्याला आवडायचं आणि माझीही तल्लफ फक्त दोन-तीन झुरक्याची असायची. ती थोडक्यात भागायची.

त्यानी सिगारेट पेटवून मला जवळ बोलावलं. एनएम जसा झाडाचा आधार घ्यायचा, तसा माझा आधार त्यानी घेतला. चष्मा काढून खिशात ठेवला. त्याचे दोन झुरके झाले. तीन झाले. चौथा झाला. मी वाट पाहतोय, आता तो माझ्या हातात सिगारेट देईल. मी आशाळभुतासारखा त्याच्यापुढं उभा. त्यानी खिशातून रुमाल काढला, तोंड पुसलं. सिगारेट संपायला आलेली. मी त्याचा नाद सोडून देणार होतो, तेव्हा त्यांनी खिशातून एक सिगारेट काढून माझ्या हातावर ठेवली. मी खैराशी सिगारेट ओढतोय. त्यांनी स्वतःची सिगारेट विझवली आणि मी मघाशी जसा झाड ते रस्ता फेऱ्या मारत होतो तशा मारायला सुरुवात केली. तिसऱ्या फेरीला मघाशी मी जसा आशाळभूत नजरेनं त्याच्यापुढं उभा होतो तसा तो माझ्यासमोर उभा राहिला. जी कृती त्यांनी करावी, अशी अपेक्षा होती ती मी केली. माझी पाच झुरके घेतलेली सिगारेट मी त्याच्या बोटात खोचली. त्यांनी एकही झुरका न घेता सिगारेट विझवली आणि म्हणाला, “जोशी..”
मी त्याच्याकडं हा काय सांगतोय म्हणून बघत राहिलो. तो पुन्हा म्हणाला, “जोशी..”
मी करवादून म्हटलं, “अरे बोल ना.”
“जोशी.. मी ती गवळ आळीतील मोठी खोली काल घेतली.”

त्याच्या या वाक्यानं मीच उमललो. यांनी मोठी खोली घेतली म्हणजे याचं लग्नाचं काही ठरतंय वाटतं. मीही खोली घेतलीय, हे सांगायचं ओघानी येणार होतं. मला त्याच्या मोठी खोली घ्यायच्या मागचं ‘गोड’ कारण समजून घ्यायचं होतं.
“शहापूरकर, तू मोठी खोली घेतली म्हणजे..” त्यानी खिशातून चष्मा काढला डोळ्याला लावला आणि म्हणाला,
“मी चूक केलीय.”
“म्हणजे?”
मला अर्थबोध होईना. कासावीस होत मी विचारलं,
“चूक केली?”
“हो चूकच झालीय. सोलापूरच्या एका स्थळांचं जमतंय असं वाटलं म्हणून मी ती खोली घेतली आणि आज भावाचं पत्र आलंय. माझं ठरू पाहणारं लग्न जमत नाहीय.”
“का?” मी अभावितपणे विचारलं.
“काय सांगू, त्या स्थळाकडून नकार आलाय.”
“नकार आलाय? काय कारण झालं?”
“माझी वहिनी.. तिच्या नात्यातलं स्थळ होतं ते. त्या लोकांना माझ्या वहिनींनी माझ्याबद्दल काहीबाही सांगितलं. म्हणून त्यांनी नकार दिलाय.”
“काय सांगितलं वहिनींनी?”
“कसं सांगू तुला.. पण सांगतोच. चार वर्षांपूर्वी आमच्या गावी मी, दादा आणि वहिनी गेलो होतो. घराच्याजवळ एक विहीर होती. तिथं पोहायला गेलो. मी वरून उडी मारली. विहिरीवरच्या पंपासाठी इनलेट पाईप बसवला होता. त्याकडं माझं दुर्लक्ष झालं होतं. त्या पाइपवर नेमकी माझी उडी पडली. असह्य वेदना झाल्या. मी बाहेर आलो तेव्हा माझी वृषणं मार लागल्यानं सुजायला लागली होती. डॉक्टरांनी सांगितलं की मार लागल्यामुळं हायड्रोसिल झालंय. ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन झालं. मी त्यातून बरा झालो. नोकरीवर रुजू झालो.”
“मग तुला आता काही त्रास होतोय का?”
“छे छे.. काहीच त्रास नाही.”
“पण मग हे मला का सांगतोयस?”
“हे सगळं वहिनींनी त्या लोकांना सांगितलं. त्यांचं मत करून दिलंय की या अपघातानं मी कदाचित बाप बनू शकणार नाही. ती लोकं बिथरली. त्यांनी नकार कळवलाय.. आणि मी इकडं मोठी खोली घेऊन बसलोय.”

