एका दिवशी अमरावतीहून फोन आला दोस्ताचा. म्हणे,
‘राजभाई, मले डोनर पाहिजे. अर्जंट. ए प्लस. माया बाबाले दवाखान्यात आणलं इरविन ले.’
म्या म्हटलं, ‘बरं बरं. मग त्या ब्लड बँकेत जाय. तिथं भेटन ना.’
तर दोस्त मने, ‘अबे इथं पैसे भरा लागते म्हणून होय.’
म्या म्हटलं, ‘बरं ठीक. जमवतो मी.’
मग कोणाला पकडावं आता? मग माया एकच कट्टर होता, ‘गोल्या’.
त्याला भेटलो बावा. त्याले सांगितला पुरा पिक्चर. मग तो मने,
‘चाल, अमरावती देऊन टाकू. आपल्यानं जीव तर वाचन. फक्त गाडी पाय कोणाची भेटन तं. सोबत पेट्रोल पाणी…’
म्या म्हटलं,
‘बरं. त्याची कायजी नको करू. पायतो मी ते.’
पकडला बा अंतिम मेश्राम. त्याले म्हटलं,
‘गाडी पायजे बात येतो मोझरीहून…’
त्यानं पण देऊन टाकली, ‘लवकर येजो बे’ म्हणत.
घेतली बा. गेलो पंपावर. त्याले म्हटलं, ‘उधार दे पेट्रोल. नंतर देतो पैसे.’
असं करत निघालो अमरावतीकडे. बम गोष्टी करत करत.
आलं बा नांदगाव पेठ. मग काय? समोर आमच्या पोलीसं गाड्या पकडून चेकिंग चालू होती. आम्ही दूरच थांबलो. कारण गाडी दुसऱ्याची. त्यात आमच्याजवळ कागदपत्रं तर नाहीच; पण ड्रायव्हिंग लायसन्स बी नाही. पण अमरावती तर जायचं डोकशात सुरू होतं.
म्या म्हटले, ‘चाल. पाहून घेऊ सायाच्याले…’
गेलो बा समोर. थांबवली गाडी. मग झालं नाटक सुरू त्याचे.
‘हे दाखव ते दाखव…’ फुकटखाये!
म्या म्हटलं,
‘साहेब, हे कागद-गिगद काही हाय-नाही; पण आम्ही चांगल्या कामाले जाऊन रायलो.’
त्यायले सांगितलं, ‘म्या रक्त द्यायले चाल्लो. जाऊ द्या बा.’
पण हे कायचे आयकते? म्हणे द्या ५०० रुपये. नाय तर हजार रुपये दंड भरा. म्या म्हटलं, ‘आम्हीच तं उपाशी आहे, तुम्हाले कुटून देऊ?’
पण तो काय आयकत नव्हता. मग म्या म्हटलं,
‘आता तर यायले झाम्या दाखवाच लागते.. मग काढला मुबाईल, नं लावला फोन बच्चूभाऊ ले’.
म्या भाऊले सांगितले सारं. मग भाऊ म्हणे, ‘दे त्यायले.’
म्या म्हटलं, ‘घ्या साहेब. बच्चूभाऊ बोलतो म्हणते तुमच्याशी.’
म्या लय हुशार होतो. स्पीकर उघड केला. काय म्हणते आयकू यायले.
मग भाऊ बोलले त्यायले,
‘हॅलो, बच्चू कडू बोलतो. हां, तो कार्यकर्ता हाय माया, सोडा त्याले जाऊ द्या.’
बस बावा, भाऊच्या एका फोनमध्ये सोडलं त्याईने. तेव्हा कुठं अमरावती पोचलो.
दवाखान्यात गेलो बा. देलं मग रक्त बँकेत. दोस्तांच्या बापाचं काम जमलं. मग ते करून गावात आलो. वेळ तं लैच झाला होता, म्हणून अंतिम थोडशा शिव्या खाऊन घेतल्या; पण काम झालं म्हणून समाधान वाटे.
मग संध्याकाळी गावात पोचलो. ज्याची गाडी नेली होती, त्याची त्याले वापस करून दिली.
संध्याकाळी गावातील चौकात साऱ्या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र बसून इकडच्या-तिकडच्या गोष्टी फाकडत बसतो. म्हणजे साऱ्या भोपाल्या गोष्टी. तवा समजलं का ‘नांदगाव एमआयडीसीमध्ये वीज तयार करणारा मोठा कारखाना येणार आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणातलं शेतकऱ्याचं हक्काचं पाणी विकल्या जाईल त्या कंपनीले.’
दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच आमदारांचं स्टेटमेंट छापून आलं होतं पेपरात; पण बच्चूभाऊचं फक्त वेगळं छापून आलं. ते असं होतं, ‘शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर प्रहार आंदोलन करेल – बच्चू कडू’
मी बातमी वाचूनच खूश झालो होतो का, लै दिवस झाले बा एखादं आंदोलन नाही झालं; पण होणार वाटते बा. म्या लावला संजुभाऊले फोन. त्यायले सांगातलं,
‘भाऊ अशी अशी बातमी आली पेपरात. खरी हाय काय?’
संजुभाऊ म्हणे, ‘हव, खरी आहे. लवकरच याबाबत मीटिंग होणार आहे आपली.’
मग म्या म्हटले, ‘भाऊ, मले मीटिंगले नेजा. मले पाहू द्या आंदोलन कसं तयार होत असते ते.’
संजुभाऊ लै गोड माणूस. एकदम मस्त. मले म्हणे, ‘हव, सांगतो तुले.’
मग एक दिवस संजुभाऊ तिवस्यात आले. माया दुकानाच्या जवळ.
म्हणे, ‘चालतं ना रे मीटिंगले?’
मी लै खूश झालो अन् गेलो भाऊसोबत. अमरावतीच्या मीटिंगले.
पोहोचलो बा रेस्टहाऊसवर. तिथं होती मीटिंग. बम गर्दी होती. सारेच महत्त्वाचे नेते, कार्यकर्ते होते. त्यात मी बी होतो. मी लै दूर बसलो. कारण मले काही बाकी जास्त समजत नव्हतं. ते लोक बसले गोष्टी करत. असं करू, तसं करू.. करत करत शेवटी बच्चूभाऊ उभे झाले आणि आंदोलनाची तारीख अन ते कसं कराचं, हे सांगून थेट घोषणा करून टाकली. मी मीटिंगच्या शेवटी कोपऱ्यात होतो बसून. म्या जसं ऐकलं आंदोलन करायचं पक्कं झालं, तेव्हा उठलो धाडकन आणि जोऱ्यांत नारा देला, ‘बच्चूभाऊ अंगार है, बाकी सब भंगार है…!’
आंदोलन कसं तयार होतं. ते तं पायला मिळालं. आता उत्सुकता थेट आंदोलनाची!
(क्रमशः)
*
वाचा
कार्यकर्ता
समाजकारण
कथा
कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
राज माहोरे हे प्रहार संघटनेचे तिवसा तालुका प्रमुख असून गेल्या वीस वर्षांपासून ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते ना. बच्चू कडू यांचे विश्वासू कार्यकर्ते असून सामाजिक व राजकीय उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
आंदोलन कस तयार होत ?उत्सुकता ताणली गेलीय.अंगार – भंगार फरक वाचायला आवडेल.
धन्यवाद.. नक्कीच पुढील भागात वाचता येईल