शहापूरकर रडण्याच्या बेतात आला होता. मी त्याला ‘चल’ म्हटलं. जसा मी कुरेशीच्या मागून चालायचो तसा तो माझ्या मागून चालत येत होता. एका टपरीवर मी त्याला चहा पिऊ दिला. त्याची सैरभैरता कमी झालीय, असं वाटल्यावर म्हणालो,
“तुला एक विचारू.. तुझं इरेक्शन होतं?”
तो ‘हो’ म्हणाला.
“तू हस्तमैथुन करू शकतोस?”
“हो.. रोजच.”
“ठीक आहे, म्हणजे वहिनींच्या शंकेतील चिंतेचा निम्मा भाग संपलाय. आता पुढचा निम्मा भाग.”
“जोशी, तू काय म्हणतोयस, काय सुचवतोयस?”
“हो, मी तुला सुचवतोय की काल्पनिक चिंता करत बसू नकोस. तुझी वीर्य तपासणी करून घे. चार-दोन दिवसात. तू बाप बनू शकण्यासाठी पुरेसे शुक्राणू आहेत का हे समजेल.”
“पण मग ते नाहीत असं समजलं तर?”
“तर तू पुन्हा गावाकडं जा आणि त्या विहिरीत जीव दे. अरे काय चाललंय. पहिला तुझा उदास चेहरा नीट कर. लॅबमध्ये जाऊन सॅम्पल देऊन ये. माझी खात्री आहे रिपोर्ट नॉर्मल येईल. तो रिपोर्ट सोलापूरला जाऊन वहिनींच्या तोंडावर मार आणि त्यांना सांग माझ्या लग्नाची काळजी मी करीन. देवक बसविण्याखेरीज तुम्ही माझ्या लग्नाबद्दल जास्त काही करू नका. उलट तू घेतलेली मोठी खोली शुभचिन्ह आहे. आता छान हास. आणखी एक आज एकही सिगारेट ओढू नकोस. सिगारेट तुला जास्त चिंतामणी बनवतीय.”
“बाय द वे तुला अजून एक विचारू?”
“हं” एवीतेवी मी मोठी खोली घेतलीय तर तू येशील माझा पार्टनर म्हणून?”
त्याच्या या विचारण्यावर काय प्रतिसाद द्यावा मला समजेना. म्हटलं,
“मित्रा, काल मी आणि कुरेशींनी मुस्लिम मोहल्ल्यात एक जागा घेतलीय. मस्त दोन खोल्या आहेत.”
शहापूरकरचा मी खुलवलेला चेहरा पुन्हा बदलला.
“तू कुरेशींबरोबर राहणार आणि तेही मुस्लिम मोहल्ल्यात?”
“का?”
‘‘मुसलमान लोक वाईट असतात रे. आणि त्यात पुन्हा कुरेशींबरोबर. तुला माहितीय का कुरेशी..”
मी त्याचं वाक्य अर्धवट तोडत म्हटलं,
“आता हे असलं माझ्या मनात भरवून तू तुझ्या वहिनीसारखं मोडता घालायचं काम करू नकोस. मला काही अडचण नाही.”

शहापूरकर गप्प बसला. मी स्वतःशी म्हणालो, या रड्या माणसाबरोबर राहण्यापेक्षा उत्साहानं थबथबलेला कुरेशी जास्त चांगला आहे. या निमित्तानं नारायणपेठीय मुसलमानांविषयीच्या धारणा किती बरोबर आहेत किती चूक आहेत हे तरी तपासून घेता येईल.

आज गुरुवार. जे काही थोडं सामान आहे ते नव्या जागेत टाकावं आणि शनिवारी पहाटेच्या एसटीने पुण्याला जावं. जागा मिळालीय, जेवणाची सोय झालीय, गावात आणि माणसात मी रमायला लागलोय, हे घरी सांगावं. येताना दादांनी आणलेला होल्डऑल गादीसकट आणावा आणि.. दादांनी एक प्रश्न विचारला तर काय सांगावं? अभ्यास जोरात चालू आहे असं सांगितलं की त्यांना बरं वाटेल आणि मलाही वाटेल की आपला माणसांचा आणि जुन्या धारणांचा अभ्यास थोडाथोडा चालू झालाय.

(क्रमशः)

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

1 Comment

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :